अभिनेता विद्युत जामवालचा शिवशंकर अवतार, चाहत्यांनी दिली अशी प्रतिक्रिया

अभिनेता विद्युत जामवालचा शिवशंकर अवतार, चाहत्यांनी दिली अशी प्रतिक्रिया

विद्युत जामवाल हा बॉलीवूडचा एक फिट अभिनेता आहे. विद्युत सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. त्यामुळे तो चाहत्यांसाठी नेहमीच त्याचे फिटनेस व्हिडिओ आणि अॅक्शन मूव्हजमधील फोटो शेअर करतो. त्याचे फोटो आणि त्याचं वर्क आऊट पाहून त्याच्याप्रमाणे शरीर यष्टी मिळवावी असं प्रत्येकालाच वाटू शकतं. जसा तो चित्रपटात अॅक्शन आणि सुपरफिट अवतारात दिसतो. तसाच तो त्याच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातही आहे. बऱ्याचदा विद्युत चाहत्यांना फिटनेस चॅलेंजही देताना आढतो. मात्र सध्या तो एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. विद्युतने नुकतंच त्याच्या सोशल मीडियावर त्याचा शिवशकंर लुक शेअर केला आहे. त्यामुळे हा त्याचा लुक त्याने का केला आहे याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली  आहे. विद्युत त्याच्या आगामी चित्रपटात भगवान शंकराची पौराणिक भूमिका साकारणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

शिवशंकर अवतारात विद्युत जामवाल

विद्युत जामवालने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक फॅन आर्ट् शेअर केलं आहे. या फॅन आर्टमध्ये विद्युत चक्क भगवान शंकराच्या अवतारात दिसत आहे. हे फॅन आर्ट पाहून चाहत्यांनी विद्युतच्या पोस्टवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. बघता बघता विद्युतचा ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र ही पोस्ट विद्युतच्या आगामी चित्रपटाची नक्कीच नाही. कारण त्याने या पोस्टसोबत शेअर केलं आहे की, "धन्यवाद @bbuukul... सध्या माझा हा एक आवडीचा फोटो आहे" याचाच अर्थ ज्या आर्टिस्टने विद्युतचा हा फोटो काढला आहे त्याचे त्याने आभार मानले आहेत. विद्युतचे हे फॅन आर्ट स्केच प्रकारातील असून ते चाहत्यांना खूपच आवडले आहे. ज्यामुळे त्याच्या पोस्टवर चाहत्यांनी हर हर महादेव असं लिहिण्यास सुरूवात केली आहे. शिवाय चाहत्यांनी विद्युतकडे विनंती केली आहे की लवकरच तू स्क्रिनवरही शिवशंकराची भूमिका साकारावी असं आम्हाला वाटत आहे. चाहते विद्युतसोबतच हे आर्ट तयार करणाऱ्या कलाकाराचेदेखील कौतुक करत आहेत. 

विद्युत आहे मार्शल आर्ट मास्टर -

विद्युत फिटनेस फ्रिकतर आहेच शिवाय तो कलरीपायट्टु या मार्शल आर्टमध्येही पारंगत आहे. कलरीपायट्टुला मार्शल आर्टची जननी असं म्हटलं जातं. कारण यातूनच अनेक प्रकारच्या मार्शल आर्टचे भाग बनवण्यात आलेले आहेत. विद्युत या कलेत मास्टर आहे. सोशल मीडियावर विद्युत या कलेचं दर्शन घडवणारे व्हिडिओ नेहमीच शेअर करत असतो. एवढंच नाही त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये या कलेची झलक पाहायला मिळते. विद्युतने साऊथ चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं होतं. फोर्स चित्रपटात त्याने जॉन अब्राहमच्या विरुद्ध व्हिलनचं काम केलं. त्यानंतर अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये त्याचे अॅक्शन मूव्ह्ज पाहायला मिळाले. विद्युत लवकरच सनक चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. या चित्रपटाचं प्रॉडक्शन विपुल शाह तर दिग्दर्शन कनिष्क वर्मा करत आहे. या चित्रपटात विद्युतची मुख्य भूमिका असेल. विद्युत पाचव्यांदा विपुल शाहसोबत काम करत आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झालं असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट एका सनकी माणसाची भावनात्मक बाजू मांडणारा असेल. यात विद्युतसोबत चंदन रॉय सन्याल, नेहा धुपिया आणि रूक्मिणी मैत्रा असणार आहेत.