चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी नियमित खा मूग डाळ, जाणून घ्या फायदे

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी नियमित खा मूग डाळ, जाणून घ्या फायदे

शरीराला पुरेशे प्रोटिन्स मिळावे यासाठी आहारात डाळी आणि कडधान्य असणं गरजेचं आहे. मूग डाळ मध्ये प्रोटीन सोबत पोटॅशियम, लोह, फॉस्फरस, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, तांबे, फॉलेट, फायबर्स,  व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई भरपूर असतं. शिवाय यात जास्त कॅलरीज नसल्यामुळे तुमच्या वजनावर नियंत्रण राहतं. मूगडाळ जशी तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असते तशीच तिचा आहारात समावेश केल्यामुळे तुमची त्वचा देखील निरोगी राहते. 

बऱ्याचदा पोट बिघडल्यावर अथवा आजारी असल्यावर मूग डाळ खाल्ली जाते. मात्र मूग डाळीमध्ये इतके पोषक घटक आहेत की ती नियमित आहारात असायालच हवी. मूग डाळ खाण्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात, चेहऱ्यावरील डाग आणि व्रण कमी होतात एवढंच नाही तर नियमित मूग डाळ खाल्ली तर तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळंही नाहीशी होऊ शकतात. यासाठीच जाणून घ्या दररोज मूग डाळ फायदेशीर का आहे.

निरोगी त्वचेसाठी -

मूग डाळीमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई असतं शिवाय त्यात भरपूर प्रमाणात फॉस्फरस देखील असतं ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या समस्या कमी होतात. दररोज मूग डाळ खाण्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. शिवाय यामुळे त्वचा नितळ होते आणि चेहऱ्यावरील डाग दिसेनासे होतात. जर तु्म्हाला सतत डार्क सर्कल्सचा त्रास होत असेल तर आहारात मूगडाळीचा समावेश केल्याने ही समस्यादेखील कमी होऊ शकते. थोडक्यात त्वचा निरोगी राहण्यासाठी आणि सतत चिरतरूण दिसण्यासाठी मूग डाळ खाणं नक्कीच फायद्याचं आहे. 

Instagram

केस होतात चमकदार -

मूगडाळ फक्त तुमच्या त्वचेसाठीच उपयुक्त आहे असं नाही तर यामुळे तुमच्या केसांचे आरोग्यदेखील वाढते. मूगडाळीमध्ये प्रोटिन्स आणि तांबे असतं. ज्यामुळे तुमचे केस मजबूत आणि चमकदार होतात. मूग डाळ खाण्यामुळे तुमच्या मेंदूला पुरेशा ऑक्सिजनचा पूरवठा होतो. ज्यामुळे तुमच्या केसांची मुळं मजबूत होतात. यासाठीच केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही नियमित मूग डाळ खाणं गरजेचं आहे. 

लहान मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर -

महिला आणि पुरूषांच्या आरोग्याप्रमाणेच मूग डाळ तुमच्या लहान मुलांच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहे. कारण मूगडाळी मध्ये विविध प्रकारचे पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या लहान मुलांची वाढ  आणि विकास चांगला होतो. शिवाय मूग डाळ पचण्यास हलकी असते. बाळाला नियमित शिजलेल्या मूग डाळीचे पाणी पिण्यास दिल्याने त्याची रोग प्रतिकार शक्ती वाढते. 

पोटाच्या समस्येवर लाभदायक -

जर तुम्हाला सतत पोट बिघडण्याची समस्या असेल तर आहारात मूगडाळीचा समावेश करा. मूग डाळ खाण्यामुळे तुमच्या पचनाच्या समस्या कमी होतात. सतत पित्त होत असेल तर मूग डाळ खाण्याने ते कमी होतं. जर काही कारणांमुळे तुम्हाला जुलाब अथवा उलटी होत असेल तर एक कप शिजलेल्या मूग डाळीचे पाणी पिण्यामुळे शरीराला आराम मिळतो. जुलाब आणि उलटीने शरीरातील पाणी कमी होतं अशावेळी हे पाणी पिण्यामुळे शरीराची झालेली झीज भरून निघू शकते.

प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी उपयुक्त -

जीवनशैलीत झालेले बदल अथवा बदलणारे वातावरण याचा थेट परिणाम तुमच्या प्रतिकार शक्तीवर होत असतो. अशावेळी रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही शिजलेल्या मूगडाळीचे पाणी पिऊ शकता. कारण त्यामुळे तुम्हाला त्वरित ऊर्जा मिळू शकते. लहान मुलं, वृद्ध आणि आजारी माणसांना प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मूग डाळ खाण्याचा चांगला फायदा होऊ शकतो.