जास्वंदीच्या फुलाने घरीच करा केस असे चमकदार

जास्वंदीच्या फुलाने घरीच करा केस असे चमकदार

जास्वंदीचं फुल गणपती बाप्पाला आवडत असल्यामुळे त्याला धार्मिक महत्त्व नक्कीच आहे. मात्र या फुलामध्ये अनेक औषधी गुणधर्मदेखील आहेत. यासाठीच याचा वापर अनेक काळापासून आयुर्वेदात औषधाप्रमाणे केला गेला आहे. एवढंच नाही तर तर तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी देखील जास्वंदीचं फुल फायदेशीर ठरू शकतं. जर तुमचे केस गळत असतील अथवा निस्तेज झाले असतील तर तुम्ही बिनधास्त जास्वंदीच्या फुलांचा वापर तुमच्या केसांसाठी करू शकता. पूजेसाठी वापरेली जास्वंदीची फुल तुम्ही पुजेनंतर तुमच्या केसांसाठी वापरा. यासाठी जाणून घ्या जास्वंदीच्या फुलाचे फायदे आणि उपयोग

केस चमकदार करण्यासाठी असा करा जास्वंदीचा वापर -

आजकाल बाजारात जास्वंदीची तयार पावडर मिळते. मात्र जर तुमच्याकडे  जास्वंदीची पावडर नसेल तर पुजेसाठी वापरलेली जास्वंदीची फुलं उन्हात सुकवा आणि त्याची पूड करून ठेवा. केसांना नैसर्गिक चमक आणण्यासाठी जास्वंदीची पावडर आणि कोरफडाचा गर एकत्र करून एक हेअर मास्क तयार करा. केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत हा हेअर मास्क लावा आणि केसांना हलक्या हाताने मसाज करा. वीस मिनीटांनी केस कोमट पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून दोनदा जर तुम्ही हा हेअर मास्क वापरला तर तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने चमकदार दिसू लागतील. शिवाय यामुळे तुमच्या केसांचे आरोग्यदेखील वाढेल. कारण जास्वंदीच्या फुलांमधील पोषक घटकांमुळे तुमच्या केसांतील फॉलिकल्स मजबूत होतात. 

Shutterstock

केस गळणे कमी करण्यासाठी असा करा वापर -

संशोधनानुसार जास्वंदीच्या फुलांमधील अर्कामुळे तुमचे केस गळणे कमी होते. म्हणूनच जर तुमचे केस गळत असतील अथवा टक्कल पडलं असेल तर हा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी जास्वंदीच्या ताज्या फुलांना मिक्सरमध्ये वाटून घ्या. जास्वंदीची पेस्ट केस गळत असलेल्या भागावर लावून ठेवा. दोन तासांनी तो भाग स्वच्छ धुवा. असं केल्यामुळे तुमच्या डोक्यावर नवीन केस उगवू लागतील. 

कोंडा कमी करण्यासाठी -

जास्वंदीची फुलं आणि पाने या दोन्ही गोष्टी केसांसाठी फायदेशीर ठरतात. यासाठी जास्वंदीची फुलं आणि पानं  सुकवून त्याची पावडर तयार करा. या पावडरमध्ये मेंदी पावडर आणि लिंबाचा रस मिसळा. या मिश्रणाची पेस्ट तयार करून तुमच्या केसांना लावा. ज्यामुळे तुमच्या केसांमधील कोंडा कमी होईल. ही पेस्ट केसांवर कमीत कमी एक तास ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुवा. 

Shutterstock

केस मजबूत करण्यासाठी -

बाजारात मिळणारे केमिकलयुक्त शॅंपू तुमच्या केसांमधील नैसर्गिक चमक कमी करतात. या शॅंपूचा वापर केल्यामुळे तुमच्या केसांमधील नैसर्गिक तेल निघून गेल्यामुळे तुमचे केस निस्तेज दिसू लागतात. यासाठीच जास्वंदीच्या फुलांपासून घरीच शॅंपू तयार करा. ज्यामुळे तुमचे केस मजबूत होतील आणि चमकदार दिसू लागतील. यासाठी जास्वंदीच्या फुलांची पावडर, बेसन, दूध आणि पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा आणि  या मिश्रणाने तुमचे केस धुवा. या नैसर्गिक शॅंपूमुळे तुमच्या केसांचे आरोग्य अधिक चांगले होईल.