टेलिव्हिजनवरील मालिका आणि प्रेक्षकांचे एक अतूट नाते असते. कारण दररोज पाहता पाहता या मालिकांमधील पात्रे कधी त्यांना त्यांच्या घरातील वाटू लागतात हे प्रेक्षकांनाही कळत नाही. हिंदी कॉमेडी मालिकांमध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने असंच प्रेक्षकांच्या मनावर मागील अनेक वर्षांपासून अधिराज्य गाजवलं आहे. आता या मालिकेत अनेक बदल झाले आहेत. या मालिकेमधील टप्पू सेना मोठी झाली आहे, सर्वांची लाडकी दयाबेन मालिकेतून गायब आहे तरीही या मालिकेवरचं प्रेक्षकांचं प्रेम कमी झालेलं नाही. आता या मात्र प्रेक्षकांचं कायम आणि निखळ मनोरंजन व्हावं यासाठी या मालिकेचं एनिमेशन व्हर्जन सूरू करण्याचा घाट निर्मात्यांनी घातला आहे.
आजही मालिकेची लोकप्रियता आहे कायम
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला एपिसोड 28 जुलै 2008 साली प्रसारित करण्यात आला होता. त्यानंतर तेरा वर्षांमध्ये या मालिकेचं आजवर जवळजवळ तीन हजारहून जास्त एपिसोड प्रसारित झाले आहेत. या मालिकेने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन तर केलंच पण प्रेक्षकांनीही या मालिकेला तितकंच डोक्यावर उचलून घेतलं. या प्रेमामुळेच ही मालिका आजवर सर्वात जास्त लोकप्रिय आणि टीआरपी मिळवणारी ठरली होती. आता ही मालिका एका नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. एनिमेशन स्वरूपात असलेल्या या मालिकेचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या प्रोमोजमध्ये दयाबेनचा गरबा आणि हे मॉं माता जी हे वाक्य चाहत्यांना खूपच आवडलं आहे. प्रोमोमध्ये बापूजी जेठालालवर चिडताना आणि रागवताना दाखवले आहेत. तर दुसरीकडे टप्पू त्याच्या सुपरमस्ती मुडमध्ये दिसत आहे. गोकुळधाम सोसायटी आणि टप्पूसेनाची धमालमस्ती तुम्ही देखील मिस करत असाल तर हे प्रोमोज पाहून तुम्हाला नक्कीच मौज वाटेल. खरंतर 2017 मध्ये दयाबेन साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी आई झाली आणि तिने मालिकेतून काढता पाय घेतला. मात्र चाहत्यांनी ती त्यानंतरही पुन्हा येईल आणि मालिकेतील रंगत वाढेल अशी आजवर आशा होती. निर्मातेही दिशाला परत आणण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. मात्र 2021 मध्येही दिशा तिच्या बाळाला सोडून मालिकेसाठी परत आली नाही. शिवाय कोरोनामुळेही या मालिकेच्या शूटिंगवर चांगलाच परिणाम झाला. या दरम्यान मालिकेमधील अनेक कलाकारांनी मालिकेला सोडचिठ्ठी दिली. मालिकेतील मुख्य पात्रांचे बदललेले चेहरे पाहून चाहते पुरते हिसमुसले होते. मात्र आता एनिमेशन स्वरूपात का होईना या मालिकेचा खरेखुरे स्वरूप पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. शिवाय लहान मुलांसाठी आणि पुढच्या पिढीसाठी ही एक मेजवानीच असणार आहे. प्रेक्षकांना आता ही एनिमेटेड मालिका सोनी वाहिनीवर सिरिजच्या स्वरूपात पाहायला मिळेल. तारक मेहता का उल्टा चष्माचं नवं एनिमेशन स्वरूप येत्याा एप्रिलपासून सुरू होणार आहे. आवडत्या पात्रांचे हे एनिमेशन स्वरूप पाहण्यास चाहते नक्कीच उत्सुक आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ चे कथानक
तारक मेहता का उल्टा चष्मा हे दुनिया ने ऊंधा चष्मा या साप्ताहिकातील एका कॉलमवर आधारित आहे. ही कथा आहे गोकुळधाम या सोसायटीमध्ये राहणाऱ्या विविध जातीधर्माच्या कुटुंबाची. जेव्हा एखाद्या सोसायटीत अशी विविध धर्माची कुटुंब गुण्यागोविंदाने एकत्र राहतात तेव्हा त्यांच्या दररोज घडणाऱ्या गोष्टींमधून कसे विनोदी किस्से घडतात हे यात दाखवण्यात आलेलं आहे. मुळ मालिकेमध्ये दिलीप जोशी, दिशा वकानी, शैलेश लोढा, मुनमुन दत्ता अशा अनेक कलाकारांनी काम केलेलं आहे. आता या सर्वांच्या भूमिका परत एकदा नव्याने एनिमेशनमध्ये पाहताना प्रेक्षकांना मजा येणार आहे.
फोटोसौजन्य – इन्साग्राम
अधिक वाचा –
अण्णा नाईकांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद…जाहिरातीने माजवली धूम
बोल्ड आणि ग्लॅमरस असूनही या अभिनेत्रींनी मालिकांमध्ये साकारली ‘आई’
अभिनेता विद्युत जामवालचा शिवशंकर अवतार, चाहत्यांनी दिली अशी प्रतिक्रिया