कारवार म्हटलं की आठवतो तो सुंदर समुद्रकिनारा, त्यामुळे या महोत्सवाची सजावटही सागरकिनाऱ्यावर बेतलेली आहे. समुद्र, रंगीबेरंगी मासे, वाळू, शंखशिंपले अशा वातावरणात बसून चविष्ट कारवारी भोजनाचा आस्वाद घेण्याचा अनुभव यावेळी आपल्याला मुंबईत घ्यायला मिळणार आहे ते पण आठवडाभर. मुंबईतील अंधेरीमधील कोहिनूर कॉंटिनेंटलमधील ‘सॉलिटेअर रेस्टॉरंट’मध्ये कारवारी खाद्यमहोत्सव सुरू झालाय. या फेस्टिव्हलमध्ये मास्टरशेफ माधवी कामत यांच्या हातची अस्सल कारवारी चव खवय्यांना चाखायला मिळत आहे. या महोत्सवात, सुमारे 40 विविध कारवारी खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. कारवार म्हटलं की, पदार्थांमध्ये सर्वात महत्त्वाची चव म्हणजे नारळाची अर्थात खोबऱ्याची. धणे, चिंच, खोबरं आणि लाल मिरची असा मसाला वापरून हे पदार्थ तयार करण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे हा मसाला तुम्ही बनवून ठेऊ शकत नाही. तर कधी भाजून तर कधी काही पदार्थांमध्ये कच्चा मसाला वापरून तुम्हाला याची विविध चव मिळते. केवळ पदार्थांची चवच नाही तर इथलं वातावरणदेखील पूर्ण कारवारी करण्यात आलं आहे. इथले वाढपीदेखील तुम्हाला कारवारी वेषातच जेवण वाढतात. त्यामुळे अगदी वेगळाच अनुभव येतो.
भात आणि मासे हे मुख्य अन्न
कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेला, विशाल सागर किनाऱ्यांनी वेढलेला, एक सुंदर टुमदार भाग कारवार. इथल्या समुद्राप्रमाणेच कारवारी माणसं विशाल मनाची आणि प्रेमळ म्हणून प्रसिद्ध आहेत. भात आणि मासे हे येथील मुख्य अन्न असले तरी येथील विविध प्रकारच्या माशांच्या कढी निश्चितच चाखाव्यात अशा असतात. कारवारी पदार्थांची खरी ओळख म्हणजे साधे पण रस्सेदार दिसायला विविधरंगी खाद्यपदार्थ. नारळ, भात आणि मासे या तीन पदार्थांशिवाय कारवारी भोजन पूर्णच होत नाही. मुंबईमध्ये कारवारी लोक भरपूर आहेत. पण प्रत्येकाला कारवारी जेवण करता येतंच असं नाही असं शेफ माधवी कामत यांनी सांगितलं. माशांचे विविध प्रकार आणि मसाला एकच असला तरीही त्याला येणारी वेगळी चव ही कारवारी मेजवानीची खासियत आहे. खरं तर चिकन आणि खेकडे हे प्रकारदेखील या मसाल्यांमध्ये अगदी वेगळे लागतात.
सुरकुंड्या हा गोडधोडाचा वेगळा प्रकार
आपल्याकडे पुरणपोळी सर्वांनाच आवडते. पण कारवारकडे पुरणाचा एक वेगळा गोड प्रकार आहे ज्याचं नाव आहे सुरकुंड्या. पुरण करून मैद्याच्या आवरणात मोदकाप्रमाणे भरायचा असतो. आणि मग तो भाजून त्यावर गरम असताना तूप घालून खायचा. अर्थात हा खाताना येणारा स्वाद अप्रतिम लागतो. शिवाय पुरणपोळी इतके कष्ट हा पदार्थ करताना लागत नाहीत असं यावेळी शेफ माधवी कामत यांनी सांगितलं. ही कारवारी मेजवानी 7 एप्रिलपर्यंत मुंबईमध्ये चालू राहणारच आहे. पण खास ‘POPxo Marathi’ च्या वाचकांसाठी कारवारी पदार्थांची रेसिपीदेखील आम्ही घेऊन आलो आहोत.
वाचा – महाराष्ट्रात मिळणाऱ्या ठसकेबाद नॉन व्हेज थाळी
1. वेलकम ड्रिंक पानक (Panak)
कारवारमधील हे आगळंवेगळं वेलकम ड्रिंक आहे. कोकणामध्ये जे पन्हं केलं जातं त्याचप्रमाणे त्याची चव लागते. पण ही करण्याची पद्धत अतिशय सोपी असून यामध्ये वापरण्यात येणारे पदार्थ हे नेहमी घरात असतात.
साहित्य आणि कृती –
पाण्यात गूळ, वेलची पावडर, लिंबू, किंचित आलं आणि काळी व पांढरी मिरी क्रश करून टाकायची आणि मस्तपैकी फ्रिजमध्ये थंड करून हे गारेगार पानक प्यावं.
2. बटाट्याचे तळासन
अचानक घरी पाहुणे आल्यानंतर आपली देखील खूप वेळा गडबड होते. नक्की काय करायचं आता जेवायला असा विचार येतो. कारवारी पद्धतीची अशी बटाट्याची भाजी हा त्यावर अप्रतिम उपाय आहे. करायलाही सोपी आणि चवीलाही मस्त
साहित्य आणि कृती –
बटाट्याचे उभे काप करून घ्यायचे. जास्त बारीक अथवा जास्त जाडसर नसावेत. त्यानंतर एका कढईत नारळाचं तेल घालून तापल्यावर त्यामध्ये मोहरी, सुक्या मिरच्या, थोडी उडदाची डाळ, मेथीचे दाणे आणि जिरं घालून तडतडल्यावर कडिपत्ता घालायचा. मग बटाट्याच्या फोडी त्यात घालाव्यात. एक वाफ काढून घेतल्यावर त्यात मीठ, हळद आणि हिंग आणि मिरची पावडर घालावी आणि पुन्हा वाफ काढावी. गरमागरम बटाटा तळासन तयार.
3. तिसऱ्या आमटी अर्थात शिंपल्याची आमटी
घरामध्ये नेहमी माशांचे विविध प्रकार बनवले जातात. त्यामध्ये तिसऱ्या अर्थात शिंपले बनवण्याचे विविध प्रकार असतात. भाताबरोबर ही आमटी अप्रतिम लागते. त्याची रेसिपी जाणून घेऊया
साहित्य आणि कृती –
धणे तेलात भाजून घेणे. ग्रेटेड कोकोनट, भाजलेले धणे, बेडगी मिरची, लांबट कापलेली कैरी, चिंच (कैरी आंबट असल्यास चिंच घालू नये) हे सर्व मिश्रण त्यामध्ये थोडी हळद घालून ते मिक्सरमधून वाटून घेणे आणि मसाला करून घेणे. जितकं बारीक वाटणार त्याला चव जास्त चांगली येणार. दुसऱ्या बाजूला कांदा भाजून घेणे. नारळाच्या तेलामध्ये कांदा फ्राय करून घेणं. तर शिंपल्या हे कव्हरसकट तसंच ठेवायचे. हे सर्व मिश्रण घालून हे सर्व आमटीप्रमाणे उकळून घेणे. त्यात चवीनुसार मीठ घालणे आणि तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे आंबट तुम्ही करू शकता.
फोटो सौजन्य – Kohinoor Continental
हेदेखील वाचा –
दररोज काहीतरी नवीन स्वयंपाक करण्यासाठी ट्राय करा या ‘टॉप 25’ भारतीय डिनर रेसिपीज
तुमचा नाश्ता हेल्दी आणि टेस्टी बनवा ‘ह्या’ रेसिपीजने
सकाळचा नाश्ता न केल्यास होऊ शकतात हे साईड इफेक्ट्स