पावसाळा जितका मनाला आनंद देतो तितकाच तो कधी कधी कंटाळवाणाही वाटू लागतो. कारण या काळात सगळीकडे ओलावा, शैवाळ आणि बुरुशीचं वातावरण असतं. घरातही या काळात लाकडाचे दरवाजे, वॉर्डरोब अशा वस्तूंना बुरशी येते. ओलसर वातावरणामुळे लाकडाच्या वस्तू या काळात खराब होतात. यासाठीच या काळात घरातील लाकडी वस्तूंची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण जर लाकडाला लागलेली बुरशी वाढली तर त्यामुळे तुमच्या कपाटातील कपडे आणि इतर वस्तूही खराब होऊ शकतात. पण जर वेळीच लक्ष दिलं तर या बुरशीपासून तुम्ही तुमचं वॉर्डरोब वाचवू शकता. यासाठीच या टिप्स नेहमी लक्षात ठेवा.
वॉर्डरोबमध्ये कधीच ओले कपडे ठेवू नका
पावसाळ्यात घरातील वातावरण उबदार असतं. ज्यामुळे धुतलेले कपडे लवकर सुकत नाहीत. शिवाय बाहेरून आल्यावर कपडे ओले झाल्यामुळे ते वारंवार धुवावे लागतात. मुंबईसारख्या ठिकाणी लहान जागेमुळे कपडे मोकळ्या जागी वाळवणं शक्य नसतं. यासाठीच लक्षात ठेवा तुमचे असे ओलसर कपडे कधीच लाकडाच्या कपाटात ठेवू नका. पावसाळ्यात शक्य असल्यास लवकर सुकणारे, पातळ फॅब्रिकचे कपडेच वापरा आणि ते नीट सुकल्यावरच वॉर्डरोबमध्ये ठेवा. असं नाही केलं तर कपड्यांचा ओलावा कपाटाला लागतो आणि कपाटाला बुरशी येते.
खिडक्या शक्य असल्यास उघड्या ठेवा
पावसाळ्यात दारं खिडक्या पाणी घरात येऊ नये यासाठी बंद ठेवल्या जातात. ज्यामुळे घरात दमट आणि कुबट वातावरण निर्माण होतं. घरातील हवा खेळती न राहिल्यामुळे घरात बुरशी वाढण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होतं. अशा वातावरणात कपाटाला बुरशी लागली तर ती लवकर निघत नाही आणि नंतर त्यामुळे तुमच्या कपाटातील वस्तू खराब होऊ शकतात. मात्र दारं खिडक्या शक्य तितका वेळ उघड्या ठेवल्या तर हवा खेळती राहते आणि कपाटाला बुरशी लागत नाही.
वॉर्डरोबला पाणी लागणार नाही याची काळजी घ्या
कपाट पावसाचे पाणी घरात येणार नाही अशा ठिकाणी ठेवा. कारण जर पाण्यामुळे वॉर्डरोब भिजलं तर त्यामुळे त्याला लगेच बुरशी लागू शकते. त्यामुळे जर खिडक्यांपासून वॉर्डरोब दूर राहिल याची काळजी घ्या. त्याचप्रमाणे बाथरूमच्या जवळदेखील वॉर्डरोब कधीच असू नये. कारण बाथरूमच्या भिंती ओलसर असतील तर त्यामुळे वॉर्डरोबला फंगस लागण्याची शक्यता असते.
वुडन बोर्ड ठेवा
तुमचे वॉर्डरोब जर बाथरूमजवळ अथवा ओलसर जागेवर असेल तर त्यामुळे तुमच्या वॉर्डरोबला बुरशी लागू शकते. कधी यामुळे तुमच्या कपड्यांना ओलसर डाग पडू शकतात. यासाठीच अशा वॉर्डरोब आणि भिंतीमध्ये वुडन बोर्ड जरूर ठेवा. ज्यामुळे तुमचे वॉर्डरोब खराब होणार नाही.
रबिंग अल्कोहोल लावा
वॉर्डरोबला जर बुरशी लागलीच तर त्या ठिकाणी स्वच्छ आणि कोरड्या कपड्याच्या मदतीने रबिंग अल्कोहोल लावा. ज्यामुळे फंगस निघून जाईल आणि जास्त पसरणार नाही. जर तुम्हाला तुनच्या वॉर्डरोबची अधिक सुरक्षा ठेवायची असेल तर वॉर्डरोबच्या दरवाज्यांना लाईम बार लावा.
वॉर्डरोबचे दरवाजे अधून मधून उघडे ठेवा
पावसाळ्यातील कुबट पणा कमी करण्यासाठी तुम्हाला वॉर्डरोबमधील हवा खेळती ठेवणं गरजेचं आहे. यासाठी आठवड्यातून एकदा किमान काही तास वॉर्डरोबची दारे उघडी ठेवा. ज्यामुळे तुमच्या वॉर्डरोबला बुरशी पकडणार नाही आणि घाणेरडा वासही येणार नाही.
घरात फ्लोरोसंट लाईट लावा
जर खोलीत पुरेसा प्रकाश नसेल तर तुमच्या खोलीचे दरवाजे आणि वॉर्डरोबमध्ये बुरशी येण्याची शक्यता जास्त वाढते. वॉर्डरोबला बुरशी पकडू नये यासाठी खोलीत फ्लोरोसंट लाईट लावा ज्यामुळे तुमच्या घराला बुरशी येणार नाही. शिवाय त्यामुळे तुमच्या खोलीतील वातावरणही चांगले दिसेल.
वॉर्डरोबमध्ये तांदळाचे दाणे ठेवा
वॉर्डरोबला बुरशीपासून दूर ठेवण्याचा हा एक जुना उपाय आहे. लाकडी वस्तूंना ओलाव्यामुळे बुरशी येते मात्र तांदूळ बुरशी सोशून घेते. यासाठीच पूर्वापासून लाकडी कपाटांमध्ये पावसाळ्यात तांदळाचे दाणे ठेवले जात असत. तुमच्या वॉर्डरोबला बुरशीपासून वाचवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. यासोबत वॉर्डरोबमध्ये कडूलिंबाची पाने सुरवून ठेवल्यामुळेही तुमच्या कपाटाला बुरशी येणार नाही.
फोटोसौजन्य – pixels
अधिक वाचा –
घरातील कुबट वास दूर करण्यासाठी सोपे उपाय
या पावसाळ्यात अशी घ्या तुमच्या मोबाईलची काळजी
ऋतू कोणताही असो ‘या’ गोष्टी तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्या