महाराष्ट्रात साधारणपणे मार्च, एप्रिल, मे मध्ये लग्नाचे भरपूर मुहूर्त असतात. ज्यामुळे या काळाला ‘लग्नाचा सिझन’ असं म्हटलं जातं. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे हा लग्नाचा सिझन असाच निघून गेला. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली होती. ज्यामुळे अनेक लग्नसोहळे रद्द करण्यात आले अथवा पुढे ढकलण्यात आले. काहींनी तर अगदी साध्या पद्धतीने घरच्या घरीच लग्नसोहळे उरकले. ज्यामुळे यावर्षी लग्नसोहळ्याची तयारी, शॉपिंग, बॅंडबाजा, विधी अशा सर्व गोष्टींचा आनंद लुटताच नाही आला. लग्नाचा सिझन सुरू झाला की मालिका आणि चित्रपटांमध्येही यावर आधारित ‘स्पेशल एपिसोड’ दाखवण्यात येतात. मालिकांमधील भूमिकांमध्ये प्रेक्षक इतके समरस होतात की ते लग्नसोहळेदेखील त्यांना आपल्या घरचे वाटू लागतात. टीआरपी मिळवण्यासाठी मालिकांमध्ये यासाठी एक ते दोन तासांचे स्पेशल एपिसोडच प्रदर्शित केले जातात. ज्यामध्ये अगदी खऱ्याखुऱ्या लग्नाप्रमाणे सर्व विधी, मौजमजा आणि विविध कार्यक्रम दाखवले जातात. लॉकडाऊनमध्ये शूटिंग बंद असल्यामुळे यंदा हा आनंदही घरी बसून प्रेक्षकांना घेता नाही आला. मात्र आता पुन्हा शूटिंगला सुरूवात झाली आहे आणि लवकरच एक सेलिब्रेटी लग्नसोहळा प्रेक्षकांना घरी बसल्या अनुभवता येणार आहे.
कसा असेल हा लग्नसोहळा
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘तुझसे हे राबता’मध्ये रोमांचक कथानक आणि प्रमुख कलाकार रीम शेख (कल्याणी) आणि सेहबान अझीम (मल्हार) यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या दोघांना प्रेमाने ‘कलमा’ असे म्हटलं जातं. भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वांत लाडक्या जोड्यांपैकी ही एक लोकप्रिय जोडी आहे. लॉकडाऊन दरम्यान टेलिव्हिजनपासून ही मालिका आणि त्यांतील पात्र नक्कीच दूर होते. पण आता नवीन वळणांसह गोड प्रेम कथा घेऊन ही मालिका प्रेक्षकांसमोर येण्यास पुन्हा सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे यात ‘कलमा’सोबतच आता आणखी एक नवीन जोडी कॅमिओ अपीअरंस करताना दिसून येणार आहे. सनम जोहर आणि अबिगेल पांडे या जोडीचा एक खास चाहता वर्ग आहे. ते दोघंही त्यांच्या जबरदस्त केमिस्ट्रीसाठी ‘टी-टाऊन’ मध्ये चर्चेत असतात. लॉकडाऊननंतर या मालिकेच्या नवीन एपिसोडचा ते एक भाग असणार आहेत. एवढंच नाही तर ‘तुझसे हे राबता’ या कथानकाचा भाग म्हणून सनम आणि अबिगेल लग्नाची शपथदेखील घेणार आहेत. मात्र हा मालिकेचा एक भाग असल्यामुळे त्यांच्या खऱ्या खुऱ्या लग्नासाठी मात्र चाहत्यांना अजून थोडी प्रतीक्षा नक्कीच करावी लागणार आहे.
शरद आणि प्रिया अडकणार लग्नबंधनात
लॉकडाऊन स्पेशल एपिसोडमध्ये कॅमिओ अपीअरंस करणारे सनम आणि अबिगेल या मालिकेत शरद आणि प्रिया ही जोडी साकारणार आहेत. या मालिकेतील नव्या भागात त्यांना लग्नाच्या ठिकाणी एका खोलीत क्वारंटाईन केलं जातं. या दोघांच्या प्रेमाचा आनंद साजरा करत राणे परिवारही त्यांच्या लग्नाचा एक हिस्सा होणार आहे. मालिकेतील असं हे असाधारण आणि नाट्यमय लग्न होत असताना आणखी बरेच जटील गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होणार आहेत. ज्यामुळे ते दोघं हे लग्न मोडण्याचा विचार करतात. पण मग कल्याणी, मल्हार, सार्थक, अनुप्रिया मिळुन शरद आणि प्रियाचा हा निर्णय बदलण्याचा प्रयत्न करतात का आणि त्यात ते यशस्वी होतात का हे या एपिसोडमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
लॉकडाऊन स्पेशल शूटिंगचा अनुभव
सनम आणि अबिगेल ही टेलिव्हिजनवरील एक हॉट आणि लोकप्रिय जोडी आहे. या मालिकेतील अनुभवाबद्दल सनम आणि अबिगेलने शेअर केलं की, “हा अनुभव अगदी खास होता आणि घरून काम करतानाही खूपच मजा आली. या अनुभवातून आम्ही खूप काही शिकलो आणि ‘तुझसे हे राबता’ परिवाराचा छोटासा बनताना आम्हाला खूपच आनंद होत आहे. आमची टीम आमच्यासाठी नेहमी खूप मेहनत घेत असते हे घरातून मोबाईल फोनवरून चित्रीकरण करत असताना आमच्या लक्षात आलं. ज्यामुळे आम्हाला त्यांची खरी किंमत नक्कीच लक्षात येत आहे. एवढ्या दीर्घ काळानंतर पुन्हा प्रेक्षकांसमोर येतानादेखील नक्कीच बरं वाटतंय. जेवढी मजा आम्हाला आली तेवढीच मजा प्रेक्षकांनाही हा एपिसोड पाहताना येईल अशी आम्हाला आशा आहे.”
ज्यामुळे लग्नाचा सिझन गेला तरी लग्नसोहळ्याची मजा मात्र एक प्रेक्षक म्हणून सर्वांना नक्कीच लुटता येणार आहे.
फोटोसौजन्य – इन्टाग्राम
अधिक वाचा –
‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत येणार छोटे शिवबा!
सुझान खानने प्रियांकाला दिल्या शुभेच्छा ‘देसी गर्ल’ ठरतेय तिच्यासाठी प्रेरणा
सुरक्षेची काळजी घेत ‘या’ मराठी मालिका पुन्हा चित्रीकरणासाठी सज्ज