इडली स्पॉंजी होण्यासाठी फॉलो करा या टिप्स (Soft and Spongy Idli Recipe In Marathi)

इडली स्पॉंजी होण्यासाठी फॉलो करा या टिप्स (Soft and Spongy Idli Recipe In Marathi)

इडली हा एक असा एक पदार्थ आहे जो तुम्ही सकाळचा नास्ता, दुपारचं जेवण अथवा संध्याकाळी आणि रात्रीदेखील खाऊ शकता. त्यामुळे आजकाल घरोघरी या साऊथ इंडिअन पदार्थांची लोकप्रियता वाढतच जात आहे. जर तुम्ही पहिल्यांदा घरी इडली बनवणार असाल अथवा तुमचा इडलीचा बेत अनेकवेळा फसला असेल तर तुम्हाला या काही सोप्या टिप्स फॉलो करण्याची गरज आहे. शिवाय ३० मार्च हा दिवस जागतिक इडली दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यासाठी तुम्हाला इडली स्पॉंजी करण्याचं कसब नक्कीच माहीत असायला हवं. 

instagram

इडली बनवताना काय चुका होऊ शकतात -

पहिल्यांदा इडली बनवताना अनेकींच्या हातून काही चुका होण्याची शक्यता असते. कारण इडली बनवणं अतिशय सोपं आहे असं आपल्याला वाटत असतं. मात्र इडली बनवताना सर्वात महत्त्वाचं आहे इडलीचं बॅटर तयार करणं. कारण जर बॅटरमधील प्रमाण अथवा ते तयार करण्याची प्रोसेस चुकली तर इडली स्पॉंजी न होता चिवट आणि कडक होते. यासाठी इडली बनवण्याची कृती आणि दिलेल्या खास टिप्स अवश्य फॉलो करा. ज्यामुळे तुम्ही देखील घरच्या घरी परफेक्ट इडली तयार करू शकता. कारण इडली खाणं तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यासाठी जाणून घ्या कसं करावं इडली खाऊन झटपट वजन कमी

घरच्या घरी इडली बनवण्याची सोपी पद्धत -

इडली परफेक्ट व्हावी असं वाटत असेल तर फॉलो करा ही रेसिपी. इडली किती जणांसाठी बनवायची आहे यावरून  आदल्या दिवशी तुम्हाला तयारीला लागण्याची गरज आहे. साधारण सहा जणांसाठी पुरतील इतक्या इडलीचे आम्ही तुम्हाला साहित्य आणि कृती शेअर करत आहोत.

साहित्य -

 • दोन कप उदीद डाळ ( तुम्ही एक कप उडीद आणि एक कप मूगडाळही घेऊ शकता)
 • चार कप इडलीचा तांदूळ अथवा कोणतेही जाडे तांदूळ
 • एक चमचा मीठ
 • पाणी

इडली बनवण्याची कृती -

 • उडीद डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून वेगवेगळे भिजत ठेवा.
 • उडीद डाळ जास्त अस्वच्छ असल्यामुळे ती जास्तीत जास्त वेळा धुवून स्वच्छ करावी आणि मगच भिजत ठेवावी. 
 • साधारण दिवसभर अथवा सहा ते आठ तास हे साहित्य पाण्यात भिजत ठेवावे.
 • रात्री झोपण्यापूर्वी सर्व उडीद डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये वेगवेगळे वाटून घ्यावे. 
 • एका भांड्यात दोन्ही बॅटर एकत्र करून  ते रात्रभर अथवा दिवसा केल्यास दहा ते बारा तासांसाठी आंबण्यासाठी (Fermentation) ठेवून द्यावे.
 • सकाळी बॅटरमध्ये चमचाभर मीठ घालवे.
 • इडलीच्या भांडयांना तेल लावून त्यात इडलीचे बॅटर भरावे.
 • इडली पात्रात पाणी ठेवून त्यात इडलीचे साचे घालावे.
 • साधारण पंधरा ते वीस मिनिटे इडली वाफवून घ्याव्या.
 • इडली पात्र थंड झाल्यावर चमच्याने इडली काढून घ्याव्या
 • गरमागरम सांबार आणि चमचमीत ओल्या नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह कराव्या.

स्पेशल टिप - इडली करताना जर तुम्हाला इडली रवा वापरायचा असेल तर सकाळी दोन कप उडीद डाळ भिजत घालावी आणि रात्री ती वाटून त्यात चार कप इडली रवा मिक्स करून मिश्रण रात्रभर आंबण्यासाठी ठेवून द्यावे.

इडली सॉफ्ट आणि स्पॉंडी होण्यासाठी खास टिप्स -

वेगवेगळ्या इडली रेसिपी करताना या गोष्टींची काळजी घेतली तर कोणाही घरच्या घरी परफेक्ट इडली सहज बनवू शकतं.

 • इडली बॅटरसाठी पॉलिश केलेली उडीद डाळ वापरू नका कारण पॉलिश करण्यासाठी फॅक्टरीमध्ये त्यावर प्रोसेस करण्यात येते. या प्रोसेसमध्ये डाळीमधील आवश्यक बॅक्टेरिआ नष्ट होतात. डाळीतील हे बॅक्टेरिआ इडलीचे बॅटर आंबवण्याची (Fermentation) प्रक्रिया करतात. 
 • इडली चविष्ट आणि स्पॉंजी होण्यासाठी पॉलिश न केलेली उडीद डाळ वापरा. मात्र ही डाळ थोडी काळपट असल्यामुळे ती स्वच्छ करताना हातावर चांगली चोळून स्वच्छ करा. 
 • इडली परफेक्ट होण्यासाठी इडली राईस अथवा इडली रव्याचा वापर करा ज्यामुळे इडली सॉफ्ट आणि स्पॉंजी होईल.
 • इडलीच्या बॅटरमध्ये टेबल सॉल्ट ऐवजी रॉक सॉल्ट वापरा. कारण त्यामुळे इडलीच्या आंबण्याच्या प्रोसेसमध्ये अडथळा येणार नाही. तुम्ही इडलीचे बॅटर तयार करताना अथवा ते आंबल्यावर असं कधीही मीठ त्यात टाकू शकता. थंडीत फर्मेटेशनची प्रकिया उशीरा होत असल्यामुळे शेवटी मीठ घालणं फायद्याचं ठरेल. उन्हाळ्यात मात्र जास्त फर्मेंटेशन टाळण्यासाठी तुम्ही रात्री पीठ तयार केल्यावरही त्यात मीठ घालू शकता.
 • इडलीचे बॅटर तयार करताना पाण्याचे प्रमाण अचूक असावे. जास्त पाणी अथवा कमी पाणी यामुळेही तुमची इडली खराब होऊ शकते. इडलीचे बॅटर सॉफ्ट आणि वेलवट टेक्चरचे असणे म्हणजे ते परफेक्ट झाले आहे असे समजावे. यासाठीच जाणून घ्या इडली-डोशाचे बॅटर बिघडत असेल तर तुम्ही करत आहात या चुका
 • डोसा बॅटरपेक्षा इडलीच्या बॅटरला जास्त फर्मेंटेशनची गरज असते. त्यामुळे डोसा बॅटरने इडली करू नये. डोसा बॅटरने बनवा हे निरनिराळ्या प्रकारचे डोसे 
 • थंडीत अथवा थंड प्रदेशात राहणाऱ्या लोकांनी इडली बॅटर व्यवस्थित होण्यासाठी ते हिटरजवळ ठेवावे. इडलीचे बॅटर आंबल्यावर त्यामधून एक प्रकारचा उग्र वास येऊ लागतो. शिवाय बॅटर त्याच्या मूळ पातळीपेक्षा फुगून वर येते. जर थंडीत ते योग्य पद्धतीने आंबले नाही तर त्यात थोडा सोडा अथवा यीस्ट टाकावे.
 • इडली पात्रात बॅटर घालण्यापूर्वी इडलीच्या साच्यांना तेल लावावे ज्यामुळे स्टीम झाल्यावर इडली पटकन निघते आणि चिकटून राहत नाही.
 • इडली फक्त पंधरा ते वीस मिनिटेच स्टीम करावी, जास्त उकडल्यास इडली कोरडी आणि कडक होऊ शकते.  

इडली सॉफ्ट आणि स्पॉंजी करण्यासाठी आम्ही दिलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम