बाळंतपणानंतर कशी घ्यावी त्वचेची काळजी

बाळंतपणानंतर कशी घ्यावी त्वचेची काळजी

गरोदरपण आणि बाळंतपण हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. हॉर्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांचा परिणाम मानसिक स्थिती आणि त्वचेवर होत असतो. बाळंतपणानंतर स्त्रीचे शरीर पूवर्वत होण्यास सुरूवात होते. ज्यामुळे त्वचेवर प्रसूतीनंतरच्या काही खुणा दिसू लागतात. अपुऱ्या झोपेमुळे बऱ्याचदा डोळ्याखाली डार्क सर्कल्स निर्माण होतात. तर प्रसूतीनंतर शरीरावर स्ट्रेचमार्क्स होणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. जर तुमचे सी-सेक्शन झाले असेल तर व्यायामाच्या अभावामुळे पूर्ववत होण्यास इतर महिलांपेक्षा जास्त काळ जाऊ शकतो. बाळाच्या जन्मानंतर काही दिवस तुम्ही घरी आराम करता मात्र नंतर पुन्हा ऑफिस आणि इतर कामांसाठी घराबाहेर पडणं गरजेचं असतं. म्हणूनच बाळंतपणानंतर त्वचेची कशी काळजी घ्यायची हे प्रत्येकाला माहीत असायलाच हवं. 

Instagram

डिलिव्हरीनंतर अशी घ्या त्वचेची काळजी -

बाळंतपणानंतर त्वचेची काळजी घेण्यासाठी फॉलो करा हे स्कीन केअर रूटीन 

 • दिवसभरात कमीत कमी दोनदा तुमचा चेहरा एखाद्या सौम्य क्लिंझरने स्वच्छ करा. यासाठी तुम्ही घरातील कच्चे दूध, गाजराचा रस, काकडीचा रस, पपईचा गर अशा नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकता.
 • चेहऱ्यासाठी वॉटरबेस मॉश्चरायझरचा वापर करा. ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होईल.
 • दररोज पुरेसे पाणी प्या. कारण यामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातील आणि हॉर्मोन्स संतुलित होण्यास मदत होईल.
 • डोळ्यांसाठी एखादी चांगली आयक्रीम वापरा. ज्यामुळे तुमच्या डोळ्याखालील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होईल. 
 • आठवड्यातून एकदा नैसर्गिक स्क्रबरने चेहरा स्वच्छ करा. घरातच साखर, मध, ऑलिव्ह ऑईल, कॉफी पावडरने तुम्ही नैसर्गिक स्क्रब तयार करू शकता.
 • आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर पपईचा गर अथवा संत्र्यांच्या सालींचा फेसपॅक लावा. ज्यामुळे त्वचेचे उत्तम पोषण होईल. 
 • भरपूर हिरव्या भाज्या, सलाड. ताजी फळे खा. ज्यामुळे त्वचेला पुरेसे पोषण मिळेल आणि त्वचा नितळ होईल.
 • स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी नैसर्गिक स्क्रबरचा वापर करा. अंघोळ करताना आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा या स्क्रबरचा वापर करा. ज्यामुळे स्ट्रेचमार्क्स कमी होण्यास मदत होईल.
 • घराबाहेर पडण्यापूर्वी चांगल्या गुणवत्तेचं सनस्क्रीन वापरण्यास मुळीच विसरू नका. 
 • बाळाचे बाबा, आजी, आजोबा, मदतनीस अशा घरातील इतर मंडळींची मदत घ्या आणि तुमच्या झोपेचं व्यवस्थित नियोजन करा. जेव्हा तुमचं बाळ झोपलेलं असेल तेव्हा तुम्हीदेखील झोपणं फार गरजेचं आहे हे लक्षात ठेवा. 
Instagram

स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी अशी घ्या काळजी -

बाळंतपणानंतर महिलांच्या पोट, कंबर, स्तन आणि मांड्यावर स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात. या स्ट्रेच मार्क्समुळे प्रेगन्सीनंतर महिला त्यांना हवे तसे फॅशनेबल कपडे घालणं कमी करतात. शिवाय स्टेच मार्क्स लपविण्यापेक्षा काही घरगुती उपाय करून तुम्ही या स्ट्रेच मार्क्सपासून कायमची सुटका करून घेता येऊ शकते.

 • पोट, मांड्या अशा स्ट्रेचमार्क्स असलेल्या भागावर  नियमित ऑलिव्ह ऑईल, नारळाचे तेल याने मसाज करा.
 • त्वचा मऊ आणि मुलायम होण्यासाठी आणि स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी तुम्ही कोरफडाच्या गराचादेखील वापर करू शकता. यासाठी कोरफडाचा गर नियमित स्ट्रेच मार्क्सवर लावा. 
 • स्ट्रेचमार्क्सवर अंड्याचा पांढरा भाग लावल्यामुळेदेखील चांगला फायदा होऊ शकतो. 
 • कच्च्या बटाट्याचा रस अथवा काकडीचा रस त्वचेवरील कोणतेही डाग कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. यासाठी घरातील या  गोष्टींचा वापर जरूर करा. 
 • कोकोबटर त्वचेसाठी अगदी उत्तम असते. कारण कोकोबटरमुळे तुमची त्वचा हायड्रेट आणि मॉश्चराईझ राहते. नियमित कोको बटर लावल्यास काहीच दिवसात तुम्हाला स्ट्रेच मार्क्स कमी झालेले दिसून येतील.