महाराष्ट्रीयन लग्नसोहळा असो अथवा मुंज असो अथवा कोणताही कार्यक्रम तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बघायला मिळतात. पण त्याहीपेक्षा सर्वात जास्त ठसका दिसून येतो तो म्हणजे ‘ठुशी’चा. महाराष्ट्रीयन दागिन्यांंमध्ये विविधता आहे. पण त्यातही ठुशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ठुशीशिवाय कोणताही महाराष्ट्रीयन साज पूर्ण होत नाही. अगदी लग्नापासून ते वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला विविध प्रकारच्या ठुशी बघायला मिळतात. पूर्वी केवळ कोल्हापूरी साजाच्या ठुशी होत्या. पण आता मागणीनुसार बाजारामध्ये विविध प्रकारच्या ठुशीच्या वेगळ्या डिझाईन्स दिसतात. इतकंच नाही तर मंगळसूत्रांमध्येही ठुशीचं डिझाईन दिसून येतं. तुम्हाला जर ठुशीच्या वेगवेगळ्या डिझाईन्स अधिक प्रमाणात जाणून घ्यायच्या असतील तर हा लेख नक्की वाचा. ठुशीमुळे गळ्याला एक वेगळीच शोभा येते. ठुशीतल्या पेंडंटचा भाग हा हिऱ्यांनी अथवा खड्यांनी नटलेला दिसतो. त्यामुळे त्याकडे पाहातच राहावे वाटते. विशेष म्हणजे नऊवारी साडीवर हा दागिना जास्त खुळून दिसत असल्यामुळेही हा दागिना मुलींना जास्त प्रमाणात आवडतो. गळ्याला घट्ट बसणारा हा दाागिना तुमचा चेहरा अधिक सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी मदत करतो, हे मात्र नक्की.
दागिन्यांची खरेदी करणं हे प्रत्येक मुलीचं आवडतं काम आहे हे कोणीच अमान्य करणार नाही. इतरांच्या लग्नासाठी अगदी इमिटेशन ज्वेलरी घ्यायची असो अथवा स्वतःच्या लग्नासाठी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी असो उत्साह तितकाच कायम असतो. आपण आपल्या लग्नात कसं दिसायचं हे प्रत्येक मुलीने आधीच ठरवलेलं असतं. तिच्या या यादीमध्ये ठुशीचा नंबर पहिला असतो. कोणत्याही महाराष्ट्रीयन मुलीच्या लग्नामध्ये ठुशी हा दागिना नाही असं होणारच नाही. अगदी तुम्ही ही ठुशी इतरांच्या लग्नातही पारंपरिक कपडे असो वा मॉडर्न, या कोणत्याही पेहरावावर घालून तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालू शकता. नव्या आणि जुन्याची कशी सांगड घालायची किंवा आपल्या कार्यक्रमांमध्ये कोणतं वेगळं डिझाईन निवडून आपण आपलं वेगळेपण जपायचं हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे सध्या बाजारामध्ये ठुशीचे अनेक डिझाईन्स आहेत, तेच आपण जाणून घेऊया. पण त्याआधी नेमकी ठुशी म्हणजे काय हे जाणून घेणंही गरजेचं आहे.
हे ठुशीचे प्रकार नेमके कसे आहेत आणि कोणकोणते आहेत ते जाणून घेऊया.
ठुशी हा खरं तर महाराष्ट्रीयन दागिना म्हणून ओळखला जातो. हा दागिना गळ्यातील तन्मणीप्रमाणेच गळ्याभोवती बांधला जातो. ठुशीच्या मध्यभागी पाचू, माणिक, रत्न यासारखे खडे जोडले जातात. ठुशी म्हणून खरं तर ठासून भरलेले गोल मणी. पूर्वी राजघराण्यामध्ये हा दागिना प्रसिद्ध होता असं सांगितलं जातं. छोट्या मण्यांच्या गळ्याबरोबर असलेला हा दागिना अत्यंत उठावदार असून तुमच्या सौंदर्यात अधिक भर घालणारा ठरतो. मण्यांच्या आकारामुळे हा दागिना नाजूक तर असतोच पण अगदी लहान मुलींपासून ते मोठ्या महिलांपर्यंंत सर्वच हा दागिना वापरू शकतात. यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही आणि हा दागिना प्रत्येकावर खुलून दिसतो हेच या दागिन्याचं वैशिष्ट्य आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा दागिना ठसठशीत असल्याने तुम्ही तुमच्या पारंपरिक वेषात अथवा आधुनिक वेषात केवळ गळ्यात ठुशी हा एकच दागिना घातलात तरीही तो उठावदार दिसतो. तुम्हाला त्याबरोबर अन्य दागिन्यांची गरज भासत नाही. या एकाच दागिन्याने तुमचं सौंदर्य खुलून यायला मदत होते. पैठणी, कांजिवरम अशा भरजरी साड्यांवर जर हा दागिना घातला तर याची अधिक शोभा वाढते. जाणून घेऊया ठुशीचे वेगवेगळे काय प्रकार आहेत.
ठुशीचे अनेक प्रकार आहेत. तुम्हाला हव्या तशा डिझाईनच्या ठुशीही तयार करून मिळतात. शिवाय बाजारामध्ये अनेक प्रकारच्या डिझाईनच्या ठुशीही उपलब्ध आहेत. त्यापैकी काही प्रकार आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत. तुम्हीही अशी ठसकेबाज ठुशी घालून नक्कीच आपल्या घरच्या अथवा अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींच्या समारंभात नक्की जाऊ शकता. यासाठी तुम्हाला इतर दागिन्यांचीही गरज भासत नाही. ठुशी हा एकच दागिना इतका भारदस्त आहे की, इतर सर्व दागिन्यांची कमतरता हा दागिना पूर्ण करतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
ही ठुशी तुम्हाला प्रत्येक सणासमारंभामध्ये पाहायला मिळते. अगदी एकमेकांमध्ये गुफंलेले ठासून गुंफलेले मणी अशी ही ठुशी असते. काही ठिकाणी याच्या मध्यभागी डाळिंबी रंगाचा खडाही असतो. काही ठुशांमध्ये हा खडा मोठा असतो तर काही ठुशांमध्ये लहान खडाही दिसून येतो. अगदी गळ्याभोवती ही येणारी ठुशी बहुदा सगळ्यांकडे असते. कोणत्याही कार्यक्रमाला जाताना ही हलकी ठुशी घालणं अत्यंत सोपं होतं. तसंच हा ठासून भरलेला दागिना असल्याने दिसायलाही सुंदर दिसतो. वजनाला हलकी आणि दिसायला भारदस्त असं हे डेडली कॉम्बिनेशन म्हणजे पारंपरिक ठुशी.
कोल्हापुरी साज हा ठुशीचाच एक प्रकार मानला जातो. या दागिन्यात लाखेवर सोन्याचा पत्रा मढवलेला असतो. कोल्हापुरी साजमध्ये 'जाव मणी' आणि 'पानड्या' (वेगवेगळ्या आकाराची पाने) सोन्याच्या तारेने गुंफलेली असतात. कोल्हापूरकडच्या लोकांनी हा साज मोठया प्रमाणात वापरून त्याचे नामकरण ‘कोल्हापुरी साज’ असं केलं. या साजात मासा, कमळ, कारले, चंद्र, बेलपान, शंख, नाग, कासव, भुंगा अशा शुभ आकारांचे सोन्याच्या घन पत्राचे मुशीतून काढलेले लाख भरलेले भरीव आकार आणि एक सोडून एक मणी ओवलेले असतात. खरं तर हा दागिना मंगळसुत्राऐवजी वापरण्यात येतो. हल्ली बऱ्याच सणासमारंभामध्ये हा दागिना वापरण्यात येतो. एकतर वजनला हलका असल्यामुळे आणि भरीव असल्याने या दागिन्याला जास्त मागणी आहे.
ठुशीचा हा थोडा वेगळा प्रकार आहे. पुरातन काळातील दागिन्यांपैकी ही ठुशी आहे. ही ठुशी अत्यंत भरीव स्वरूपाची असते. तसंच यामध्ये ठुशीचे जास्त पदर असतात. पारंपरिक ठुशीमध्ये एकच माळ असते. पण यामध्ये एकाखालोखाल एक असे हाराप्रमाणे पदर असतात. तसंच हे अगदी गळ्याबरोबर घातलं असलं तरी राजघराण्यातील दागिन्यांप्रमाणे याचा लुक असतो. त्यामुळे हे घातल्यानंतर गळा अगदी भरलेला दिसतो. ही ठुशी सोन्याची बनवून घेण्यासाठी जास्त खर्च येतो. पण जर तुम्हाला इमिटेशनची अशी ठुशी हवी असेल तरीही ती बाजारामध्ये उपलब्ध आहे.
काही जणींना पारंपरिक लुकमधील ठुशी आवडत नाहीत. त्यांच्यासाठी अगदी मॉडर्न डिझाईन असलेली ही ठुशी आहे. यामध्ये बारीक नक्षीकाम केलं असून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर ही ठुशी घालता येते. पारपंरिक ठुशीमध्ये मण्यांची एकमेकांमध्ये गुंफण असते. पण या ठुशीमध्ये तशी गुंफण दिसून येत नाही. हल्ली लग्न अथवा कोणत्याही समारंभामध्ये साडीपेक्षाही घागरा आणि चोळी घालण्याची फॅशन आली आहे. त्यामुळे अशा फॅशनेबल कपड्यांवर तुम्हाला अशी ठुशी घालणं योग्य ठरेल.
प्रत्येक ठुशीचं डिझाईन हे वेगळं असतं. सहसा ठुशी ही गळ्याभोवती घातली जात असल्याने त्याचा आकार गोलाकार असतो. पण तुम्हाला या कोल्हापूरी प्लेन लांबट मणी ठुशीमध्ये बऱ्यापैकी लांबट आकाराची ठुशी मिळते. तुम्हाला हवी तशी अॅडजस्ट करून तुम्ही ही ठुशी घालू शकता. यामध्ये लांबट मणी असल्यामुळेच याला लांबट ठुशी असं म्हटलं जातं. काही लोकांना गोल आकाराचे मणी आवडत नाहीत अथवा काही जणांना नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घेण्याची हौस असते. त्यांच्यासाठी अशा प्रकारची ठुशी नक्कीच उपयोगी पडते. तुम्हाला एक वेगळा लुक यामुळे मिळतो.
या ठुशीला पारंपरिक ठुशीप्रमाणेच जास्त प्रमाणात मागणी आहे. सध्या गोल्डनप्रमाणेच सिल्व्हर ठुशीची मागणीही वाढताना दिसून येत आहे. अशा हँडक्राफ्टेड ठुशी वेगवेगळ्या साड्यांवर अथवा तुमच्या कुरत्यांवरही उठून दिसतात. ज्यांना कॉटनच्या साड्या अथवा ड्रेस घालण्याची हौस आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. शिवाय हँडक्राफ्टेड असल्याने त्याचा एक वेगळाच साज आहे. या हँडक्राफ्टेड ठुशी वेगवेगळ्या डिझाईन्समध्येही उपलब्ध आहेत. तसंच याची मागणी सध्या बाजारामध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला दिसून येते.
ही ठुशी कोल्हापूरच्या बाजूला आधी जास्त वापरात होती. पण यावरील नक्षीकाम आणि त्याचे मणी इतके आकर्षक आहेत की, आता याची मागणी वाढली आहे. वज्रटिक ठुशी ही महालक्ष्मी ठुशीशी मिळतंजुळतं डिझाईन आहे. यामध्ये कोल्हापुरी ठसका दिसून येतो. अगदी भरलेल्या मण्यांची अशी ही ठुशी घातल्यानंतर एकदम एक भारदस्तपणा तुम्हाला तुमच्या स्वतःमध्येही जाणवतो. सहसा एखाद्या वेषभूषेत अथवा नाटकामध्ये भूमिका असताना अशा प्रकारच्या ठुशी घालण्याला जास्त प्राधान्य दिलं जातं. पण इतर कार्यक्रमातही तुम्हाला हवं तर तुम्ही अशा डिझाईनची ठुशी नक्कीच वापरू शकता.
प्रत्येकाला पारंपरिक दागिने आवडतील असं नाही. सध्या वेगवेगळ्या फॅशनचे कपडे अगदी सणासुदीला घातले जातात. अशावेळी डिझाईनर कपड्यांवर अशा स्वरूपाचे दागिने घालण्याला प्राधान्य दिलं जातं. घरातून ठुशीसारखा दागिना घालावा असंही तुमच्यावर एकप्रकारचं प्रेशर असेल तर तुम्हाला डिझाईनर ठुशी हा चांगला पर्याय आहे. तुमच्या डिझाईनर कपड्यांवर तुम्ही अशा प्रकारच्या डिझाईनर ठुशी घालून पारंपरिक आणि मॉडर्न असा दोन्ही मेळ साधू शकता. तुम्हाला यामध्ये वेगळी वेणी ठुशी अथवा वेगवेगळ्या रंगाच्या ठुशी घेता येऊ शकतात.
केवळ महाराष्ट्रातच नाही तर आता राजपूती कंठी ठुशी हादेखील एक प्रकार तुम्हाला वापरता येऊ शकतो. हे डिझाईन राजपूती तऱ्हेने बनवण्यात आलं असलं तरीही त्याला एक महाराष्ट्रीयन टच दिलेला असतो. तुम्ही तुमच्या वेगळ्या पेहरावावर अशा प्रकारची राजपूती कंठी ठुशी नक्कीच घालू शकता. पण ही परफेक्ट ठुशी या प्रकारात मोडत नाही. याला चोकर असंही म्हणतात. पण सध्या ही फॅशन चलनात आहे. बऱ्याच डिझाईनर लेहंग्यावर अशा प्रकारचे दागिने घातल्यानंतर दिसायाला सुंदर दिसतात.
नेहमीच्या ठुशीच्या तुलनेत ही थोडी फॅन्सी ठुशी असते. तसंच याचा एक पदर मोठा असतो. यातही ठुशीचं डिझाईन योग्य तऱ्हेने बनवण्यात आलेलं असतं. पण पारंपरिक ठुशीप्रमाणे याचं डिझाईन नाही. याचे मणी अगदी एकमेकांमध्ये गुंफलेले नसतात. तसंच यामध्ये काही ठिकाणी मोती आणि इतर खड्यांचाही वापर करण्यात येतो. जो पारंपरिक ठुशीमध्ये करण्यात येत नाही. त्यामुळे तुम्हाला जर फॅन्सी डिझाईन आवडत असतील तर तुम्ही अशा प्रकारच्या डिझाईन्सना प्राधान्य देऊ शकता.
महालक्ष्मी आणि वज्रटिका या दोन्हीचा मिलाप म्हणजे गडी ठुशी. याचं डिझाईन थोडं वेगळं असतं. पण ही ठुशी अगदी गळ्याबरोबर घातली की, त्याचा उठाव खूपच सुंदर दिसतो. वरच्या बाजूला केवळ डिझाईनची पट्टी आणि त्याच्या खाली गुंफलेले मणी असा हा दागिना घातल्यानंतर अधिक आकर्षक दिसतो. अगदी तुमच्या डिझाईनर साडीवरदेखील ही गडी ठुशी उठून दिसते. तुम्ही जर प्लेन साडी अथवा फ्लोरल साडी नेसलात आणि अशा प्रकारची ठुशी घातलीत तर तुम्हाला ती नक्कीच चांगली दिसेल. यासाठी तुम्हाला इतर सणासुदीला वेगळे दागिने घालायची गरज नाही. एकच गडी ठुशी घालून तुमचं काम होऊ शकतं. ही भारदस्त असल्याने इतर कोणत्याही दागिन्यांची गरज नाही.
मंगळसूत्र म्हणजे तर प्रत्येक महिलेच्या जिव्हाळ्याचा विषय. ठुशीमध्येही मंगळसूत्राचे वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला बाजारामध्ये आता उपलब्ध झाले आहेत. मुळातच मंगळसूत्रांच्या वेगवेगळ्या आकर्षक डिझाईन्स असतात. पण तुम्ही ठुशीच्या डिझाईन्समधलं मंगळसूत्र बघितल्यानंतर यापैकी एक तर आपल्याकडे असावं हा मोह तुम्हाला नक्कीच आवरणार नाही. यामध्ये तुम्हाला अगदी गळ्याबरोबरील मंगळसूत्रापासून ते ठुशीच्या डिझाईन्सच्या लांबलचक मंगळसूत्राच्या विविध डिझाईन्स मिळतात. पण त्यातही कोल्हापुरी डिझाईन्सची केवळ एक डाळिंबी रंगाचा खडा आणि बाकी काळ्या मण्यांची ठुशीप्रमाणे गुंफलेला हार हे कॉम्बिनेशन सर्वात जास्त प्रचलित आहे. तसंच ठुशीप्रमाणे गुंफलेले सोन्याच्या रंगाचे मणी आणि काळ्या मण्यांची त्याला जोडलेली माळ याचीही मागणी जास्त प्रमाणात दिसून येते. कारण हे दिसायला मोठंही दिसतं आणि त्याशिवाय आकर्षक दिसतं. तसंच याचा जास्त सांभाळ करावा लागत नाही. अगदी साधं असलं तरीही आकर्षक असं हे डिझाईन आहे.
You Might Like These:
मराठमोळ्या मंगळसूत्रांच्या डिझाईन्स खास तुमच्यासाठी
तुमच्या या दागिन्यामुळे तुमच्या अगदी साध्या कपड्याचाही रुबाब वाढेल