वयाच्या 6व्या महिन्यानंतर, स्तनपानाबरोबर किंवा दुधाबरोबरच बाळाला बाहेरच्या दुधाची तसेच घन अन्नाची ओळख करून दिली जाते. ज्यामध्ये नवीन पदार्थ आणि चवी समाविष्ट असतात. अर्थात प्रौढांप्रमाणे, बाळ सर्व काही खाऊ शकत नाही त्यामुळे बाळाच्या सर्वांगीण वाढीसाठी बाळाला संतुलित तसेच पौष्टिक आहार देणे महत्वाचे आहे. बाळ जसजसे मोठे होऊ लागते, तसे बाळाच्या विकासाचे विविध टप्पे पार पडतात आणि बाळाच्या आहारातही विविध बदल होतात. बाळ 9 महिन्याचे झाल्यावर बाळाच्या आहारात आणखी बरेच नवीन चवीचे पदार्थ समाविष्ट केले जातात. 9 महिन्याच्या बाळाचा आहार ठरवताना आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, बाळाला आता अधिक पोषणाची कॅलरीजची गरज पडणार आहे. कारण या काळात बाळ फारच ऍक्टिव्ह झालेले असते. ते रांगू लागलेले असते, बसू लागते, कदाचित काही बाळे आधार घेऊन उभीही राहू लागतात. या बाळांना आता एका जागी बसून राहणे आवडत नाही. त्यामुळे त्यांना काहीही खाऊ घालणे कठीण होऊ लागलेले असते. म्हणूनच या काळात त्यांच्या आहाराकडे अधिक जातीने लक्ष देण्याची आवश्यकता असते.
9 महिन्यांच्या बाळाला लहान आकारात कापलेल्या ब्लू बेरी, क्रॅनबेरी, खजूर, अंजीर खायला द्या. तुम्ही ब्रोकोली, बटाटे, वांगी, फ्लॉवर इत्यादी मॅश करून बाळाला खायला देऊ शकता. घरात मांसाहार होत असेल तर या काळात तुम्ही बाळाची मांसाहाराशीही ओळख करून देऊ शकता. तुम्ही तुमच्या बाळाला थोड्या प्रमाणात अंडी, चिकन आणि मासे देखील खायला देऊ शकता. पण हे जास्त प्रमाणात देऊ नका कारण तुमच्या बाळाची पचनसंस्था अजून पूर्ण विकसित झालेली नाही. त्यामुळे त्याला भरपूर पाणी द्या. तुम्ही तुमच्या बाळाला घरी तयार केलेले नैसर्गिक फळांचे रसही देऊ शकता. फक्त ते रस आंबट नसावेत आणि त्यात जास्त प्रमाणात साखर घातलेली नसावी. तुम्ही बाळासाठी, क्विनोआ, नाचणी, तांदूळ, डाळी आणि ओट्स यापासून घरीच बेबी फूड किंवा प्युरी बनवू शकता आणि ती बाळाला खाऊ घालू शकता. बघूया 9 महिन्याच्या बाळाचा आहार कसा असावा.
9 महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता । 9 Month Old Baby Diet Chart In Marathi
बहुतेक 9 महिन्यांची बाळे इतकी मोठी होतात की ते प्युरी खाणे थांबवून मॅश केलेले अन्न खाऊ शकतात. बाळाला दात येतात तेव्हा त्यांना सतत काही चावावेसे वाटते. अशा वेळी त्यांना गाजर ,सफरचंद अशा कडक भाज्या किंवा फळांचे तुकडे चावण्यास देता येऊ शकतात. नऊ महिन्यांचे बाळ अनेक प्रकारचे अन्न सहजतेने खाऊ व पचवू शकते. लक्षात घ्या की तुमचे बाळ आता दिवसातून तीन वेळचे जेवण घेण्यास सक्षम झाले आहे. तुमचे बाळ 9 महिन्यांचे झाले असेल तर तुम्ही त्याला अनेक प्रकारचे अन्न देऊ शकता. असे अनेक पदार्थ आहेत जे तुम्ही घरी सर्वांसाठी बनवत असाल तर ज्यामध्ये मीठ आणि मसाले कमी असतील असे पदार्थ मॅश करून तुम्ही तुमच्या बाळाला ते देऊ शकता. बेबी फूड चार्टच्या मदतीने तुम्ही तुमच्या बाळाच्या जेवणाचा प्लॅन बनवू शकता. नऊ महिन्यांचे बाळ अनेक प्रकारचे अन्न सहजतेने घेऊ शकते. तरीही आईच्या दुधात आणि फॉर्म्युला मिल्कमध्ये आवश्यक फॅट आणि पोषक घटक असतात जे पहिल्या वर्षाच्या बाळाच्या विकासासाठी खूप महत्वाचे असतात. म्हणूनच घन आहाराबरोबरच बाळाला पहिल्या वर्षी तरी आईचे दूध व फॉर्म्युला मिल्क नक्कीच पाजायला हवे.
दिवस | सकाळी उठल्यावर | सकाळचा नाश्ता | मिड मॉर्निंग नाश्ता | दुपारचे जेवण | संध्याकाळचा नाश्ता | रात्रीचे जेवण |
सोमवार | आईचे दूध / फॉर्म्युला मिल्क | स्टीम डोसा | भाज्यांचे सूप/ स्तनपान किंवा फॉर्म्युला मिल्क | वरण भात तूप (त्यात बिनतिखट भाजी मॅश करून) | सिझनल फळाचे (सफरचंदाचे) मोठे तुकडे | वरण भात / पातळ खिचडी/ घरी बनवलेली खिमटी |
मंगळवार | आईचे दूध / फॉर्म्युला मिल्क | रव्याचा किंवा कणकेचा चांगल्या तुपातील शिरा किंवा खीर | उकडलेलं अंडं / स्तनपान किंवा फॉर्म्युला मिल्क | वरण भात तूप व त्यात मॅश केलेली घरची बिनतिखट भाजी | द्राक्षे | पालक खिमटी/ पातळ खिचडी |
बुधवार | आईचे दूध / फॉर्म्युला मिल्क | मऊ इडली | मॅश केलेले पेअर /स्तनपान फॉर्म्युला मिल्क | तूप लावून मऊ पोळीचे तुकडे व बिनतिखट मॅश केलेली भाजी | पपई | कणिक व बदामाचा मऊ शिरा / खिमटी |
गुरुवार | आईचे दूध / फॉर्म्युला मिल्क | ओट्सचे पॅनकेक | ब्रेडस्टिक्स / स्तनपान किंवा फॉर्म्युला मिल्क | वरण भात तूप | चिकूची प्युरी | नाचणीची पेज किंवा नाचणी सत्व |
शुक्रवार | आईचे दूध / फॉर्म्युला मिल्क | तांदळाची पेज | भाज्यांचे सूप / स्तनपान किंवा फॉर्म्युला मिल्क | तूप लावलेली पोळी व भाजी | गाजराचे लांब तुकडे | ओट्सची खीर किंवा पातळ खिचडी |
शनिवार | आईचे दूध / फॉर्म्युला मिल्क | गव्हाची खीर | ग्रीक योगर्ट किंवा दहीसाखर | भाज्या घातलेली खिचडी | केळे | वरण भात तूप |
रविवार | आईचे दूध / फॉर्म्युला मिल्क | मॅश बनाना पॅनकेक | चेरी/ ब्ल्यूबेरी | टोमॅटो पुलाव / व्हेज पुलाव | उकडलेलं रताळं | खिमटी |
अधिक वाचा – 5 महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता
9 महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम पदार्थ । Best Food For 9 Month Old Baby In Marathi
तुमचे बाळ नवीन चवी खाऊन बघण्यास उत्सुक असू शकेल किंवा नवीन प्रकारचे खाद्यपदार्थ खाण्यास ते चिडचिड देखील करू शकेल. पण तरीही बाळासाठी सर्वोत्तम आणि चवदार अन्न निवडा. 9 महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम पदार्थ पुढील प्रमाणे आहेत.
फळांचे सेवन 9 महिन्याच्या बाळाचा उत्तम आहार आहे
ब्लूबेरी, आवळा, कलिंगड, खजूर, अंजीर, चेरी, लिंबूवर्गीय फळे देखील 9 महिन्यांच्या बाळाला दिली जाऊ शकतात. तुमच्या बाळाला देण्यापूर्वी फळ पूर्णपणे पिकलेले, स्वच्छ धुतलेले व पूर्णपणे मॅश केले असेल याची नेहमी काळजी घ्या.
भाज्या आहेत 9 महिन्याच्या बाळासाठी उपयुक्त आहार
ब्रोकोली, शतावरी, बटाटे, वांगी, फ्लॉवर, मॅश केलेले बटाटे, कांदे, बीट, सर्व भाज्या ज्या शिजवल्या आणि मॅश केल्या जाऊ शकतात, त्या तुमच्या बाळासाठी अत्यंत पौष्टिक आणि उत्तम आहेत.
मांस आणि अंडी आहेत 9 महिन्याच्या बाळासाठी पौष्टिक आहार
अंडी, चिकन आणि मासे जे पूर्णपणे स्वच्छ केलेले आणि शिजवलेले आहेत ते तुमच्या बाळाला दिले जाऊ शकतात. तुमच्या बाळाला कोणत्याही प्रकारचे कच्चे मांस किंवा कमी शिजलेली अंडी देऊ नका.
पाणी आणि फळांचे रस आहेत 9 महिन्याच्या बाळासाठी आहार
तुमच्या बाळाची पचनसंस्था अजून पूर्ण विकसित झालेली नाही. म्हणून बाळाला योग्य प्रमाणात पाणी पिण्याची खात्री करा. प्रक्रिया केलेल्या रसांऐवजी घरी साखर न घालता नैसर्गिक रस बनवण्याचा प्रयत्न करा.
चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थ 9 महिन्याच्या बाळासाठी आहार
क्रीम चीज, पनीर, दही, तूप, लोणी हे पौष्टीक पदार्थ तुम्ही तुमच्या बाळाला माफक प्रमाणात देऊ शकता.
धान्ये सेवन 9 महिन्याच्या बाळासाठी सर्वोत्तम आहार
शिजवलेला क्विनोआ, बाजरी, गव्हाचा मऊ केलेला पास्ता, तांदूळ, टोस्टचे छोटे तुकडे, पोळी किंवा पराठा, गहू किंवा नाचणीची पातळ कुरकुरीत बिस्किटे आणि ओट्स हे तुमच्या बाळाला देण्यासाठी स्वादिष्ट व पौष्टिक पर्याय आहेत.
डाळी व कडधान्ये चे सेवन 9 महिन्याच्या बाळासाठी पौष्टिक आहार आहे
शिजवलेले आणि मॅश केलेले मूग, मटकी, मसूर, कडधान्यांचे सूप हे बाळासाठी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक अन्न आहे.
मसाले आहे 9 महिन्याच्या बाळासाठी आहार
तुमच्या बाळाचे चवीचे ज्ञान जसजसे विकसित होईल तसतसे हिंग, लवंग, धणे, मोहरी, बडीशेप, मेथी, जायफळ, कढीपत्ता, दालचिनी, वेलची, तमालपत्र, हळद, लसूण यांचा वापर त्याच्यासाठी जेवण बनवताना करा. हे मसाले देखील पचनासाठी आवश्यक असतात व त्यांत आवश्यक पौष्टीक घटक देखील असतात.
अधिक वाचा – 6 महिन्याच्या बाळाचा आहार
9 महिन्यांच्या बाळाने किती खायला हवे। How Much A Baby Should Eat At This Age Marathi
जरी तुमचे बाळ तुम्ही जे काही खाता ते सर्व खाण्यास सक्षम नसले तरी नवीन अन्न आणि चवी चाखण्यास सुरुवात केल्याने त्याचे टेस्ट बड्स उत्तेजित होतील. आपल्या बाळाला काय द्यायचे आणि किती द्यायचे याबाबत आईबाबांच्या मनात संभ्रम असतो. परंतु हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की याबाबतीत असा कुठलाही निश्चित नियम नाही. फक्त तुम्ही बाळाला देताय ते अन्न शक्य तितके पौष्टिक आणि नैसर्गिक असेल ही काळजी घ्या. अर्थात एव्हाना आईवडिलांना बाळाची काळजी कशी घ्यायची हे चांगले कळलेले असते.
नवीन अन्न व नवीन चवी देण्यास सुरुवात केल्यावर काहीवेळा बाळे खाण्यास नकार देतात किंवा अगदी थोडे थोडे खातात आणि त्यांना चव आवडली नाही तर अन्न तोंडातून बाहेर देखील काढून टाकतात. लक्षात घ्या की, लहान मुलांचे पोट एखाद्या व्यक्तीच्या मुठीएवढे असते आणि ते भरण्यासाठी जास्त अन्नाची आवश्यकता नसते. तसेच, त्यांचे टेस्ट बड्स अजून पूर्ण विकसित झाले नसल्याने, आपण त्यांना दिलेले सर्व प्रकारचे अन्न त्यांना आवडेलच असे नाही. काही मुलांना भाज्या आवडतात तर काहींना फळे. काही मुलांना प्युरी आवडते तर काहींना लहान लहान तुकडे चावायला आवडते. तुमच्या बाळाच्या नेमक्या आवडी-निवडी समजून घेण्यासाठी या टप्प्यावर प्रयोग करत राहणे महत्त्वाचे आहे.तसेच हे विसरू नका की तुमच्या बाळाला फॉर्म्युला दूध किंवा आईच्या दूधही मिळणे आवश्यक आहे. तुमचे बाळ दूध पिण्याव्यतिरिक्त दिवसातून तीन वेळा जेवेल ही काळजी घ्या. तसेच बाळाचे पोट साफ होण्यासाठी त्याला संतुलित आहार द्या.
9 व्या महिन्यात बाळासाठी मुख्य पोषक तत्वे कोणती आहेत । What Are The Most Important Nutrients In A Baby’s Diet?
तुमच्या वाढत्या बाळाची सर्वांगीण वाढ होण्यासाठी आवश्यक असलेली पोषक तत्त्वे येथे दिलेली आहेत. खालील पदार्थ देताना एकावेळी एकच द्याआणि जेव्हा बाळ पहिल्यांदा नट्स, दुग्धजन्य पदार्थ आणि गहू यांसारख्या सामान्य ऍलर्जीक पदार्थाचे सेवन करतात तेव्हा ऍलर्जीच्या लक्षणांकडे लक्ष द्या.
प्रथिने- आईच्या दुधातून आणि/किंवा फॉर्म्युलामधून बाळाला अजूनही त्यालाआवश्यक असलेली बहुतांश प्रथिने मिळतात. पण बाळाला माफक प्रमाणात अंडी, मांस, चिकन, मासे आणि टोफू यासह इतर प्रथिने-पॅकयुक्त पदार्थ देण्यास सुरुवात करा.
कॅल्शियम- आईचे दूध आणि फॉर्म्युला मिल्क या दोन्हींतून तुमच्या बाळाला आवश्यक असलेले सर्व कॅल्शियम मिळेल. बाळासाठी अनुकूल, कॅल्शियमयुक्त पदार्थ जसे की चीज आणि दही, रिकोटा चीज आणि पनीर हे स्वादिष्ट, पौष्टिक पदार्थ तुम्ही देऊ शकतात. यातून बाळाला प्रोटिन्स देखील मिळतील.
धान्य आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स- धान्ये व बटाटा, रताळी, मटार यातून बाळाच्या रोजच्या आहारात आवश्यक असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे तसेच काही प्रथिने समाविष्ट होतील.
जीवनसत्त्वे A, B, C आणि E – ही चार जीवनसत्त्वे तुमच्या बाळाच्या निरोगी मेंदू आणि मज्जातंतूंच्या विकासास प्रोत्साहन देतात, तसेच डोळे, त्वचा आणि रोगप्रतिकार प्रणालीचे योग्य कार्य आणि विकास करतात.
जास्त चरबीयुक्त पदार्थ.- आईच्या दुधापासून किंवा फॉर्म्युलामधून बहुतेक कॅलरीज मिळवणाऱ्या बालकांना आवश्यक असलेली सर्व चरबी आणि कोलेस्ट्रॉल मिळते. जेव्हा ते अधिक वैविध्यपूर्ण आहाराकडे वळतात आणि तेव्हा बहुतेक दुग्धजन्य पदार्थ पूर्ण फॅट किंवा संपूर्ण दुधापासून बनवलेले असावेत.
ओमेगा -3 फॅटी ऍसिडस्. – ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स हे अत्यावश्यक फॅटी ऍसिडस्च्या कुटुंबाचा एक भाग आहेत. ओमेगा-३ (DHA सह), तुमच्या बाळाच्या वाढीसाठी, दृष्टीसाठी आणि इष्टतम मेंदूच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत. एकदा बाळाच्या खाण्याचे प्रमाण वाढले की, तुम्ही ओमेगा-3 फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असलेले इतर पदार्थ जसे की मासे,, टोफू, फ्लेक्ससीड, कॅनोला तेल आणि DHA- समृद्ध दही, तृणधान्ये आणि अंडी बाळाला देऊ शकता.
9 महिन्यांच्या बाळासाठी होममेड बेबी फूड रेसिपी । Homemade Baby Food Recipes For 9 Month Old Baby
हे पदार्थ तुम्ही तुमच्या बाळाला घरी पटकन बनवून खाऊ घालू शकता. हे पदार्थ पौष्टीक तर आहेच शिवाय चवदार देखील आहेत जे खाऊन तुमचे बाळ अगदी आनंदाने पटापट सगळे जेवण संपवेल.
खिमटी
साहित्य- तांदूळ 3 वाट्या, मूग डाळ 1 वाटी, ओवा 1चमचा, मेथीदाणा 1 चमचा
कृती – तांदूळ आणि मूग डाळ वेगवेगळे धुवून घ्या आणि सूती कापडावर पंख्याखाली किंवा सूर्यप्रकाशात 2-3 तास अलगद सुकवा. धान्ये सुकल्यावर तांदूळ किंचित भाजून घ्या आणि थंड होऊ द्या, मूग डाळही वेगळी भाजून घ्या व थंड होऊ द्या. ओवा आणि मेथीचे दाणे किंचित भाजून घ्या.आता तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या मग मूग डाळ, ओवा आणि मेथीदाणा बारीक करा. हे सर्व मिक्स करून हवाबंद डब्यात ठेवा.हे खिमटीचे मिश्रण महिनाभर साठवता येते. आता जेव्हाही जेवू घालायचे असेल तेव्हा तुम्ही लगेच ते कधीही तयार करू शकता. फक्त एक चमचा खिमटीची पावडर एक कप पाण्यात घाला आणि त्यात मीठ घाला. व ते घट्ट होईपर्यंत ढवळून काही मिनिटे उकळून शिजवून घ्या. त्यामध्ये तुपाचे काही थेंब टाका आणि बाळाला खाऊ घाला. बाळाला थोडे वेगळ्या चवीचे जेवण द्यायचे असेल तर यात तुम्ही मॅश केलेल्या भाज्या, मॅश केलेली फळे, ड्राय फ्रूट्स, दूध व दही घालू शकता. तुमच्या बाळाच्या आवडीनुसार तुम्ही यात प्रयोग करू शकता.
मिक्स व्हेज खिचडी
साहित्य: ½ कप तांदूळ, ½ कप मूग डाळ, 1 कप गाजर, वाटाणे, बटाटे आणि बीन्स या मिश्र भाज्या व्यवस्थित धुऊन त्याचे लहान तुकडे करून घेणे, 1 टीस्पून तूप, एक चिमूटभर हळद, ½ टीस्पून जिरे, चिरलेली कोथिंबीर
कृती- डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. दोन्ही तीस मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. प्रेशर कुकरमध्ये तूप गरम करा. आता जिरं घालून तडतडू द्या. मग त्यात डाळ आणि तांदूळ आणि नंतर भाज्या घालून परतून घ्या. त्यानंतर त्यात चिमूटभर मीठ व पाणी घालून मिसळा व 3-4 शिट्ट्या करा. खिचडी शिजल्यावर एका चमच्याने खिचडी हलकी मॅश करा. वरून थोडे तूप घालून बाळाला खाऊ घाला.
मॅश्ड क्विनोआ आणि केळी
साहित्य– 1/2 केळे , चिमूटभर दालचिनी, 3 चमचे शिजवलेले क्विनोआ, 1 टेबलस्पून फुल फॅट दही
कृती- एका भांड्यात केळे मॅश करून घ्या. 3 चमचे क्विनोआ पाणी घालून शिजवून घ्या. मॅश केलेल्या केळ्यामध्ये क्विनोआ व दही घाला आणि ढवळून घ्या.यात चवीसाठी तुम्ही एक चिमूटभर दालचिनी पावडर घालू शकता. उन्हाळ्यात तुम्ही हा पदार्थ थोडा थंड करून बाळाला खाऊ घालू शकता. हा पौष्टिक घटकांनी समृद्ध पदार्थ तुम्ही बाळाला सकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणात देऊ शकता. कारण याने पोट व्यवस्थित भरते.
लाल भोपळ्याची प्युरी
साहित्य- 1 लहान लाल भोपळा, 1-2 कप पाणी, आईचे दूध
कृती- भोपळा कापून त्याची साले व सर्व बिया काढून घ्या. कुकरमध्ये भोपळ्याचे काप मऊ होईपर्यंत शिजवून घ्या आणि ब्लेंडर किंवा फूड प्रोसेसरमध्ये बारीक करून घ्या. बारीक करण्यासाठी थोडे पाणी किंवा व्हेजिटेबल स्टॉक घाला.लाल भोपळा हा बीटा-कॅरोटीन, पोटॅशियम आणि लोहाने समृद्ध असतो. त्यामुळे लहान बाळांच्या सर्वांगीण विकासासाठी हे सगळे पौष्टीक घटक असलेली ही सोपी रेसिपी नक्की करून बघा.
कणकेचा शिरा
साहित्य- 2 टीस्पून कणिक , ½ टीस्पून तूप, 2 कप गरम पाणी, दूध
कृती –कढईत तूप गरम करून त्यात कणिक घाला. सतत ढवळत कणिक भाजून घ्या. कणिक भाजली गेली आणि खरपूस सुगंध आला की हळूहळू त्यात गरम पाणी घाला. गुठळ्या होऊ नयेत म्हणून सतत ढवळत राहा आणि तुमचे बाळ खाऊ शकेल इतका शिरा घट्ट किंवा पातळ ठेवा व गॅस बंद करा. शिरा थोडासा थंड झाल्यावर त्यात दूध घाला. गोडपणासाठी तुम्ही त्यात केळ्याची प्युरी किंवा सफरचंद घालू शकता.
फिंगर भाज्या
साहित्य-1 गाजर, 1 भोपळा, 1 रताळे, 1 झुकिनी/काकडी
कृती – कोणत्याही भाजीचे किंवा सर्व भाज्यांचे लांब तुकडे करा जे तुमचे चावून खाऊ शकेल. हे तुकडे प्रेशर कुकरमध्ये ५-७ मिनिटे वाफवून घ्या व थंड झाल्यावर बाळाच्या हातात खाण्यासाठी द्या. 9 महिन्यांच्या बाळासाठी फिंगर फूड मिड मॉर्निंग किंवा संध्याकाळच्या स्नॅकसाठी योग्य आहे.
व्हेजिटेबल सूप
साहित्य- 1/2 गाजर चिरून, 3-4 बीन्स चिरून,10 मटारचे दाणे, 1/2 टोमॅटो चिरलेला, 1/2 बटाटा बारीक चिरून,1/2 टेबलस्पून तूप,मिरपूड चिमूटभर, चिमूटभर जिरे पावडर
कृती – कुकरमध्ये सर्व भाज्या 2 कप पाण्यात 3 शिट्ट्या करून शिजवा. त्यांना थंड होऊ द्या आणि त्यांची गुळगुळीत प्युरी करा. प्युरी पुन्हा गरम करा व त्यात आवश्यक असल्यास पाणी, मिरपूड आणि जिरे पावडर घाला. व कोमट झाले की बाळाला खाऊ घाला.हिवाळा आणि पावसाळ्यात हे गरमागरम सूप प्यायला बाळाला छान वाटेल.
9 महिन्यांच्या बाळाला हे देऊ नये । Which Food To Avoid For Baby In Marathi
तुमच्या बाळाला स्वच्छ आणि ताजे अन्न देणे महत्त्वाचे आहे. तुमचे मूल आता आनंदाने तुमच्या बरोबर जेवायला बसू शकते. परंतु काही पदार्थ आहेत बाळाला देऊ नयेत.
मध
मधात बॅक्टेरिया असतात ज्यामुळे तुमच्या बाळाला गंभीर आजार होऊ शकतात, ज्यामुळे आतड्यांचेही नुकसान होऊ शकते आणि इन्फन्ट बोटुलिझम नावाचा दुर्मिळ सिंड्रोम होऊ शकतो. हे बाळाच्या दातांसाठी देखील हानिकारक असू शकते.
माशांचे काही प्रकार
शार्क, स्वॉर्डफिश आणि मार्लिनमध्ये पारा जास्त प्रमाणात असतो ज्यामुळे बाळाच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो. तसेच अन्नातून होणारी विषबाधा टाळण्यासाठी शेलफिश देखील टाळा
संपूर्ण नट्स
बाळाच्या घशात अडकून बाळ गुदमरू नये म्हणून बाळाला ते पाच वर्षांचे होईपर्यंत पूर्ण नट्स देऊ नका.
साखर
तुमच्या मुलाच्या वाढणाऱ्या दातांसाठी साखरयुक्त अन्न वाईट आहे. यामध्ये आइस्क्रीम, बिस्किटे, मिठाई, चॉकलेट यांचा समावेश आहे.
मीठ
तुमच्या बाळाच्या जेवणात जास्त मीठ घालू नका, कारण किडनी ते हॅन्डल करू शकत नाही. स्नॅक्स आणि चिप्स सारखे खारट पदार्थ पूर्णपणे टाळा. बाळांना दिवसातून 1 ग्रॅमपेक्षा कमी मीठ द्यावे.
लिंबूवर्गीय किंवा आम्लयुक्त फळे
लिंबूवर्गीय फळांमुळे काही लहान मुलांना ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो. तरीही चवीसाठी तुम्ही प्युरीमध्ये लिंबाच्या रसाचे थेंब किंवा किंचित लिंबाची साल किसून घालू शकता.
शेंगदाणे
कधी कधी काही बाळांना शेंगदाण्याची ऍलर्जी होऊ शकते. म्हणून बाळ किमान वर्षाचे होईपर्यंत तरी त्याला शेंगदाणे देऊ नका.
फुल फॅट मिल्क
यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. कधीही आईच्या दुधाला पर्याय म्हणून बाळाला फुल फॅट मिल्क देऊ नये. ते शरीरात लोहाच्या शोषणात देखील अडथळा आणू शकते, जे बाळाच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे.
बाळाला घरी बनवलेला , चावण्यास सोपा, पचण्यास हलका असा आहार द्यायला हवा. जास्त गोड ,तिखट,आंबट,खारट चवींचे अन्नपदार्थ बाळांना देऊ नयेत. या वयात बाळांच्या चवी डेव्हलप होत असतात. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे जेव्हा बाळांना भाज्या आणि फळांची ओळख करून देता येते आणि बाळांना भाज्या व फळे खाण्याची सवय लावता येते.
FAQ – 9 महिन्याच्या बाळाचा आहार | 9 Month Old Baby Food
प्रश्न – 9 महिन्यांच्या बाळाला दररोज किती कॅलरी लागतात?
उत्तर- 9 महिन्यांच्या बाळाला दररोज 750-900 कॅलरीज आवश्यक असतात आणि सुमारे 400-500 कॅलरीज आईच्या दुधातून किंवा फॉर्म्युलामधून मिळत राहतील असा आहार असायला हवा.
प्रश्न – 9 महिन्यांच्या बाळाने दिवसातून किती वेळा खावे?
उत्तर – समान्यपणे 9 महिन्यांच्या बाळाने दिवसातून 3 वेळा जेवले पाहिजे- जसे की नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण व संध्याकाळी हलके स्नॅक्स खायला हवे. तसेच त्यांना आईचे दूध देखील पाजलेच पाहिजे.
प्रश्न – 9 महिन्यांच्या मुलाने किती घन पदार्थ खावेत?
उत्तर – 9 महिन्यांच्या बाळाने सुमारे 1/4 ते 1/2 कप धान्य, फळे आणि भाज्या दिवसातून दोनदा खाल्ल्या पाहिजेत. दिवसातून सुमारे 1/4 ते 1/2 कप दुग्धजन्य पदार्थ देखील बाळाच्या पोटात गेले तर चांगले. दिवसातून सुमारे 1/4 ते 1/2 कप प्रोटीनयुक्त पदार्थ देखील बाळाला मिळणे आवश्यक आहे.
प्रश्न – बाळाचे पोट भरले आहे हे कसे कळेल?
उत्तर – तुमच्या बाळाचे पोट भरल्याची काही सामान्य चिन्हे आहेत, बाळाने तोंड फिरवणे. जेव्हा तुम्ही बाळाला खाऊ घालण्याचा प्रयत्न करता तेव्हा बाळ ओठ घट्ट मिटून घेते अन्न बाहेर काढून टाकते.
प्रश्न – 9 महिन्यांच्या बाळाने किती दूध प्यावे?
उत्तर – बाळ जर स्तनपान करत असेल तर ते त्याचे पोट भरेपर्यंत दूध पिते. जी बाळे बाटलीतून दूध पितात ती सुमारे 150 ml आईचे दूध पितात. परंतु हे लक्षात घ्या की प्रत्येक बाळ वेगळे असते आणि जर तुमचे बाळ कधी कमी आणि कधी जास्त खात असेल तर ते सामान्य आहे.