मोठ्या माणसांचं इनफेक्शन आणि लहान मुलांचे इनफेक्शन यात खूप फरक असतो. कारण मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांची प्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे वातावरणात बदल झाल्यावर, नवीन जागी गेल्यावर, भरपूर लोकांमध्ये गेल्यावर, नीट काळजी न घेतल्यास लहान मुलांना सर्दी, खोकला आणि ताप पटकन येऊ शकतो. प्रत्येक वेळी सर्दी खोकला झाल्यावर मुलांना कफ सिरप अथवा औषधंच द्यायला हवं असं मुळीच नाही. कधी कधी घरातील काही साधे उपाय करूनही मुलांचा सर्दी खोकला बरा होऊ शकतो. जर मुलांना सर्दीचा खूप त्रास होत असेल तर वैद्यकीय मदत घ्यायलाच हवी. शिवाय काही घरगुती उपाय करूनही मुलांना पटकन आराम मिळू शकतो. यासाठीच जाणून घ्या मुलांच्या सर्दी खोकल्यावर उपाय – Lahan Mulanchya Sardi Khokla Sathi Upay कसे करावे. तसंच वाचा मोठ्यांसाठी सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय, बाळाची काळजी कशी घ्यायची (Navjat Balachi Kalji In Marathi), बाळाची शी ची जागा लाल होणे उपाय, बाळाची काळजी कशी घ्यायची (Navjat Balachi Kalji In Marathi), बाळाची शी ची जागा लाल होणे उपाय
Table of Contents
लहान मुलांना सर्दी-खोकला होण्याची कारणे आणि लक्षणे
एक पालक म्हणून मुलांना आजारी पडताना पाहणं नक्कीच कठीण असू शकतं. यासाठी प्रत्येक पालकांना लहान मुलांना होणाऱ्या सर्दी खोकल्याची कारणे आणि लक्षणे माहीत असायला हवीत.
लहान मुलांना सर्दी-खोकला होण्याची कारणे
लहान मुलं सर्दी खोकला अथवा ताप आल्यास चिडचिडी होतात. यासाठी जाणून घ्या लहान मुलांना सर्दी खोकला येण्यामागची कारणे
- वातावरणातील बदल हा लहान मुलांना सर्दी खोकला होण्यामागे महत्त्वाचं कारण असू शकतं. वातावरणामध्ये पावसाळा अथवा हिवाळ्यामुळे थंडावा निर्माण झाला की लहान मुलांना सर्दी खोकला होतो.
- सर्दी अथवा खोकला हे संसर्गजन्य आजार असल्यामुळे जर सर्दी खोकला झालेल्या इतर मुलांसोबत खेळण्यामुळे लहान मुलांना पटकन सर्दी खोकला होऊ शकतो.
- घराबाहेर पडल्यावर इनफेक्शन झालेल्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे, खेळणी अथवा वस्तूंना स्पर्श झाल्यामुळेही लहान मुलांना सर्दी खोकला होऊ शकतो.
- तुमच्या मुलांना जर धुळ अथवा इतर गोष्टींची अॅलर्जी असेल तर अशा गोष्टी संपर्कात आल्यामुळे त्यांना इनफेक्शन होऊन सर्दी खोकला होऊ शकतो.
- लहान मुलांच्या आहाराबाबत असलेल्या चुकीच्या गोष्टींमुळेही त्यांना सर्दी खोकला होऊ शकतो. जसं की काही मुलांना थंड पदार्थ, आइस्क्रीम, उघड्यावरचे पदार्थ, तेलकट पदार्थ खाण्यामुळे सर्दी खोकला होऊ शकतो.
लहान मुलांना सर्दी-खोकल्याची लक्षणे
या लक्षणांवरून तुम्ही लहान मुलांना सर्दी खोकला झालेला हे ओळखू शकता.
- नाक गळणे
- नाक चोंदणे
- सतत शिंका येणे
- डोकेदुखी
- अंगदुखी
- घसा खवखवणे
- घसा दुखणे
- सतत खोकला येणे
- भुक कमी लागणे
- थकवा
- सौम्य ताप
- उलटी आणि मळमळ
लहान मुलांमधील सर्दी-खोकला किती वेळ राहतो
लहान मुलांची प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे त्यांना वातावरणातील बदल, आहारातील बदल अथवा इतर लोकांच्या संसर्गामुळे वारंवार सर्दी खोकला होण्याची शक्यता असते. तान्ह्या बाळालाही वर्षभरात चार ते पाच वेळा सर्दी खोकला होऊ शकतो. याचे कारण सर्दी खोकल्याचे शेकडो विषाणू वातावरणात असतात जे तुमच्या लहान बाळाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना इनफेक्शन होऊ शकते. लहान बाळाला साधारणपणे चार ते पाच दिवस सर्दी खोकला असू शकतो. जास्त इनफेक्शन असेल तर दोन आठवडे सर्दी खोकला असणं सामान्य आहे. मात्र त्यापेक्षा जास्त दिवस जर तुमच्या बाळाला सर्दी खोकला असेल तर याबाबत वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. जर बाळाला वारंवार सर्दी खोकला होत असेल तर फार चिंता करण्याचे कारण नाही. कारण लहान बाळ जस जसं मोठं होऊ लागतं तस तशी त्याची प्रतिकार शक्ती वाढू लागते. त्यामुळे पुढे भविष्यात सर्दी खोकला होण्याचे प्रमाणही कमी होत जाते. डॉक्टर बाळाच्या प्रकृतीनुसार त्याला वर्षाचे, पाच वर्षाचे होईपर्यंत काही औषधे देतात जी तुम्ही सर्दी खोकला झाल्यावर बाळाला देऊ शकता.
लहान मुलांच्या सर्दी-खोकल्यावरील घरगुती उपाय
काही घरगुती उपचार करूनही लहान मुलांचा सर्दी खोकला बरा करता येतो. यासाठी जाणून घ्या हे घरगुती उपचार
आराम – Rest
मुलं सर्दी खोकल्यामध्ये जितका वेळ अॅक्टिव्ह असतील तितका त्यांना जास्त त्रास होतो. त्यामुळे सर्दी खोकला झाल्यावर मुलांना जास्तवेळ खेळू देऊ नका. शिवाय घराबाहेर खेळण्यास पाठवलं तर तुमच्या मुलांचे इनफेक्शन इतर मुलांमध्ये पसरू शकते. म्हणूनच सर्दी खोकला झाल्यावर मुलांना जास्तीत जास्त घरातच आराम मिळेल याची काळजी घ्या. घरात जर मुलांसाठी आरामदायक आणि शांत वातावरण असेल तर त्यांना लवकर बरं वाटू शकतं. झोप आणि आराम केल्यामुळे मुलांची प्रतिकार शक्ती वाढते. ज्यामुळे त्यांना सर्दी खोकल्यावर मात करण्यास शारीरिक ऊर्जा मिळते. आराम केल्यामुळे सर्दी खोकल्यावर घेतलेली औषधे लवकर परिणाम करतात. म्हणूनच शक्य असेल तितका वेळ मुलांना झोपू द्या.
पुरेसं हायड्रेशन – Adequate Hydration
सर्दी, खोकला अथवा तापामुळे मुलं डिहायड्रेट होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मुलं लवकर बरी व्हावीत यासाठी त्यांना जास्तीत जास्त हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. पाणी पिण्यामुळे कफ पातळ होण्यास मदत होते आणि फुफ्फुसांमध्ये कफ पसरत नाही. यासाठी या काळात मुलांना कफ पातळ होईल असा काढा, कोमट पाणी, सूप, पेज, भरडी असे पदार्थ पिण्यास द्या. आजारपणात मुलांना खाण्याची इच्छा नसते मात्र कोमट जलयुक्त पदार्थ पिण्यास सोपे असतात. ज्यामुळे ते पाणी अथवा पेय पिण्याचा कंटाळा करत नाहीत.
कुल मिस्ट ह्युमिडीफायर – Cool Mist Humidifier
वातावरणात झालेल्या बदलांमुळे मुलांना सर्दी खोकल्याचा त्रास होत असतो. अशा वेळी थंड अथवा गरम असे वातावरणात बदल होणं मुलांसाठी त्रासदायक ठरू शकतं. म्हणूनच सर्दी खोकला झाल्यावर मुलांच्या खोलीत कुल मिस्ट ह्युमिडीफायर बसवलेला असावा. ज्यामुळे मुलं झोपल्यावर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत नाही आणि त्यांना शांत झोप लागते.
मिठाच्या पाण्याच्या गुळण्या – Salt Water Gargle
सर्दी खोकल्यामुळे घशाला इनफेक्शन होते आणि घसा खवखवू लागतो. मोठी माणसं हा त्रास समजू शकतात आणि सहन करू शकतात. मात्र लहान मुलांना घसा दुखू लागल्यास सहन होत नाही ज्यामुळे ती मोठ्याने रडू आणि चिडू लागतात. असं केलं तर त्यांचा घसा अधिकच दुखू शकतो. म्हणूनच मुलांना मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यास द्यावा. ज्यामुळे घशाला आराम मिळतो आणि मुलांना बरं वाटू लागतं.
सक्शन बल्ब – Suction Bulb
लहान मुलं घरात असतील तर तुमच्या घरात सक्शन बल्ब असणं अतिशय गरजेचं आहे. कारण लहान मुलांना सुरुवातीच्या काळात नाक कसं स्वच्छ करावं हे समजत नाही. सर्दी खोकला झाल्यावर नाकात जमा झालेल्या कफ आणि सर्दीमुळे मुलं अस्वस्थ होतात. अशामुळे छातीत कफ जास्त प्रमाणात जमा होत जातो. त्यामुळे लहान मुूलाचे नाक स्वच्छ करण्यासाठी तुमच्याजवळ सक्शन बल्ब असायला हवा.
स्पंज बाथ – Sponge bath
सर्दी खोकला झाल्यावर मुलांना अंघोळ घालणं कठीण असतं. कारण जर तुमचं बाळ खूप लहान असेल तर त्याला अंघोळ घालताना सर्दी खोकल्याचा जास्त त्रास होऊ शकतो. नाकातोंडात पाणी गेल्यामुळे बाळ गुदमरू शकतं. यासाठी या काळात शक्य असल्यास मुलांना अंघोळ घालू नये. पण मुलांची शारीरिक स्वच्छता राखण्यासाठी त्यांना स्पंज बाथ घालण्यास काहीच हरकत नाही. अशा वेळी कोमट पाण्याने मुलांचे अंग पुसून घ्यावे.
वाफ देणे – Steam
वाफ देणे हा सर्दी मध्ये आराम देणारा एक चांगला नैसर्गिक उपचार आहे. यासाठी लहान मुलांना सर्दी पातळ होऊन श्वास घेणे सोपे जावे यासाठी गरम पाण्याची वाफ द्यावी. वाफ घेण्याच्या स्टीमरमध्ये पाणी गरम करून ठराविक अंतरावरून मुलांना वाफ चेहऱ्यावर वाफ द्यावी. मात्र वाफ नेहमी मोठ्या माणसांच्या देखरेखीखालीच द्यावी. कारण जर तुमचे लक्ष नसेल तर वाफेमुळे मुलांचा चेहरा पोळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी स्वतः सावधपणे मुलांना वाफ द्यावी.
मधाचे चाटण – Honey
लहान मुलं असलेल्या घरी सर्दी खोकला झाल्यावर सर्वात पहिला केला जाणारा घरगुती उपाय म्हणजे मधाचे चाटण. यासाठी जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर सेंद्रिय मध असायलाच हवी. कारण मधामध्ये अॅंटि व्हायरल गुणधर्म असल्यामुळे मुलांचा खोकला लवकर बरा होतो. खोकला सुरू होताच मुलांना मधात चिमूटभर हळद मिसळून त्याचे चाटण मुलांना चाटण्यास द्यावे. ज्यामुळे नैसर्गिक पद्धतीने मुलांचा खोकला बरा होतो.
हलका आहार – Soft Foods
सर्दी खोकला झाल्यावर मुलांना तेलकट, चमचमीत अथवा फास्ट फूड असे पदार्थ खाण्यास देऊ नयेत. कारण यामुळे खोकला वाढून सर्दी-खोकल्याचा त्रास जास्त होण्याची शक्यता असते. म्हणूनच या काळात मुलांना हलका आहार द्यावा. वरण भात, पेज, सूप, पोळी भाजी, खिचडी असे सात्विक आणि पौष्टिक पदार्थ मुलांना खाण्यास देण्यास काहीच हरकत नाही.
लहान मुलांना सर्दी खोकला होऊ नये म्हणून घ्यायची काळजी
लहान मुले सर्दी खोकल्यामुळे वारंवार आजारी पडू नयेत यासाठी काही गोष्टींबाबत पालकांना जाणिवपूर्वक सावधगिरी बाळगायला हवी.
- लहान मुलांना इनफेक्शन होऊ नये यासाठी सतत वीस सेकंद स्वच्छ हात धुण्याची सवय लावावी. कोणतीही गोष्ट खाण्यापूर्वी, टॉयलेटमधून बाहेर येताना, घरात आल्यावर आणि झोपण्यापूर्वी त्यांना हात पाय स्वच्छ धुण्यास सांगावे
- सर्दी खोकला आल्यास रुमालाचा वापर करण्यास आणि हात तोंडावर ठेवून मगच शिंकण्याची सवय लावावी.
- शेअरिंग कितीही चांगले असले तरी साथीचे आजार पसरलेले असताना तुमच्या मुलांना इतर मुलांच्या वस्तू वापरू देऊ नयेत.
- घराबाहेर जाताना मुलांना स्वतःचा खाऊ आणि पिण्याच्या पाण्याची बाटली जवळ बाळगण्यास शिकवावे.
- मुलांना घराबाहेर असताना सॅनिटायझरचा वापर करणे किती गरजेचे आहे हे शिकवावे.
- मुलांना पौष्टिक आणि हलका आहार खाण्यास द्यावा, साथीचे आजार सुरू असताना फास्ट फूड अथवा इतर अपथ्यकारक पदार्थ खाऊ देऊ नयेत. ज्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती वाढेल.
- मुले पावसात भिजल्यास त्यांना लगेच कोरडे करावे
- आठवड्यातून एकदा मुलांना सर्दी खोकल्यावर प्रतिबंध करणारा आणि प्रतिकार शक्ती वाढवणारा काढा द्यावा. वाचा आयुर्वेदिक काढा रेसिपी (Kadha Recipe In Marathi)
- मुलांना नेहमी घरातील उकलेले पाणी पिण्यास द्यावे.
- मुलांचे कपडे आणि इतर वस्तू नेहमी स्वच्छ आणि निर्जंतूक राहतील याची काळजी घ्यावी.
- मुलांना थंड पदार्थ खाण्यास देऊ नयेत.
- मुले पुरेशी झोप घेतील याची काळजी घ्यावी.
लहान मुलांना सर्दी खोकला आणि निवडक प्रश्न – FAQs
प्रश्न – लहान मुलांमधील सर्दी-खोकला गंभीर आहे की नाही कसं ओळखावं ?
उत्तर – मुलांमध्ये सर्दी खोकल्याची लक्षणे ही सौम्य स्वरूपाची असतील तर फार काळजी करण्याचे कारण नाही. योग्य काळजी आणि घरगुती औषधांनी सर्दी खोकला काही दिवसांमध्ये बरा होऊ शकतो.
प्रश्न – लहान मुलांना सर्दी-खोकला झाल्यास डॉक्टरांना कधी दाखवावं ?
उत्तर – लहान मुलांमध्ये प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे त्यांना वारंवार सर्दी खोकला होण्याची शक्यता असते. पण जर मुलांना सर्दी खोकल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असेल अथवा तीव्र ताप आला असेल तर त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्यावा.
प्रश्न – लहान मुलांना सर्दी खोकला फक्त घरगुती उपाय करून बरा होतो का ?
उत्तर – लहान मुलांना असलेल्या सर्दी खोकल्याची लक्षणे सौम्य स्वरूपाची असतील तर घरातच उपचार करून सर्दी खोकला बरा होऊ शकतो. मात्र जर तीव्र लक्षणे असतील तर मुलांना त्वरित डॉक्टरांकडे न्यावे.
Conclusion – लहान मुलं आजारी पडली की पालक खूप चिंताग्रस्त होतात. कारण लहान मुलांना आजारपण सहन करणं कठीण जातं. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेले लहान मुलांच्या सर्दी खोकल्याची कारणे,लक्षणे आणि लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर उपाय कसे वाटले हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा.