ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
jyeshtha-gauri-avahan-pujan-visarjan-information-in-marathi

संपूर्ण गौरी आवाहन विधी | Gauri Avahan Pujan, Visarjan Information In Marathi

गणेशोत्सव (Ganeshotsva 2022) दरम्यान ज्येष्ठ गौरींचे आगमन होते आणि ज्येष्ठ गौरी पूजन (Jyeshtha Gauri Pujan) करण्यात येते. अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करण्यात येते. पौराणिक कथेत सांगितल्याप्रमाणे असुरांच्या त्रासाला कंटाळून त्यावेळी सर्व महिला या आपल्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी गौरीला शरण गेल्या आणि गौरीची पूजा अर्चना करून गौरीला प्रसन्न करून घेतले. त्यानंतर माता गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला आणि त्यानंतर सौभाग्यवती महिला या सौभाग्य प्राप्त होण्यासाठी कायम ज्येष्ठा गौरीचे हे व्रत करतात. ज्येष्ठ नक्षत्रांवर गौरींना पूजले जाते म्हणूनच त्याला ज्येष्ठा गौरी पूजन असेही संबोधण्यात येते.  या व्रतामध्ये तीन मुख्य भाग आहेत – ज्येष्ठा गौरी आवाहन (Jyeshtha Gauri Avahan), ज्येष्ठ गौरी पूजन (Jyeshtha Gauri Pujan) आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन (Jyeshtha Gauri Visarajan). यावर्षी गौरी आवाहन नक्की कधी आणि विसर्जन कधी करण्यात यावे, तसंच गौरी आवाहन विधी याबाबत सर्व इत्यंभूत माहिती या लेखातून तुम्ही जाणून घ्या. 

शुभ मुहूर्त 2022 | Gauri Avahan Muhurt 2022)

शुभ मुहूर्त 2022 (Gauri Avahan Muhurt 2022)
शुभ मुहूर्त 2022 (Gauri Avahan Muhurt 2022)
  • ज्येष्ठ गौरी आवाहन तिथी – 3 सप्टेंबर, 2022 रोजी 
  • शुभ मुहूर्त – पहाटे 6.03 पासून ते संध्याकाळी 6.36 पर्यंत
  • ज्येष्ठ गौरी पूजा मुहूर्त – 4 सप्टेंबर, 2022 
  • ज्येष्ठ नक्षत्र पूजा तिथी सुरूवात आणि शेवट – 3 सप्टेंबर, 2022 रोजी रात्री ११ वा. पासून ते 4 सप्टेंबर, 2022 रोजी रात्री 9.40 मिनिट्सपर्यंत  
  • एकूण अवधी – 12 तास 28 मिनिट्स 
  • गौरी विसर्जन – 5 सप्टेंबर, 2022 रोजी
  • गौरी विसर्जन मुहूर्त – दुपारी 12.23 पासून ते संध्याकाळी 7.23 वा. पर्यंत 

ज्येष्ठ गौरी पूजन महत्त्व | Importance Of Gauri Pujan In Marathi

ज्येष्ठ गौरी पूजन महत्त्व | Importance Of Gauri Pujan In Marathi
ज्येष्ठ गौरी पूजन महत्त्व

गौरी अर्थात माता पार्वती. गणपती बाप्पाची आई असणारी ही गौरी अन्नपूर्णा स्वरूपातही पाहिली जाते. त्यामुळे महालक्ष्मीच्या स्वरूपातील या देवीचे धन आणि समृद्धीसाठी पूजाअर्चा करण्यात येते. ज्येष्ठ गौरी पूजनाचा माता पार्वतीची आराधना करण्यात येते. महाराष्ट्रात हा सण अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. गौरीची स्थापना करून प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरींना पूजले जाते आणि तिसऱ्या दिवशी गौरींचे गणपतीसह विसर्जन करण्यात येते. सुखसमृद्धीसाठी गौरी पूजनाचे अधिक महत्त्व आपल्याकडे मानण्यात आले आहे. तसंच पती – पत्नीमधील संबंध अधिक घट्ट करण्यासाठी आणि घरादारात सुखसमाधान आणण्यासाठीही गौरी पूजनाचे महत्त्व सांगण्यात येते. याशिवाय लग्नात येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी आणि आयुष्यात चांगला जोडीदार मिळावा म्हणूनही अनेक जण ज्येष्ठ गौरी पूजन करताना दिसतात. तर याप्रमाणेच श्रावण महिन्यातही गौरींचे पूजन होते ज्याला मंगळागौर म्हटले जाते. मंगळागौरीची माहिती आपणा सर्वांना आहेच. 

गौरी आवाहन | Gauri Avahan

गौरी आवाहनाचा दिवस खास असतो. गौराईला घरातील माहेरवाशिणीचे स्थान देण्यात येते. ज्यामुळे आवाहान करणे म्हणजे गौरीला आणल्यापासूनच तिचा पाहुणाचार केला जातो. वाजतगाजत गौराईला आपल्या घरी आणले जाते. माहेरवाणीच्या हातूनच गौरीची स्थापना होते, तिला साडी नेसवली जाते, तिला नटवले जाते आणि घरातील माहेरवाशिणीच्या हातूनच तिचे आवाहन करण्यात येते. कोकणातील काही भागांमध्ये नववधूंसाठी गौरीपूजनामध्ये ‘ओवसा’ ही एक महत्त्वाची परंपरा दिसून येते. ‘ओवसा’ म्हणजे ओवसणे अथवा ओवाळणे.  काही लोक ओवशाल्या ‘ववसा’ असंही म्हणतात. असुरांपासून गौरीने अत्याचार मुक्त केले असल्यामुळेच महिला गौरीचे या दिवशी आवाहन करतात. गौरी आवाहनच्या दिवशी 16 अंक हा शुभ मानण्यात येतो आणि म्हणूनच या दिवशी 16 सवाष्णींना बोलावून त्यांची पूजा करण्यात येते आणि 16 श्रृंगारांच्या वस्तूंचे वाटप करण्यात येते आणि याशिवाय 16 फळं, मिठाई, पदार्थांचा नैवेद्य ज्येष्ठ गौरीसाठी दाखविण्यात येतो.  

  • तुम्ही घरच्या घरी गौरीची मूर्ती मातीपासून तयार केलीत तर अधिक उत्तम. मात्र बाजारातूनही तुम्ही ही मूर्ती आणू शकता. तर काही ठिकाणी गौरींचे आवाहान करताना खड्यांच्या गौरी आणल्या जातात
  • गौरी आवाहन करताना तुम्ही सुंदर रांगोळी काढावी, घराचा देव्हारा फुलांनी सजवावा आणि गौरी घरात आल्यावर हळदी कुंकू लाऊन घरभर गौरी फिरवाव्या (खड्याच्या असल्यास) आणि मग आरती करावी 
  • गणपतीच्या मूर्तीजवळ याची स्थापना करावी आणि त्यानंतर गौरीच्या मूर्तीला उटणे लाऊन पाण्याने आंघोळ घालावी आणि मग सजवावे. दुसऱ्या दिवशी गौरींचे संपूर्ण पूजन करण्याचे विधी असतात आणि त्यानंतर गौरीचे विसर्जन असते

ज्येष्ठ गौरी पूजन विधी | Gauri Pujan Vidhi In Marathi

ज्येष्ठ गौरी पूजन विधी | Gauri Pujan Vidhi In Marathi
ज्येष्ठ गौरी पूजन विधी 

महाराष्ट्रात विवाहित महिलांद्वारे हे ज्येष्ठ गौरी पूजन (Jyeshtha Gauri Pujan 2022) अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येते. साधारण तीन दिवस हे करण्यात येते. माता गौरीला सजवून आणि साज-श्रृंगार करूनच ही पूजा करण्यात येते. माता गौरीची कृपा प्राप्त करण्यासाठी हे व्रत करण्यात येते. तर अगदी अविवाहित मुलीही हे व्रत आपल्याला आयुष्यात चांगला जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात. ज्येष्ठ गौरी पूजन विधी नक्की कशा प्रकारे करण्यात येते हे जाणून घ्या – 

ADVERTISEMENT
  • ज्येष्ठ गौरी आवाहनाच्या नंतर दुसऱ्या दिवशी पूजन करण्यात येते. या दिवशी देवीची प्रतिमा पंचामृत आणि शुद्ध पाण्याने धुवावी अर्थात त्यावर अभिषेक करावा (मुखवट्याच्या देवी असल्यास, वेगळी पद्धत असते)
  • अभिषेक आणि स्नान घातल्यानंतर एका चौरंगावर स्वच्छ कपडा घालून ती प्रतिमा स्थापन करावी अथवा उभ्या गौरी असतील तर गौराईला व्यवस्थित साडी नेसवावी. साडी नेसून झाल्यावर गौराईला आपल्या हौसेप्रमाणे दागदागिने घालून सजवावे
  • माता गौरीला त्यानंतर हळद – कुंकू वाहून त्यावर अक्षत आणि फूलं वाहावीत. धूप, दीप आणि अगरबत्ती दाखवावी 
  • हे सर्व झाल्यानंतर गौरी पूजनासाठी 16 प्रकारचे पदार्थ आणि गोड पदार्थांचा वापर करून गौराईला नेवैद्य दाखवावा (यामध्ये काही ठिकाणी मांसाहाराचा नैवेद्यही दाखविण्यात येतो. तुमच्या घरातील पारंपरिक पद्धतीनुसार हा नैवेद्य असावा)  
  • गौरी पूजनादरम्यान माता गौरीचा जप करावा आणि कथा सर्वांना सांगावी आणि त्यानंतर गणपती आणि गौरीची आरती करावी. घरात सकारात्मक ऊर्जा राहील असेच सर्व वातावरण असावे

गौरीची वेगवेगळ्या पद्धतीने पूजा 

गौरीची पूजा करण्याची पद्धत ही प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. प्रत्येक जण आपापल्या पद्धती आणि परंपरेनुसार गौरीचे आवाहन करतात. मात्र काही सामाईक पद्धतीही आहेत ज्या पाळल्या जातात 

  • गौरीचे आवाहन करण्यापूर्वी प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे रांगोळीने ठसे काढण्यात यावे 
  • हातात गौरी घेऊन आलेल्या माहेरवाशीणीचे पाय हे पाण्याने आणि दुधाने धुवावे आणि त्यानंतर तिच्या पायावर कुंकू ओले करून स्वस्तिक काढावे 
  • घरात गौरी आणताना लक्ष्मीच्या पावलांवरूनच चालत यावे आणि मुखवटे अथवा खड्यांच्या गौरी घेऊन घरात यावे. गौरी आणताना अजिबातच बोलू नये आणि तोंडामध्ये पाणी ठेवावे
  • तसं गौरी आणत असताना तिच्यासह असणाऱ्या व्यक्तीने घंटा वाजवावी अथवा ताट चमच्याने वाजवत घरात आणावे. शांतपणे घरात गौरी आणू नये. गौरींचे स्वागत हे वाजत गाजतच करावे 
  • गौरीचे स्थापन करण्यापूर्वी घरातील सुख – समृद्धीची जागा, स्वयंपाकघराची जागा आणि संपूर्ण घर गौरींना दाखवून मगच त्यांची स्थापना करावी 
  • गौरी स्थापन करताना घरातील सर्वांना उदंड आयुष्य मिळो, घरात कायम सुख – समृद्धी आणि ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करावी 
  • महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गौरी आणल्या जातात आणि गौरी आणण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. त्यामध्ये काही ठिकाणी गौरींचे मुखवटे असतात. तर काही ठिकाणी पाठवठ्यावर अर्थात विहीरीवर वा नदीकाठी जाऊन पाच, सात वा अकरा खडे आणण्याची पद्धत आहे, ज्याला खड्यांच्या गौरी असे म्हटलं जातं. तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाच मडक्यांची उतरंडी करण्यात येते आणि त्यावर गौरीचे मुखवटे बसवले जातात. तर काही ठिकाणी दोन कलशांमध्ये गहू आणि तांदूळ घेऊन त्यावर मुखवटे बसविण्याची पद्धत आहे. तर काही ठिकाणी नुसत्याच गहू – तांदळाच्या राशी मांडून गौरींची पूजा करण्याचीही पद्धत आहे. प्रत्येक प्रांतानुसार गौर आणण्याची पद्धत ही बदललेली दिसून येते 

मुखवटाच्या गौरी

मुखवटाच्या गौरी
मुखवटाच्या गौरी

अनेक ठिकाणी मुखवट्याच्या गौरींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रात गौरींचे विविध पद्धतीचे मुखवटे दिसून येतात

  • आवाहनाच्या दिवशी शुभ मुहूर्त पाहून मुखवट्यांची आणि गौरींची स्थापना करण्यात येते. काही ठिकाणी हे मुखवटे असतात. तर काही ठिकाणी मुखवट्यांसह संपूर्ण उभ्या गौरी असतात
  • काही ठिकाणी धातूची प्रतिमा करून मुखवटे करण्यात येतात तर काही ठिकाणी मातीचे मुखवटे तयार करण्यात येते 
  • विदर्भ आणि मराठवड्याच्या ठिकाणी महालक्ष्मी देवीचे मुखवटे तयार करण्यात येतात. विदर्भामध्ये गौरीला महालक्ष्मी असे म्हटले जाते 
  • तर काही ठिकाणी गौरी आणि महालक्ष्मी अशी दोन रूपेही दिसून येतात. अधिक ठिकाणी मुखवट्यांच्या गौरी दिसतात. उभ्या गौरींपेक्षा मुखवट्यांच्या गौरी पूजणे अनेक ठिकाणी सोपे जाते. त्यामुळे अशा पद्धतीच्या गौरी या पारंपरिक पद्धतीने पूजल्या जातात
  • तर काही ठिकाणी तेरड्याची रोपं ही मुळासकट आणून त्यांना गौरी म्हणून पूजले जाते 

गौरी जेवण | गौरीसाठी नैवेद्य

गौरी जेवण | गौरीसाठी नैवेद्य
गौरी जेवण (गौरीसाठी नैवेद्य)

गौरी आवाहनाच्या दिवशी गौरीला अनेक ठिकाणी भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात येतो. यामध्ये बऱ्याच ठिकाणी गवार – भोपळ्याची भाजी अथवा पालेभाजी करण्यात येते. 

मात्र ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीला अर्थात महालक्ष्मीला महानैवेद्य दाखविण्यात येतो. यामध्ये गोडाधोडाचे जेवण आणि साधारणतः 16 हा शुभ अंक असल्यामुळे 16 पदार्थ बनविण्यात येतात तर काही ठिकाणी 16 वेगवेगळ्या पद्धतीची भाजी, 5 प्रकारच्या कोशिंबीर, पंचपक्वान्न ज्यामध्ये शेवयांची खीर, गव्हल्यांची खीर, पुरण, लाडू, काकडीचे गोड पातोळे याचा समावेश अधिक प्रमाणात असतो. तर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे गोड पदार्थ  उदा. घावन – घाटले, पुरणपोळी, सांजोऱ्या, करंजी आणि परंपरेनुसार भाजी बनविण्यात येते. माहेरवाशीणींचा हा सण असल्यामुळे सहसा तिच्या आवडीचे पदार्थ यामध्ये करण्यात येतात. तर या पदार्थांसह फळे, मिठाई, फराळाचे विविध पदार्थ याचाही समावेश नैवेद्यामध्ये करण्यात येतो. तर अनेक ठिकाणी गौरीला आणि माहेरी आलेल्या लेकीसाठी मटणाचाही नैवेद्य करतात. मात्र ही प्रथा प्रत्येक प्रांत आणि भागानुसार वेगवेगळी असते आणि त्या त्या भागानुसार गौरीसाठी जेवण अर्थात गौरीसाठी नैवेद्य तयार करण्यात येतो.  

ADVERTISEMENT

ज्येष्ठा गौरी विसर्जन आणि विसर्जनाचे महत्त्व

ज्येष्ठा गौरी विसर्जन आणि विसर्जनाचे महत्त्व
ज्येष्ठा गौरी विसर्जन आणि विसर्जनाचे महत्त्व

ज्येष्ठ गौरींचे आवाहन आणि पूजन झाल्यानंतर ज्येष्ठा गौरींचे विसर्जन करण्यात येते. या दिवसालाही तितकेच महत्त्व आहे. केवळ आवाहन आणि पूजन करून हा विधी पूर्ण होत नाही. तर ज्येष्ठ गौरींचे विसर्जन (Gauri Visarjan) करण्याचा विधीही असतो. काही ठिकाणी गणपतींसह गौरींचे विसर्जन (Gauri Visarjan 2022) होते तर काही ठिकाणी गौरींचे आधी विसर्जन होते आणि त्यानंतर दहा दिवसांनी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येते (Ganpati Visarjan). गौरींचे विसर्जन करण्यापूर्वी काही महत्त्वाचे विधी पूर्ण करण्यात येतात आणि त्यानंतरच ज्येष्ठा गौरींचे मुहूर्तावर विसर्जन करण्यात येते. 

साधारणतः तीन दिवस गौरींचा वास घरामध्ये असतो आणि त्यानंतर माता गौरीचे विसर्जन करण्यात येते. अखंड सौभाग्यासाठी या गौरींची पूजा करण्यात येते आणि त्यानंतर पुन्हा एकदा पुढच्या वर्षी त्यात उत्साहात गौरींनी माहेरी येऊन घरात उत्साह आणावा याचे आवाहन करत गौरींना विसर्जित करण्यात येते. 

ज्येष्ठ गौरी विसर्जन विधी | Jyeshtha Guari Visarjan Vidhi

  • गौरी विसर्जन विधीसाठी महिलांनी ब्रम्हमुहूर्तावर उठावे आणि शूचीर्भूत होऊन स्वच्छ कपडे परिधान करावे
  • गौरी आवाहनाच्या दिवशीप्रमाणेच पुन्हा एकदा गौरींची पूजा करावी 
  • पूजनानंतर तुम्ही गौरीला फळ, मिठाई आणि नैवेद्य दाखवून धूप, दीप, अगरबत्ती दाखवून आरती करावी 
  • आवाहानाप्रमाणेच वाजत गाजत गौरींचे विसर्जन करावे 
  • नदी, विहीर अथवा समुद्राच्या ठिकाणी पाण्यात गौरींचे विसर्जन करावे. पर्यावरणाला हानी पोहचू नये म्हणून आजकाल घरातच शुद्ध पाण्यात बादलीत विसर्जन करून हे पाणी झाडांना घालण्याची नवी पद्धतही सुरू झाली आहे 
  • विसर्जन करताना माता गौरीचा जप करावा 
  • विसर्जन करून आल्यानंतर घरात सर्वांना प्रसाद वाटावा आणि पुन्हा आरती करावी 

प्रश्नोत्तरे (FAQs)

प्रश्न – गौरी पूजन करण्याचा हेतू काय आहे?
उत्तर –  घरात सुख-समृद्धी यावी आणि अखंड सौभाग्य लाभावे यासाठी विवाहित महिला हे व्रत करतात आणि गौरी पूजन करतात. तर आयुष्यात चांगला जोडीदार लाभावा यासाठी अविवाहित मुली गौरी पूजनाचे व्रत करतात. 

प्रश्न – ज्येष्ठ गौरी नक्की कोण आहे?
उत्तर –  ज्येष्ठ गौरी म्हणजे गणपतीची आई आहे. त्यामुळे तिला अधिक शुभ मानण्यात येते आणि अन्नपूर्णा स्वरूपातही पाहिले जाते. तसंच काही ठिकाणी गौरी म्हणजे महालक्ष्मी अर्थात धन आणि समृद्धीची देवता म्हणूनही पूजली जाते

ADVERTISEMENT

प्रश्न – गौरी पूजनाचा मुहूर्त असतो का?
उत्तर – हो गौरी आवाहन, गौरी पूजन आणि अगदी गौरी विसर्जनाही मुहूर्त असतो. हा मुहूर्त तुम्हाला तुमच्या भटजीकडून अथवा कॅलेंडरवरूनही कळू शकतो. तुम्हाला तारीख कळल्यानंतर तुम्ही याचा मुहूर्तही जाणून घेऊ शकता

निष्कर्ष – गौरी पूजनाचे हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गौरी आवाहन, गौरी पूजन आणि गौरी विसर्जनाची महत्त्वाची आणि इत्यंभूत माहिती आम्ही या लेखातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच गौरीची पूजा आणि आवाहन विधी, विसर्जन विधी कसा असावा याबाबतही माहिती आम्ही दिली आहे. गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Best Ganesh Chaturthi Wishes Hindi

Ganesh Chaturthi Shayari Hindi

ADVERTISEMENT
30 Aug 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT