ADVERTISEMENT
home / भविष्य
लग्न कुंडली कशी पाहावी | कसा पहावा विवाह योग मराठी

लग्न कुंडली कशी पाहावी | कसा पहावा विवाह योग मराठी

नेहमी आपण थोरामोठ्यांकडून ऐकत असतो की,  लग्नयोग जुळून आला की लग्न होईल अथवा तुझं लग्न कधी होणार आहे अशा स्वरूपाचे प्रश्न एका विशिष्ट वयानंतर ऐकू येतात. पण लग्न योग कधी अथवा लग्नयोग म्हणजे नक्की काय हे माहीत आहे का? आपण फक्त म्हणतो की सारे नशीबाचे खेळ आहेत आणि योग यायला हवा. पण योग जुळून येतो म्हणजे नक्की काय होतं हेदेखील तितकंचं महत्त्वाचे आहे. प्रत्येकाचा जन्म झाल्यानंतर राशीकुंडली काढण्यात येते. या कुंडलीनुसार अभ्यास करून लग्नयोग अर्थात लग्न होण्याचे साधारण वय काय असू शकेल हे सांगता येते. जन्म झाल्याच्या वेळी चंद्र ज्या राशीत असेल ती जन्मरास अथवा चंद्ररास असते. तर लग्नकुंडली म्हणजे जन्माच्या वेळी पूर्व क्षितीजावर जी रास असते त्याला आपली लग्नरास असे म्हटले जाते. या सगळ्या गोष्टींचा एक अभ्यास असतो आणि त्यानुसारच लग्नयोग पाहता येतो. कोणीही उठसूठ कुंडली पाहून लग्नाचा योग पाहू शकत नाही. आपले लग्न कसे होईल? प्रेमविवाह होईल की पत्रिका जुळवून केलेला विवाह असेल? आपला जोडीदार कसा असेल? वैवाहिक सौख्य मिळेल की नाही, लग्न कुंडली कशी पहावी असे अनेक प्रश्न हे प्रत्येकाच्या मनात असतात. याची उत्तरं तुम्हाला नक्की मिळू शकतात.  

लग्न कुंडली म्हणजे काय?

आधी हे समजून घ्या कि जन्मरास आणि विवाह रास दोन्ही वेगवेगळ्या असतात. जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती जन्म राशी किंवा चंद्र राशी असते. तर विवाह कुंडली म्हणजे हि अशी रास आहे जी जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर असते. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यानुसार विवाह योग पाहता येतो.

लग्न कुंडली कशी पाहावी | Lagna Kundali Kashi Pahavi

लग्न कुंडली कशी पाहावी | Lagna Kundali Kashi Pahavi
लग्न कुंडली कशी पाहावी

प्रत्येक व्यक्तीला आपल्या भविष्यात नक्की काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. भाग्योदय कधी होणार, रंगरूप, आचारविचार, स्वभाव, गुणदोष, योग्यता, व्यवसाय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लग्न. लग्न योग कधी आहे हे सर्व लग्न कुंडलीवरून पाहिले जाते. कुंडलीच्या पहिल्या स्थानात जी रास असते तीच तुमची लग्न रास म्हणून गृहीत धरले जाते. उदा. प्रथम स्थानमध्ये मेष रास असेल तर तुमची लग्न रास ही मेष ग्राह्य धरली जाते. कुंडलीमध्ये लग्न आणि लग्नेश बलवान असणे हे आयुष्यामधील शुभस्थिती, बलहीन लग्न, लग्नातील चढउतार, संघर्ष याबाबत व्यक्त होते. लग्न कुंडली कशी पहावी याचे उत्तर हवे असेल तर लग्न कुंडलीत जी रास आहे त्यालाच स्वामी लग्नेश असं म्हटलं जातं. कुंडली मिलन करतानाही लग्न राशीचा विचार महत्त्वपूर्ण आहे. लग्न कुंडली हा सर्वात महत्त्वाचा भाग असून यावरूच तुमचे लग्न कसे टिकून राहील याबाबात शक्यता वर्तविली जाते. 

जन्मकुंडलीच्या प्रकारांपैकी सर्वात महत्त्वाची म्हणजे लग्न कुंडली आहे. लग्न हा जन्मकुंडलीचा आत्मा समजण्यात येतो. खगोलीय सूर्यमालेतील बारा राशी पूर्व दिशेला एकामागून एक उगवतात. हा क्रम 24 तास किंवा 60 तासात पूर्ण होतो आणि पुन्हा सुरू होतो आणि सतत चालू राहातो. पृथ्वी आपल्या अक्षावर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते आणि याच क्रांतीमुळे संपूर्ण आकाश हे पूर्व क्षितीजावर दिसते. एखाद्या वेळी पूर्व दिशेला वाढणाऱ्या राशीला दिलेली विशिष्ट संख्या ही पहिल्या घरात लिहिलेली असते. त्याप्रमाणे ज्या राशीचा उदय होत आहे ती त्या वेळी चढत्या राशीची मानल जाते आणि त्यानंतर इतर राशी कुंडलीमध्ये स्थापित होतात आणि त्याप्रमाणे लग्न कुंडली पाहिली जाते. 

कुंडलीत काय बघणे आहे गरजेचे | Lagna Kundali Madhye Kay Baghave?

ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नसला तरीही त्याची थोडीफार माहिती करून घेतली तर नक्कीच वाया जात नाही. तुम्हालाही नक्की काय आहे यामध्ये रस असेल तर तुम्ही याची माहिती करून घ्या. लग्नयोग आहे की नाही हे पाहण्यासाठी नक्की काय बघायला हवे – 

  • मुलाच्या कुंडलीत चंद्र – शुक्र आणि मुलीच्या कुंडलीमध्ये रवि – शुक्र हे महत्त्वाचे ग्रह बघावे लागतात
  • शनि, मंगळ आणि राहू हे तीन ग्रह विवाहाला विलंब करतात आणि त्याशिवाय विवाहसौख्यामध्येही बाधा आणतात
  • गुरु हा ग्रह नेहमीच शुभ मानण्यात येतो. कुंडलीत गुरू ग्रह कुठे आहे यावर वैवाहिक सौख्य अवलंबून असते
  • सप्तम स्थानामध्ये जी रास असते त्या राशीचा ग्रह हा विवाहाच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा असतो. उदा. जर सप्तम स्थानामध्ये कन्या ही रास असेल तर त्या राशीसाठी बुध हा ग्रह महत्त्वाचा ठरतो. 

कोणत्या स्थानामध्ये जुळून येतो विवाह योग मराठी

कोणत्या स्थानामध्ये कोणता ग्रह असेल तर विवाह जुळून येईल हेदेखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कोणत्या स्थानामध्य जुळून येतो विवाह योग मराठीत जाणून घ्या –  

ADVERTISEMENT
  • महिलांच्या बाबतीत जेव्हा रवि आणि गुरू एकत्र येतील, रवि हा गुरू ग्रहापासून पाचव्या अथवा सातव्या स्थानात असेल तेव्हा लग्नाचा योग निर्माण होतो. तसंच शनि, मंगळ, राहू यापैकी कोणताही दोष पत्रिकेत नसेल तर विवाहयोग लवकर अथवा योग्य वयात येतो 
  • पुरूषांच्या बाबतीत सांगायचे झाले तर चंद्र आणि गुरू एकत्र आले असता चंद्र गुरूपासून पाचव्या अथवा सातव्या स्थानावर असल्यास, लग्नयोग जुळतो. विवाहयोगासाठी मग जास्त प्रयत्न करावा लागत नाही
  • ज्यावेळी मुलींच्या कुंडलीमध्ये चलित गुरूचे भ्रमण हे तिच्या जन्मगुरूवरून होते तेव्हा ती समंजस होते आणि पुरूषाच्या कुंडलीमध्ये हेच भ्रमण जेव्हा जम्नराहूवरून होते तेव्हा विवाह योग संभवतो. लवकर अथवा उशीरा विवाह ही काळ, जाती, समाजानुसार वेगवेगळे असू शकते. 
  • गोचरीचा गुरू जेव्हा प्रथम, तृतीय, सप्तम वा एकादश स्थानामध्ये प्रवेश करतो तेव्हा विवाहयोग संभवतो. तसंच यावेळी चंद्र, रवि, शुक्र अथवा सप्तम राशीचा ग्रह यासह गुरूचा शुभयोग असेल तर विवाह होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगण्यात येते 

विवाह होण्यास विलंब का होतो

लग्न कुंडली कशी पाहावी | कसा पहावा विवाह योग मराठी
कुंडली

अनेक वेळा आपण पाहतो की, घरात सर्व सुख आहे. मुलगा वा मुलगी अत्यंत चांगले आहेत. नोकरी, पैसा, घर सर्व काही आहे मात्र विवाह योग जुळून येत नाही. मग असे का असाही प्रश्न पडतो. विवाहाला विलंब होण्यासाठी मंगळ, शनि आणि राहू या तीन ग्रहांचा त्रास असतो. एखाद्या व्यक्तीच्या लग्न कुंडलीत प्रथमस्थानी, पंचमस्थानी वा सप्तमस्थानी अथवा दशमस्थानी शनि असेल अथवा प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम किंवा बाराव्या स्थानी मंगळ असेल, तसंच राहू प्रथम स्थान वा सप्तम स्थानात असेल तर विवाह जुळण्यास हमखास विलंब होतो. त्याचप्रमाणे एखाद्याच्या पत्रिकेमध्ये शनिदोष असेल तर अशा व्यक्तीचा विवाह हा वयाच्या तिशीनंतरच होतो. मंगळदोष असल्यास, 28 व्या वर्षानंतर लग्नाचे योग असतात. तर राहूचा दोष असेल तर 32-35 वयापर्यंत वाट पाहावी लागते. कधीकधी तर अशा व्यक्तींचे विवाहच होत नाहीत. 

सप्तमस्थानामध्ये रवि, मंगळ, शनि वा राहू असेल तर विवाहाला विलंब होतोच. अनेक अभ्यासावरून हे सिद्ध झाले आहे. तसंच महिलांच्या कुंडलीमध्ये रवि – शनि, रवि – मंगळ अथवा रवि आणि राहू अशा जोड्या असतील तर हमखास उशीरा विवाह होतो. तर पुरूषांच्या कुंडलीमध्ये चंद्र – मंगळ, चंद्र – राहू अथवा चंद्र – शनि अशी जोडी बनली असेल तर विवाह जुळण्यास विलंब होतो. 

विवाह योग कसा कळतो

विवाहयोग्य अर्थात लग्नयोग नक्की कसा बघावा अथवा तो कसा कळतो हा प्रश्न प्रत्येकालाच असतो. पण ज्योतिषशास्त्रात त्याचे काही आराखडे असतात.  त्यानुसार लग्नयोग पाहिला जातो. तुम्हालाही याची माहिती आम्ही देत आहोत. 

  • महिलांच्या कुंडलीत रवि – गुरू एकत्र असतील, रवि हा गुरूपासून पाचव्या अथवा सातव्या स्थानात असेल तर विवाह होतो. तसेच शनि, मंगळ, राहू यापैकी कोणत्याही ग्रहाचा दोष पत्रिकेत नसेल तर लग्नयोग लवकर म्हणजे योग्य वयात होतो
  • पुरुषाच्या कुंडलीत चंद्र आणि गुरू एकत्र  असतील आणि चंद्र गुरूपासून पाच अथवा सातव्या स्थानात असेल तर त्याचा लग्नयोग जुळून येतो
  • लवकर अथवा उशीर विवाह होण्याचे योग हे देश, काळ, जाती आणि समजानुसार बदलू शकतात. पण हा योग असतो.  त्या कालावधीत तुम्ही लग्न करू शकता
  • गोचरीचा गुरू जेव्हा प्रथम, तृतीय, सप्तम अथवा एकादश स्थानामध्ये असतो त्यावेळी लग्नयोग जुळून येतो. त्याचवेळी चंद्र, रवी, शुक्र याचा गुरूशी शुभयोग होत असतो अशी परिस्थिती असेल तेव्हा लग्नयोग जुळून येण्याची दाट शक्यता असते

लग्न कुंडलीत विवाह मोडणे किंवा घटस्फोट होईल हे कसे बघावे?

लग्न भविष्य मराठीत आपण वाचत असतो. सर्वात मोठी भीती असते ती म्हणजे विवाह मोडणे अथवा घटस्फोटाची. पूर्णपणे नातं विस्कळीत होणे म्हणजे शेवटची पायरी अर्थात घटस्फोट घेणे. पण हे नक्की का घडते. अर्थात याला माणसाचे स्वभाव, परिस्थिती कारणीभूत असते. पण सर्वात मोठा ग्रह कारणीभूत ठरतो, तो म्हणजे हर्षल. तुमच्या कुंडलीमध्ये हर्षल हा ग्रह सप्तमस्थानात अथवा प्रथमस्थानात असेल तर हमखास विवाह मोडतो. त्याचप्रमाणे कुंडलीमध्ये कोणत्याही स्थानावर चंद्र – हर्षल, रवि – हर्षल एकत्र असतील अथवा समोरासमोर असतील तर घटस्फोटाची शक्यता नाकारता येत नाही. या युतीमुळे विवाहामध्ये फसवणूक, मतभेद, चढउतार सगळ्याला दोन्ही व्यक्तींना सामोरे जावे लागते. याशिवाय जर कुंडलीमध्ये खालील युती असेल तर विवाह मोडतो 

ADVERTISEMENT
  • लग्नामध्ये शनी – हर्षल युती 
  • शुक्र वक्री असल्यास, चंद्र – शनि – मंगळ युती 
  • शुक्र केंद्रयोग शनि – हर्षल युती 
  • सप्तम स्थानात केतू, हर्षल वक्री 
  • पाप नक्षत्रामध्ये रवि आणि मंगळ ग्रहाची युती 
  • सप्तम स्थानात मंगळ – नेपच्युन – केतू एकत्र 
  • लग्न स्थानात शनि आणि नेपच्युन युती, धन स्थानामध्ये वक्री मंगळ, शुक्र – हर्षल युती 

लग्न कुंडलीत प्रेमविवाहाची स्थिती आहे कसे समजते?

लग्न कुंडली कशी पाहावी | कसा पहावा विवाह योग मराठी
प्रेमविवाहाची कुंडलीतील स्थिती

प्रत्येकालाच आपला प्रेमविवाह व्हावा असे वाटत असते. पण त्यासाठी कुंडलीत तसे ग्रहही असावे लागतात. त्यासाठी पाचवे आणि सातवे स्थान महत्त्वाचे आहे. चंद्र – गुरू, रवि – गुरू यांचा शुभयोग असल्यास, प्रेमविवाह होण्याची दाट शक्यता असते. तसेच यांचा विवाह टिकून राहातो. यासाठी पाचवे आणि सातवे स्थान एकमेकाला पूरक असणे अत्यंत आवश्यक मानले जाते. 

लग्न केल्यानंतर आपला संसार सुखाचा व्हावा असं सगळ्यांनाच वाटत असतं. चंद्र – गुरू, रवि – गुरू, सप्तमस्थानाचा ग्रह आणि गुरू यांचा शुभयोग असेल तर त्या व्यक्तींचे विवाह सुखकारक होतात. वैवाहिक जीवनात कोणतेही वादळ येत नाही. ज्या स्थानात गुरू आहे त्यापासून पाचवे, सातवे आणि नववे स्थान इथे रवि, चंद्र अथवा सातव्या स्थानाचा ग्रह असल्यास, शुभयोग जुळून येतो.

लग्न कुंडलीत द्विभार्या किंवा बहुभार्या योग  कसा बघावा?

आपण समाजामध्ये बरेचदा दोन ते तीन लग्न झालेली पाहतो. लग्नामध्ये उच्च राशीचा ग्रह असेल अथवा लग्नेश उच्च राशीमध्ये असेल तर द्विभार्या वा बहुभार्या योग संभवतो. बलवान चंद्र आणि शुक्र एका राशीत असतील तर बहु विवाह योग असतात. अर्थात हे महिला आणि पुरूष दोघांच्याही बाबतीत घडते. सप्तम स्थानामध्ये जर शुक्राचा प्रभाव अधिक असेल तरीही अधिक विवाह योग असतात. कोणत्या युतीमध्ये अधिक विवाहयोग संभवतात जाणून घ्या – 

  • शुक्र आणि मंगळ पाप नक्षत्रात असल्यास
  • चंद्र मंगळ केंद्र योग 
  • शनि आणि राहू षडाष्टक योग 
  • सप्तमातील केतू – हर्षल – नेपच्युन हे ग्रह प्रतियोगात 
  • शुक्र नीच राशीच्या केंद्र योगात 
  • मंगळ आणि शनि या दोन्ही ग्रहाची सप्तम स्थानावर दृष्टी असल्यास 
  • शुक्र – हर्षल – नेपच्युन अशुभ योग असेल तर 
  • शुक्राच्या राशीमध्ये मंगळ अशुभ संबंधामध्ये असेल 
  • चंद्र जम्नतः साडेसाती असल्यास 

नक्की कसे होते गुण मिलन

लग्न कुंडली कशी पहावी हे जाणून घेताना एकूण आठ गोष्टी असतात आणि याला वेगवेगळे गुण देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे प्रत्येकाच्या पत्रिकेत ज्याप्रमाणे त्याचे गुण असतात त्यानुसार त्यांचे मिलन करण्यात येते. प्रत्येकाचे वर्ण, गण, नाडी, तारा या सर्व गोष्टी वेगळ्या असतात आणि गुणही वेगळे असतात.  त्यानुसार ज्योतिषशास्त्र अभ्यास करून याचे गुणमिलन करतात. कुठल्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये आठ प्रकारचे गुण आणि अष्टकूटचे मिलन करण्यात येते. ते गुण कसे असतात ते बघूया. 

ADVERTISEMENT

वर्ण – जातीचे मिलन – 1 गुण
वैश्य – आकर्षण – 2 गुण
तारा – अवधी – 3 गुण
योनी – स्वभाव आणि चरित्र – 4 गुण
मैत्री – एकमेकांमधील समज – 5 गुण
गण – मानसिक क्षमता – 6 गुण
भकोत – दुसऱ्याला प्रभावित करण्याची क्षमता – 7 गुण
नाडी – संतानजन्म – 8 गुण

FAQ’s – लग्न कुंडली कशी पाहावी संदर्भात प्रश्नोत्तरे  

प्रश्न – सुखी विवाहासाठी कोणता योग लग्न कुंडलीत पाहावा?
उत्तर – गुरू ज्या स्थानामध्ये आहे त्या स्थानापासून तुम्ही मोजणी सुरू केल्यास, त्याच्या पाचव्या स्थानी, सातव्या आणि नवव्या स्थानी चंद्र, रवि वा सातव्या स्थानाचा ग्रह असल्यास सुखी विवाह लग्न कुंडलीत दिसून येतो. याशिवाय चंद्र – गुरू, रवि – गुरू आणि सप्तमस्थानाचा ग्रह आणि गुरू याचा शुभयोग जुळून येत असल्यास, विवाह सुखकारक होतो. 

प्रश्न – लग्न कुंडलीत मंगळाची काय भूमिका असते?
उत्तर – कुंडलीत मंगळ आहे असं कळल्यानंतर आजही अनेकांना नकार दिला जातो. मंगळ हा प्रथमस्थानी, चौथ्या, सातव्या आणि बाराव्या स्थानात असेल तर मंगळाची कुंडली म्हटली जाते. यामुळे विवाहाला उशीर होतो. याचा फार बाऊ करण्यात येऊ नये. पण लग्नात अडचणी येणे, ठरलेला विवाह मोडणे, लग्नानंतर अनेक अडचणी आणि कटकटी उद्भवणे अशी भूमिका मंगळ बजावताना दिसून येतो. 

प्रश्न – असमाधानकारक विवाहाचे कुंडलीतील योग काय आहेत?
उत्तर – महिलांच्या कुंडलीमध्ये रवी, शुक्र हे ग्रह मंगळ, शनि अथवा राहू ग्रहासह असल्यास, विवाहसौख्य तुमच्या मनाप्रमाणे मिळत नाही. तर पुरूषांच्या कुंडलीत चंद्र, शुक्र हे ग्रह राहू वा शनिसह असल्यास, त्रासदायक ठरते. विवाहाला विलंब होण्यासह विवाह असमाधाकारकही ठरतो. 

ADVERTISEMENT

लग्न म्हणजे एक प्रकारे जुगारच मानला जातो. कारण लग्न टिकविण्यासाठी बऱ्याच गोष्टी सांभाळून घ्याव्या लागतात. लग्न करणे सोपे आहे मात्र ते निभावणे कठीण आहे. त्यामुळे तुम्हीही लग्न करताना पत्रिका पाहणार असाल तर या गोष्टी नक्की लक्षात घ्या. लग्न कुंडली कशी पहावी हे आपल्या सगळ्यांना जमेलच असं नाही पण लग्नाचा योग कधी आहे हे लग्न कुंडली कशी पहावी हे जाणून नक्कीच घेता येते.

11 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT