भारतात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. अशा काळात स्वतःची आणि कुटुंबाचे कोरोनापासून संरक्षण करणं अतिशय गरजेचं आहे. कोरोना संक्रमणापासून दूर राहायचं असेल तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ जपणं गरजेचं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून जसं तुम्ही स्वतःचं आणि कुटुंबाचं रक्षण केलं तसंच या काळातही तुम्ही करू शकता. त्यामुळे घाबरून न जाता काही खास गोष्टींचे पालन केल्यास तुम्ही कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचाही हिंमतीने सामना करू शकता.
दिनक्रम नियोजित करा –
कोरोनाच्या काळात सुरक्षित राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे सर्वांनी आपापल्या घरात राहणे. घराबाहेर न पडता कोरोना संक्रमणाची साखळी सहज तोडता येऊ शकते. यासाठीच प्रत्येकाने घरातच सुरक्षित राहणे गरजेचं आहे. ज्या लोकांना अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडावं लागणार आहे त्यांनी योग्य ती काळजी घेत स्वतःचे संरक्षण करावे. मात्र या व्यक्तिरिक्त वर्क फ्रॉम होम करणारे, लहान मुले आणि वृद्ध मंडळींनी विनाकारण घराबाहेर पडू नये. ज्यामुळे कोरोनाचा प्रसार नक्कीच थांबवता येईल.
शारीरिक आरोग्य महत्त्वाचे –
कोरोनाच्या काळात तुम्ही जरी बराच वेळ घरात राहणार असाल तरी घरातल्या घरात व्यायाम आणि घरातील कामे करून तुम्ही योग्य ती शारीरिक हालचाल करू शकता. यासाठी घरात करता येतील असे व्यायाम, प्राणायम, योगासने, सुर्य नमस्कार, घरातल्या घरात चालणे असे व्यायाम करा. घरातील कामे स्वतः केल्यामुळेही तुमच्या शरीराला योग्य तो व्यायाम मिळेल. शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळण्यासाठी योग्य शारीरिक हालचाल करणं गरजेचं आहे. निरोगी जीवनशैलीसाठी नियमित करा ‘ही’ योगासने
pexels
पौष्टिक आहार –
कोरोनाच्या काळात शरीर सुदृढ आणि सशक्त ठेवायचं असेल तर प्रतिकार शक्ती मजबूत असायला हवी. यासाठी तुम्ही या काळात योग्य आणि पोषक आहार घेणं गरजेचं आहे. आहारात ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या, कंदमुळे, प्रोटीन्स आणि व्हिटॅमिनयुक्त पदार्थ वाढवून तुम्ही तुमची प्रतिकार शक्ती वाढवू शकता. यासाठीच तुमच्या आहाराकडे योग्य लक्ष द्या आणि शरीर प्रकृती सुधारा.
मानसिक आणि भावनिक आरोग्य –
कोरोनाच्या काळात बाहेरून होणाऱ्या संक्रमणाप्रमाणेच घातक आहे नकारात्मक विचारांमुळे आलेले नैराश्य. सध्या सोशल मीडिया आणि टिव्हीवर सतत मिळणारे कोरोनाचे अपडेट पाहून अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. प्रत्येक शारीरिक समस्येचं मूळ हे मानसिक अवस्थेत दडलेलं असतं. यासाठी या काळात मानसिक स्वास्थ सांभाळणं खूप गरजेचं आहे. या काळात चांगली पुस्तके वाचणे, मेडिटेशन करणे, चांगली व्याख्याने ऐकणे तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरेल. सध्या जीवनविद्या मिशन या शैक्षणिक, सामाजिक, सेवाभावी संस्थेमध्ये असे अनेक उपक्रम घेण्यात येत आहेत ज्यामुळे तुमचे मानसिक स्वास्थ जपता येईल. थोर समाज सुधारक तत्वज्ञ सदगुरू श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनची व्याख्याने आणि मनाला शांती देणाऱ्या विचारांचा तुम्ही यासाठी लाभ घेऊ शकता.
छंद जोपासा –
घरात राहून मनाला निवांत ठेवण्याचा आणखी एक चांगला मार्ग म्हणजे छंद जोपासणे. वास्तविक आतापर्यंत कामात व्यस्त असल्यामुळे तुमचे अनेक छंद काळाच्या ओघात मागे पडले असतील. या रिकाम्या काळात तुम्ही ते पुन्हा जोपासू शकता. बाहेरील नकारात्मक वातावरणाचा विचार करत बसण्यापेक्षा तुमच्या आवडीच्या गोष्टींमध्ये मन रमवा. ज्यामुळे तुमच्या मनातील भीती कमी होईल. शिवाय तुम्ही भविष्याची चिंता आणि भूतकाळातील वाईट गोष्टींचा विचार न करता काही काळ वर्तमान काळात स्थिर व्हाल. घरी राहून कंटाळा आला असेल तर हे ऑनलाईन कोर्स करा ट्राय
pexels
शांत झोप घ्या –
निरोगी राहण्यासाठी निवांत झोप घेणं अतिशय गरजेचं आहे. मात्र सध्या घरात राहिल्यामुळे रात्रभर टिव्ही, मोबाईलमध्ये व्यस्त राहण्याचा कल दिसून येत आहे. असं केल्यामुळे तुमची झोप पूर्ण होत नाही आणि याचा विपरित परिणाम तुमच्या शरीरावर होतो. अपुऱ्या झोपेमुळे तुमची प्रकृती बिघडते आणि कोरोनाची भीती अधिकच वाढू शकते. यासाठी या काळात रात्री कमीत कमी आठ तासांची झोप घ्या. रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठून तुमचा दिवस प्रसन्न करा. यासाठी झोपताना वाचा हे मानसिक समाधान देणारे हे आध्यात्मिक सुविचार (Spiritual Quotes In Marathi)
फोटोसौजन्य – pexels