वाफाळती चहा, कॉफी पिताना किंवा गरमागरम पिझ्झा खाताना तुमची जीभ अथवा टाळू भाजली आहे का ? गरम पदार्थ खाताना तोंड भाजणं ही एक सामान्य समस्या आहे. ज्या लोकांना घाईघाईत जेवण्याची सवय असते त्यांना हा त्रास नेहमीच जाणवतो. एकदा का असे तुमचे तोंड पोळले की मग नंतर काहीही खाणं कठीण होतं. तोंड पोळलेलं असेल तर बोलतानाही अवघडल्यासारखं वाटू लागतं. याचं कारण आपल्या तोंडातील त्वचेचे टिश्यूज फारच नाजूक असतात. गरम खाद्यपदार्थांमुळे ते लवकर पोळले जातात. यासाठीच या समस्येवर घरीच उपचार करण्यासाठी करा हे नैसर्गिक उपाय ज्यामुळे लवकर आराम मिळेल आणि पोळलेली जखम बरीदेखील होईल.
लगेच थंड पाणी प्या –
जर तुमचे तोंड गरम पदार्थ खाताना पोळले तर सर्वात आधी थंड पाणी प्या. संशोधनानुसार तोंडातील पोळलेल्या भागावर थंड पाणी पिण्याने लवकर परिणाम होतो. दहा मिनीटे थंड पाण्याचा असा शेक मिळाला की भाजलेल्या भागाला थंडावा मिळतो. तुम्ही तोंड भाजल्यावर काही मिनीटे तोंडात थंड पाणी अथा बर्फ नक्कीच ठेवू शकता.
मधाचे चाटण जीभ आणि टाळूवर लावा –
तोंड भाजले तर तुम्ही गरम पदार्थांनी पोळलेला भाग मधाचे चाटण घेऊन बरा करू शकता. कारण मधासारख्या गोड, पातळ आणि औषधी पदार्थांमुळे तुमच्या जीभ आणि टाळूवर एक आवरण निर्माण होते. शिवाय मधामधील अॅंटि मायक्रोबायल घटकांमुळे तुमच्या तोंडामधील जखम बरी होणे सोपे जाते. मद प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असतेच तेव्हा हा उपाय तुम्ही घरच्या घरी नक्कीच करू शकता.
दही खा अथवा दूध प्या –
भाजलेले तोंड बरे करण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे. जर तुमचे गरम पदार्थ खाऊन तोंड भाजले असेल तर थंडगार दही खा अथवा दूध प्या. ज्यामुळे तोंडाचा दाह कमी होण्यास मदत होईल. चटका बसल्यामुळे तोंडात होणारी जळजळ आणि खास यामुळे कमी होऊ शकेल. दही आणि दुधामुळे तुमच्या तोंडात ओलसरपणा निर्माण होईल आणि जखम लाळेने लवकर बरी होईल.
पुदिनाच्या गोळ्या तोंडात ठेवा –
पुदिना असलेल्या मिंटच्या गोळ्या तु्मच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कारण यामुळे तुमच्या तोंडाला पटकन थंडावा मिळेल. या गोळ्यांमध्ये अॅंटि बॅक्टेरिअल घटक असतात ज्यामुळे तुम्हाला इनफेक्शन होण्याचा धोका कमी होतो. जर तुमच्याकडे मिंटच्या गोळ्या नसतील तर तुम्ही पुदिना असलेली टुथपेस्ट तोंडाला लावू शकता.
थोडावेळ तोंडाने श्वास घ्या –
आपण नेहमी नाकाने श्वास घेतो मात्र सर्दी अथवा इतर आरोग्य समस्यांमुळे नाकाने श्वास घेण्यास त्रास झाला तर आपोआप तोंडावाटे श्वास घेतला जातो. जेव्हा तुम्ही तोंडाने श्वास घेता तेव्हा तुमच्या तोंडात थंड वाऱ्यामुळे गारवा निर्माण होतो. म्हणूनच जर जर तुमचे तोंड भाजले तर तोंडात असा थंडावा निर्माण करण्यासाठी तुम्ही उपाय म्हणून थोडावेळ तोंडाने श्वास घेऊ शकता.
व्हिटॅमिन ईयुक्त तेलाने मसाज करा –
व्हिटॅमिन ईच्या गोळ्या घेण्याची जर तुम्हाला सवय असेल तर तोंड भाजल्यावर तुम्ही हा उपाय करू शकता. व्हिटॅमिन ईची गोळी फोडून त्यातील तेल तुम्ही तुमच्या जबड्याला लावू शकता. या तेलाने हलक्या हाताने टाळूवर मसाज करा. कारण यामुळे तुमच्या तोंडातील त्वचेच्या टिश्यू लवकर बऱ्या होतील आणि तुम्हाला आराम मिळेल.
तोंड भाजल्यावर काय खाणे टाळाल –
तोंड भाजल्यावर काहीही खाताना खूप त्रास होतो. मात्र या काळात जर काही पदार्थ लक्षपूर्वक खाणे टाळले तर तुमचे पोळलेले तोंड लवकर बरे होईल.
- गरमागरम, मीठाचे, तिखट आणि कुरकुरीत पदार्थ
- मद्यपान आणि तंबाखू
- दालचिनीयुक्त पदार्थ
- टोमॅटो अथवा संत्री अशी आंबट फळे
याकाळात हे पदार्थ मुळीच खाऊ नका. कारण यामुळे तुमचा त्रास कमी होणार नाही उलट जास्त वाढेल. भाजलेले तोंड आठवड्याभरात आपोआप बरे होते. कारण आपल्या ताळेमध्ये तोंडातील जखमा बऱ्या करण्याची क्षमता असते. यासाठी आठवडाभर थंड आणि जलयुक्त आहार घ्या. पण जर आठवड्याभरात तुमची जखम बरी झाली नाही तर मात्र तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं नक्कीच गरजेचं आहे. शिवाय यासाठी नेहमी एखादा गरम पदार्थ खाताना तो सावधपणे आणि सयंमाने खा.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक
अधिक वाचा –
उंची वाढण्यासाठी आहारात समावेश करा या खाद्यपदार्थांचा
झोप येत नसल्यास करा सोपे उपाय, खास टिप्स
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ खाद्यपदार्थांचा आहारात करा समावेश