कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी अनेक महिने मालिकांचे शूटिंग बंद होते. मात्र आता अनलॉक 2 सुरू झाल्यामुळे अनेक मालिकांना पुन्हा आपले चित्रीकरण सुरू करण्यास परवानगी मिळवली आहे. त्यानुसार काही मराठी मालिकांच्या शूटिंगला सुरूवातही झाली. आता प्रेक्षकांना पुन्हा आपल्या आवडत्या मालिकांचे फ्रेश एपिसोड पाहता येणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जुने एपिसोड पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकांसाठी ही एक नक्कीच खुशखबर आहे. मात्र आता माझ्या नवऱ्याची बायको या मराठी लोकप्रिय मालिकेत एक मोठा बदल होणार आहे. या मालिकेतील अनेकांचे आवडते पात्र म्हणजे ‘शनाया’ खरंतर शनायामुळेच या मालिकेला नेहमी चांगलाच टीआरपी मिळत असतो. या मालिकेतील शनायाची सगळीकडे नेहमी चर्चा असते. मात्र या मालिकेतील शनाया पु्न्हा बदलली जाणार आहे. त्यामुळे आता या मालिकेतील नवी शनाया कोण हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.
या कारणासाठी लॉकडाऊन नंतर पुन्हा बदलली ‘शनाया’
माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त पाहिली जाणारी मालिका आहे. या मालिकेच्या सुरूवातीला अभिनेत्री रसिका सुनील हिने ‘शनाया’ची भूमिका साकारली होती. रसिकाने साकारलेली ‘शनाया’ निगेटिव्ह कॅरॅक्टर असूनही प्रेक्षकांना फारच भावली. मात्र रसिकाला शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळाली आणि तिने या मालिकेला रामराम ठोकला. तिच्यानंतर अभिनेत्री ईशा केसरकरने ही भूमिका साकारली. मात्र आता ईशालाही ही मालिका सोडावी लागली आहे. याचं कारण खुद्ध इशानेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून स्पष्ट केलं आहे.
ईशाला या कारणासाठी सोडावी लागली मालिका
अभिनेत्री ईशा केसरकरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका सोडण्याचं कारण सांगितलं आहे. लॉकडाऊन संपल्यावर लगेचच ती मालिकेच्या शूटिंगला सुरूवात करणार होती. यासाठी तिने नाशिकला शूटिंगसाठी जाण्याची तयारी देखील केली होती. मात्र अचानक तिला अक्कलदाढेचं दुखणं निर्माण झालं. ज्यामुळे तिच्या अक्कलदाढेचं ऑपरेशन करावं लागलं. सर्वांना माहीत असेलच अक्कलदाढेचं दुखणं आणि ऑपरेशन हे फारच कठीण आणि वेदनादायी असतं. या दुखण्यामुळे ईशा शूटिंगसाठी नाशिकला जाऊ शकली नाही. ज्यामुळे तिला ही मालिका सोडावी लागली असं तिचं म्हणणं आहे. सध्या ईशासाठी तिची तब्येत महत्त्वाची आहे. ज्यामुळे तिने घेतलेल्या या निर्णयासाठी प्रेक्षक तिची नक्कीच साथ देतील असं तिला वाटत आहे.
आता कोण साकारणार शनायाची भूमिका
ईशाला आरोग्यासाठी माझ्या नवऱ्याची बायकोच्या शूटिंगला जाणं शक्य नाही हे तर आता स्पष्ट झालं आहे. मात्र मनोरंजन विश्वातील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ‘शो मस्ट गो ऑन’ आता जर शो सुरू ठेवायचा असेल तर नव्या शनायाचा शोध घेणं निर्मात्यांना भाग आहे. ईशाने मालिका सोडल्यानंतर रसिका सुनील पुन्हा या मालिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना त्यांची जुनी शनाया पुन्हा दिसण्याची शक्यता आहे.
शनाया बदलण्याचा हा जुना खेळ प्रेक्षकांना आवडणार का
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचं शूटिंग नाशिकमध्ये सुरू झालं आहे. पूर्वी या मालिकेचं शूटिंग ठाण्यामध्ये होत असे. मात्र सध्या ठाणे कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे ठाण्यात या मालिकेचं शूटिंग होणं सध्यातरी शक्य नाही. म्हणूनच या मालिकेचं शूटिंग नाशिकच्या ईगतपुरीला करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही मुख्य कलाकारांच्या साथीने हे शूटिंग सुरू करण्यात आलं आहे. कलाकारांना सुरक्षेसाठी नाशिकमध्ये राहून या मालिकेचं शूटिंग करावं लागणार आहे. यामुळे काहीच दिवसांमध्ये प्रेक्षकांना त्यांची ही आवडती मालिका पुन्हा पाहता येणार आहे. मात्र शनायाच्या भूमिकेत झालेला हा बदल प्रेक्षकांना आवडणार की नाही हे मालिका सुरू झाल्यावरच समजेल.
अधिक वाचा –
लॉकडाऊनमध्ये या टीव्ही अभिनेत्याने गुपचूप केले लग्न
अभिनेत्री अवनीत कौरची इमोशनल गुडबाय नोट, अलाद्दीन मालिकेमधून घेतली एक्झिट
सुझान खानने प्रियांकाला दिल्या शुभेच्छा ‘देसी गर्ल’ ठरतेय तिच्यासाठी प्रेरणा