नववर्षाच्या स्वागताची सर्वत्र उत्साहात तयारी सुरु आहे. तरुणाईला नववर्षाच्या सुरुवातीलाच चाहुल लागते ती म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’ची. वातावरणात वाढलेल्या गारव्यासोबत प्रेमाची गुलाबी हवादेखील यंगस्टर्संना रोमांचित करत असते. या ‘खास दिवशी’ प्रेमयुगुलांना प्रेमाची कबुली देण्यासाठी साथ देतात ती चित्रपटातील ‘रोमॅंटिक गाणी’. सध्या एक नवकोरं प्रेमगीत तरुणाईच्या ओठांवर रुंजी घालतंय. मिरॅकल्स फिल्म्स निर्मित ‘युथ ट्युब’ या चित्रपटातील हे गीत आहे. ‘रुमझुम रुमझुम स्वप्नांची झांजरं मनात रोजच शंभर पाखरं…’ असे या गीताचे बोल आहेत. या गाण्याचा व्हिडिओ नुकताच रिलीज झाला आहे. यापूर्वी रिलीज झालेलं ‘WhatsApp वरती midnight chatting’ हे गाणं देखील यंगस्टर्संमध्ये खूप व्हायरल झालं होतं.
शिल्पा देशपांडे एक ‘लोकप्रिय गझलकारा’
युथ ट्युबमधील ‘रुमझुम रुमझुम स्वप्नांची झांजरं मनात रोजच शंभर पाखरं…’ या प्रेमगीताची गीतकार ‘शिल्पा देशपांडे’ आहे. शिल्पाला लहानपणापासूच कविता करण्याचा छंद जडला. पूर्वी मीडियामध्ये निवेदनाच्या कामात व्यस्त असल्यामुळे तिला हा छंद मोठ्या प्रमाणावर जपणं शक्य नव्हतं. आता मात्र तिने कविता आणि गझलच्या दुनियेत ‘लोकप्रिय गझलकारा’ म्हणून नावलौकिक मिळवला आहे. वर्षभरापूर्वीच प्रदर्शित झालेला शिल्पाचा ‘दिवे अत्तराचे’ हा गझल अल्बमदेखील लोकप्रिय झाला. शिल्पाला सतत नवनवीन कविता आणि गझल स्फुरत असतात. तिच्या गझलदेखील नाविण्यपूर्ण आणि वेगळ्या धाटणीच्या असतात. यापूर्वी प्रमोद प्रभुलकरांच्या ‘सुंदर माझे घर’ या चित्रपटासाठी शिल्पाने कवितालेखन केलं होतं. युथ ट्युब चित्रपटातील तिचं हे प्रेमगीतदेखील मनाला नक्कीच मोहरुन टाकणारं आहे.
Also Read About दु: खी भावनिक स्थिती
युथ ट्युब ‘एक फेब्रुवारी’ला होणार प्रदर्शित
‘युथ ट्युब’ हा चित्रपट तरुणाईवर आधारित आहे. तरुण पिढी आणि सोशल मीडिया यांचं असलेलं अतुट नातं या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. युथ ट्युबमध्ये प्रमुख भुमिकेत लागीरं फेम ‘शिवानी बावकर’ झळकणार आहे. तसंच या चित्रपटातून अनेक नवीन तरुण चेहरेदेखील प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाच्या कथानकामध्ये ‘मैत्री’ हा महत्वाचा दुवा असणार आहे. प्रमोद प्रभुलकर दिग्दर्शित आणि मिरॅकल्स फिल्म निर्मित युथ ट्यूब हा चित्रपट एक फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील गीतांना संगीतबद्ध केलं आहे ‘पंकज पडघण’ यांनी तर ‘मधुराणी प्रभुलकर, शिल्पा देशपांडे, सायली कुलकर्णी’ यांनी यासाठी गीतं साकार केली आहेत. या गीतांना आर्या आंबेकर, सायली पंकज, सागर फडके आणि शिखा अजमेरा यांनी या ‘स्वरसाज’ चढवला आहे. या रोमॅंटिक गाण्यांमुळे चित्रपटाबाबत प्रंचड उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.
फोटोसौजन्य-इन्स्टाग्राम