सेलिब्रेटीजचे आयुष्य आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनाबाबत चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. ज्यामुळे कलाकारांच्या प्रत्येक गोष्टीला फॅन्स फॉलो करत असतात. कलाकारांचे कपडे, फॅशन, त्यांचे अफेअर्स, ब्रेकअप, लग्नाच्या बातम्या, गुडन्यूज अशा सर्वच गोष्टी चाहत्यांसाठी महत्त्वाच्या असतात. मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक लोकप्रिय कलाकार आहेत ज्यांचा फार मोठा चाहतावर्ग आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आवडत्या कलाकाराला फॉलो करत असतात.
Table of Contents
कलाकार सिनेमात काम करण्यासाठी नेमकं किती मानधन घेतात हे देखील चाहत्यांना नक्कीच जाणून घ्यायचं असतं. कारण त्यावरून त्या कलाकाराची ब्रॅंड वॅल्यू ठरत असते. बऱ्याचदा बॉलीवूड कलाकारांच्या मानधनाविषयी आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रेटीजच्या बातम्या चर्चेत असतात. मात्र आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतदेखील असे अनेक कलाकार आहेत जे सर्वाधिक मानधन घेण्यावरून प्रसिद्ध आहेत. यासाठीच आम्ही तुम्हाला तुमच्या काही आवडत्या मराठी कलाकारांच्या मानधनाबद्दल सांगणार आहोत. असे काही मराठी कलाकार जे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कलाकार जितका प्रसिद्ध होत जातो तितके त्याचे मानधन वाढत जाते. यासाठी जाणून घेऊ या अशा मराठी कलाकारांविषयी ज्यांचे एका चित्रपटाचे मानधन अंदाजे लाखोंच्या घरात आहे.
सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते (मानधन अंदाजे 25 ते 50 लाख) Highest Paid Actors (25-50 Lakh Honors)
मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटांना एका विशिष्ठ उंचीवर नेलं आहे. मराठीतील टॉपचे कलाकार असल्याने त्यांचं मानधन जवळजवळ दहा ते पन्नास लाखांच्या घरात आहे.
सुबोध भावे (Subodh Bhave)
सुबोध भावे हे नाव सध्या मराठीत सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपट असो की मालिका अथवा नाटक तिन्ही माध्यमांमध्ये सुबोध भावे प्रसिद्ध आहे. लोकमान्य, बालगंधर्व, आणि काशीनाथ घाणेकर अशा विविध बायोपिकमध्ये काम करून सुबोधने मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सुबोधच्या ‘का रे दुरावा’ या मालिकेला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावरच घेतलं. मराठी इंडस्ट्रीमध्ये सुबोध सर्वात जास्त मानधन घेतो अशी चर्चा आहे. सुबोध एका चित्रपटासाठी जवळजवळ पन्नास लाखाचे मानधन घेतो असं म्हटलं जातं. याशिवाय विविध नाटक आणि मालिकांमधून मिळणारे सुबोधचे उत्पन्न ग्राह्य धरल्यास सुबोध सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील एक सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे असं म्हणण्यास काहीच हरकत नाही.
स्वप्नील जोशी (Swapnil Joshi)
स्वप्नील जोशी हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक हिट चित्रपटांमधून स्वप्नील झळकला आहे. दुनियादारी, तू ही रे, मुंबई-पुणे-मुंबईचे तिन्ही भाग, मितवा अशा अनेक चित्रपटातून त्याने काम केलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या उच्च शिखरावर पोहचल्यामुळे स्वप्नील सध्या प्रत्येक चित्रपटासाठी कमीत कमी चाळीस ते पन्नास लाख मानधन घेतो अशी चर्चा आहे.
सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar)
मराठी इंडस्ट्रीमधील चॉकलेट हिरो म्हणून सध्या सिद्धार्थ चांदेकरची ओळख निर्माण होत आहे. वयाच्या एकोणीसाव्या वर्षी अवधुत गुप्तेच्या झेंडा या चित्रपटातून सिद्धार्थने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. गुलाबजाम, क्लासमेट, ऑनलाईन बिनलाईन, वजनदार अशा अनेक चित्रपटातून त्याने काम केलं. सिटी ऑफ ड्रिम्स या वेबसिरिजमधील सिद्धार्थची नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना अधिक आवडली. त्यासोबत जिवलगा या मराठी मालिकेतील त्याची हटके भूमिका सध्या टेलीव्हिजनवर गाजत आहे. त्यामुळे असं म्हणतात की सिद्धार्थ चांदेकरदेखील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या लिस्टमध्ये पोहचला आहे.
वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi)
वैभव मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतदेखील आपले पाय यशस्वीपणे रोवत आहे. वैभवने आतापर्यंत कॉफी आणि बरंच काही, फक्त लढ म्हणा, शॉर्टकट, मि अॅंड मिसेस सदाचारी अशा मराठी चित्रपटात काम केलं आहे. मात्र त्याच्या हंटर, बाजीराव मस्तानी, मणिकर्णिका या हिंदी चित्रपटांमधील कामाला देखील तितकीच प्रंशसा मिळाली आहे. शिवाय हुतात्मा सारख्या ऐतिहासिक वेबसिरिजमधून वैभव एका वेगळं माध्यमातदेखील आपलं नशिब आजमावत आहे. वैभव मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय असल्यामुळे वैभव सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या लीस्टमध्ये शामिल झाला आहे.
ललित प्रभाकर (Lalit Prabhakar)
ललित प्रभाकर सध्या मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळं स्थान निर्माण करत आहे. जुळूनी येती रेशीमगाठी या चित्रपटातून ललितने आपल्या करियरला सुरूवात केली होती. या मालिकेमुळे ललितला घराघरात प्रसिद्धी मिळाली. चि वा चिसौकां, हम्पी अशा चित्रपटातून त्याच्या अभिनयाचे कौतूक झाले. मात्र आनंदी गोपाळमध्ये ललितने साकारलेले गोपाळराव प्रेक्षकांना सर्वाधिक भावले. मराठी चित्रपटसृष्टीत जम बसवल्यामुळे ललित प्रत्येक चित्रपटासाठी चांगले मानधन घेतो असा अंदाज आहे.
उमेश कामत (Umesh Kamat)
आभाळमाया, वादळवाट, असंभव अशा लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहचलेला अभिनेता उमेश कामत. आपल्या अभिनय आणि लुकमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. टाईमप्लीज, लग्न पहावे करून, बाळकडू ,अजब लग्नाची गजब गोष्ट अशा चित्रपटांमधून उमेशने काम केलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये उमेशची गणना केली जाते.
प्रसाद ओक (Prasad Oak)
प्रेमाची गोष्ट या नाटकातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून प्रसादने आपल्या करिअरला सुरूवात केली. पुढे त्याला बंदिनी मालिकेतून अभिनय करण्याची संधी मिळाली. प्रसादने अनेक लोकप्रिय मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून काम केलं आहे. त्याच्या आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना फार आवडली. भरत जाधव नंतर स्वतःची वॅनिटी व्हॅन घेणारा तो दुसरा कलाकार आहे. त्यामुळे सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये प्रसादचे नाव समाविष्ठ आहे.
अंकुश चौधरी (Ankush Choudhari)
मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय कलाकार म्हणून अंकुशने आपला ठसा उमटवला आहे. अगदी ऑल दी बेस्ट नाटकापासून ते दुनियादारी चित्रपटापर्यंत त्याचा अभिनय प्रवास वाखाण्याजोगा आहे. अकुंशदेखील त्याच्या चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेतो अशी चर्चा आहे.
सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री (अंदाजे 15 ते 30 लाख मानधन)Highest Paid Actress (15-30 Lakh Honors)
मराठी अभिनेतेच नाही तर मराठी अभिनेत्रीदेखील त्यांच्या सर्वाधिक मानधनासाठी लोकप्रिय आहेत. यासाठी जाणून घेऊ मराठीतील अशा काही अभिनेत्री ज्या चित्रपटासाठी कमीत कमी दहा ते तीस लाख रूपये मानधन घेतात असा अंदाज आहे.
रिंकू राजगुरू (Rinku Rajguru)
सैराट चित्रपटातून लोकप्रिय झालेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू प्रेक्षकांना फारच भावली. नुकताच रिंकूचा कागर चित्रपट प्रदर्शित झाला असून आता ती तिच्या मेकअप या मराठी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मराठीत अभिनेत्री सर्वाधिक म्हणजे दहा ते पंधरा लाख रूपये मानधन घेतात अशी चर्चा असते. मात्र रिंकूने मेकअप चित्रपटासाठी जवळजवळ सत्ताविस लाखांचं मानधन घेतल्याचा अंदाज आहे. त्यामुळे रिंकू मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.
अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)
मराठी आणि हिंदी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीत अमृताने स्वतःचे स्थान निर्माण केलं आहे. एका टॅलेंट शोमधून अमृता अभिनयक्षेत्रात आली. अमृताने अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून काम केलं आहे. सध्या जीवलगा या मालिकेतील तिच्या भूमिकेची फार चर्चा होत आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अमृताचं नाव घेतलं जातं.
सई ताम्हणकर (Sai Tamhankar)
रिंकू आणि अमृताप्रमाणेच सई ताम्हणकरदेखील चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. सईने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केलं आहे. मराठीत दुनियादारी, क्लासमेट आणि टाईमप्लीजमधील तिचं काम विशेष लक्षात राहीलं. हिंदीत तिने गजनी आणि हंटरमध्ये एका वेगळ्या धाटणीची भूमिका साकारली होती.
सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni)
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सक्षम अभिनयाने ठसा उमटवलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील सर्वाधिक मानधन घेत असल्याचा अंदाज आहे. गुलाबजाम, देऊळ, कच्चालिंबू अशा अनेक मराठी चित्रपटांमधून सोनालीने वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.
प्रिया बापट (Priya Bapat)
मराठीतील चुलबुली अभिनेत्री प्रिया बापट अनेकांची आवडती अभिनेत्री आहे. मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, हॅपी जर्नी, आम्ही दोघी, टाईमपास 2, टाईमप्लीजमधून प्रिया झळकली आहे. मात्र काकस्पर्शमधील तिच्या भूमिकेमुळे तिच्यातील अभिनयकौशल्य जगासमोर आले. सिटी ऑफ ड्रिम्समधील तिची बेधडक भूमिका चाहत्यांना फारच आवडली. प्रियादेखील मराठी अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.
ऊर्मिला कोठारे (Urmila Kothare)
ऊर्मिलाने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून काम केलं आहे. नृत्यकलेत पारंगत असलेली ऊर्मिला सोशल मीडियावर तिच्या नृत्याचे अविष्कार सतत शेअर करत असते. मुलीच्या जन्मानंतर ऊर्मिलाने काही दिवसांसाठी अभिनयक्षेत्रातून ब्रेक घेतला आहे. तीदेखील एका चित्रपटासाठी दहा लाखांच्यावर मानधन घेते असा अंदाज आहे. आम्ही दिलेली मानधनाची संख्या अधिकृत नसून हा केवळ एक अंदाज आहे. मात्र यावरून तुमच्या आवडत्या अभिनेता अथवा अभिनेत्रीची लोकप्रियता नक्कीच दिसून येते.
अधिक वाचा
सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडलेले हे कलाकार,सध्या काय आहे त्यांचे स्टेटस
बॉलीवूडचे ‘हे’ सेलिब्रेटी सध्या वेबसिरिजमध्ये आजमावत आहेत आपलं नशीब
या विचित्र फोटोंमुळे हे सेलिब्रिटी झाले होते चर्चेचा विषय
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम