ADVERTISEMENT
home / आरोग्य
Skin Diesase In Marathi

त्वचा रोगाचे प्रकार | Types of Skin Disease In Marathi

मनुष्य तितक्या प्रवृत्ती आणि तितक्याच समस्या हे आपण सारेच जाणतो. मानवी आयुष्याशी निगडीत अनेक समस्या असतात. म्हणजेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करता अनेक त्रासांना आपल्याला सामोरे जावे लागते. त्वचेशी निगडीत असलेल्या कोणत्या समस्या तुम्हाला माहीत आहेत? कारण त्वचा रोग म्हटले की, अनेकांना पिपंल्स, निस्तेज त्वचा असा त्रासच वाटतो. पण त्वचा अनेक समस्यांना सामोरे जाते. त्वचेला होणाऱ्या या समस्यांना त्वचा रोग असे म्हणतात. त्वचा रोगाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांना ओळखण्याची पद्धत आणि औषधोपचार हा पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे या रोगांची व्यवस्थित माहिती तुम्हाला असायला हवी. आज आपण या लेखातून त्वचा रोग,त्वचा रोगाचे प्रकार, Nagin Skin Disease In Marathi, Isabgol Skin Disease In Marathi, Surma Skin Disease In Marathi, सुरमा त्वचा रोग मराठी याची माहिती घेणार आहोत. चला करुया सुरुवात

त्वचेची रचना | Skin Structure In Marathi

Skin Structure

त्वचेची रचना ही कशी असते हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. पण या रचनेचा अभ्यास केला तर त्वचेला आवश्यक असलेल्या घटकांची माहिती होण्यास मदत मिळते. त्वचेखाली असलेले कोलॅजन आपल्या अनेकांना माहीत असेल पण सुंदरता वगळता त्वचेचे चालणारे कार्य हे वेगळे असते. 

त्वचेचे साधारणपणे तीन थर असतात. याला बाह्यत्वचा, अंतत्वचा, अधस्त्वचा असे म्हणतात. बाह्यत्वचा हा त्वचेचा सगळ्यात वरचा थर आहे. हा फार जाड असतो. पण प्रत्येक व्यक्तीनुसार ते बदलते. पण साधारणपणे बाह्यत्वचा आणि अधस्त्वचा ही जाड असते. मधला आणि सगळ्यात खालचा थर हा यांना आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांमार्फत रक्तपुरवठा होेतो. त्वचेच्या आतमध्ये शृंगस्तर, कणमय स्तर, कंटकी स्तर आणि आधार स्तर असे चार स्तर असतात. या पेशींच्या आतमध्ये केराटीन, मेलानिन असे घटक असतात त्यामुळे त्वचा, केस मजबूत होण्यास मदत मिळते. 

त्वचा रोगाचे प्रकार | Different Skin Disease In Marathi

त्वचेची रचना पाहिल्यानंतर त्वचा रोगाविषयी माहिती घ्यायला हवी. चला जाणून घेऊया त्वचा रोग आणि त्वचा रोगाचे प्रकार

नागीण – Nagin Skin Disease In Marathi

नागीण त्वचा रोगाचा प्रकार आहे.  नागीण हा आजार विषाणूजन्य असून याला विसर्प, हर्पीस होस्टर या नावाने देखील ओळखले जाते. नागीण हा रोग एका विशिष्ट व्हायरसमुळे होतो. Varicella Roster नावाच्या याच जीवाणूमुळे कांजिण्यांचादेखील त्रास होतो.  ज्यांना लहानपणी कांजिण्या येऊन जातात. त्यांच्या शरीरात मज्जारज्जूच्या भागामध्ये हा विषाणू घटक लपून राहतो. ज्यावेळी प्रतिकारशक्ती कमी होते. त्यावेळी हा त्वचा रोग बळावण्याची शक्यता असते. नागीण झाली हे तुम्हाला आलेल्या बारीक बारीक पुळ्यांमधून कळते. शरीराच्या एखाद्या भागात ती सलग येते. ती संपूर्ण शरीराला सापासारखा विळखा घालते. म्हणून याला नागीण असे नाव पडले असावे.
नागीण ही शरीराच्या कोणत्याही भागावर येऊ शकते. अगदी डोळ्यातही काही जणांना नागीणचा त्रास झालेला आहे.  डोळ्यामध्ये नागीण येणे हे अत्यंत वाईट असते. कारण त्यामुळे अंधत्व येण्याची शक्यता असते.
शरीरावर बारीक दुखावणारे पुरळ येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. नागीण झाल्यानंतर येणारे पुरळ हे खूप दुखतात. अनेकदा अंगात चमक भरल्यासारखेही वाटते.  घरगुती उपायांनी नागीण बरी होते. हल्ली डॉक्टर्सही यावर उत्तम औषधे सुचवतात.

ADVERTISEMENT

वाचा – त्वचेचे विकार आणि आयुर्वेदिक उपाय

इसब – Isabgol Skin Disease In Marathi

इसब - त्वचा रोगाचे प्रकार
इसब

त्वचेला होणाऱ्या रोगांपैकी इसब हा एक त्वचा रोग आहे. अतिसवंदेशनशील, दाह किंवा ॲलर्जीमुळे हा त्वचारोग होण्याची संभावना अधिक असते.  इसबचा (Eczema)त्रास होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. वातावरणातील बदल, प्रार्दुभाव, उष्णता वाढवणारे अन्नपदार्थ, तणाव, कोरडे हवामान यामुळे शरीरावर इसब उठू शकते. इसब झाला हे कसे ओळखावे असा विचार करत असाल तर या त्रासामध्ये शरीरावर लाल चट्टे उठतात. सगळ्यात आधी यामध्ये त्वचेवर बारीक बारीक पुरळ येतात. त्याचे रुपांतर मग चट्टयात होऊ लागते. उठलेल्या लाल चट्ट्यांमध्ये इतकी खाज उठते की ही खाज असह्य होऊन जाते. यामुळे जमखा होण्याची संभावना अधिक असते. कोपर, मनगट,मान, घोटा आणि पायांवर अशाप्रकारे इसब येतात. याकडे दुर्लक्ष केले तर त्वचेच्या खवल्या पडू लागतात. जखमा होण्यााधी यावर योग्य ईलाज झाला तर हा आजार बरा होण्यास मदत मिळते.

बेंड – Bend Skin Disease In Marathi

बेंड म्हणजेच फोड. याला केसतोड  (Kestod) असे देखील म्हटले जाते. हे फोड फार मोठे असतात. त्यामध्ये पू साचतो. हे फोड खूपच दुखणारे असतात. खरंतर वेगवेगळ्या कारणामुळे बेंड येतात. यामागे केसतोड हे एकच कारण नसते. तर कधी कधी घामामुळे देखील हे त्रासदायक बेंड येतात.  घामामुळे बेंड कसा येतो?असा विचार करत असाल तर आपल्या त्वचेवर बारीक बारीक छिद्र असतात. या छिद्रातून घामाचे उत्सर्जन होत असते. अशावेळी आपल्या त्वचेवर असलेले पोअर्स हे उघडेही होत असतात. या छिद्रांमध्ये जर घामातून घाण गेली तरीदेखील त्यामुळे त्या ठिकाणी मोठे बेंड येतात. बेंड येणार असेल तर त्या ठिकाणी थोडीशी सूज आल्यासारखी होते. त्यानंतर बेंडाला लालिमा आल्यासारखी होते. ते खूप लाल दिसू लागतात. त्यानंतर त्यामध्ये पस साचून तो दुखू लागतो. बेंड फुटेपर्यंत थोडा वेळ लागतो. जो पर्यंत तो पिकत नाही तो पर्यंत त्याला फोडता येत नाही. त्याला तोंड येण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतात. त्यावर जास्वंदीचा पाला, तुळशीचा पाला लावला तरी देखील आराम मिळतो. शिवाय योग्य वेळी डॉक्टरांकडे गेला तर त्यावर वेळीच इलाज करता येतो. जर फोड मोठा असेल तर डॉक्टर तो फोड योग्यपद्धतीने फोडतात. त्यामुळे इजा होत नाही. 

सुरमा – Surma Skin Disease In Marathi

सुरमा - त्वचा रोगाचे प्रकार
सुरमा रोग

सुरमा या त्वचा रोगा ने अनेक जण ग्रासलेले असतात. Pityriasis Alba या नावाने याला ओळखले जाते. हा त्वचारोग लहान मुलं आणि तरुणांना जास्त करुन होतो. हा त्वचारोग कशामुळे होतो. याचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. पण हा एक फंगल इन्फेक्शनचा प्रकार आहे. यामध्ये त्वचेवर गुलाबी- पांढऱ्या रंगाचे अंडाकृती असे चट्टे येऊ लागतात.  हे पॅच एखाद्या कोडाप्रमाणे वाटते. पण त्याचा परिणाम त्वचेच्या खोलवर जात नाही. हा एक बुरशीजन्य आजारांमध्ये येतो. यावर डॉक्टर थंडावा देणारे क्रिम लावण्यास देतात.  पाठ, चेहरा, दंड अशा काही प्रमुख भागांवर तुम्हाला सुरमाचे डाग आलेले दिसतात.
सुरमा त्वचा रोग झाला असेल तर तुमच्या त्वचेवर अशा फिक्कट गुलाबी रंगाचे डाग येतात. या डागांना खूप खाज येते. हे डाग प्रकर्षाने दिसून येतात. पूर्वी शरीरात काही कमतरता झाली की असे डाग उठतात असे म्हटले जात होते. पण विज्ञानात याचे कोणतेही कारण नाही. हा त्रास झाल्यानंतप योग्य वेळी डॉक्टरांकडे गेल्यास योग्य सल्ला दिला जातो. 

ADVERTISEMENT

वांग – Wang Skin Disease In Marathi

वांग हा एक त्वचा रोगाचा प्रकार आहे. वांग हे चेहऱ्यावर येतात. हे चेहऱ्यावर आलेले काळे डाग असून ते रंगद्रव्यामधील फरकामुळे होणारी समस्या आहे. वांग येण्याचे ठराविक असे वय नाही. वांग कधीही आणि कोणालाही येऊ शकतात. आपल्या त्वचेखाली रंगद्रव्ये असतात. रंगद्रव्याला आपण मेलेनिन असे म्हणतो. ज्याठिकाणी मेलनिन अति प्रमाणात तयार होते तो भाग हा काळा दिसू लागतो. चेहऱ्याखाली काही ठिकाणी असे मेलनिन जास्त तयार होते. त्याठिकाणी काळे काळे डाग येऊ लागतात. वांग जाण्यासाठी क्रिम बाजारात मिळतात.
वांग जाण्यासाठी हल्ली अनेक उपाय उपलब्ध आहेत. हे डाग घरी अगदी पटकन जाता येतील असे नाही. त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यावी लागते.  वांग येण्यामागे अनेक कारणं असू शकतात. त्यापैकी काही कारण म्हणजे अतिनील किरणं, काही औषधांचा परिणाम, बदललेली लाईफस्टाईल यामुळेही वांग येण्याची शक्यता असते. 

नायटा, गजकर्ण

नायटा हा त्वचारोगाचा त्रासदायक असा प्रकार आहे. नायटा हा निरनिरळ्या प्रकारचे असतात. शरीराची स्वच्छता योग्य पद्धतीने राखले नाही किंवा अंगावरील साबण नीट जात नसेल तर अशावेळी नायटा किंवा गजकर्णाचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. हा आजार अस्वच्छपणा, दमटपणा, एकमेकांचे कपडे वापरणे, घाणेरडी अंथरुणं वापरणं या काही कारणामुळे हा त्रास होऊ शकतो. हा एक बुरशीजन्य आजार असून तो कोणालाही होऊ शकतो.   नायटाचा त्रास हा छाती, पोट, दंड, जांघ, कंबर याठिकाणी होतो. याची खूप खाज येते इतकेच नाही तर त्यावर लालिमा आलेली असते. दगडफुलासारखी याला सूज आलेली असते.
नायटाचा त्रास झाला असेल तर तुम्ही गरम पाण्याने अंग स्वच्छ धुवून आणि पुसून घेऊ शकता. बाजारात काही औषध मिळतात. ते पाण्यात घालूनही तुम्ही अंग धुवू शकता किंवा स्वच्छ पुसून घेऊ शकता.

खरुज

खरुज हा त्वचा रोज असून तो सार्कोप्टीस स्केबीज नावाच्या जीवाणूमुळे होतो. याचा किटक अगदी लहानसा असतो.  यांना मााईट असे देखील म्हटले जाते. या किटकांमधील मादी जीव ही त्वचेच्या आत जाऊन अंडी घालते. सुरुवातीला पटकन याची खाज येत नाही.  संक्रमणाच्या 2- 3 तासांच्या आत अंडी देण्यास सुरु करते. ही अंडी दहा दिवसात तयार होतात. त्यानंतर संपूर्ण शरीरावर खाज यायला सुरुवात होते. हा आजार हा संक्रमणाने होणारा असा आजार असून जर घरातील एखाद्याला झाला असेल तर तो दुसऱ्यालाही होऊ शकतो. खूप वेळा एखाद्या खरुज झाले असेल आणि त्याचा बेड किंवा चादर वापरात आली असेल तरी देखील हा त्रास होतो. याचे किटक हे दुसऱ्याच्या शरीरात जाऊन मग त्याची दुसऱ्याच्या शरीरात वाढ होते. 

जीवाणू जितके वाढतील तितकी खाज येत राहते. खरुजची खाज ही रात्रीच्यावेळी जास्त होते. त्यामुळे याचा त्रास रात्री खूप होतो. खाज येण्याची जागाही साधारणपणे सारखीच असते.  हाता पायांच्या बोटांमध्ये, मांडीच्या आत, कोपऱ्यात, गुडघ्यात, नाभी, स्तन, लिंग, कंबर या ठिकाणी ही खाज सगळ्यात जास्त येते. जर या वर योग्य उपचार घेतले नाही तर प्रकृतीच्या अनेक तक्रारी जाणवू शकतात. प्रतिकारशक्तीवरही याचा परिणाम होतो.

ADVERTISEMENT

 पुरळ

पुरळ येणे हा देखील त्वचारोगाचा एक प्रकार आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे त्वचेवर पुरळ येत असतात. काही पुरळ हे पस अर्थात पुवाने भरलेले असतात तर काही हे पाण्याने भरलेले असतात. पुरळ हे आपल्याला कांजिण्या, गोवर, घामोळ्या, नागीण, एलर्जी किंवा एखाद्या जंतुदोषाने देखील अशाप्रकारे आपल्या त्वचेवर पुरळ येतात. त्वचेवर आलेले पुरळ नेमके कोणते आहेत. हे जाणून घेतल्यानंतर मगच त्यावर इलाज करणे सोपे जाते. 

पुरळ येऊन जर जात असेल तर ठिक पण पुरळ येऊन सात दिवसांहून अधिक काळ उलटून गेला असेल आणि काही केल्या पुरळ जात नसेल तर ती चिंतेती बाब असू शकते. अशावेळी योग्य तो सल्ला घेणे कधीही चांगले. 

 कुष्ठरोग

त्वचा रोगाचे प्रकार मधील कुष्ठ रोग हा एक प्रकार आहे. कुष्ठ रोग हा आजार भयावह असून हा जिवाणूजन्य असा रोग आहे. पूर्वीच्या काळी हा आजार खूप जणांना होत होता. पण आता हा त्वचा रोग फारच कमी झाला आहे. कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरियम लेप्रि नावाच्या जिवाणूमुळे होतो.  या जिवाणूचा शिरकाव झाला की, प्रतिकारशक्ती कमी होऊ लागतो. त्यामुळे हा आजार अधिक बळावतो. त्वचेच्या खाली, अंतत्वचा आणि चेता यांच्यामध्ये हा वाढत जातो. हा ज्या ज्या ठिकाणी वाढत जातो तेथील संवेदना कमी होऊ लागतात.  ज्या भागाची संवेदना होत नाही अशा ठिकाणी कुष्ठरोग झाला असे समजावे. यामुळे काही भागांना इजा होते. झालेल्या जखमांमुळे जिवाणू वाढतात. उघड्या जखमांमुळे गँग्रीन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे तो भाग मृत होऊ लागतात त्यामुळे तो भाग झडू लागतो. पण आता यावर उत्तम अशी उपाययोजना आलेल्या आहेत. त्यामुळे हा त्रास कमी झाला आहे. 

 पांढरे कोड

त्वचा रोगाचे प्रकार मधील पांढरे कोड हा त्रास देखील खूप जणांना झालेला तुम्ही पाहिला असेल. त्वचेखाली रंगद्रव्ये असतात. त्यामुळे आपल्या त्वचेचा रंग ठरत असतो. ज्यावेळी आपली रंगद्रव्ये काम करणे कमी करतात. तेथील त्वचा ही पांढरी पडू लागते. पांढरे कोड जाण्यासाठी 100 टक्के उपचार पद्धती मिळालेली नाही. यावर अजूनही प्रयोग सुरु आहे. पण अद्याप त्यावर 100 टक्के इलाज मिळालेला नाही. कोड हे अनेकदा आनुवंशिक असतात. जर याचा त्रास सुरुवातीच्या काळात थांबवता आला तर तो कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे यावर योग्यवेळी डॉक्टरांना दाखवण्यास विसरु नका. 

जळवात

जळवात हा पायांना होणारा त्वचा रोग आहे. यामध्ये पायांना भेगा पडण्याचा त्रास होतो. जळवात होण्यामागे धुळ ही कारणीभूत असते. जे अनवाणी चालतात. त्यांच्या पायांना हा त्रास होतो. पायांचे घर्षण होणे, पाय कोरडे होणे यामुळे  पायांना जळवात होतो. जे सतत घट्ट बूट घालतात. अशांना देखील जळवाताचा त्रास होण्याची शक्यता असते. जळवात झाला असेल तर पायांची काळजी घेण्यासाठी तुम्ही एक बादली गरम पाणी घेऊन त्यामध्ये पाय बुडवून बसावे त्यामुळे भेगा पडलेल्या ठिकाणी थोडासा आराम मिळतो. याशिवाय जळवाताचा त्रास कमी करण्यासाठी पायांना तेल लावणे, मलम लावणे, तूप लावणे असे केल्यामुळे भेगा पडलेल्या ठिकाणी आराम मिळतो. 

ADVERTISEMENT

घामोळ्या

त्वचा रोगाचा हा प्रकार खूप उन्हाळा असेल तर अशावेळी होतो. याला घामोळे असे म्हणतात  मेच्या प्रंचड उकाड्यामध्ये खूप जणांच्या मानेला टोकेरी असे पुरळ येतात. हे पुरळ सलग येतात. त्यामुळे त्वचेवर त्याचा गुंता आहे असा वाटतो. घामोळ्या या उष्णता वाढल्यावरच येतात. सगळ्यांनाच त्वचेवर घामोळ्या येतात असे नाही. घामोळ्या या खूपच टोचणाऱ्या असतात. त्यामुळे त्याची खूप खाज येते. या काळात गरम पाण्याने अजिबात आंघोळ करु नका. कारण त्यामुळे हा त्रास अधिक होऊ शकतो. काख, पाठ, मान या ठिकाणी घामोळ्या येतात. घामोळ्यांचा त्रास खूप जास्त होत असेल तर थंडावा मिळण्यासाठी काही प्रिकली हिट पावडरचा उपयोग करु शकता.
त्वचेच्या त्रासापैकी हा एक त्रास असून त्याने आरोग्यास कोणताही धोका होत नाही. पण खाज आल्यामुळे त्वचेला नखं लागण्याची शक्यता असते. त्यामुळे जखमा होऊ शकतात.

 चिखल्या

चिखल्या हा देखील त्वचा रोगाचा प्रकार आहे. या त्वचा रोगाचा त्रास पावसाळ्यात प्रामुख्याने होतो.  जे शेतीत काम करतात अशांना हा त्रास होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. पाण्यात असणाऱ्या सुक्ष्म जंतूमुळे हा त्रास होऊ शकतो. चिखल्याचा त्रास झाला असेल तर पायांच्या सुजण्यापासून त्याची सुरुवात होते. त्यानंतर हळुहळू त्यावर पुरळ यायला सुरुवात होते. हे पुरळ तसेच राहात नाहीत. तर हे पुरळ फुटून त्याचे रुपांतर जखमांमध्ये होऊ लागते. जे फार त्रासदायक होत जाते. याला ओळखायचे असेल तर पायाला बुरशी किंवा पांढरे झाल्यासारखे वाटत असेल तर तुम्हाला चिखल्या झालेला असू शकतो.

काही सोप्या आणि साध्या घरगुती उपायाने चिखल्याचा त्रास नियंत्रणात येतो. ज्यांना चिखल्याचा त्रास झाला आहे. अशांनी काही काळ पाण्यापासून दूर राहणेच चांगलेच असते. या काळात पायाला प्लास्टिकची पिशवी बांधून ठेवा. याशिवाय जर तुम्ही लिंबाचा पाला वाटून लावला तरी देखील किटक कमी होण्यास मदत मिळते. 

व्रण

त्चचा रोग मधील आणखी एक समस्या म्हणजे व्रण. एखादी जुनी जखम ज्यावेळी भरत नाही अशा जुन्या जखमेला व्रण असे म्हणतात. ही जखम बरी न होणे, सतत चिघळणे, त्यातून पाणी येणे असे काही त्रास देखील खूप जणांना होऊ लागतात. व्रण हा अगदी लहान असला तरी देखील त्रासदायक असू शकतो. याची स्वच्छता राखणे आणि योग्य वेळी औषधोपचार करणे गरजेचे असते. कारण काही वेळा या जखमा तशाच राहिल्याने त्वचा भरुन निघण्याचा जो आपल्या शरीराचा गूणधर्म आहे त्यावरही परिणाम होऊ लागतो. त्यामुळे त्वचेवरील मांस हे कमी होऊन जाते. पाय सुजलेला दिसतो, पाय काळवंडणे, दुखणे असे काही त्रास होऊ लागतात.या त्रासावर आयुर्वेदिक उपचार देखील उपलब्ध आहेत.

त्वचा रोग आणि आयुर्वेद

त्वचा रोग आणि आयुर्वेद
त्वचारोग आणि आयुर्वेद

आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून त्वचा रोग हा बाह्यांगाचा दोष आहे. आयुर्वेद हे जुने असे ज्ञान असून त्याचा उपयोग करुन अनेक आजारांचे उपाय यामध्ये सांगण्यात आलेले आहेत. आयुर्वेद शास्त्रातील उपाय हे थोडा वेळ घेतील. पण या त्वचारोगांचे उच्चाटन करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. 

ADVERTISEMENT
  1. निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेद शास्त्रात काही नियम सांगितलेले आहेत. त्यानुसार काही अन्नाचे कॉम्बिनेशन हे चुकीचे मानले जाते. दूध- चिकन,  फळ- दूध असे खाण्याचे प्रकार अजिबात खाऊ नये. 
  2. आयुर्वेदानुसार पोट साफ नसणे, पोटात जंत असणे किंवा पोटाच्या अशा काही विकारांमुळेही त्वचा रोग उद्भवण्याची शक्यता असते. 
  3. निरोगी त्वचेसाठी आयुर्वेदात बेसन, मुलतानी माती लावण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे त्वचेवरील लालिमा कमी होण्यास मदत मिळते. 
  4. पावसाळ्यात त्वचारोग होण्याची शक्यता ही अधिक असते. त्यामुळे अशावेळी पावसाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करावे. 
  5. आपोआप पाणी सुटणारे पदार्थ म्हणजे दही,गूळ या गोष्टी चवीला चांगल्या लागल्या तरी या त्वचारोग वाढवण्यास कारणीभूत असतात. त्यामुळे या आहारात कमीच असायला हव्यात .
  6. खूप आंबट, तिखट, तेलकट असे  पदार्थ आहारातून व्यर्ज केले तर त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते. 
  7. दूध आणि दूधाचे पदार्थ हे आरोग्यास चांगले असले तरी देखील ते योग्य प्रमाणात खाणे गरजेचे असते.

त्वचा रोग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

त्वचा रोग होऊ नये म्हणून काही सोप्या गोष्टींची काळजी घेणे फारच जास्त गरजेचे असते. त्यासाठी फार काही मेहनत घ्यावी लागत नाही तर अगदी रोजच्या सोप्या गोष्टीमधून तुम्हाला त्वचेची काळजी घेता येते.

  1. त्वचेची काळजी घेताना तुम्ही आंघोळ रोजच्या रोज करणे गरजेचे असते. आंघोळ कधीही टाळू नका.कारण ही स्वच्छता फारच गरजेचे आहे. 
  2. त्वचा रोग हा काही आयुर्वेदिक उपायांनी बरा होऊ शकतो. पण तो एका दिवसात बरा होत नाही . त्यासाठी थोडा संयम राखणे हे फार गरजेचे आहे. 
  3. त्वचा रोग झाल्यानंतर काही काळासाठी मानसिक स्वास्थ्य देखील खराब होऊ शकते. उदा. साधे पिंपल्स आले तरी अनेकांना खूप ताप होतो. तर त्वचा रोग हा अनेकदा त्रासदायक आणि आत्मविश्वास घालवणारा असतो. पण अशावेळी आपले मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवा. 
  4. त्वचा रोग झाला असेल तर तुम्हाला सातत्याने स्वच्छता राखणे गरजेचे आहे. वेळोेवेळी त्वचेची स्वच्छता राखा. 
  5. एकदा त्वचा रोग झाल्यानंतर तो भविष्यात पुन्हा होऊ नये यासाठी तुम्हाला आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तंतोतंत पाळायला हव्यात. 

FAQ’S

प्रश्न : त्वचा रोग बरा होऊ शकतो का?
उत्तर :हो, त्वचा रोग उपचाराने बरा होऊ शकतो. काही त्वचा रोग हे वेळ होण्यासाठी वेळ घेतात. पण ते बरे होतात. जर तुम्हाला कोणताही त्वचा रोग झाला असे तर त्याकडे बरा होईल असे म्हणत दुर्लक्ष करण्यापेक्षा तुम्ही लगेचच डॉक्टर गाठायला हवा.

प्रश्न : त्वचा रोग झाला हे कसे समजावे?
त्वचा रोग झाला हे ओळखणे काही वेळा कठीणही जाऊ शकते. काही त्वचा रोग पटकन कळत नाही. पण सर्वसाधारणपणे अंगाला खाज येणे, पुरळ, त्वचेची लालिमा वाढली की समजावे तुम्हाला त्वचा रोग झाला आहे. जर तुम्हाला तरीही कळत नसेल तर तुम्ही तातडीने डॉक्टर गाठायला हवा.त्वचा रोग औषधौपचरांनी बरा होऊ शकतो का?

प्रश्न: औषधोपचरांनी त्वचा रोग बरा होऊ शकतो का ?
उत्तर : आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या उपचारांनी तुम्हाला त्वचारोगावर काम करता येऊ शकते. पण याकडे दुर्लक्ष न करता तुम्ही त्याचा योग्य इलाज करणे गरजेचे आहे.   

23 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT