ऋतू बदलले की अनेक रोगांच्या साथी पसरतात. सर्दी, पडसे ते व्हायरल फिवर, डोळे येणे, स्टमक फ्ल्यू अश्या साथी पसरतात. त्याचप्रमाणे त्वचेशी संबंधित आजारदेखील पसरतात. वातावरण बदलले की अनेक लोकांना गजकर्ण म्हणजेच रिंगवर्म हा त्वचेचा आजार होतो. ज्या व्यक्तींची त्वचा सेन्सिटिव्ह असते. त्या लोकांना गजकर्णाचा त्रास होण्याची अधिक शक्यता असते. खास करून ज्यांची त्वचा कोरडी व संवेदनशील असते. त्यांना हिवाळ्यात गजकर्णाची समस्या होऊ शकते. गजकर्ण हा काही फार भयावह आजार नाही. योग्य काळजी घेतल्यास आणि गजकर्ण वरील उपाय केल्यास संसर्ग कमी होऊन त्वचेला आराम मिळू शकतो.
Table of Contents
गजकर्ण म्हणजे काय । What Is Ringworm In Marathi
गजकर्ण किंवा रिंगवर्म, ज्याला वैद्यकीय भाषेत डर्माटोफाइटोसिस, डर्माटोफाइट इन्फेक्शन किंवा टिनिया असेही म्हणतात, हा त्वचेला झालेले फंगल इन्फेक्शन असते. रिंगवर्म या नावामुळे कदाचित असे वाटू शकते की हा रोग एखाद्या किटकामुळे किंवा वर्म (अळी) मुळे होतो. पण प्रत्यक्षात कुठल्याही कीटकांमुळे हा संसर्ग होत नसून एका विशिष्ट प्रकारच्या फंगसमुळे त्वचेला संसर्ग होतो. या इन्फेक्शनमुळे त्वचेवर जो व्रण पडतो तो एखाद्या अंगठीच्या आकाराच्या किड्यासारखा दिसतो म्हणून हे इंग्रजीत याला रिंगवर्म असे नाव आहे. शरीराच्या इतर कुठल्याही भागावर येणाऱ्या गजकर्णाला टिनिया कॉर्पोरिस असे वैद्यकीय नाव आहे तसेच मांडी व जांघेच्या ठिकाणी जर हा संसर्ग झाला असेल तर त्या संसर्गाचे वर्णन टिनिया क्रुरिस असे करण्यात येते. पायांच्या बोटांना गजकर्णाचा संसर्ग झाल्यास त्याला ‘ऍथलेट्स फूट’ म्हणतात. गजकर्ण हा त्वचेचा संसर्ग आहे जो एका फंगसमुळे होतो जे तुमची त्वचा, केस आणि नखे यांच्या मृत पेशींवर राहते.
गजकर्णाचा संसर्ग जसा माणसांमध्ये दिसून येतो तसेच प्राण्यांनाही हे इन्फेक्शन होऊ शकते. आजाराच्या सुरुवातीला त्वचेच्या प्रभावित भागात लाल ठिपके येतात आणि नंतर हा आजार शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतो. गजकर्णाचा संसर्ग आपल्या टाळू, पाय, नखे, मांडीचा सांधा, दाढी किंवा इतर भागांना होऊ शकतो. संसर्ग फार वाढला नसल्यास गजकर्ण वर घरगुती उपाय (Ringworm Home Treatment In Marathi) देखील करता येतात. काही कारणामुळे जर चेहऱ्यावर डाग पडले असतील तर त्यावरही घरगुती उपाय केल्यास डाग कमी होण्यास मदत होते.
गजकर्णाची लक्षणे । Symptoms Of Ringworm In Marathi
तुम्हाला शरीरावरच्या कुठल्या भागात गजकर्णाचा संसर्ग झाला आहे त्यानुसार गजकर्णाची लक्षणे (Symptoms Of Ringworm In Marathi) वेगवेगळी आहेत. गजकर्ण झाले असल्यास तुम्हाला खालील त्रास होऊ शकतात.
- त्वचेला जिथे इन्फेक्शन झाले आहे, तिथली जागा लाल होते. त्या ठिकाणी खूप खाज सुटते किंवा खवले ,चट्टे उठतात. त्वचेवर जिथे चट्टे उठले आहेत. त्या भागांना प्लेक्स म्हणतात किंवा सोप्या भाषेत आपण पॅचेस देखील म्हणू शकतो.
- त्वचेवर ज्या पॅचमध्ये इन्फेक्शन झाले आहे, तिथे लाल ठिपके येतात. कधी कधी तिथे फोड किंवा पुस्ट्युल्स सुद्धा येतात. ज्याचा त्रास होतो. खाज येते किंवा त्वचेची जळजळ होऊ शकते.
- त्वचेवर गोलाकार पॅचेस येतात आणि त्यांच्या कडा लाल होतात. त्या ठिकाणी खाज येते व खाजवले की त्वचेची जळजळ होते.
- गजकर्ण झालेल्या त्वचेच्या पॅचवर सूज आल्यासारखे दिसते आणि ती त्वचा फुगल्यासारखी वाटते.
- कधी कधी आपल्या नखांना डर्माटोफिटोसिस (इन्फेक्शन) असेल तर तर त्यांची विचित्र प्रकारे जाडी वाढते किंवा त्यांचा नैसर्गिक रंग बदलून खराब रंग दिसू लागतो किंवा नखं ठिसूळ होऊन ते आपोआप तुटू शकतात. याला डर्माटोफायटिक ऑन्कोमायकोसिस किंवा टिनिया अनग्युअम म्हणतात. हे नखांना झालेले फंगल इन्फेक्शन आहे.
- तसेच जर तुमच्या टाळूला फंगल इन्फेक्शन झाले असेल, तर त्या पॅचच्या आजूबाजूचे केस तुटू शकतात किंवा मुळापासून गळू शकतात आणि त्या पॅचमध्ये टक्कल पडते. याला वैद्यकीय भाषेत टिनिया कॅपिटिस असे म्हणतात.
हे सर्व त्वचा, नखं , टाळूच्या फंगल इन्फेक्शनचे प्रकार आहेत.
पावलांना झालेले गजकर्ण (ऍथलेट्स फूट)
पावलांना गजकर्णाचा संसर्ग होतो तेव्हा तिथली त्वचा लाल होणे, सुजणे, सोलल्यासारखी वाटणे, दोन बोटांच्या मध्ये जी त्वचा असते तिथे खाज येणे अशी लक्षणे दिसतात. विशेषत: करंगळी व त्याबाजूचे बोट या दोन बोटांमध्ये इन्फेक्शन होण्याचे प्रमाण जास्त आहे.. पायाचा तळवा आणि टाचेलाही गजकर्ण होऊ शकते. इन्फेक्शन गंभीर असले तर पावलांच्या त्वचेवर फोड येऊ शकतात. म्हणूनच लक्षात आल्यावर लगेच गजकर्ण वरील उपाय सुरु केले पाहिजेत.
वाचा – सुरमा त्वचा रोगावर घरगुती उपाय
स्कॅल्प (टिनिया कॅपिटिस)
स्कॅल्पवर गजकर्ण झाले असेल तर तिथल्या त्वचेवर खवले येणे, खाज सुटणे, त्वचा लाल होणे व इन्फेक्शनच्या पॅच मध्ये गोलाकार टक्कल पडणे ही लक्षणे दिसून येतात. या गजकर्ण वर इलाज वेळीच केला नाही तर मोठ्या पॅच मध्ये टक्कल पडते आणि संसर्ग पसरल्यास त्वचेवर अनेक डाग पडतात. स्कॅल्पला गजकर्ण होण्याचे प्रमाण प्रौढांपेक्षा लहान मुलांमध्ये जास्त आहे.
मांडीचा सांधा / जांघेतील गजकर्ण (टिनिया क्रुरिस किंवा “जॉक इच”)
जेव्हा या भागात गजकर्ण होते तेव्हा मांडीच्या त्वचेच्या फोल्ड्सच्या आतील बाजूस, खवले, खाज, लाल ठिपके दिसतात.हे एक फंगल इन्फेक्शन असल्यामुळे शरीराच्या उबदार आणि ओलसर भागात होण्याची शक्यता जास्त असते. तेथील त्वचा लाल होते आणि खाज सुटून पुरळ उठते. पुरळ अनेकदा मांडीचा सांधा आणि आतील मांड्यांवर उठते आणि त्याचा आकार गोल असू शकतो. कधी कधी त्या ठिकाणची त्वचा काळी पडते व तिथे खूप खाज सुटते. तेव्हाही तेथे फंगल इन्फेक्शन असू शकते. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या प्रकाराला जॉक्स इच म्हणतात कारण हे इन्फेक्शन होणे खेळाडूंमध्ये सामान्य आहे. ज्यांना खूप घाम येतो किंवा ज्यांचे वजन जास्त आहे त्यांच्याही हे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.
दाढीमध्ये होणारे गजकर्ण (टिनिया बार्बे)
या इन्फेक्शनमध्ये पुरुषांच्या दाढीमध्ये खवले, खाज सुटणे, गालावर लाल ठिपके येणे, हनुवटी आणि मानेच्या वरच्या भागात पुरळ किंवा रॅशेस येणे ही लक्षणे दिसतात. जिथे लाल ठिपके उठलेत कालांतराने त्यात पस होणे व त्याठिकाणचे केस गळून पडणे हा त्रास होतो. पण घाबरून जाण्याचे कारण नाही कारण गजकर्ण इलाज करून (Gajkaran Var Upay) पूर्णपणे बरे होऊ शकते.
वाचा – चामखीळ येण्याची कारणे आणि घरगुती उपाय
गजकर्ण होण्याची कारणे | Causes Of Ringworm In Marathi
गजकर्ण हा एक संसर्गजन्य आजार आहे. या इन्फेक्शनला कारणीभूत असलेले परजीवी जंतू आपल्या त्वचेच्या बाहेरील लेयरवर असतात. त्यामुळे ते पसरणे खूप सोपे होते. गजकर्ण होण्याची खालील कारणे आहेत.
एकाचा दुसऱ्याला संसर्ग होणे
गजकर्ण बहुतेकवेळा एकापासून दुसऱ्याला असे पसरते. ज्या व्यक्तीला गजकर्ण झाले आहे त्याच्या त्वचेशी थेट संपर्क आल्यास आपल्या त्वचेवरही ते जंतू हल्ला करतात व आपल्यालाही गजकर्ण होते.
प्राण्याकडून माणसांना संसर्ग होणे
गजकर्ण असलेल्या एखाद्या प्राण्याच्या थेट संपर्कात आल्यास आपल्याला गजकर्णाचा संसर्ग होऊ शकतो. घरातील पाळीव प्राणी (श्वान, मांजरी) यांना गजकर्ण असेल तर ते घरातील व्यक्तींना होऊ शकते कारण पाळीव प्राण्यांना घरातील व्यक्ती थेट स्पर्श करतात. किंवा प्राणी घरातील व्यक्तींच्या जवळ जातात तेव्हा संसर्ग पसरू शकतो. गायींना देखील गजकर्ण होणे सामान्य आहे.
वस्तूंद्वारे संसर्ग पसरणे
आपण जर गजकर्ण झालेल्या व्यक्तीच्या वस्तू उदाहरणार्थ टॉवेल, नॅपकिन, कपडे, झोपण्याची उशी, चादर, पांघरूण, कंगवा, ब्रश वापरले तर त्यामुळे आपल्याला संसर्ग होऊ शकतो.
मातीतून संसर्ग होणे
काही दुर्मिळ केसेसमध्ये मातीतून देखील गजकर्णाचा संसर्ग होऊ शकतो. मातीत जर गजकर्णाचे जंतू असतील आणि दीर्घकाळ त्या मातीशी थेट संपर्क आल्यास आपल्याला गजकर्णाचे इन्फेक्शन होऊ शकते.
याखेरीज उष्ण व दमट वातावरण, घट्ट व अंगाला अंगाला चिकटून बसणारे कपडे दीर्घकाळ वापरणे, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असणे यामुळे सुद्धा गजकर्णाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
वाचा – त्वचा विकार आणि त्यावर आयुर्वेदिक उपाय
गजकर्ण घरगुती उपाय | Ringworm Treatment In Marathi
हे एक फंगल इन्फेक्शन आहे. त्यामुळे यासाठी शक्यतोवर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य औषधोपचार करावेत आणि त्याबरोबरच त्रासाची तीव्रता कमी व्हावी म्हणून आपण गजकर्ण वर घरगुती उपाय (Gajkaran Gharguti Upay In Marathi) देखील करू शकतो. डॉक्टर गजकर्णाची तीव्रता बघून त्यानुसार औषधोपचार सुचवतात. पण सामान्यतः त्वचेवर लावण्यासाठी औषधी मलम व लोशनने हा त्रास कमी होतो. डॉक्टर जी औषधे देतात ती अँटीफंगल म्हणजे फंगसवर परिणामकारक असतात. स्कॅल्प व नखांना जर संसर्ग झाला असेल तर डॉक्टर त्यासाठी पोटातून घ्यायची औषधे (Gajkaran Treatment In Marathi ) देतात. ही औषधे बराच काळ घ्यावी लागतात कारण त्वचेचे आजार बरे होण्यासाठी थोडा काळ जाऊ द्यावा लागतो.
याबरोबरच वापरलेली चादर आणि कपडे रोज स्वच्छ धुवून घेणे, अंघोळ केल्यानंतर अंग स्वच्छ कोरडे करणे, सैलसर कपडे घालणे व रोज नित्यनियमाने डॉक्टरांनी दिलेली औषधे लावणे या गोष्टी करणे आवश्यक असते. याखेरीज आपण गजकर्ण घरगुती उपाय (Gajkaran Gharguti Upay In Marathi) करूनही कमी करू शकतो. पण हे उपाय करण्याआधी तुमच्या डॉक्टरांना नक्की विचारा.
साबण व पाणी
गजकर्ण झाले असल्यास ती जागा जितकी स्वच्छ व कोरडी ठेवता येईल तितके चांगले. ज्या ठिकाणी संसर्ग झाला आहे तिथे तुम्हाला सूट होईल तो अँटीबॅक्टेरियल साबण लावून ती जागा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या व स्वच्छ धुतलेला टॉवेल किंवा नॅपकिन वापरून पूर्ण कोरडी करा व नंतरच डॉक्टरांनी दिलेले लोशन किंवा मलम लावा.
ऍपल सीडर व्हिनेगर
ऍपल सीडर व्हिनेगर मध्ये अँटीफंगल घटक असतात त्यामुळे आपण ते जर गजकर्ण झालेल्या पॅचवर लावले तर त्याचा उपयोग होतो. डायल्युट न केलेल्या ऍपल सीडार व्हिनेगरमध्ये कापसाचा बोळा बुडवून त्या बोळ्याच्या साहाय्याने ऍपल सीडार व्हिनेगर गजकर्णाच्या पॅचवर हळुवार हातानी लावा. असे दिवसातून तीन वेळा करा.
टी ट्री ऑइल
टी ट्री ऑइल त्वचेसाठी चांगले आहे हे तर आपल्याला ठाऊक आहेच. पण यामध्ये अँटीफँगल घटक असल्याने त्याचा गजकर्णावरही उपयोग होतो. कापसाच्या बोळ्याने टी ट्री ऑइल गजकर्ण झालेल्या जागेवर लावा. तुम्हाला जर ते थेट तुमच्या त्वचेवर लावायचे नसेल तर त्यात थोडेसे खोबरेल तेल मिसळून मग ते त्वचेवर लावा. खोबरेल तेलात देखील फंगस नष्ट करण्याचे गुण आहेत. स्कॅल्पवरील फंगल इन्फेक्शनवर तर खोबरेल तेल अतिशय गुणकारी आहे. तुम्हाला फक्त खोबरेल तेल लावायचे असल्यास ते थोडेसे कोमट करा व केसांच्या मुळाशी किंवा त्वचेवर लावा. याने त्वचेला येणारी खाज व जळजळ देखील थांबते.
हळद
हळदीचे औषधी गुण तर सर्वांनाच माहित आहेत. त्यामुळे गजकर्णावरही हळद प्रभावशाली आहे. पाणी व हळद यांची पेस्ट करा आणि ती गजकर्ण झालेल्या पॅचवर लावा. ती पूर्ण सुकली की मग धुवून टाका आणि त्वचा पूर्ण कोरडी करा.
कोरफड
त्वचेला येणारी खाज व जळजळ यासाठी कोरफड उपयोगी आहेच याशिवाय ती फंगल इन्फेक्शन देखील कमी करण्यास मदत करते. दिवसांतून तीन वेळा त्वचेवर कोरफडीचा गर लावल्यास गजकर्ण लवकर बरे होते.
अधिक वाचा – सोरायसिस म्हणजे काय जाणून घ्या सर्व माहिती
गजकर्ण संबंधित पडणारे काही प्रश्न – FAQ’s
- उपचार सुरू केल्यानंतर गजकर्ण किती काळ संसर्गजन्य आहे?
जोपर्यंत फंगल स्पॉर्स त्वचेवर असतात, तोपर्यंत गजकर्ण संसर्गजन्य आहे.जरी तुम्ही अँटीफंगल औषधे वापरण्यास सुरुवात केली असेल तरीही तुम्ही संसर्गजन्य असता. जोपर्यंत तुमच्या त्वचेतून सर्व स्पोर्स निघून जात नाहीत तोपर्यंत ही स्थिती संसर्गजन्य असते. म्हणजेच पूर्ण बरे होईपर्यंत गजकर्ण पसरू शकते.
2. गजकर्णावर सर्वात प्रभावी उपाय काय? गजकर्णाचे जंतू सर्वात जलद नष्ट कशाने होतात?
ओव्हर-द-काउंटर अँटीफंगल औषधे गजकर्णाचे जंतू सर्वात जलद नष्ट करू शकतात आणि आजार लवकर बरा करण्यात हातभार लावतात. पण ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी.
3. गजकर्णाच्या उपचारांनंतर काय करावे?
गजकर्णासाठी उपचार घेतल्यानंतरही त्वचेची काळजी घेणे बंद करू नये. स्वच्छता पाळणे व त्वचा कोरडी ठेवणे, सैलसर कपडे वापरणे कायम ठेवावे कारण गजकर्ण पुन्हा पुन्हा होऊ शकते. डॉक्टरांनी सांगितलेली सगळी औषधे दिलेल्या कालावधीसाठी सुरु ठेवावी.औषधे घेणे /लावणे मध्येच थांबवू नये.
4. गजकर्णासाठी मीठाचे पाणी उपयोगी आहे का?
मीठ घातलेल्या पाण्याने त्वचा निर्जंतुक होते आणि रॅशेस आलेले पॅच लवकर सुकण्यास मदत होते. तसेच कोमट पाण्यात मीठ घालून आंघोळ केल्याने फंगल इन्फेक्शनमुळे येणारी खाज कमी होण्यास मदत होते.
5. बरे होताना गजकर्ण काळे पडते का?
गजकर्ण बरे झाल्यानंतर काही लोकांना त्या जागी काळपट डाग येऊ शकतो. याला पोस्ट-इंफ्लॅमेटरी हायपरपिग्मेंटेशन म्हणतात. त्वचेचा रंग गडद असलेल्या लोकांमध्ये हे होणे अधिक सामान्य आहे असे तज्ज्ञांचे मत आहे.
वरील सर्व माहिती व उपाय हे हे लोकांमध्ये सामान्यपणे आढळणाऱ्या लक्षणांवरून दिलेले आहेत. तरी तुम्हाला काही त्वचेसंबंधित त्रास व शंका असल्यास तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करा. आपल्या मनाने उपचार केल्यास तब्येतीला धोका होऊ शकतो याची नोंद घ्यावी.
अधिक वाचा – त्वचेच्या समस्या आणि त्वचा रोग घरगुती उपाय