ख्रिसमस जवळ येताच बाजारांमध्ये केकची मागणी वाढते. अशा वेळी जास्त मागणी असल्याने बरेचदा बाजारात चांगल्या चवीचे आणि दर्जाचे केक्स मिळत नाहीत. ज्यामुळे तुमच्या ख्रिसमसच्या मजेचा मूड ऑफ होऊ शकतो. पण जर तुम्हाला घरच्याघरी सोप्या पद्धतीने केक बनवता आला तर बाहेरून केक आणायची गरजच काय. यासाठीच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास ख्रिसमससाठी सोप्या केक रेसिपीज. हे केक तुम्ही यंदा घरीच करा आणि मग पाहा घरातील बच्चे कंपनी आणि मोठेही कसे होतील खूष.
ख्रिसमसमध्ये केक बनवण्याची परंपरा
वाढदिवसाला तर आपण नेहमीच केक कापून सेलिब्रेट करतो. पण ख्रिसमसच्या निमित्ताने खास केक बनवण्याची पूर्वापार परंपरा सुरू आहे. नोव्हेंबर महिन्यातच ख्रिश्चन बांधवांना केक मिक्सिंगचे वेध लागतात. ज्यात मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन केकचं साहित्य मिक्स केलं जातं. तसंच नाताळमध्ये रम केक बनवण्याचीही जुनी परंपरा आहे. या निमित्ताने तुम्हीही घरातील बच्चेकंपनीसाठी किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींच्या ख्रिसमस सेलिब्रेशनला जाताना केक घेऊन जा आणि त्यांना आश्चर्याचा धक्का द्या. ख्रिसमसनिमित्त घराची सजावटीमध्ये हे केक तुमच्या नक्कीच उपयोगाचे आहेत.
या केक्समध्ये आहेत सोपे आणि पौष्टीक केक्स. जे तुम्ही एगसोबत किंवा एगलेसही बनवू शकता. मग या ख्रिसमसला नक्की करून पाहा घरच्या घरी हे चविष्ट केक्स. तसंच रव्यापासूनही केक बनवता येतो. रव्यापासून अनेक पदार्थ तयार करता येतात. त्यापैकी एक आहे केक.
जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल आणि एगलेस केक बनवायचा असेल तर हा ड्रायफ्रूट केक तुमच्या ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी परफेक्ट आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हा केक घरी बनवता येईल.
साहित्य: 1 कप मैदा, 1 कप मिल्क पावडर, 1 कप दूध, 1 कप साखर, 3 थेंब व्हॅनिला इसेंस, 1 छोटा चमचा बेकिंग पावडर, 1 छोटा चमचा बेकिंग सोडा, मिक्स ड्रायफ्रूट्स (अक्रोड, किशमिश, काजू, बदाम) आणि 3 चमचे तूप/रिफाइंड ऑईल
कृती: सर्वात आधी ड्रायफ्रूट्सचे छोटे छोटे तुकडे करून घ्या आणि दुसरीकडे एका बाऊलमध्ये मैदा, मिल्क पावडर, साखर, तेल, इसेंस, बेकिंग सोडा आणि पावडर एकत्र करून चांगल मिक्स करून घ्या. आता या मिश्रणात कापलेले ड्रायफ्रूट्स टाका. आता ही पेस्ट 30 मिनिटांसाठी तशीच ठेवा. त्यानंतर बेकिंग ट्रेमध्ये बटर पेपर पसरून किंवा ट्रेला चारीबाजूंना चांगल तेल लावा आणि मिश्रण ट्रेवर घेऊन चांगल पसरा. आता 10 मिनिटं ओव्हनला प्री हीट करूून नंतर त्यात हा ट्रे ठेवा. आता ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सियसवर 45 मिनिटांसाठी केक ठेवा. त्यानंतर ट्रे आरामात बाहेर काढा आणि 10 मिनिटं थंड होऊ द्या. तुमचा ड्रायफ्रूट केक तयार आहे.
ही नाताळमधील पारंपारिक रम केकची रेसिपी आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने तब्बल एक महिना आधी या केकसाठी रममध्ये ड्रायफ्रूट्स घालून ठेवले जातात, असं म्हटलं जातं. चला पाहूया पारंपारिक केकची रेसिपी.
साहित्य: एक बाऊल साखर, एक बाऊल तूप किंवा बटर, एक बाऊल मैदा, अर्धा बाऊल रम, पाव चमचा बेकिंग पावडर, दूध गरजेनुसार, अर्धा बाऊल ड्रायफ्रूट्स.
कृती: जर तुम्हाला आवड असल्यास तुम्हीही ड्रायफ्रूट्स एक महिना नाही पण सात-आठ दिवसआधी रममध्ये बुडवून ठेवू शकता. जेव्हा केक बनवायचा असेल तेव्हा मैदा आणि बेकिंग पावडर चाळून घ्या. त्यात रममध्ये भिजवलेले ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये वाटून मग मिक्स करा. आता बटर आणि साखर घालून चांगल फेटून घ्या. त्यात दूध घालून चांगलं मिश्रण करून घ्या. केक बॅटर मोल्डमध्ये घालून 15 मिनिटं बेक करा. तुम्ही या केकवर ड्रायफ्रूट्सचं गार्निशिंगही करू शकता.
हा केक खूपच स्वादिष्ट असतो. त्यातही जर तुम्ही चॉकलेटप्रेमी असाल तर एकदा तरी हा केक नक्की ट्राय करा.
साहित्य: 250 ग्रॅम मैदा, 6 अंडी, 500 ग्रॅम पिठीसाखर, 100 ग्रॅम कोको पावडर, 500 ग्रॅम डार्क चॉकलेट, 1 टेबल स्पून व्हॅनीला इसेंस, 1 छोटा तुकडा बटर, 200 ग्रॅम चिरून घेतलेलं चॉकलेट
चॉकलेट मड केक बनवण्याची कृती:
सर्वात आधी डार्क चॉकलेट वितळवून बटरमध्ये मिक्स करा. आता मैदा आणि कोको पावडर त्यात घालून हँड ब्लेंडरने चांगल मिक्स करून घ्या. हे करतानाच त्यात अंड आणि साखरही या चॉकलेट मिक्श्चरमध्ये मिक्स करा. हे मिश्रण चांगलं फेटून घ्या. आता वरून यामध्ये थोडे चिरलेले चॉकलेटचे तुकडे घाला. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे केकचं हे मिक्श्चर बेक करण्यासाठी आधी ओव्हन प्री-हीट करून घ्या. मग हा केक 30 मिनिटं बेक करा आणि मग कमीत कमी 1 तास थंड होण्यासाठी ठेवून द्या. तुमचा चॉकलेट मड केक तयार आहे.
एगलेस रेड वेलव्हेट केक आणि तोही नैसर्गिक फूड कलर्सपासून बनवलेला हा केक तुमच्या बच्चेकंपनीला खाण्यासाठी ही चांगला आहे. कारण यातील घटक तुम्हाला माहीत आहेत. आहे ना ख्रिसमस ट्रीटसाठी बेस्ट.
साहित्य: 1/3rd कप बटर, 1/2 कप आयसिंग शुगर, 1/2 कप बीट रूट प्युरी, 1 कप मैदा किंवा पीठ, 1/2 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा अगोड कोको पावडर, 1/4 कप दूध, 1 चमचा व्हॅनिला इसेंस, 1/2 चमचा इनो फ्रूट सॉल्ट.
फ्रॉस्टींगसाठी साहित्य: 1 कप क्रिम चीज, 2 चमचे बटर, 1 चमचा व्हॅनिला इसेंस,1 कप आईसिंग शुगर.
कृती: बटर वितळवून त्यात आयसिंग शुगर आणि क्रिम मिक्स करून घ्या. नंतर त्यात बीट प्युरी घालून मिश्रण करा. आता त्यात मैदा किंवा पीठ, कोकोआ पावडर आणि बेकिंग पावडर घाला. मग दूध घालून चांगल फेटा. शेवटी त्यात इनो फ्रूट सॉल्ट आणि त्यावर एक चमचा दूध घाला ते मिक्स होण्यासाठी. आता हे मिश्रण तूप किंवा बटर लावून घेतलेल्या ट्रेवर काढून 350 डिग्री से. वर 30 मिनिटांसाठी बेक करा.
फ्रॉस्टींगसाठी वितळवलेलं बटर एका बाऊलमध्ये घ्या. त्यात क्रिम चीज, आयसिंग शुगर आणि व्हॅनिला इसेंस घालून मिक्स करा. मऊ आणि क्रिमी होईपर्यंत मिक्स करा.
आता हा केक थंड झाल्यावर फ्रॉस्टींगने सजवून घ्या. तुमचा रेड वेलव्हेट केक तयार आहे.
थंडीच्या दिवसात बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर गाजरं येतात. तुमची मुलं जर गाजर खात नसतील तर त्याचा केक करून तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता. अशाप्रकारे गाजरातील व्हिटॅमीन्स त्यांना आपोआपच मिळतील. हा एगलेस केक असून तुम्ही तो प्रेशर कुकरमध्येही बनवू शकता. हा केक पौष्टिकसुद्धा आहे कारण हा तुम्ही गव्हाच्या पीठापासूनही बनवू शकता. मग नाताळमध्ये नक्की करून पाहा हा टेस्टी, मऊ आणि पौष्टिक कॅरट केक.
साहित्य: कुकरमध्ये लेयरिंगसाठी मीठ, 1/2 कप + 3 चमचे दूध (साधारण तापमानचं), ¼ कप पिठीसाखर, 1/4 कप ब्राऊन शुगर, ¼ कप तेल, 1 कप गव्हाचं पीठ, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा बेकिंग सोडा, ¼ चमचा नटमेग पावडर, 1/2 कप किसलेलं गाजर, 2 चमचे बारीक चिरलेले अक्रोड, काही मनुका.
कृती: कुकर प्री-हीट करून घ्या. त्यासाठी या कुकरमध्ये तळाला मीठाचा थोडा थर घाला आणि दहा मिनिटं प्री-हीट करा. 6” चा बेकिंग ट्रे घ्या आणि त्यावर वॅक्स पेपर ठेवून त्याला तेल लावून घ्या. तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तूपाने ग्रीस करू शकता. एका बाऊलमध्ये साधारण तापमानाचं दूध घ्या. त्यात पिठीसाखर आणि ब्राऊन शुगर घाला. जर तुमच्याकडे ब्राऊन शुगर नसेल तर तुम्ही त्याऐवजी पिठीसाखरेचाच वापर करू शकता. हे चांगल मिक्स करा. त्यात तेल घालून पुन्हा मिक्स करा. नंतर त्यात गव्हाचं पीठ घाला. तसंच बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडाही घाला. हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्या. लक्षात ठेवा यात गुठळ्या राहता कामा नये. आता त्यात नटमेग पावडर घाला. याऐवजी तुम्हाला आवडत असल्यास वेलची पावडरही घालू शकता. सरसरीत होण्यासाठी आवश्यक असल्यास दूध घाला. आता या मिश्रणात गाजर, अक्रोड आणि मनुका घाला. तुम्ही काजू किंवा बदाम-पिस्तेही घालू शकता. तुमच्या एगलेस कॅरट केक मिश्रण आता तयार आहे. आता ग्रीस केलेल्या बेकिंग ट्रेवर हे मिश्रण घेऊन प्री-हीट कुकरमध्ये ठेवा. ट्रेच्या खाली कुकरसोबत मिळणारी डीश ठेवा. म्हणजे केक लागणार नाही. आता कुकरचं झाकण लावा. लक्षात ठेवून कुकरची शिट्टी आणि रिंग काढून ठेवा. मध्यम आचेवर 30-35 मिनिटं हा केक बेक करा. नंतर 10-15 मिनिटांसाठी थंड होऊ द्या. तुमचा कॅरट केक तयार आहे.
चॉकलेट बिस्कीट केक ही खूपच सोपी आणि साधी रेसिपी आहे. हा केक बनवताना तुम्हाला बेकिंगचंही टेन्शन नाही. हो..या रेसिपीसाठी कुकर किंवा ओव्हनची गरज नाही.
साहित्य: ¼ कप पाणी, 100 ग्रॅम मारी बिस्कीट्स, 1 कप डार्क चॉकलेट, 1/4 कप बटर, 1/2 कप मिक्स्ड नट्स (पिस्ता, अक्रोड, काजू आणि बदाम), 1/4 चमचा व्हॅनिला इसेंस, 2 चमचे पिठीसाखर आणि 2 चमचे इस्टंट कॉफी.
कृती: मारी बिस्कीटांचा अगदी बारीक चुरा करा. पण हाताने करा मिक्सरमध्ये नाही. काही बिस्कीटांचे छोटे तुकडे करून बाजूला ठेवा. तवा मध्यम आचेवर तापवून घ्या आणि त्यात पाणी व कॉफी पावडर घाला. मिक्स करा आणि उकळी येऊ द्या. कॉफी पावडर पाण्यात मिक्स झाली पाहिजे. पाणी उकळल्यावर गॅस बंद करा. आता त्यात पिठीसाखर घाला मिक्स करा. नंतर व्हॅनिला इसेंस घालून मिक्स करा. यानंतर बटर आणि डार्क चॉकलेट घाला. चॉकलेट विरघळेपर्यंत ढवळा आणि चांगल मिश्रण होऊ द्या. आता त्यात बिस्कीटांचा चुरा घाला आणि मिक्स करा. नंतर ड्रायफ्रूट्स घालून मिक्स करा. आता हे मिश्रण ताटात काढून फ्रीजमध्ये किमान 30 मिनिटांसाठी सेट होऊ द्या. 30 मिनिटांनी मिक्श्चर काढून घ्या. त्याचे तुकडे किंवा रोल करून पुन्हा फ्रिजरमध्ये 1 ते 1 1/2 तास ठेवा. तुमचा नो बेक चॉकलेट बिस्कीट केक रेडी आहे.
यंदाच्या ख्रिसमसला बनवा टेस्टी- टेस्टी व्हाईट चॉकलेट चीजकेक. जो बनवणं खूपच सोपं आहे. खालील रेसिपीने हा केक बनवल्यास तो जवळपास 8 लोकांना सर्व्ह करता येईल. केक बनवण्यासाठी तुम्हाला लागेल 30 मिनिटांचा वेळ तर बेकिंग टाईम आहे 1 तास.
चॉकलेट चीजकेक बनवण्याचं साहित्य:
बटर 125 ग्रॅम, शुगर 12 मोठे चमचे, व्हॅनिला इसेंस, 1½ चमचा, मैदा 125 ग्रॅम, फिलाडेल्फिया क्रीम चीज 225 ग्रॅम, व्हाईट कंपाउंड चॉकलेट 120 ग्रॅम, अंडी 4, रासबेरी क्रश सर्व्ह करण्यासाठी, रासबेरी आणि स्ट्रॉबेरी गार्निशिंगसाठी,
चॉकलेट चीजकेक बनवण्याची कृती:
एक मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये 3 मोठे चमचे साखर, बटर आणि ½ चमचा व्हॅनिला इसेंस एका रबर स्पॅटुलाच्या मदतीने बीट करून घ्या. जोपर्यंत हलकं आणि फल्फी होत नाही. आता त्यात मैदा मिक्स करून हे मिक्श्चर सॉफ्ट बनवून घ्या. तयार मिश्रण एका 9/6 इंचाच्या बेकिंग ट्रेमध्ये घालून आणि याच्या टॉपवर एक काट्याच्या चमच्याने छेद देऊन 160 डिग्री सें. वर 20 मिनिटांसाठी बेक करा. जोपर्यत तो हलका ब्राऊन होत नाही.
चॉकलेट एका मायक्रोवेव्ह सेफ बाऊलमध्ये 2 मिनिटं ठेवून वितळवून घ्या. आता ते चांगलं मिक्स करून 2 मिनिटं अजून मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. ज्यामुळे ते पूर्णतः वितळेल. आता ते वेगळं ठेवा. एका हँड बीटरच्या साहाय्याने क्रिम चीज, व्हॅनिला इसेंस आणि उरलेली साखर मोठ्या बाऊलमध्ये सॉफ्ट आणि फ्लफी होईपर्यंत बीट करा. आता यामध्ये चॉकलेट मिक्श्चर आणि एक-एक करून अंड मिक्स करा व हळूहळू बीट करा. प्रत्येक अंड मिक्स केल्यानंतर चांगल ब्लेंड करा आणि मिक्श्चर बेक्ड क्रस्टवर ठेवा. आता क्रस्ट लेव्हल करा आणि 160 डिग्री से. वर 50 मिनिटांसाठी बेक करण्यासाठी ठेवा. हा केक बेक झालाय की नाही टूथपिक घालून चेक करू शकता. टूथपिक जर लगेच निघालं तर केक बेक झाला आहे आणि त्यावर केक लागला तर केक बेक होण्यास वेळ आहे. बेक झाल्यानंतर ओव्हनमधून काढून ठेवा आणि केक थंड होऊ द्या. थंड झाल्यावर तो केक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून थंड करा. आता या केकवर 3-4 मोठे चमचे रासबेरी क्रशने टॉप करा आणि स्ट्रॉबेरीज व रासबेरीजने गार्निश करा आणि थंड थंड सर्व्ह करा.
व्हॅनिला केक हा सर्वांना हमखास आवडतोच. त्यातही तो जर एगलेस असेल तर सगळ्यांनाच खाता येईल. जाणून घेऊया घरच्याघरी व्हॅनिलाचा सोप्या केकची रेसिपी.
साहित्य: 1 ¼ कप मैदा, 1 ½ टीस्पून बेकिंग पावडर, ½ टीस्पून बेकिंग सोडा, ¾ कप कंडेस्ड मिल्क, 4 टेबल स्पून वितळलेलं बटर, 1 टीस्पून व्हॅनिला इसेंस.
कृती: मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मिक्स करून चाळून घ्या आणि बाजूला ठेवा. नंतर 175 मिमी (7”) व्यासाच्या केक टिनमध्ये वितळलेल्या बटरने ग्रीस करा. नंतर मैद्याने डस्ट करून घ्या आणि त्यावर पीठ सगळीकडे चांगल पसरून घ्या. आता कंडेस्ड मिल्क, वितळलेलं बटर आणि व्हॅनिला इसेसं खोलगट बाऊलमध्ये घेऊन स्पॅट्युलाने चांगल मिक्स करा. आता यामध्ये चाळून घेतलेलं पिठ आणि 5 चमचे पाणी घाला. हे मिश्रण चांगल मिक्स होऊन जाडसर झालं पाहिजे. आता हे मिश्रण केक टीनमध्ये काढा आणि प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये 180 से. तापमानावर 25 मिनिटासाठी बेक करा. केक जेव्हा शिजेल तेव्हा टीन पालथा करून केक काढा. थंड करा आणि नंतर गार्निश करून सर्व्ह करा.
संत्र्याचा आंबटपणा आणि टूटी-फ्रूटीची गोड यांचं मिश्रण असलेला हा केक मुलांना नक्कीच आवडेल. हा केक बनवून तुम्ही अगदी चार-पाच दिवस ठेवू शकता. फक्त दरवेळी सर्व्ह करताना गरम करून वाढा. पाहूया या केकची कृती.
साहित्य: 1 ¼ मैदा, 1 ½ बेकिंग पावडर, ½ बेकिंग सोडा, ¾ कडेंस्ड मिल्क, 4 चमचे वितळलेलं बटर, 3 चमचे संत्र्याचा रस, 2 चमचे आँरेज मार्मलेड, 1 चमचा व्हॅनिला इसेंस, 5 चमचे टूटी-फ्रूटी, 2 चमचे दूध.
कृती: एका खोलगट बाऊलमध्ये मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून चांगलं मिक्स करून एका बाजूला ठेवून द्या. दुसऱ्या बाऊलमध्ये कंडेस्ड मिल्क, बटर, संत्र्याचा रस, आँरेज मार्मलेड आणि व्हॅनिला इसेंस घालून स्पॅट्युलाने मिक्स करा. आता यामध्ये पहिल्या बाऊलमधील मिश्रण मिक्स करा. नंतर त्यात घालून मिक्स करून घ्या. हे करून झाल्यावर टूटी-फ्रूटी घाला आणि मिक्स करा. नंतर केकच्या मोल्डमध्ये घालून प्री-हीट ओव्हनमध्ये 180 से. तापमानावर 35 मिनिटं बेक करा. थंड झाल्यावर तुम्ही हा केक बंद डब्यात ठेवू शकता. हवं तेव्हा सर्व्ह करू शकता.
रवा केक हा प्रत्येकालाच आवडतो. पण बाहेर हा केक खूपच महाग मिळतो. त्यापेक्षा तुम्ही हा केक घरी करून पाहा. चला पाहूया या केकची कृती.
साहित्य: 1 कप रवा, 1 कप ताजा खोवलेला नारळ, 1 कप पिठीसाखर, ½ वितळलेलं बटर, ½ दही, 2 चमचे दूध, 1 चमचा कॉर्न फ्लॉवर, ½ बेकिंग सोडा, 1 बेकिंग पावडर, ½ व्हॅनिला इसेंस, एक चिमूट मीठ.
कृती: केकचा मोल्ड बटरने ग्रीस करून त्यावर मैद्याने डस्ट करून घ्या. जास्तीचा मैदा मोल्ड झटकून काढून टाका. सर्व साहित्य एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊन चांगल मिक्स करा. केकच्या मोल्डमध्ये हे मिश्रण काढून ते नीट पसरून घ्या. आता प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये 180 सें तापमानावर 40 मिनिटं बेक करा. थंड होऊ द्या आणि नंतर आवडीनुसार गार्निश करून सर्व्ह करा.
वाचा - रव्याचे पौष्टिक तत्व
जर तुम्हाला झटपट आणि हटके केक करायचा असल्यास ही रेसिपी तुमच्यासाठी बेस्ट आहे.
साहित्य: 250 ग्रॅम मैदा, 125 ग्रॅम बटर, 75 ग्रॅम आइसिंग शुगर, 2 अंड्यांचा पिवळा भाग, 2-3 थेंब व्हॅनिला इसेंस. अर्धा किलो स्ट्रॉबेरी, 250 मि. ली. (एक मोठा चमचा कॅस्टर शुगर मिक्स केलेलं) व्हीप्ड क्रीम, ¼ टेबल स्पून व्हॅनिला इसेंस
कृती: मैदा चाळणीने चाळून घ्या. नंतर यात बटर, कच्च्या अंड्याचा पिवळा भाग आणि व्हॅनिला इसेंस घालून मिक्स करून घ्या. स्मूद पेस्ट करून घ्या. अर्धा तास थंड करत ठेवा. आता दो-आठ इंचाच्या गोलाकार आणि ¼ इंच जाडसर टिनमध्ये हे मिश्रण काढा. 15 मिनिटं थंड करत ठेवा. नंतर 180 डिग्री सैल्सियसवर 15-20 मिनिटांसाठी हे मिश्रण बेक करा. वरून व्हीप्ड क्रीम लावा. मग आईसिंग शुगर आणि क्रीमने गार्निश करून सर्व्ह करा.
हा चीज केकचा प्रकार नेहमीपेक्षा थोडा वेगळा आहे. या केकमध्ये बिस्कीटांचा चुरा आणि शाही चीजकेकच्या मिश्रणानंतर बेक करण्यात आला आहे. ख्रिसमसमध्ये चॉकलेट सॉससोबत खाण्यासाठी हा केक परफेक्ट आहे.
लेयरिंगसाठी: ¾ जाडसर क्रश केलेलं मारी बिस्कीट, 1 चमचा साखर, 4 वितळलेलं बटर.
साहित्य: 1 ½ कप किसलेलं पनीर, 1 चमचा घट्ट दही, चिमूटभर बेकिंग सोडा, चिमूटभर जायफळ, ¼ कप कंडेस्ड मिल्क आणि 1 चमचा किशमिश
कृती: लेयर बनवण्यासाठी एक बाऊलमध्ये यासाठी लागणारं साहित्य मिक्स करा. हे मिश्रण केकच्या मोल्डमध्ये घालून किमान 30 मिनिटं रेफ्रिजरेट करा.
आता चीजकेकचं मिश्रण बनवण्यासाठी किशमिश सोडून सर्व साहित्य वाटून घ्या. एका खोलगट बाऊलमध्ये हे मिश्रण काढून त्यात किशमिश घाला. नंतर हे मिश्रण आधीच्या लेयर केलेल्या मोल्डमध्ये पसरवून घ्या आणि ओव्हनमध्ये 200 से तापमानावर 15 मिनिटं बेक करा. थंड झाल्यावर सर्व्ह करा.
साहित्य: 1 कप मैदा, 3 मोठे चमचे कोको पावडर, 1/2 छोटा चमचा बेकिंग पावडर, 1 चिमूट मीठ, 3/4 छोटे चमचे साखर, 1 कप थंड पाणी, 1/4 कप तेल, 1 मोठा चमचा व्हिनेगर, 1/2 छोटा चमचा व्हॅनिला इसेंस, दूध आवश्यक्तेनुसार.
आईसिंगसाठी: 2 कप किंवा आवश्यक असेल तेवढं फेटलेलं क्रीम, 7-8 मोठे चमचे किसलेलं डार्क चॉकलेट, 3 मोठे चमचे बारीक चिरलेल्या चेरीज, शुगर सिरप, एक थेंब व्हॅनिला इसेंस.
कृती: सर्वात आधी मैदा, कोको पावडर, मीठ आणि बेकिंग पावडर मिक्स करून 3 वेळा चाळून घ्या. आता एका बाऊलमध्ये साखर आणि थंड पाणी घाला आणि विरघळेपर्यंत ढवळा. आता यामध्ये तेल आणि व्हिनेगर घाला आणि थोडं शिजवून बाजूला ठेवा. नंतर व्हॅनिला इसेंस घाला आणि सर्व साहित्य मिक्स करून फेटून घ्या. लक्षात ठेवा यात गुठळ्या होता कामा नये. आता हे मिश्रण मोल्डमध्ये काढून बेक करा. एका मोठ्या पॅनमध्ये मीठ घालून त्यावर रिंग ठेवा आणि मग केकचा मोल्ड ठेवून झाका. हे मिश्रण 25-30 मिनिटं बेक करा पण मंद आचेवर. थंड झाल्यावर काढून सर्व्ह करा.
आईसिंग करताना फेटलेल्या क्रीममध्ये व्हॅनिला इसेंस मिक्स करा. आता ते दोन भागात वाटून घ्या. एकात शुगर सिरप तर दुसऱ्यामध्ये चॉकलेट आणि चेरीज टाका. आता दोन्ही मिश्रणाने लेयर करा. वरून किसलेलं चॉकलेटही घाला. तयार आहे तुमचा ब्लॅक फॉरेस्ट केक.
तिरामिसू हा इटालियन पद्धतीचा केक आणि डेझर्ट आहे. हा स्पंज केक असून तो कॉफीमध्ये डीप करून त्यावर व्हीप्ड क्रीम, अंडाचा पांढरा भाग, मास्करपोने चीज आणि कोको फ्लेवर्ड लिकर लेयर करून सर्व्ह केला जातो.
तिरामिसूसाठी लागणारं साहित्य: 8-10 स्पंज केक पीस, 300 ग्रॅम मास्करपोने चीज ते नसल्यास तुम्ही पर्याय म्हणून क्रीम चीज वापरू शकता. 3 कच्च्या अंड्यांचा पांढरा भाग, 1 कप ताजं व्हीप केलेलं क्रीम, 200 ग्रॅम आईसिंग शुगर, 300 ग्राम पिठीसाखर, 1/2 कप एक्स्प्रेसो किंवा स्ट्राँग ब्रू कॉफी, 1 टेबल स्पून गोड रम, 1 टेबल स्पून साखर.
मास्करपोने चीजसाठी: 1 लीटर ताजं क्रीम आणि 1 टी स्पून व्हिनेगर किंवा लिंबाचा रस.
तिरामिसू बनवण्याची कृती: मास्करपोने चीज तयार करण्यासाठी व्हिनेगर किंवा लिंबाचा रस ताज्या क्रिममध्ये मिक्स करा. हे मिश्रण तेव्हा मिक्स करा जेव्हा ते घट्ट होईल. नंतर दोन दिवस मलमलच्या कपड्यात चक्क्यासारखं टांगून ठेवा. आता तिरामिसू बनवण्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये कच्च्या अंड्याचा पांढरा भाग घ्या. मग आईसिंग शुगर घालून चांगलं फेटून घ्या. त्यात वरून तयार केलेलं मास्करपोने चीज घाला आणि मिक्स करून पाच मिनिटं बाजूला ठेवून द्या. नंतर त्यात व्हीप क्रिम घाला. एका दुसऱ्या बाऊलमध्ये गोड रम, साखर आणि एक्स्प्रेसो कॉफी मिक्स करा. बाजूला ठेवा. आता एका भांड्यात स्पंज केकचे पीस ठेवा. हे कॉफी मिक्श्चरमध्ये बुडवा. त्यावर मास्करपोने मिक्श्चर लावा आणि पुन्हा स्पाँज केकची लेयर ठेवा. पुन्हा कॉफी मिक्श्चरने भिजवा. पुन्हा मास्करपोने चीज लेयर ठेवून त्यावर कोको पावडरने डस्ट करा. नंतर अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवा. थंड तिरामिसू सर्व्ह करा.
नट्स आणि क्रिमी फ्लेवर, केळं आणि दालचिनीपासून तयार केलेला हा केक तुमच्या मुलांसाठी उत्तम आहे.
साहित्य: 284 ग्रॅम मैदा, 12 ग्रॅम बेकिंग पावडर, 5 ग्रॅम दालचिनी पावडर, 100 ग्रॅम अक्रोड, 280 ग्रॅम केळ, 70 ग्रॅम बटर, 100 ml (मिली.) दही, 150 ml (मिली.) दूध.
कृती: मैदा आणि बेकिंग पावडर मिक्स करून घ्या. त्यात दालचिनी पावडर आणि अक्रोड घाला. एका बाऊलमध्ये केळ्यासोबत बटर चांगलं मॅश करून घ्या. मॅश केलेल्या केळ्यात आता दही घाला आणि मिक्स करा. नंतर या मिश्रणात सुकं साहित्य घाला आणि हळूहळू दूध घाला. हे बॅटर चांगलं फेटून घ्या. यात गुठळ्या राहता कामा नये. आता बॅटर ग्रीस केलेल्या टिनवर काढा. हे केक बॅटर 170 डिग्री सेल्सियम तापमानावर 50 ते 60 मिनिटांसाठी बेक करा आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बेक करा. आता हा केक थंड करा आणि सर्व्ह करताना आयसिंग शुगर घाला.