स्वयंपाक उत्तम आणि झटपट करायचा असेल तर त्यासाठी स्वयंपाक घर सुसज्ज असायला हवं. स्वयंपाक घरातील अतिशय महत्त्वाची वस्तू म्हणजे मिक्सर अखवा फूड प्रोसेसर. कारण स्वयंपाक करता करता जर अचानक तुमचा मिक्सर खराब झाला तर खूपच पंचाईत होऊ शकते. ओल्या खोबऱ्याचं वाटण, चटणी, प्यूरी, ठेचा, पेस्ट करण्यासाठी सतत तुम्हाला मिक्सरची गरज लागते. शिवाय मिक्सर वापरण्यामुळे तुमचा स्वयंपाकाचा खूप वेळही वाचतो. यासाठीच तो सुस्थितीत असणं गरजेचं आहे. मिक्सर व्यवस्थित टिकावा यासाठी तो वापरताना काही गोष्टींची काळजी घ्या. या छोट्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही तुमचा मिक्सर जास्त दिवस टिकवू शकता.
मिक्सर वापरताना काय काळजी घ्याल –
मिक्सरवर तो वापरण्यासाठी एक बटण असतं. ज्यावरून तुम्ही त्याचा स्पीड कमी जास्त करू शकता. लक्षात ठेवा मिक्सर सुरू करताना अथवा बंद करताना तो फुल स्पीडवर कधीच ठेवू नका. ज्यामुळे मशीनवर लोड येतो आणि मिक्सर लवकर खराब होतो. यासाठी सुरूवात करताना ती नेहमी स्लो मग मिडिअम आणि मग फास्ट स्पीडवर ठेवा. मिक्सर बंद करण्यापूर्वीदेखील तो कमी स्पीडवर न्या आणि मगच बंद करा. मिक्सर असा क्रमाक्रमाने सुरू आणि बंद केल्यामुळे मिक्सरचं मशीन जास्त दिवस टिकू शकतं.
मिक्सरच्या भांड्यामध्ये किती साहित्य असावे –
मिक्सर वापरण्यापूर्वी मिक्सरच्या भांड्यात तुम्ही किती साहित्य भरले आहे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण मिक्सरचं भांडे पूर्ण भरलेले असेल तर मशीनवर अचानक खूप लोड येतो आणि मिक्सर बंद पडतो. असं सतत होत असेल तर मिक्सरचे मशीन लवकर बंद होते. यासाठीच मिक्सरचे भांडे काठोकाठ न भरता अर्धवट भरा. एकदा वाटण वाटून झाले की मग अर्धे साहित्य भांड्यात टाका आणि ते पुन्हा वाटून घ्या. शिवाय मिक्सरच्या भांड्यात अती गरम साहित्य घालून वाटू नका. कारण असं केल्यामुळे भांडे गरम होते आणि त्याचा परिणाम मशीनवर होऊन मशीनचे तापमान वाढते. सतत गरम साहित्य वाटल्यास मिक्सर उष्णतेमुळे बंद पडू शकतो.
मिक्सरची साफसफाई –
स्वयंपाक घरातील सर्व वस्तूंची वेळच्या वेळी साफसफाई होणं खूप गरजेचं आहे. कारण त्याचा परिणाम नकळत तुमच्या आरोग्यावर होत असतो. पण एवढंच नाही जर तुम्हाला तुमचा मिक्सर जास्त टिकवायचा असेल तरदेखील तुम्ही मिक्सर नीट स्वच्छ करायला हवा. कारण एखादी पेस्ट अथवा ओलसर गोष्ट मिक्सरवर पडल्यामुळे मिक्सर खराब होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वापर झाल्यावर लगेच मिक्सर कोरड्या कापडाने पुसून ठेवा. शिवाय मिक्सरची भांडीदेखील वेळीच स्वच्छ करा.
मिक्सरची निगा राखण्यासाठी आणखी काही गोष्टी –
मिक्सर वापरण्याची वेळ तुमचा मिक्सर किती वॅटचा आहे यावर अवलंबून आहे. त्यामुळे घरगुती वापरातील मिक्सर नेहमी दहा ते पंधरा मिनिटेच सुरू ठेवावे. जर तुम्हाला जास्त वेळ मिक्सर वापरायचा असेल तर दर दहा मिनिटांनी थोड्या वेळाचे अंतर मध्ये ठेवून तो वापरावा. ज्यामुळे मशीनवर लोड येणार नाही आणि मिक्सर नीट सुरू राहील. त्याचप्रमाणे मिक्सरचा वापर झाल्यावर मुख्य प्लग बंद करा कारण असं न केल्यास त्यातून वीजेचा प्रवाह मिक्सरमध्ये सुरू राहील. असं झाल्यास मिक्सरवर लोड येऊन तो खराब होऊ शकतो.
आम्ही तुमच्या सोबत शेअर केलेल्या या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.
फोटोसौजन्य –
अधिक वाचा –
किचनमधली लाकडी भांडी अशी करा स्वच्छ, वापरा या सोप्या टिप्स
गॅस बर्नर स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा या स्टेप बाय स्टेप टिप्स
स्वयंपाकानंतर किचन स्वच्छ करायला नाही लागणार वेळ, फॉलो करा या टिप्स