बॉलीवूडमध्ये सुरु झालेली #MeToo India चळवळ आता मीडिया आणि अन्य क्षेत्रातही येऊन पोहोचली आहे. आपले बॉस वा इतर कोणत्याही ओळखीच्या व्यक्तीच्या शोषणाची शिकार बनलेल्या महिला आता या मुद्द्यावर अगदी मोकळेपणाने बोलत आहेत. इतकंच नाही तर, आपल्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींचा अनुभव आता जगासमोर त्या सांगत आहेत. आम्ही असा १० महिलांशी बातचीत करून त्यांच्याबरोबर नेमकं काय घडलं याचा आढावा घेतला आणि त्यांनी या गोष्टींचा सामना कसा केला हेदेखील जाणून घेतलं. या त्याच मुली आहेत, ज्या आपल्या आयुष्यात कधी ना कधीतरी आपला बॉस, मामा, काका, भाऊ वा अन्य कोणत्यातरी नातेवाईकांच्या शोषणाची शिकार बनल्या आहेत. काही कारणांनी त्यावेळी त्यांनाा याबद्दल आवाज उठवता आला नाही. पण आता पुढे येऊन याबाबत मनमोकळेपणाने या मुली बोलत आहेत. (या मुलींची नावे बदलली आहेत)
1. नोकरीच्या बहाण्याने शोषण करण्याचा प्रयत्न – निशी शुक्ला
मी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला होते. घरातील आर्थिक परिस्थिती नीट नसल्या कारणामुळे मला शिक्षण संपतानाच नोकरी शोधायची होती. माझ्या कॉलेज कॅम्पसमध्ये प्लेसमेंटची पद्धत नव्हती त्यामुळे सर्व विद्यार्थी आपापल्यापरीने नोकरी शोधत होते. त्याचदरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी एका व्यक्तीशी मैत्री झाली, जो देशातील एका प्रसिद्ध चॅनलमध्ये प्रॉड्युसर होता. असंच बोलता बोलता नोकरीच्या आमिषाने त्याने मला प्रेस क्लबमध्ये बोलावलं. मला जराही अंदाज आला नाही की, त्याच्या डोक्यामध्ये मुलाखतीऐवजी अजूनही काही चालू होतं. मी जेव्हा तिथे पोचले तेव्हा त्याने आणि त्याच्या मित्राने मला ड्रिंक्स घेण्यासाठी सांगितले. मला तेव्हा थोडीशी शंका आली तेव्हा मी जायला निघाले. मला बाहेर पडताना जाणवलं की, ते लोक माझा पाठलाग करत आहेत. नशेत असलेला तो प्रोड्युसर आणि त्याचे मित्र बाहेरच्या शांत वातावरणाचा फायदा घेऊन माझ्याबरोबर वाईट वर्तणूक करत होते. कसातरी मी तिथून पळ काढला. आजही ते आठवलं की माझ्या अंगावर काटा उभा राहतो. आता #MeToo चळवळीमुळे मी निदान माझं मन हलकं करू शकले.
2. त्याच्यामुळे बाजारात जाणं विसरले होते – कीर्ति
त्यावेळी मी १२ वी मध्ये होते. घरी आणि बाहेर दोन्ही ठिकाणी मी माझ्या जबाबदाऱ्या सांभाळून माझं शिक्षण पूर्ण करत होते. एका दुपारी गर्मीच्या दिवसांमध्ये काही सामानाची खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते. माझ्या घराजवळच दुकान होतं, जिथे एक मुलगा बसायचा. त्यादिवशी त्या दुकानात मुलाऐवजी त्याचे वडील बसले होते. जेव्हा मी त्यांनाा काही सामान काढायला सांगितलं, तेव्हा ते व्यस्त असल्यामुळे त्यांनी माझं बोलणं नीटसं ऐकलं नाही. मी जेव्हा त्यांना ऐकू यावं म्हणून थोडं पुढे गेल्यानंतर त्यांनी मला हाताला धरून दुकानामध्ये खेचून घेतलं. त्यानंतर त्यांनी त्यांचा फोन मला दाखवायला सुरुवात केली. त्यामध्ये, ते कोणतातरी अश्लील चित्रपट पाहात होते. मी ओरडायचा खूप प्रयत्न केला तेव्हा त्या माणसाने दुकानाचे शटर पाडले. साधारण १५ मिनिटाने त्याचा मुलगा आला तेव्हा मी तिथून निसटले. त्या घटनेचा माझ्यावर इतका परिणाम झाला की, कितीतरी दिवस बाजारामध्ये जाण्याचंही विसरले. आजही तो क्षण आठवला की, मला वाटतं मला त्याचवेळी सर्वांना सांगायला हवं होतं असं वाटतं.
3. माझ्या बॉसने मला नोकरीवरून काढून टाकलं – शालिनी सिंह
मी देशातील एका प्रसिद्ध मीडिया हाऊसच्या मार्केटिंग विभागामध्ये काम करत होते. माझा बॉस कोणतंही कारण नसताना मला बऱ्याचदा ऑफिसमध्ये थांबवून घेत होता. मी नकार दिला तर वाटेल तसं बोलायचा. एकदा त्याने माझ्याबरोबर चुकीचं वागण्याचा प्रयत्न केला होता. मी त्याचवेळी आरडाओरडा करून इतर लोकांना जमा केलं. सर्वांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं की, माझ्याबरोबर नक्की काय झालं आहे. पण व्यवस्थापनासमोर कोणीही काहीच बोललं नाही. दुसऱ्या विभागातील काही लोक माझी साथ द्यायला तयार झाले होते, तर त्यांचाही पगार थांबवण्यात आला. त्यानंतरही मी मागे हटले नाही आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. माझा बॉस खूपच वरीष्ठ होता आणि महाव्यवस्थापकाच्या जवळचाही. पोलीस तक्रारीमुळेही काहीच फरक पडला नाही. शेवटी मलाच कामावरून कमी करण्यात आलं. इतकंच नाही तर तक्रार मागे घेण्यासाठी माझ्यावरच दबाव टाकण्यात आला. त्याच्या धमक्यांना घाबरून मला माझी तक्रार मागे घ्यावी लागली. मी टू चळवळ अशा लोकांचा चेहरा नक्की समोर आणेल.
4. वाईट वाटतं की, ते माझे शिक्षक होते – मीनल गुप्ता
मी कानपूरच्या एका प्रसिद्ध शाळेतील विद्यार्थीनी होते. शाळेतून सुटल्यानंतर मी दोन तास ट्यूशनला जात असे. या शिक्षकाकडे जायला लागून मला एक महिना झाला होता. एक दिवस त्याने माझ्या आईला सांगितलं की, शिकवताना खूप जास्त आरडाओरडा बाहेरून ऐकू येतो, तर मी दार बंद करून शिकवत जाईन. एक – दोन दिवस दार लावल्यानंतर त्याने मला नीट शिकवलं आणि तिसऱ्या दिवशी त्याने घाणेरडे चाळे माझ्याबरोबर करायला सुरुवात केली. कधी कधी शिकवताना माझ्या हातावर तो हात ठेवू लागला तर कधी टेबलखालून पाय मारायचा. काही दिवस तो नक्की काय करत आहे हे मला नक्की कळलं नाही. पण एकदा बायोलॉजी शिकवताना त्याची ही गोष्ट अगदीच हाताबाहेर गेली. त्याने मला हात लावला नाही. मात्र त्याचा प्रायव्हेट पार्ट दाखवून मला उत्तेजित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यादिवशी घरी कोणीच नव्हतं. आई – बाबा आल्यानंतर त्यांना मी हे सांगितले आणि दुसऱ्या दिवशीच त्याला येऊ नको असेही सांगितले.
5. मुलाखतींमध्ये अशी होत होती निवड – दिव्या सक्सेना
एका वर्षापूर्वी मी वेगवेगळ्या कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज करत होते. त्यावेळी माझ्याकडे एका मुलाखतीसाठी कॉल आला. मुलाखतीच्या आदल्या दिवशी त्या कंपनीच्या हेडचा मला कॉल आला आणि मला भेटण्यासाठी बाहेर बोलावलं मात्र मी गेले नाही. मुलाखतीच्या दिवशी माझ्यासारखे ६ उमेदवार तिथे होते, ज्यामध्ये ४ मुली आणि २ मुलं होती. बॉस सर्व मुलींना मुलाखतीसाठी पहिले बोलावत होता (दोन्ही मुलांना बोलावण्यात आलं नाही) मुलाखत झाल्यानंतर एका तासातच मला त्याच्या एका व्यक्तीचा फोन आला की, त्यांना माझं प्रोफाईल आणि टेस्ट आवडली आहे. मला नोकरी देण्यासाठी ते सकारात्मक आहेत पण त्यासाठी मला आधी त्यांना बाहेर भेटावं लागेल. त्यांनी मला बरेच डबल मिनिंग मेसेजही पाठवले. त्यानंतर मीच स्वतः ठरवलं की, हा बॉस असेपर्यंत या कंपनीत कधीही जायचं नाही. मी #MeToo चळवळीबरोबर आहे.
6. ऑडिशनच्या वेळी चूक झाली – अंजली वर्मा
मी एका छोट्या शहरातील मुलगी आहे आणि शाळेत – कॉलेजमध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे. मी मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छित होते. त्याचवेळी माझ्या एका मित्राने सांगितले की, शहरामध्ये मॉडेलिंग एजन्सीचे काही लोक आले आहेत, जे इथल्या मुलींची ऑडिशन्स घेणार आहेत. मी घरी न सांगताच ऑडिशनच्या तयारीला लागले आणि त्या एजन्सीच्या पत्त्यावर माझे काही फोटोज पाठवले. साधारण एका आठवड्यानंतर मला शहरातील एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आलं. हॉटेलच्या रूममध्ये दोन मुलगे आणि एक मुलगी असे लोक होते. त्यांनी मला वेगवेगळे कपडे घालून काही शॉट्स द्यायला सांगितले आणि शेवटी माझे सगळे कपडेदेखील उतरवले. त्यावेळी माझं डोकं अजिबात काम करू शकत नव्हतं, मला फक्त मुंबईला पोचायचं होतं. काही वेळानंतर त्याच टीमच्या एका मुलाने मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. शेवटी मी वैतागून घरी सर्व सांगितलं आणि घरच्यांच्या मदतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.
7. फील्डवर जाण्याच्या बहाण्याने केली छेडछाड – आंचल श्रीवास्तव
मी एका मीडिया हाऊसमध्ये इंटर्नशिप करत होते. एकदा एका मोठ्या कार्यक्रमाचं आमंत्रण आलं तेव्हा बॉसने मलाही त्यांच्याबरोबर येण्यासाठी सांगितले. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी १० मिनिट्स आम्ही निघालो. पण शॉर्टकट रस्त्याने जाण्याऐवजी त्यांनी लांबचा रस्ता पकडला. आम्ही तिथे पोचलो, तेव्हा कार्यक्रम संपला होता. तिथून परतत असताना माझ्या बॉसला भूक लागली. एका ठिकाणी थांबून आम्ही काही स्नॅक्स खाल्ले आणि पुन्हा ऑफिसला यायला निघालो. तेव्हा त्याने मला विचारलं की, घरी येतेस का? त्यावर मी त्यांना गाडी थांबवायला सांगितली. पण माझं काहीही न ऐकता त्यांनी माझा हात दाबायला सुरुवात केली. त्यावर मी त्यांना गाडीतून उडी मारण्याची धमकी दिली. पहिल्यांदा त्याने माझ्या धमकीकडे लक्ष दिले नाही पण जेव्हा मी कारचा दरवाजा उघडला तेव्हा त्याच्या लक्षात आले की, मी त्याचं काहीही ऐकणार नाही. मी मध्येच रस्त्यात उतरले आणि दुसऱ्या दिवशीपासून ऑफिसला जाणंं बंद केलं.
8. माझ्या घरातच राक्षस होता – रेणुका टंडन
ही त्या वेळेची गोष्ट आहे, जेव्हा माझ्या आईला एक महिन्यासाठी गावाला जावं लागलं होतं. त्यावेळी मी माझ्या आजीच्या घरी राहिले होते. त्याचवेळी तिथे एक दूरच्या नात्यातील मामा आले होते. मला एकटीला झोप यायची नाही. तेव्हा मी मामा आणि मावशीबरोबर झोपत असे. एका रात्री मला जाणवलं की, माझ्या नाईट सूट्सचे बटण कोणीतरी काढत आहे. पण त्यावेळी झोपेत मला काही कळलं नाही आणि मी परत झोपले. काही दिवसांनंतर मला मामावर संशय येऊ लागला. एक दिवशी घरी फक्त मी आणि मामा होतो. त्यावेळी त्याने माझ्याबरोबर काही केलं तर मी घरातल्यांना सर्व सांगेन अशी मी धमकी दिली. घाबरण्याऐवजी मामा अजून घाणेरड्या गोष्टी करायला लागला. मी ओरडले तर त्याने मला स्टोअर रूममध्ये बंद करून ठेवले आणि माझ्यावर बळजबरी केली. नंतर मला मारून टाकण्याची धमकी दिली. घाबरून मी कधीही कोणालाही ही गोष्ट सांगितली नाही. या घटनेला ५ वर्षे उलटून गेली आहेत पण अजूनही मी यातून पूर्णतः सावरू शकलेले नाही.
9. माझा बॉयफ्रेंडचा होता माझा गुन्हेगार – अंशुमाला
मी दोन वर्ष एका मुलाबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. नोकरीनंतर आम्ही दोघांनी एकत्र राहण्याचे ठरवले. लिव्ह इन मध्ये राहायला लागल्यानंतर त्याचा खरा चेहरा माझ्यासमोर येऊ लागला होता, पण त्याच्यापासून दूर जाण्याबद्दल विचारच करू शकत नव्हते. तो मला शारीरिक कधीही त्रास द्यायचा नाही. मात्र त्याने मला मानसिक प्रचंड त्रास दिला. प्रत्येक लहानसहान बाबीत तो माझ्याकडून पैसे उकळत होता आणि रोज नव्या मुलीबरोबर दिवस घालवत होता. सर्व काही माहीत असूनही मी शांत होते. मात्र एक दिवस मी त्याला त्याच्या बहिणीबरोबर पकडलं तेव्हा माझा स्वतःवरचा ताबा सुटला. त्यादिवशी मात्र गप्प न राहता मी सर्वांना त्याच्याबद्दल सांगून टाकलं. मी खूप दुःखी झाले होते कारण त्याच्याबद्दल मी काही वाईट बोलू शकेन असं मला वाटलंही नव्हतं. त्याच्याकडून मी माझे सर्व पैसे परत घेऊन मी पुन्हा नव्याने जगणं सुरु केलं. काही दिवसांपूर्वीच कळलं की, MeToo चळवळीदरम्यान कोणीतरी त्याचे सर्व काळेधंदे पुन्हा बाहेर काढले आहेत.
10. यात माझीही चूक होती – दीवा अग्रवाल
मी गेल्या अडीच वर्षांपासून एका व्यक्तीबरोबर नात्यात आहे. आम्ही दोघेही एकमेकांच्या खूपच जवळ आहोत आणि कधीही एकमेकांपासून काहीही लपवत नाही. माहीत नाही अचानक मला काय झालं आणि दुसऱ्या एका व्यक्तीच्या बोलण्यात येऊन मी माझ्या पार्टनरपासून बऱ्याच गोष्टी लपवायला लागले. मला वाटत होतं की, मी आमच्या दोघांच्याही चांगल्यासाठी हे करत आहे, पण झालं काहीतरी भलतंच. दुसरा व्यक्ती माझ्या पार्टनरचा बेस्ट फ्रेंड होता आणि आम्ही तिघेही बाहेर जाण्याची योजना करत होतो. मात्र काहीतरी वेगळ्या स्थितीमुळे हा प्लॅन आम्हाला कॅन्सल करावा लागला. त्याचवेळी त्या मित्राने मला सांगितले की, तो त्याच्या घरी विकऑफ्सबद्दल सध्या काही सांगू शकत नाही आणि त्यामुळे प्रत्येक वीक ऑफला माझ्या घरीच राहील. मात्र काही कारणाने त्याने माझ्या पार्टनरला यासंबंधी सांगू नकोस असं सांगितलं. त्याचवेळी असं काहीतरी झालं की, माझ्या मनात असूनही मी माझ्या पार्टनरला काही सांगू शकले नाही आणि आमच्या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. माझ्या या चुकीसाठी माझ्या पार्टनरच्या मित्रासह मीदेखील तितकीच जबाबदार आहे.
#MeToo India चळवळीचा फायदा पण लोक सध्या घेत आहेत. सेलिब्रिटीज असो वा सामान्य माणूस, कोणत्याही माणसावर यौन शोषण आरोप लावण्यात आला आहे, त्यावर लगेच कारवाई करण्यात येत आहे. एखाद्या माणसावर जर कोणतीही कायदेशीर कारवाई होत नसेल तरीही तो सोशल मीडियाच्या कचाट्यातून सुटत नाही. येणाऱ्या काळात #MeToo India चळवळीला नक्कीच यश मिळेल अशी आशा आहे आणि लोक कोणतेही चुकीचं पाऊल उचलण्यापूर्वी १० वेळा विचार करतील. मात्र या चळवळीत काही केस अशाही पाहायला मिळत आहेत, ज्याची तपासणी झाल्यानंतर ते चुकीचे आहेत हे सिद्ध झालं आहे. जेव्हा अशा एखाद्या चळवळीची देशात सुरुवात होते, तेव्हा त्याच्या विश्वाससंदर्भात कोणतीही शंका उपस्थित होऊ नये याची काळजी घ्यायला हवी.