गणपती बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र वातावरण अगदी मंगलमय आणि आनंदी झालं आहे. बाप्पाच्या चरणी लीन झाल्यावर एक अनामिक शांतता प्रत्येकालाच मिळते. खरंतर बाप्पाचं आणि आपलं नातं एक खास नातं असतं. बाप्पाचं आणि आपलं हे नातं नकळत कधी तयार होतं हे कोणालाच कळत नाही. ज्यामुळे हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हवाहवासा वाटत राहतो.
मालिकांमधील कलाकारांना तासनतास त्यांच्या कामानिमित्त शूटिंगमध्ये व्यस्त राहावं लागतं. त्यामुळे बऱ्याचदा या कलाकारांचे सण-समारंभ हे सेटवरच साजरे केले जातात. पण गणेशोत्सवाची मजाच काही निराळी असते. काहीजण आपल्या घरी तर काहीजण सेटवर गणपती बाप्पाची मुर्ती आणतात. कारण बाप्पासोबत हा सण साजरा करावा असं सर्वांनाच मनापासून वाटत असतं. गणेशोत्सव जवळ येताच बाप्पाच्या आठवणी नकळत मनात रूणुझूणु करू लागतात. काही मराठी कलाकारांनी त्यांच्या बाप्पासोबत असलेल्या त्यांच्या या काही स्पेशल आठवणी आणि यंदाचा गणेशोत्सव ते कसा साजरा करणार हे POPxo मराठीच्या चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.
तितिक्षा तावडे (तू अशी जवळी राहा )
“माझ्या गावी १० दिवसांचा गणपती असतो. त्यामुळे, लहानपणापासून असं एकही वर्ष गेलेलं नाही, ज्या वर्षी मी गणपतीत गावाला गेले नाही. अर्थात, सुरुवातीला ११ दिवस गावी जात असे. नंतर कामामुळे हे दिवस कमी कमी होत गेले. पण दर वर्षी वेळ काढून मी गणेशोत्सवाला गावी जातेच. यंदा कामाचा व्याप अधिक असणार आहे. तरीही वेळात वेळ काढून मी गणपतीच्या दिवसात गावाला जाऊन येणार आहे. कोकणात जायचं म्हणजे, १२ तासांचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे मला ३ दिवसांची सुट्टी हवी होती. पण तू अशी जवळी राहा या मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे सुट्टी मिळणे थोडे कठीण होते तरी देखील मी मालिकेच्या चित्रिकारणातून वेळ काढून 2 दिवसांची सुट्टी घेतली आहे. गणेश चतुर्थीच्या सुट्टीचा दिवस धरून, २ ते ३ दिवस मला मिळणार असल्यामुळे वेगवेगळ्या मंडळांच्या गणपतीला मी नक्की भेट देणार आहे. अशा विविध मंडळांच्या गणपतीला जाणं मला फार आवडत असल्याने माझं प्राधान्य त्यालाच असेल.”
अभिजित श्वेतचंद्र (साजणा)
“गणपती या आराध्य दैवतावर माझी फार श्रद्धा आहे. माझ्या घरी सुद्धा ५ दिवसांचा गणपती असतो. गणपतीची आरास करण्यासाठी साजणा च्या शूटिंगमधून वेळ काढणं कठीण जातं. तरीही रात्री घरी पोचल्यानंतर हे काम मी गेले १५ दिवस करतो आहे. रोज थोडं थोडं करत हे काम सुरू आहे. इकोफ्रेंडली आरास करण्याचा माझा प्रयत्न आहे. दरवर्षी एखादा छानसा देखावा तयार करण्याचा माझा प्रयत्न असतो. ही कला जोपासायला मला फार आवडतं. अर्थात, दरवर्षी जी काही आरास करतो, त्याचं काही ना काही काम अगदी शेवटच्या दिवसापर्यंत सुरू असतं.
गणेशोत्सव हा माझा आवडत सण आहे. त्यानिमित्ताने सर्व मित्रमंडळी व नातेवाईक घरी येतात व गप्पाटप्पा सुद्धा होतात. ५ दिवसांची सुट्टी मिळत नसली, तरीही जी काही सुट्टी मिळेल, त्या दिवसांमध्ये मी हा आनंद साजरा करतो. सार्वजनिक गणेशोत्सवांना भेट देणंही मला फार आवडतं. १० दिवसांच्या काळात, वेळात वेळ काढून तेदेखील करण्याचा माझा प्रयत्न असतो.”
हृता दुर्गुळे ( फुलपाखरू)
“आमच्या घरी दीड दिवस गणपती असतो. यानिमित्ताने सर्व नातेवाईक एकत्र येतात. फुलपाखरू च्या शूटिंग मधून वेळ काढून मी गणपतीच्या सजावटीसाठी मदत करते. एक वेगळाच माहोल यानिमित्ताने घरात निर्माण झालेला पाहायला मिळतो. संपूर्ण घरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असल्याने वेळ फार मजेत जातो. गणेशोत्सवाचे माझ्यासाठी असलेले आणखी एक महत्त्व म्हणजे माझा जन्म गणेशोत्सवाच्या काळात झालेला असल्याने दरवर्षीचा वाढदिवस याच दरम्यान येतो.”
हार्दिक जोशी ( तुझ्यात जीव रंगला )
“माझ्या घरी सुद्धा ५ दिवसांचा गणपती असतो. त्यामुळे दरवर्षी तुझ्यात जीव रंगला या मालिकेचं चित्रीकरण सांभाळून सर्व तयारी करावी लागते. अर्थातच, गणेशोत्सवासाठी सुट्टी घ्यायची म्हणजे त्याचा परिणाम मालिकेच्या चित्रिकरणावर होणार नाही, याची काळजी मी घेतो. मला जसं शक्य होईल तसं मी जास्त वेळ शूटिंग करून सर्व भाग वेळेत पूर्ण होतील याचा प्रयत्न करतो. त्यानुसार, काम वेळेत पूर्ण झाले आहे याची खात्री झाल्यानंतर, घरच्या गणपतीसाठी यंदा मी सुट्टी घेतली आहे. कामाचा व्याप कितीही असला, तरीही घरच्या बाप्पासाठी सुट्टी घ्यायला हवी. यासाठी जे करणे शक्य आहे, ते करण्याचा माझा प्रयत्न असतो.
अभिजित खांडकेकर ( माझ्या नवऱ्याची बायको )
“माझ्या घरी दहा दिवसांसाठी बाप्पांची प्रतिष्ठापना होते. बाबांची कामानिमित्त सतत बदली होत राहायची. त्यामुळे नगर, बीड, परभणी अशा अनेक ठिकाणी आम्हाला जावं लागायचं. पण तरीसुद्धा दरवर्षी गणपती आणण्याची प्रथा आजही कायम आहे.
आई-बाबा नाशिकच्या घरी राहतात. तिथेच आम्ही गणपतीचा सण साजरा करतो. मात्र, गौरी माझ्या काकांच्या घरी आणली जाते. मी आणि सुखदा न चुकता गणपतीसाठी नाशिकला जातो. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या कामामुळे मी व्यस्त आहे. मात्र, तरी देखील मी चित्रिकारणातून वेळ काढून काही दिवसांसाठी मी नाशिकला जाऊन येईन. बाप्पाच्या मूर्तीबाबत आम्ही नेहमी काही नियम पाळतो. आम्ही शक्यतो पारंपारिक मूर्तीला प्राधान्य देतो. बाप्पाचं पितांबर, डोळे पडताळल्यानंतर मूर्तीची निवड केली जाते. अगदी साधी पण आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनाला भावेल अशी मोहक, पिंतांबर नेसलेली आणि आसनस्थ मूर्ती आम्ही आणतो. प्रसन्न अशी गणपती बाप्पाची मूर्ती आमच्या घरी १० दिवसांसाठी विराजमान होईल.”
कलाकारांच्या जश्या बाप्पाच्या आठवणी आहेत. तश्याच तुमच्याही असतीलच. बाप्पा विसर्जनानंतर त्याला मिस करत असाल तर नक्की शेअर करा गणपती विसर्जन दुःखी कोट्स (ganpati bappa visarjan quotes in marathi) आणि आपल्या भावनांना व्यक्त करा.
अधिक वाचा –
DIY: या गणेशोत्सवाला घरच्या घरी स्वतःच तयार करा अशी इकोफ्रेन्डली सजावट
गणपतीसाठी वेगळ्या आणि सोप्या Modak Recipes
#MemoriesOfYourBappa: कोकणातील गणेशोत्सवाच्या आठवणी
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम