2019 हे नववर्ष मीन राशीच्या लोकांसाठी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखं असणार आहे. म्हणजे वर्षाची सुरुवात उत्तम असेल. मध्य काळजीत टाकणारा आणि भरपूर उलथापालथ घडवणारा तर शेवट गोड असं असणार आहे. अर्थातच हे सर्व चढ-उतार वर्षभर आपल्या राशीच्या ग्रहमानानुसार होणार आहेत. चला तर मग मीन राशीच्या लोकांसाठी 2019 हे नववर्ष कसं असेल या विषयी सविस्तर जाणून घेऊया.
ग्रहमान जाणून घेण्याच्या आधी आपण मीन राशीचे गुण आणि स्वभाव वैशिष्ट्यांविषयी जाणून घेऊया
कृतीपेक्षा त्यामागील भावनेला जास्त महत्त्व देणा-या लोकांची राशी म्हणजे मीन राशी होय. आपल्या या स्वभाव वैशिष्ट्यामुळे हे लोक समोरच्या वक्तीला उत्तमरित्या समजून घेऊ शकतात. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये कमालीचा प्रामाणिकपणाही दिसून येतो. एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड केलेले दोन मासे हे राशीचे प्रतीक असून राशी स्वामी गुरु महाराज आहेत. मीन राशीचे लोक फारच भावनाप्रधान असतात. त्यामुळे त्यांच्या स्वभावात गुंतागुंत अधिक प्रमाणात दिसून येते. भावनाप्रधान असल्यामुळे हे लोक तडजोडीही खूप करतात. त्याग करणं, दया दाखविणं, परोपकार करणं, मदत करणं हे या लोकांचं नेहमीचच काम असतं. मनाची भाषा हे लोक चटकन समजतात. त्यामुळे या राशीला पूर्णत्वाची राशी असेही म्हणतात. एखाद्याची मदत करायचं ठरविल्यास त्याचं काम पूर्ण होईपर्यंत ते त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. सत्संग, विवेकबुद्धी, शालीनता व नीतिमत्ता या गुणांना मीन राशीचे लोक आयुष्यात प्राधान्य देत असतात.
नववर्षाची सुरूवात उत्तम होणार
मीन राशीसाठी 2019 या नववर्षाची सुरुवात एका उत्तम ग्रहस्थितीच्या बैठकीतून होत आहे. त्यात सर्वात महत्त्वाचा योग म्हणजे भाग्येश – लग्नेश यांचे परिवर्तन आणि नवपंचम योग होय. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास तुम्ही जे काम हातात घ्याल त्या प्रत्येक कामात भाग्य तुमची साथ देणार आहे. म्हणजेच 2019 या नववर्षाची सुरुवात ही उत्तम होणार आहे.
दि. 6 फेब्रुवारी ते 21 मार्च 2019 या कालखंडात धनेष धन स्थानात आर्थिक समृद्धी आणणार आहे. व्यवसायात प्रगती आणि नोकरी पदोन्नती प्राप्त करण्याचा हा योग आहे. त्याचा योग्य लाभ आपण करुन घ्यायचा आहे.
2019 वार्षिक भविष्य कुंभ (Aquarius) राशी : जे पेरलंय त्याचं फळ मिळणार या वर्षात
असं असलं तरी दि. 5 मार्च 2019 ला राहू चतुर्थ स्थानात येणार आहे. परिणामी आईच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. घरात मतभेदही वाढीस लागू शकतात. म्हणजेच कौटुंबिक समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागणार आहे.सोबतच कार्यस्थळीही समस्या उभ्या राहण्याचा हा योग आहे. कार्यस्थळी तुमच्या विरुद्ध राजकारण किंवा षडयंत्र केलं जाऊन बदनामी करण्याचा प्रयत्न घडू शकतो किंवा तुमचे आत्मिक खच्चीकरणही केले जाऊ शकते. तेव्हा विशेष काळजी घ्या. बेसावध राहू नका. ताकही फुंकून पिण्याचे हे दिवस आहेत. असं असलं तरी जे जातक राजकारणात सक्रिय असतील किंवा ज्यांची सक्रिय राजकारण सहभाग घेण्याची इच्छा असेल त्यांना मोठ्या प्रमाणावर यश मिळू शकते. शेअर मार्केटमध्येही मोठ्या प्रमाणावर तुम्ही यश मिळवू शकता. त्यामुळे या क्षेत्रात कार्यरत असणा-या जातकांनी या ग्रहयोगाचा योग्य तो लाभ घ्यायचा आहे.
2019 वार्षिक भविष्य धनु राशी – यावर्षी ग्रह तुमची परीक्षा घेणार आहेत
दि. 22 जून ते 7 ऑगस्ट 2019 या कालखंडात तुमचा भाग्येश पंचमात निचीचा होईल. परिणामी भाग्यात कमतरता, कामात प्रचंड अडथळे, निर्णय घेण्यात असमर्थता यासारखे प्रश्न उभे राहू शकतात. या कालखंडात कोणतंही काम करत असतांना आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीतून लाभ मिळेलच ही अपेक्षा निरर्थक आहे. त्यामुळे कधी कधी फळाची अपेक्षा न ठेवताही काम करायला आपण शिकलं पाहिजे. थोडक्यात आपलं ग्रहमान लक्षात घेता फळ नाही मिळालं तरी चालेल मात्र नुकसान होऊ नये म्हणून काळजी घेणं आवश्यक आहे. भरीसभर म्हणजे कर्मस्थानात निर्माण होणारा शनि – केतू जडत्व दोष आपली अनेक बाबतीत दिशाभूल करणारा आहे. म्हणून लाभाची अपेक्षा न ठेवता कार्यरत राहा. मात्र अत्यंत सावधपणे. जेणेकरुन आपलं काही नुकसान होणार नाही.
२०१९ हे नववर्ष सगळ्यांसाठी प्रगतीचं
2019 या वर्षाच्या सुरुवातीचा शुभ कालखंड सोडला तर मधल्या किंवा बाकी सर्व वर्षभर तुम्ही अनेक समस्यांना सामोरं जाणार आहात. नियती किंवा तुमच्या राशीला असलेले ग्रह हे तुमची परीक्षा या कालखंडात घेणार आहेत. तुमचं धैर्य आणि समंजसपणाची या कालखंडात कसोटी लागणार आहे. एवढं सगळं सहन केल्यानंतर तुमच्या राशीला सुखद अशी ग्रहस्थिती निर्माण होईल, ती दि. 5 नोव्हेंबर 2019 ला! या ग्रहस्थितीने तुमचा वर्षाचा शेवट गोड होणार आहे. कारण दि. 5 नोव्हेंबर 2019 ला तुमचा राशीस्वामी स्वराशीत तुमच्या कर्मस्थानात प्रवेश करत असून त्याद्वारे हंसयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे वर्षाचा शेवट तर गोड होईल, मात्र तेथून पुढचा कालखंड आपल्यासाठी प्रगतीची दारं उघडणारा आहे.
त्यामुळे वर्षभर ग्रहांच्या कसोटीवर खरं उतरा, सावध राहून कार्य करत राहा. जे मिळतंय ते पदरात पाडून घ्या. जे नाही मिळत त्याकडे लक्ष देऊ नका. वर्षाच्या शेवटी सगळं चांगलंच होणार आहे. हे सर्व करण्यासाठी तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा!
शुभं भवतू|
लेखिका *ज्योतिष भास्कर सौ. ज्योती जोशी* यांच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊ शकता.