वातावरणातील बदल, प्रदूषण आणि चुकीच्या जीवनशैलीचा शरीरावर सतत परिणाम होत असतो. म्हणूनच हवामानानुसार आहारात काही विशिष्ट बदल नियमित करायला हवेत. निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी पौष्टिक आणि सकस आहाराचा चांगला फायदा होतो. जर तुम्हाला तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी नियमित पौष्टिक पदार्थ बनवायचे असतील तर तुम्हाला या खास रेसिपीज माहित असायलाच हव्या. आम्ही तुमच्यासोबत अशा काही रेसिपीज शेअर करत आहोत ज्या बनवणं अगदी सोपं आणि सहज आहे. तेव्हा दररोजच्या स्वयंपाकात हे पौष्टिक पदार्थ तयार करा आणि निरोगी राहा.
Table of Contents
- पौष्टिक लाडू (Paushtik Ladoo Recipe In Marathi)
- खरवस रेसिपी मराठी (Kharvas Recipe In Marathi)
- गव्हाची लापशी (Ghavachi Lapshi)
- नाचणीचा उपमा (Nachnicha Upma)
- पालक सूप (Palak Soup Recipe In Marathi)
- बीटाच्या वड्या (Bitchya Wadya)
- थालीपीठ रेसिपी (Thalipeeth Recipe In Marathi)
- बिन खव्याचे गुलाबजाम (Bin Khavache Gulab Jamun)
- मक्याचे सॅलेड (Makyache Salad)
- गाजराची कोशिंबीर (Gajarachi Koshimbir)
- मुगाचे धिरडे (Mugache Dhirde)
- पोळीचा लाडू (Policha Ladoo)
- खजूरची वडी (Kajur Wadi)
- नाचणीचं सत्व (Nachani Satwa)
- दुधी भोपळ्याचा पराठा (Dudhicha Paratha)
पौष्टिक लाडू (Paushtik Ladoo Recipe In Marathi)
हिवाळा सुरू झाला की शरीराला उष्ण पदार्थांची गरज भासते. अंगात ताकद येण्यासाठी आणि हाडे मजबूत होण्यासाठी या दिवसांमध्ये घरोघरी डिंक, मेथी आणि सुकामेव्याचे लाडू तयार केले जातात. यासाठीच जाणून घ्या पौष्टिक लाडूची ही रेसिपी
साहित्य –
- पाव किलो बदाम
- शंभर ग्रॅम काजू
- पाव किलो खारीक
- पाव किलो पिस्ता
- पाव किलो अक्रोड
- पाव किलो सुके खोबरे
- वीस ग्रॅम खसखस
- शंभर ग्रॅम मेथी
- अर्धा किलो मूगडाळीचे पीठ
- पाव ते अर्धा किलो तूप
- अर्धा किलो गूळ
- वेलची आणि जायफळ पूड
कृती –
लाडू करण्याच्या आठवडाभर आधी मेथीची पावडर आणि तूप एकत्र करून डब्यात भरून ठेवावे. यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होतो. त्यानंतर लाडू बनवताना तूपात सर्व डिंक आणि सुकामेवा तूपात तळून घ्यावा. मूगडाळीचे पीठ कढईत खरपूस भाजून घ्यावे. खोबरे किसून बदामी रंगाचे भाजून घ्यावे. सुकामेवा आणि खोबरे, डिंक मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. मूगडाळीचे पीठ, तूपात भिजवलेली मेथीची पावडर, मिक्सरमध्ये दळलेले साहित्य एकत्र करावे. गरजेनुसार तूप घालावे आणि लाडू वळून घ्यावे.
वाचा – खमंग चिवडा रेसिपी, बनवा घरच्या घरी
खरवस रेसिपी मराठी (Kharvas Recipe In Marathi)
खरवस हा अनेकांचा आवडता पदार्थ असतो. खसवस गाईच्या ताज्या चिकापासून म्हणजेच वासराला जन्म दिल्यानंतर गाईला येणारे पहिल्या दुधापासून तयार केलेला असल्यामुळे शरीरासाठी अतिशय लाभदायक असतो. यासाठीच जाणून घ्या खरवस हा पौष्टिक पदार्थ कसा तयार करावा.
साहित्य –
- दोन कप गाईच्या चिकाचे दूधए
- एक कप गाईचे साधे दूध
- पाऊण कप गूळ
- वेलची आणि जायफळीची पूड
कृती –
एका भांड्यात साधे दूध, चिकाचे दूध आणि गूळ एकत्र करा.गूळ विरघळल्यावर त्यात वेलची आणि जायफळीची पूड घाला. कुकरच्या डब्यात मिश्रण ओता आणि कुकरमध्ये तळाला थोडं पाणी घालून डबा आता ठेवाकुकरची शिटी न लावता पंधरा ते वीस मिनीटे वाफवून घ्या.खरवस थंड झाला की वड्या पाडा आणि फ्रीजमध्ये ठेवा.
घरीच बनवा या चटपटीत आवळा रेसिपीज (Amla Recipes In Marathi)
वाचा – महाराष्ट्रातील प्रसिद्ध मिसळ पाव रेसिपी
गव्हाची लापशी (Ghavachi Lapshi)
गव्हाची लापशी हा शिऱ्याप्रमाणे एक झटपट होणारा गोड पदार्थ आहे. मात्र गोड असूनही हा एक पौष्टिक पदार्थ आहे. कारण त्यामधून तुमच्या शरीराला पुरेसे फायबर्स मिळू शकतात.
साहित्य –
- एक वाटी गव्हाचा रवा अथवा दलिया
- अर्धी वाटी गूळ
- किसलेले खोबरे
- तूप
- पाणी
- वेलची आणि जायफळीची पूड
कृती –
गॅसवर तूप गरम करा आणि त्यात गव्हाची लापशी अथवा दलिया भाजून घ्या.गुलाबी रंगाचा झाल्यावर त्यात गूळ टाका. वरून दुप्पट कोमट पाणी टाका आणि चांगले शिजू द्या. शिऱ्याप्रमाणे रवा सुटसुटीत झाला आणि तूप वेगळे होऊ लागले की वरून वेलची आणि जायफळीची पूड टाका. लापशी तयार झाल्यावर गॅस बंद करा आणि गरमागरम वाढा
नाचणीचा उपमा (Nachnicha Upma)
साहित्य –
- एक वाटी नाचणी
- एक चिरलेला कांदा
- दोन बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या
- हिंग
- मोहरी
- तेल
- हळद
- कढीपत्ता
- कोथिंबीर
- लिंबाचा रस
- किसलेले खोबरे
- चवीपुरतं मीठ
कृती –
नाचणी भिजवून त्याला मोड आणावे. कढईत तेल टाकून हिंग, मोहरीची फोडणी द्यावी.त्यात कढीपत्ता. कांदा आणि मिरची टाकावी. कांदा गुलाबी झाला की त्यात नाचणी टाकावी. वरून झाकण ठेवून चांगली वाफ आणावी. नाचणी शिजली की मीठ टाकावे. वरून कोथिंबीर, खोबरं आणि लिंबूरस पिळून सर्व्ह करावे
वाचा – कटाची आमटी रेसिपी
पालक सूप (Palak Soup Recipe In Marathi)
पालकचे सूप झटपट होणारा आणि अतिशय पौष्टिक पदार्थ आहे. तुम्ही कोणत्याही वेळी हे सूप पिऊ शकता. हिवाळ्यात हे सूप पिण्यामुळे शरीरप्रकृती चांगली राहते.
साहित्य –
- दोन कप धुवून चिरलेली पालकची पाने
- अर्धा कप दूध
- दीड चमचा कॉर्न स्टार्च
- बटर
- अर्धा चिरलेला कांदा
- आल्याची पेस्ट
- लसणाच्या पाकळ्या
- पाणी
- मीठ आणि साखर चवीनुसार
- काळीमिरी पावडर
कृती –
दुधात कॉर्न स्टार्च मिसळा. गुठळ्या काढून चांगली पेस्ट तयार करा.कढईत बटरमध्ये कांदा, आलं आणि लसूणम परतून घ्या.कांदा परतल्यावर त्यात पालकची चिरलेली पाने टाका. वरून पाणी टाकून चांगले शिजू द्या.चवीसाठी मीठ आणि साखर टाका. मिश्रण थंड झाल्यावर ब्लेंडरने वाटून घ्या.प्युरी गाळून घ्या आणि त्यामध्ये दूध आणि कॉर्नस्टार्चचे मिश्रण मिसळा. तीन चे चार मिनीट उकळा आणि वरून काळीमिरी पावडर टाका
बीटाच्या वड्या (Bitchya Wadya)
बीटाच्या वड्या हा एक अतिशय पौष्टिक पदार्थ आहे. रंगीत असल्यामुळे तुमच्या लहान मुलांना तो खूप आवडतो.
साहित्य –
- एक कप उकडून किसलेले बीट
- एक कप साखर
- अर्धा कप खिसलेला नारळ
- तूप
- वेलची आणि जायफळीची पूड
कृती –
बीटाचा कीस तूपात परतून घ्यावा. मध्यम आंचेवर किस मऊ झाला की त्यात साखर आणि खोबरे टाकावे.. साखर विरघळ्यावर मिश्रण पातळ होईल . मिश्रण दाट होईपर्यंत मंद आंचेवर ढवळत राहावे. घट्ट झाल्यावर वेलची आणि जायफळीची पूड टाकून गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर ताटाला तूप लावून त्यावर थापून वड्या पाडाव्यात
थालीपीठ रेसिपी (Thalipeeth Recipe In Marathi)
थालिपीठ हा झटपट होणारा आणि अतिशय चविष्ट, पौष्टिक पदार्थ आहे. जर तुमच्याकडे थालिपीठाची भाजणी तयार असेल तर तुम्ही कधीही पटकन थालिपीठ करू शकता. पण नसेल तर ही रेसिपी फॉलो करा
साहित्य –
- एक कप तांदळाचे पीठ
- एक कप ज्वारीचे पीठ
- एक कप बाजरीचे पीठ
- एक कप गव्हाचे पीठ
- अर्धा कप बेसण
- अर्धा कप मूगडाळीचे पीठ
- चिरलेला कांदा
- चिरलेली कोथिंबीर
- हिरवी मिरची,आलं, लसणाची पेस्ट
- धण्याची पावडर
- जिरा पावडर
- हळद
- मीठ
- लाल तिखट
- एक उकडलेला बटाटा
- तेल
कृती –
चिरलेला कांदा, मिरची, आलं, लसणाची पेस्ट, कोथिंबीर एकत्र करून त्यात हळद, लाल तिखट, मीठ, धण्या-जिऱ्याची पावडर एकत्र करा. सर्व प्रकारची पीठे वरून बेताने टाका. सर्व मिश्रण एकत्र करा. बटाटा कुस्करून टाका. मिश्रणाला गरज असल्यास पाण्याचा हात लावा. मळलेले पीठ काही मिनीटे ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवा. पोळपाटावर ओले कापड अथवा केळ्याचे पान ठेवा आणि त्यावर तेलाचा हाताने थालिपीठ थापून घ्या. तवा गरम करा आणि थालिपीठ भाजून अथवा तळून घ्या. नारळाची चटणी, लोण्यासोबत गरमागरम वाढा
बिन खव्याचे गुलाबजाम (Bin Khavache Gulab Jamun)
जर तुम्हाला खवा नको असेल तर पौष्टिक पदार्थ तयार करताना तुम्ही बिन खव्याचे गुलाबजाम तयार करू शकता. जाणून घ्या कसे
साहित्य –
- एक वाटी मिल्क पावडर
- दोन चमचा मैदा
- एक चमचा रवा
- एक चमचा सोडा
- एक चमचा तूप
- दोन चमचे दूध
- पाकासाठी साखर
कृती –
साखर आणि पाण्याचा पाक तयार करा. एका भांड्यात मिल्क पावडर, रवा, मैदा आणि तूप, दूध मिक्स करून पीठ मळून घ्या. मिश्रण काही मिनीटं ओल्या फडक्यात बांधून ठेवा. छोटे छोटे गोळे करून तूपात तळून घ्या. साखरेच्या पाकात टाकून थोडावेळ उकळवा आणि मुरल्यावर गरमागरम सर्व्ह करा
मक्याचे सॅलेड (Makyache Salad)
मका हा शरीरासाठी अतिशय पोशक असतो. त्यामुळे तुम्ही नियमित ही पौष्टिक रेसिपी तयार करू शकता.
साहित्य –
- उकलेला मका
- चिरलेला कांदा
- चिरलेला टोमॅटो
- हळद
- बटर
- चाट मसाला
- लाल तिखट
- काळीमिरी पावडर
कृती –
मका उकडून पाणी गाळून घ्या. चिरलेला कांदा, टोमॅटो टाकून एकजीव करा. पॅनमध्ये बटरमध्ये थोडं परतून घ्या. मिश्रणात वरून मीठ, हळद, काळीमिरी पावडर, लाल तिखट, चाट मसाला टाका.
गाजराची कोशिंबीर (Gajarachi Koshimbir)
गाजराचा हलवा करण्याऐवजी नियमिक गाजराची कोशिंबीर खाणं नक्कीच योग्य राहील. कारण गाजराच्या कोशिंबीरीतून मुबलक फायबर्स तुमच्या पोटात जातील.
साहित्य –
- धुवून,सोलून किसलेली गाजरे
- हिरवी मिरची
- कोथिंबीर
- लिंबाचा रस
- डाळिंबाचे दाणे
- दाण्याचा कूट
- मीठ
कृती –
गाजराच्या किसामध्ये चिरलेली हिरवी मिरची, चिरलेली कोथिंबीर, दाण्याचा कूट आणि डाळिंबाचे दाणे टाका. मिश्रण एकजीव करा आणि मीठ, लिंबाचा रस मिसळा. आंबट तिखट चवीची ही कोशिंबीर तुमच्या तोंडाला चांगली चव आणेल.
मुगाचे धिरडे (Mugache Dhirde)
मोड आलेले मूग आरोग्यासाठी नक्कीच पौष्टिक आहेत. तुम्ही या मोड आलेल्या मुगापासून अनेक पौष्टिक पदार्थ तयार करू शकता.
साहित्य –
- दीड कप मोड आलेले मोड
- दोन हिरव्या मिरच्या
- आले
- मीठ
कृती –
मूग, आले आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटून घ्यावी. मिश्रण जाड असेल तर त्यात पाणी टाकून पातळ करावे. मीठ टाकून धिरड्याचे मिश्रण तयार करावे. तव्यावर तेल गरम करून डावेने धिरडी सोडावी. गरमागरम धिरडी खाण्यास द्यावी.
पोळीचा लाडू (Policha Ladoo)
शिळी पोळी खाणं योग्य नाही असं अनेक ठिकाणी सांगितलं जातं. मात्र इतर अपथ्यकारक पदार्थ खाण्यापेक्षा उरलेल्या पोळीचा लाडू खाणं नक्कीच फायदेशीर ठरेल. शिवाय पोळीचा लाडू ही अतिशय सोपा आणि झटपट होणारा पौष्टिक पदार्थ आहे.
साहित्य –
- उरलेल्या पोळ्या
- गूळ पावडर
- तूप
- वेलची पावडर
कृती –
पोळ्या मिक्सरमध्ये वाटून घ्याव्या. कढईत तूप गरम करून त्यात पोळ्याचा चुरा टाकून परतून घ्यावा. गरजेनूसार गूळ पावडर घालावी. वेलची पावडर टाकून छान लाडू वळावेत. भूक लागल्यावर कधीही खाण्यासाठी हे लाडू तुमच्या नक्कीच उपयोगी पडतील.
खजूरची वडी (Kajur Wadi)
हिवाळ्यात खजूर खाणं नक्कीच शरीरासाठी चांगलं असतं. शिवाय चांगल्या शरीर प्रकृतीसाठी प्रत्येकाने दिवसभरात एक ते दोन खजूर अवश्य खावेत. पण तुम्हाला खजूर खाणं आवडत नसेल तर अशा प्रकारे खजूराची वडी बनवून खा.
साहित्य –
- बिया काढलेले खजूर
- तूप
- खसखस
- सुके खोबरे
कृती –
खजूर मिक्सरमध्ये वाटून तूपावर परतून घ्या. त्यात खसखस आणि खोबरं टाका. मिश्रण एकजीव होईपर्यंत गरम करा. खजूर शिजले की ताटाला तूप लावून त्यावर मिश्रण पसरवा. थंड झाल्यावर मिश्रणाच्या आवडीनुसार वड्या पाडून खा.
नाचणीचं सत्व (Nachani Satwa)
उन्हाळ्यात शरीराचा दाह कमी करण्यासाठी नाचणीचं सत्व पिण्यास दिलं जातं. नाचणी थंड असल्याने लहान मुलांसाठीदेखील नाचणीचे सत्व दिलं जातं.
साहित्य –
- नाचणी
- मीठ
- तूप
कृती –
नाचणीला धुवून भिजवून मोड आणावे. उन्हात कापडावर पसरून ती वाळवावी. मिक्सरमध्ये वाळलेली मोड आलेली नाचणी दळून घ्यावी. मोड आलेल्या नाचणीचे पीठ म्हणजेच नाचणीचे सत्व तयार करताना नाचणीच्या पीठात मीठ आणि पाणी मिसळावे. गॅसवर गरम करण्यास ठेवावे पीठ आटू लागले की त्यात तूप टाकावे. शिजल्यावर गरमागरम खाण्यास द्यावे. आजारी माणसे आणि लहान मुलांसाठी नाचणीचे सत्व खूप फायदेशीर आहे.
दुधी भोपळ्याचा पराठा (Dudhicha Paratha)
दुधी भोपळा खाण्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहतं. त्यामुळे जर तुम्ही अशा एखाद्या पौष्टिक पदार्थाच्या शोधात असाल तर ही रेसिपीज जररू करून पाहा.
साहित्य –
- किसलेला दुधी भोपळा
- कणीक
- लाल तिखट
- हळद
- मीठ
- धणा पावडर
- जिरा पावडर
- तूप
कृती –
भोपळा किसून त्याचे पाणी काढून घ्यावे. दुधीच्या किसावर कणीक, मीठ, तिखट, धण्या-जिऱ्याची पावडर, हळद एकत्र करावी. गरज लागल्यास दुधीचे काढलेले पाणी कणीक मळण्यासाठी वापरावे. मळलेले कणीक ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवावे. पराठे लाटून तूपावर शेकवून घ्यावे. चटणी अथवा सॉससोबत गरमागरम वाढावे.