चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी झळकणार वेबसीरिजमध्ये

चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी झळकणार वेबसीरिजमध्ये

आजकाल वेबसीरिजचा जमाना आहे. मराठी सिनेमातील कलाकार असो वा बॉलीवूडमधील सेलेब्स असो सध्या सगळ्यांनाच वेबसीरिजचं जग खुणावतंय. या वेबसीरिजवर झळकणाऱ्या स्टार्समध्ये आता मराठीतला चॉकलेट हिरोसुद्धा सामील झाला आहे. जाणून घेऊया या अभिनेत्याच्या पहिल्यावहिल्या वेबसीरिजबाबत.

सतीश राजवाडे आणि स्वप्नील जोशी एकत्र

मराठी सिनेसृष्टीत एका पेक्षा एक सुपरहिट कलाकृती देणारी दिग्दर्शक आणि अभिनेत्याची जोडी म्हणजे सतीश राजवाडे आणि स्वप्निल जोशी. लवकरच ही जोडी वेबसिरिजच्या निमित्ताने आपल्याला मनोरंजनाची एक दर्जेदार मेजवानी देणार आहेत. मालिका आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रात हिट ठरलेली ही जोडी आता वेबदुनिया गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या आणि एम एक्स ओरिजिनलची निर्मिती असणाऱ्या "समांतर" या वेबसीरिजमधून स्वप्नील जोशी वेबच्या दुनियेत पाय ठेवणार आहे. सुप्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित ही वेबसीरिज आहे.

कोणाचा शोध घेत आहे स्वप्नील

नेहमी चॉकलेट बॉयच्या भूमिकेत दिसणारा स्वप्नील यावेळी मात्र काहीतरी वेगळं प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. स्वप्नील जोशीने आपल्या इन्स्टा अकाउंटवर या वेबसीरिजचं टीजर शेअर केलं आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने म्हटलं आहे की, कोण आहे सुदर्शन चक्रपाणी? या टीजरवरून ही वेबसीरिज सस्पेन्स प्रकारातली असल्याचं दिसतंय. तसंच यामध्ये स्वप्नील सुदर्शन चक्रपाणी नावाच्या व्यक्तीचा शोध घेत असल्याचं दिसतंय. आता हा सुदर्शन चक्रपाणी कोण हे जाणून घेण्यासाठी ही वेबसीरिज नक्कीच पाहावी लागेल. तसंच स्वप्नील एका हटके भूमिकेत पाहण्याची संधीही त्याच्या चाहत्यांना मिळणार आहे, हे मात्र नक्की.

स्वप्नीलसोबतच तेजस्विनीसुद्धा

या वेबसीरिजमध्ये स्वप्नील जोशीसोबतच अभिनेत्री तेजस्विनी पंडितसुद्धा दिसणार आहे. पण रिलीज झालेल्या टीजरमध्ये अजून तेजस्विनी दिसलेली नाही. नुकतंच तेजस्विनीच्या तेजाज्ञा ब्रँडचं ग्रँड वेडिंग सीरिज शूट आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळालं होतं. आता स्वप्नीलच्या भूमिकेची हटके शेड पाहिल्यानंतर समांतरमध्ये तेजस्विनीच्या भूमिकेबाबतची उत्सुकताही वाढली आहे.

एमएक्सची अजून एक मराठी प्रस्तुती

एमएक्स या अॅपवरील ही अजून एक मराठी वेबसीरिज आपल्या भेटीला येत आहे. या आधीही एमएक्सने मूव्हींग आऊट, पांडू, आणि काय हवं, वन्स इन अ ईयर सारख्या आणि अजून काही चांगल्या वेबसीरिज मराठी प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत. आता पाहूया आगामी ‘समांतर’ या वेबसीरिजमधला सुदर्शन चक्रपाणी कोण?, स्वप्नील कोणाचा शोध घेत आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी वाट पाहा समांतरची. मुख्य म्हणजे हे वेबसीरिज फक्त मराठीतच नाहीतर हिंदी आणि इतर दोन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. स्वप्नीलच्या या शोधाचे कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे असेल असे वाटते आहे. 'समांतर' वेबसीरिजचा टिजरनंतर येत्या ९ मार्चला या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.