Relationship मग ते कोणतेही असो.नाते फुलण्यासाठी आणि नाते अधिक काळ टिकवण्यासाठी थोडी मेहनत तर घ्यावी लागते. दोन वेगळ्या स्वभावाच्या आणि प्रवृत्तीच्या माणसांना एकत्र राहण्यासाठी थोडी तडजोड तर नक्कीच करावी लागते. मग ते नाते कोणतेही असोत. गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंड, नवरा- बायको, सासू-सून, सासरे-सून,आजी आजोबा- नातू किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेलं.. नात्याची चांगली सुरुवात करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी आपणही लक्षात ठेवायला हव्यात अशाच काही गोष्टी आम्ही काढल्या आहेत. नवे नाते सुरु करण्याच्या विचारा तुम्ही असाल तर तुम्हाला या गोष्टी माहीत हव्यात.
एकमेकांना जाणून घ्या
प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो. त्यामुळे समोरच्याला तुमच्या आणि तुम्हाला समोरच्याच्या सगळ्याच गोष्टी आवडतील असे होऊ शकत नाही. त्यामुळे एकमेकांना सगळ्यात आधी जाणून घेणे गरजेचे असते. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, त्याची वागण्याची पद्धत.त्याला राग कधी येतो? कोणत्या गोष्टींसाठी येतो हे जाणून घ्या. म्हणजे जर तुम्हाला या व्यक्तीसोबतच आयुष्य काढायचे ठरले असेल तर तुम्हाला फार त्रास होणार नाही. ही गोष्ट कोणत्याही व्यक्तीसाठी लागू आहे.
उदा. लग्न ही आयुष्यातील अशी गोष्ट आहे. ज्याचा निर्णय तुम्हाला अगदी विचारपूर्वक घ्यायचा असतो. हल्ली लोकांना लग्नापेक्षाही लोकांना समोरच्याचा स्वभाव माहीत असणे आवश्यक वाटते. त्यामुळे चेहरा आणि बाकी गोष्टी नंतर पाहिल्या जातात.पण समोरच्याला अधिक जाणून घेतले जाते. तुम्ही कोणत्या नवीन नात्याची सुरुवात करणार असाल तर एकमेकांना जाणून घ्या.
रिलेशनशीपमध्ये तुमच्यासोबतही होत असेल असे तर आताच करा ब्रेकअप
खऱ्याने करा नात्याची सुरुवात
नात्याला अधिक घट्ट करण्याचे काम ही एकच गोष्ट करत असते. खरे बोला.लहानपणापासून ही एकच गोष्ट शाळेतल्या बाईंनी किंवा शिक्षकांनी मनामनात बिंबवलेली असते..पण तरीसुद्धा परिस्थितीनुसार आपण खोटं बोलतोच. पण नव्या नात्याला सुरुवात करण्याआधी ‘दिल की बात बोल डाल जो सच हे वही बोल डाल’ हे आपण कायमच लक्षात ठेवले पाहिजे. मग ते नाते अगदी कोणाबरोबरचे का असेना.
उदा. तुम्ही नुकतेच लग्न करुन सासरी गेलात. कदाचित तुम्हाला तुमच्या सासूचा स्वभाव पटेलच असे नाही. त्यामुळे थोडे दिवस जाऊ द्या. एकमेकांना पुरेपूर समजून घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्या कोणत्या गोष्टी आवडत नाही त्या खरोखरं सांगून टाका. तुमच्या खरं बोलण्यामुळे कदाचित समोरची व्यक्ती कोणत्याही वयात बदलू शकते. किमान ती थोडं फार कमी करण्याचा प्रयत्न करु शकते.
या शिवाय नवरा- बायको यांनी देखील त्यांच्या नात्याची सुरुवात खरे बोलून करावी. कारण खोटे फार काळ लपून राहात नाही. एक खोटं लपवण्यासाठी आणखी खोटं बोललं जातं. जो पर्यंत खोटं बोलून तुम्ही थकत नाही तो पर्यंत पण त्यानंतर मात्र ते एकदाच बाहेर पडत आणि तुमचं नात एका क्षणात खराब होऊन जातं.
राग हा नात्यातील शत्रू
राग ही अशी गोष्ट आहे की ती प्रत्येकाला येणं स्वाभाविक आहे. त्यामुळे राग नियंत्रणात ठेवण्याव्यतिरिक्त तुम्ही काही वेगळे करु शकत नाही. पण एखादी व्यक्ती जर तुमच्या मनाविरोधात वागत असेल तर त्याला ती न सांगता त्या व्यक्तीबद्दल मनात राग ठेवणे हे मात्र चुकीचे आहे. त्या रागाचा परिणाम तुमच्यावर इतका अधिक होतो की तुम्ही चांगले विसरुन समोरच्याच्या वाईट गोष्टींचा अधिक विचार करु लागता आणि तुमचे नाते खराब करुन घेता. त्यामुळे राग हा कोणाबद्दलही मनात नसावा
उदा. तुम्ही एका घरी लग्न करुन जाणार आहात. तुमचे सासरे किंवा सासू ही कोणाशी तरी काही परिस्थितीमध्ये वाईट वागली होती. ते तुमच्या कानी पडल्यानंतर तुम्ही त्यांची बाजू जाणून न घेता त्याचा राग करणार असाल तर याला काहीच अर्थ नाही. कारण हा राग तुमच्या नात्यात नाहक शत्रू बनतो.
नात्यात या गोष्टी केल्या तर तुमचे नातेही होईल अधिक घट्ट
कसलाही गैरसमज नको
रागाखालोखाल जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे गैरसमज.. काहींना नाहक गैरसमज करुन घ्यायची सवय असते. ज्यांना राग येत नाही अशा व्यक्ती गैरसमज करुन फुरगुटून बसतात.त्यांना कितीही काहीही चांगलं सांगा त्यांना ते अजिबात पटत नसतं. ते गैरसमजातूनच सगळ्या क्रिया असतात.
उदा. ऑफिसमध्ये एखादा नवा कलिग आल्यानंतर मनात दडपण येऊ शकतं.म्हणजे याचं काम माझ्यापेक्षा चांगल निघालं तर मला प्रमोशन मिळणार नाही. या व्यक्तीमुळे माझ्या करीअरला धोका आहे. असा गैरसमज तुम्ही करुन बसता आणि काम सोडून नको तुमचे सगळे लक्ष समोरच्याला शह देण्यामध्ये जातो.
हे झालं कामाविषयी याशिवाय अनेकदा जेव्हा घरातही काही गोष्टी घडतात. तेव्हा देखील तुम्ही एखाद्या विषयी गैरसमज करुन घेता. असे गैरसमज जास्त करुन सासू आणि सुनेमध्ये होतात. कोणाचेही ऐकून ज्यावेळी तुम्ही हा गैरसमज करुन घेता. त्यावेळी त्या नात्यात वितुष्ट यायला लागते.
तुम्ही जे आहात ते दाखवा
नवं नातं सुरु करणे म्हणजे गंमत नसते. कोणतेही नाते सुरु करण्याआधी तुम्हाला समोरच्याला चांगलेच दाखवायचे असते. त्यामुळेच अनेकदा तुम्ही खरे कसे आहात ते दाखवत नाही. तर तुम्ही जे नाही ते दाखवण्याचा अनेकदा प्रयत्न केला जातो. त्यामुळे तुम्ही कोणतेही नवे नाते सुरु करण्याआधी तुम्ही जे आहात ते दाखवा. तसे करण्यामुळे समोरच्याला तुमच्याशी कसे वागायला हवे हे कळते.
उदा. तुम्ही एखाद्या मुलीला भेटायला गेला आहात.ती मुलगी किंवा मुलगी तुम्हाला पहिल्याच भेटीत आवडला. तो हातातून जाऊ नये म्हणून जर तुम्ही उगाचच चांगले असण्याचे दाखवत असाल तर तुम्हाला त्याचा त्रास पुढे जाऊन होऊ शकतो.
तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल तर तुम्ही सरळ सांगून टाका. म्हणजे मग तुम्हाला समजण्यात एखाद्याचा गैरसमज होणार नाही. शिवाय त्यामुळे होणारी भांडणे देखील होणार नाहीत.
नात्यात हवा हळुवारपणा
नाते कोणतेही असो नात्यात हळुवारपणा महत्वाचा असतो. प्रत्येक नाते फुलायला थोडा वेळ लागतो. वरील सगळ्या गोष्टी जरी झाल्या असतील तरी अजूनही वेळ गेलेली नाही. तुमचे नाते अजूनही चांगले होऊ शकते. त्यामुळे तुम्ही त्याचा विचार करा.झालेल्या घटना विसरुन जर तुम्हाला नवी सुरुवात करायची असेल तर तुम्ही पाऊल उचला. झालेल्या चुका मान्य करुन नाते सुरु करा.आधी थोडासा त्रास होईल. पण तुम्हाला भविष्यात त्याचा चांगला फायदा होईल. तुमच्या नात्यातील कटुता दूर होऊन मनाने तुम्ही परत एकदा एकमेंकाजवळ याल
10 गोष्टींमधून मुली व्यक्त करतात त्यांचे प्रेम, जाणून घ्या या गोष्टी
उदा. तुम्ही खोटं बोलल्याचे समोरच्या व्यक्तीला लक्षात आले असेल. तर ती चूक मान्य करण्यातच मोठेपणा आहे. तुम्ही तुमची चूक योग्यवेळी मान्य केली तर तुम्हाला पुन्हा एक संधी नक्कीच मिळू शकते.
(सौजन्य- shutterstock)