अभिनयानंतर अभ्यासतही रिंकूचं ‘सैराट’ यश

अभिनयानंतर अभ्यासतही रिंकूचं ‘सैराट’ यश

रिंकू राजगुरू हे नाव ‘सैराट’नंतर घराघरात पोहचलं आहे. नुकताच रिंकूचा ‘कागर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि पुढे ‘मेकअप’च्या प्रमोशनसाठीही रिंकू सज्ज झाली आहे. पण हीच रिंकू अभ्यासातही तितकीच हुशार निघाली आहे. रिंकू राजगुरूने यावर्षी आपली बारावी परीक्षा दिली होती. या परीक्षेमध्ये रिंकू 82 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाली असून ‘सैराट’ यश मिळवलं आहे. रिंकूने बारावीच्या परीक्षेमुळेच तिच्या आधीच्या चित्रपटाचं प्रमोशनही पुढे ढकललं होतं. अभिनयाबरोबरच रिंकूला तिचं शिक्षणही व्यवस्थित पूर्ण करायचं असल्यामुळे तिने अभ्यासाकडेही व्यवस्थित लक्ष दिलं.


rinku result


दहावीची कसर भरून काढली बारावीत


रिंकूचा ‘सैराट’ प्रदर्शित झाला तेव्हा रिंकू दहावीत होती. प्रमोशनमुळे तिला अभ्यासासाठी जास्त वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे तिला दहावीमध्ये 64.40 टक्के मिळाले होते. पण त्यावेळची अभ्यासाची कसर भरून काढत रिंकूने यावेळी दणदणीत यश मिळवलं आहे. यावेळी 82 टक्के मिळवत बारावीमध्ये घवघवीत यश मिळवलं आहे. ‘मराठीत सांगितलेलं कळत नाही का, इंग्लिशमध्ये सांगू ’ असं म्हणत रिंकूने सर्वांच्या मनामध्ये राज्य केलं. याच रिंकूने इंग्रजी आणि मराठी या दोन्ही विषयांमध्ये चांगले गुण मिळवले आहेत. अनुक्रमे इंग्रजीमध्ये 54 आणि मराठी या विषयामध्ये 86 गुण मिळवले आहेत. तर इतर विषयांमध्येही तिला अप्रतिम गुण मिळाले असून एकूण 650 पैकी 533 गुण मिळवत तिने बारावीत यश प्राप्त केलं आहे. रिंकूला ‘सैराट’ने खूपच चांगली ओळख मिळवून दिली इतकंच नाही तर नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटामुळे तिला पहिल्याच चित्रपटातून राष्ट्रीय पुरस्कारही मिळवून दिला. इतकं यश मिळूनही अभ्यास किती महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवत रिंकूने आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करत यश मिळवलं आहे. आता रिंंकू पुढे नक्की कोणत्या क्षेत्रात अभ्यास करणार हेदेखील लवकरच कळेल.


rinku FI


लवकरच रिंकूचा येणार ‘मेकअप’


रिंकू राजगुरूच्या ‘कागर’ला म्हणावं तितकं मोठ्या पडद्यावर यश मिळालं नाही पण आता रिंकूचा ‘मेकअप’ हा नवा चित्रपट लवकरच येत आहे. रिंकूला तिच्या करिअरच्या सुरूवातीलाच सैराटसारखा चांगला आणि दमदार भूमिका असलेला सिनेमा मिळाला. आता रिंकू तिच्या आगामी मेकअप या चित्रपटातही अगदी हटके रोलमध्ये दिसणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन गणेश पंडीत करत आहेत. या आधी त्यांनी बालक-पालक, बाळकडू आणि राणी मुखर्जीच्या हिचकी सिनेमाचं लेखन केलं असून दिग्दर्शनातलं हे त्याचं पहिलं पाऊल आहे. मेकअपच्या टीझरमध्ये रिंकू दारूच्या नशेत असून अगदी शोले स्टाईल धर्मेंद्रप्रमाणे बडबडताना दिसत आहे. या 57 सेकंदाच्या क्लीपमध्ये रिंकू एका पडक्या बिल्डींगमध्ये उभी असून तिच्या घरच्यांना उद्देशून बोलत आहे. जी तिच्या मेकअपवरून बोलणाऱ्या घरातल्याविरूद्ध तक्रारीचा सूर लावत आहे. या टीझरमध्येही तिचा बोलण्याचा लहेजा थोडासा ग्रामीणच आहे. हे टीझर सोशल मीडियावर येताच व्हायरल झालं आहे. रिंकूच्या फॅन्सनी तिच्या या नव्या अवताराला पसंती दिल्याचं कळतंय. मेकअपमधला रिंकूचा हा लुक तिच्या आधीच्या दोन्ही चित्रपटांपासून अगदी हटके आहे. त्यामुळे तिच्या फॅन्समध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा - 


मेकअपमध्ये रिंकू राजगुरूचा राऊडी अवतार


रिंकू-आकाश जोडी पुन्हा झळकणार नागराज मंजुळेच्या ‘झुंड’मधून


रिंकूच्या बारावीच्या परीक्षेमुळे 'कागर'चं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय