सुरक्षेची काळजी घेत 'या' मराठी मालिका पुन्हा चित्रीकरणासाठी सज्ज

सुरक्षेची काळजी घेत 'या' मराठी मालिका पुन्हा चित्रीकरणासाठी सज्ज

कोरोनामुळे गेले तीन महिने सर्वजणलॉकडाऊन होते. सर्वसामान्यांप्रमाणेच या लॉकडाऊनमुळे सर्व सेलिब्रेटीदेखील घरीच असल्यामुळे गेले तीन महिने कोणत्याही मालिकेचं शूटिंग सुरू नव्हतं. मात्र आता अनलॉक 2 ची घोषणा होताच सर्वांनी आपलं जीवन पूर्ववत करायला सुरूवात केली आहे. अनलॉक दोनचा टप्पा सुरू झाला आणि मनोरंजन विश्वानेही नवा मार्ग स्वीकारत आपल्या कामाला सुरूवात केली. त्यामुळे सध्या प्रेक्षकांना त्यांच्या काही आवडत्या मालिका पुन्हा एकदा पाहता येणार आहेत. काही स्टुडिओज आणि गोरेगावच्या चित्रनगरीत  या मालिकांचे शूटिंग करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मात्र या सर्व सेटवर सामाजिक अंतर आणि कमीतकमी कर्मचार्‍यांसह मार्गदर्शक सूचनांचे अत्यंत काळजीपूर्वक पालन करावे लागणार आहे. तेव्हा शूटिंग सेटवर सर्वात आधी 'सेफ्टी' महत्त्वाची हा नियम सध्या पाळला जात आहे. 

जाणून घ्या मालिकांच्या सेटवर काय घेतली जात आहे खबरदारी

झी युवाच्या ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण, डॉक्टर डॉन  आणि प्रेम पॉयजन पंगा या तिन्ही मालिकांचं शूटिंग आता पुन्हा सुरु झालं आहे. यातील कलाकार देखील जवळपास बऱ्याच महिन्यांनंतर पुन्हा कामाला सुरुवात करत आहेत त्यामुळे सेटवर सध्या उत्साहाचे वातावरण आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून त्यांच्या फॅन्सनां ही खुषखबर देण्यास सुरूवात केली आहे. मात्र सेटवर मात्र हा उत्साह प्रत्येकाने स्वतःपुरताच मर्यादित ठेवला आहे. कारण शूटिंग करताना सुरक्षेची खबरदारी मात्र काटेकोरपणे पाळली जात आहे. कलाकारांच्या खोल्या, मेकअप रूम्स, स्वच्छतागृहे एवढेच नाही तर, चित्रीकरण केले जात असलेला संपूर्ण परिसर योग्यप्रकारे निर्जंतुक केला जात आहे. चित्रीकरण आणि नंतर लगेच निर्जंतुकीकरण असा दोन्ही कामांचा भन्नाट वेग सध्या प्रत्येक सेटवर पाहायला मिळत आहे.शूटिंग सुरू झाल्यावर प्रेम पॉयजन पंगा या मालिकेचा निर्माता आणि अभिनेता आदिनाथ कोठारेने त्याचं याबाबत मनोगत व्यक्त केलं, "चित्रीकरण जरी सुरु झालं असलं तरी आम्ही सेटवर योग्य ती खबरदारी घेतोय. कोरोना पासून वाचण्यासाठी सर्व नियम आणि अटींचं पालन करतोय, तसंच आम्ही सर्व युनिट मेंबर्सनां पीपीइ किट्स दिले आहेत. याचसोबत सेटवर 24 तास मेडिकल हेल्प आणि एक रुग्णवाहिका देखील आहे."

कलाकारांना सेफ्टीबाबत दिलं जात आहे मार्गदर्शन

काही प्रसिद्ध स्टुडिओ आणि गोरेगावच्या चित्रनगरीत ही पुन्हा शूटिंगची लगबग सुरू झाली आहे. मराठी टेलिव्हिजनवरील स्वराज्यजननी जिजामाता, स्वामिनी, बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकांनादेखील आता शूटिंगसाठी परवानगी मिळाली आहे. तर अग्गंबाई सासूबाईचं शूटिंगही लवकरच सुरू होणार आहे. या मालिकांचे शूटिंग सुरू असताना कलाकार आणि इतर मंडळींच्या शरीराचे तापनाम, रक्तदाब तपासला जाणार आहे. कलाकारांना सेटवर कोणती काळजी घ्यायची याबाबत वेळोवेळी मार्गदर्शनही केलं जाणार आहे. शूटिंगची ही लगबग पाहता प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिका आता पुन्हा पाहता येतील अशी आशा निर्माण झाली आहे. गेले तीन महिने तेच तेच एपिसोड पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकांना आता नवीन फ्रेश एपिसोड पाहण्याची उत्सुकता लागली आहे. कोरोनाच्या संकटावर मात करत मराठीप्रमाणेच हिंदी मालिका आणि चित्रपटांचे शूटिंगही लवकरच सुरू होईल आणि पूर्वीसारखा मनोरंजनाचा खरा तडका सर्वांना अनुभवता येईल.

हे ही वाचा -

#WomenisPower - निर्माता विकास गुप्ताने केली पहिली #pride पोस्ट

लॉकडाऊनमध्ये या टीव्ही अभिनेत्याने गुपचूप केले लग्न

होम डिलिव्हरी झालेल्या भाज्या पाहून अभिनेत्री जुही चावला संभ्रमात