भारतभर होळी सणाच्या तयारीला सुरूवात झाली आहे. पण होळी आधी सुरू होतं ते होलाष्टक. काय आहे हे होलाष्टक? होळीची माहिती आपल्या सर्वांना असते पण तुम्हाला होलाष्टकाबाबत माहीती आहे का? माहीत नसेल तर नक्की वाचा हा लेख. होळीदहन आणि होलाष्टक हे एकमेकांशी निगडीत आहेत. यंदा तब्बल 499 वर्षानंतर एक दुर्लभ योग निर्माण होत आहे. होळीच्या आठ दिवस आधी लागतं ते होलाष्टक. यंदा होळी 29 मार्चला आहे, त्यामुळे होलाष्टक हे 22 मार्च ते 28 मार्च असेल. होलाष्टकादरम्यान शुभ कार्य करणं वर्जित असतं. जाणून घेऊया काय आहे हे होलाष्टक आणि त्याचं महत्त्व.
होलाष्टकाचं महत्त्व आणि आख्यायिका
हिंदू धर्मात होळीच्या आठ दिवस आधी सर्व शुभ कार्य थांबवली जातात. या कालावधीला होलाष्टक असं म्हटलं जातं. फाल्गुन शुक्ल अष्टमी ते होलिका दहनापर्यंत हे होलाष्टक असतं. होलाष्टकाचा काळ हा भक्तीच्या शक्तीचा प्रभाव सांगणारा आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार हिरण्यकशपूने आठ दिवस आपल्या मुलाला प्रल्हादाला त्रास दिला होता. पण भगवान विष्णूच्या कृपेने तो बचावला. प्रल्हादाची आत्त्या म्हणजेच हिरण्यकशपूची बहीण हिला आगीत न जळण्याचं वरदान प्राप्त होतं. जेव्हा ती प्रल्हादाला घेऊन आगीत बसली तेव्हा ती जळून खाक झाली पण भक्त प्रल्हाद मात्र बचावला. म्हणून होळीचा उत्सव हा वाईट शक्तींवर चांगल्याचा विजय दर्शवतो. त्यामुळे या काळात जास्तीत जास्त भक्ती कार्यात व्यतीत करावा. होलाष्टक सुरू होताच झाडाची एक फांदी कापून जमीनीत रोवली जाते. या फांदीला रंगीबेरंगी कपड्याचे तुकडे बांधतात. या फांदीला भक्त प्रल्हादाचं प्रतीक मानलं जातं. ज्या भागात होलिकादहनासाठी झाडाची फांदी जमिनीत रोवली जाते. त्या भागात कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य केलं जात नाही.
एक आख्यायिका अशीही सांगितली जाते की, कामदेवाने भगवान शंकराची तपस्या भंग केली होती. यामुळे क्रोधित होऊन शंकराने प्रेम देवतेला फाल्गुन अष्टमीच्या तिथीला भस्म केलं होतं. यानंतर कामदेवाची पत्नी रती हिने शंकराची आराधना केली आणि कामदेवाला पुर्नजिवित करण्याची याचना केली. ज्याचा शंकर देवाने स्वीकार केला. भगवान शंकराचा हा निर्णय भक्तांनी धूमधडाक्यात साजरा केला. यामुळे 8 दिवस शुभ कार्य वर्जित मानली जातात.
होलाष्टकात शुभकार्य टाळण्याचं ज्योतिषीय कारण
ज्योतिषशास्त्रानुसार अष्टमीला चंद, नवमीला सूर्य, दशमीला शनी, एकादशीला शुक्र, द्वादशीला गुरू, त्रयोदशीला बुध, चतर्दुशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहु यांचा स्वभाव उग्र असतो. ग्रह-नक्षत्र कमकुवत असल्याने जातकाची निर्णयक्षमता कमी होते. ज्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता असते.
Unsplash
होलाष्टकात टाळा शुभकार्य
होलाष्टकच्या कालावधीत म्हणजेच आठ दिवस मंगलकार्य करण्यास मनाई असते. या दरम्यान लग्न, भूमीपूजन, गृहप्रवेश, मांगलिक कार्य, नवा व्यवसाय किंवा नव्या कामाला सुरूवात करणं टाळावं. आपल्या शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की, होलाष्टक सुरू झाल्यावर 16 संस्कार म्हणजे बारसं, मुंज, गृहप्रवेश, विवाह यासारख्या शुभकार्यांना थांबवलं जातं. कोणत्याही प्रकारचे होम-हवनसुद्धा या दिवसांमध्ये करता येत नाहीत. याशिवाय असंही सांगितलं जातं की, या दिवसांमध्ये नवविवाहित स्त्रीला माहेरी राहायला जाण्याचा सल्ला दिला जातो.
होलाष्टकामध्ये काय करावं ?
होलाष्टकाच्या दिवसांमध्ये संपूर्ण वेळ भगवान शंकर आणि कृष्णाची उपासना करावी. असंही म्हणतात की, होलाष्टकामध्ये प्रेम आणि आनंदासाठी केलेले सर्व प्रयत्न यशस्वी होतात. मग यंदा होळीच्या शुभेच्छा तर द्याच त्यासोबतच ही होलाष्टकाची माहितीही तुमच्या प्रियजनांना नक्की द्या.