‘फोडणी’ असा नुसता शब्द जरी ऐकला तरी डोळ्यासमोर येतो तो… फोडणीच्या भाड्यांतून येणारा चर्र चर्र असा आवाज, तडतडणारी जिरं आणि मोहरी, उड्या मारणारी मिरची, लसुण आणि कडीपत्ता, घरभर दरवळलेला फोडणीचा खमंग वास आणि त्या वासाने सडकून लागलेली भुक. डाळ, भाजी, ढोकळा, चटणी, कढी अशा अनेक खाद्यपदार्थांना फोडणी देिली जाते. ज्यामुळे त्या पदार्थांची लज्जत अधिकच वाढते. मात्र तुमच्या मनात असा कधी प्रश्न आला आहे का खाद्यपदार्थांना अशी खमंग फोडणी का बरं दिली जात असेल. जाणून घेऊया या फोडणीचं महत्व
फोडणी म्हणजे काय
फोडणी ही स्वयंपाक करताना वापरली जाणारी एक खास प्रक्रिया आहे. फोडणी देण्यासाठी फोडणी पॅन, छोटे पातेलं, पळी अथवा कढई अशा अनेक भांड्याचा वापर केला जातो. फोडणी वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. कधी गरम तेलात जिरं, मोहरी, मिरची टाकून ती तडतडू लागली की वरून डाळ, भाजी अथवा खाद्यपदार्थ टाकले जातात. कधी कधी वरून फोडणी देऊनही अन्न शिजवलं जातं. पद्धत कोणतीही असली तरी त्यामुळे खाद्यपदार्थांला विशेष चव येते. पूर्वीच्या काळी घरात तेल आणि मसाले नसले तरी दगडाची फोडणी दिली जायची. भांड्यात दगड तापवून त्यावर अन्नपदार्थ सोडले जायचे. फोडणी देण्याची ही प्रक्रियाच इतकी हटके आहे की त्यातून निर्माण होणारा सुंगधानेच तोंडाला पाणी आधीच सुटतं.
खाद्य पदार्थांना फोडणी का दिली जाते –
फोडणीचा खमंग वास तुमच्या पोटातील भुक वाढवतो. फोडणीसाठी जे विविध घटक वापरले जातात त्यांच्यामध्ये भुक वाढवण्याची क्षमता असते. फोडणी दिल्यामुळे जिरे, मोहरी, हिंग, मिरची, लसुण, कांदा, कडिपत्ता, मसाल्यांची चव त्या खाद्यपदार्थांमध्ये उतरते. फोडणी देण्यामुळे पदार्थ अधिक स्वादिष्ट आणि चटपटीत होतो. फोडणी देण्याची प्रत्येक घरची एक विशिष्ठ पद्धत असते. या पद्धतीनुसार प्रत्येक गृहिणीच्या हाताची चव बदलत असते. फोडणीसाठी लागणारे साहित्याचे प्रमाण आणि फोडणी टाकण्याची अचूक वेळ साधता आली की तुम्ही तुम्हाला हवे तसे चविष्ठ पदार्थ तयार करू शकता.
फोडणीचे आरोग्यावर होतात हे चांगले फायदे –
फोडणीने केवळ तुमच्या खाद्यपदार्थांची चव वाढत नाही तर तुमचे आरोग्यदेखील सुधारते.
- लसणाच्या वापरामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. ज्यामुळे लसणाच्या फोडणीचे पदार्थ खाण्यामुळे तुम्हाला सर्दी, खोकला, डोकेदुखी होत नाही.यासाठी पावसाळा अथवा हिवाळ्याच्या थंड वातावरणात बऱ्याचदा लसूणाची फोडणी देऊन पदार्थ तयार केले जातात.
- तिखट अथवा हिरवी मिरची फोडणीत टाकल्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
- जिरे, मोहरी आणि हिंगाची फोडणी देण्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते. खाद्यपदार्थ पचण्यासाठी त्या पदार्थाला फोडणी देण्याची पद्धत आहे.
- हळद, तिखट आणि गरम मसाल्यांची फोडणी दिलेले खाद्यपदार्थ खाण्यामुळे तुमच्या शरीराचे इनफेक्शनपासून संरक्षण होते. अशा पदार्थांमुळे पोटाच्या समस्या कमी होतात आणि अन्न लवकर पचते. वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी निरनिराळी फोडणी दिली जाते. ज्यामुळे ते पदार्थ अधिक रूचकर आणि चटपटीत होतात.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
फक्त नूडल्स नाही मॅगीपासून बनवा वेगवेगळ्या डिशेस
या उन्हाळ्यात साठवणीचे हे हटके पदार्थ करुन पाहा
तुपाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का (Health Benefits Of Ghee In Marathi)