विडा बनवताना पानाला चुना लावला जातो. त्याचप्रमाणे चुन्याचा वापर अनेक आरोग्य समस्या दूर करण्यासाठीही केला जातो. कारण चुन्यात अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत. आयुर्वैदात चुन्याचे महत्व अधिक आहे, ज्यामुळे मोठ मोठ्या आरोग्य समस्यांवर चुना एखाद्या औषधाप्रमाणे वापरला जातो. चुना खाण्यामुळे शरीराला पुरेसं कॅल्शिअम मिळतं. विशेष म्हणजे चुन्यामुळे तुमच्या त्वचेच्या समस्याही कमी होतात. मात्र चुन्याचा वापर सौंदर्यासाठी करता येऊ शकतो याबाबत आजही अनेकींना माहीत नाही.
त्वचेसाठी कसा करावा चुन्याचा वापर
चुना आरोग्य समस्यांप्रमाणेच त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठीही फायदेशीर आहे.
काळे डाग कमी होतात
चेहऱ्यावर निर्माण होणाऱ्या काळ्या डागांचा अनेकींना सामना करावा लागतो. चेहऱ्यावर काळे डाग निर्माण होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. मात्र हे काळे डाग तुम्ही चुना लावून कमी करू शकता. कारण चुन्यामध्ये त्वचेचा पोत सुधारणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग तर कमी होतातच शिवाय तुमच्या चेहऱ्याची त्वचाही उजळ होते. यासाठीच चुन्यामध्ये गुलाबाचं पाणी मिसळा आणि एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावरील काळ्या डागांवर लावा. पेस्ट चेहऱ्यावर लावण्यासाठी तुम्ही कॉटन पॅड अथवा कापसाचा बोळा वापरू शकता. मात्र लक्षात ठेवा चुना चेहऱ्यावर लावल्यावर अथवा तो काढल्यानंतर लगेचच उन्हात जाऊ नका. नाहीतर चेहऱ्यावर त्याचे भयंकर परिणाम होऊ शकतात.
त्वचेवर ग्लो येतो –
त्वचेवर काळे डाग, धुळ, माती, प्रदूषण यामुळे चेहरा काळवंडतो. मात्र चुन्याचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावर उजळपणा आणि चमक आणू शकता. चुना तुमच्या त्वचेला नैसर्गिक आणि त्वरीत चमक आणण्यासाठी उपयुक्त आहे. जर तुमचा चेहरा फारच काळवंडला असेल तर तुम्ही गुलाबपाण्यासह चुन्याचा वापर चेहऱ्यावर करू शकता.
एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी
सध्या प्रदुषणामुळे, चिंता काळजीमुळे आणि दगदगीच्या जीवनशैलीमुळे चेहऱ्यावर वयाआधीच एजिंगचे मार्क्स दिसू लागतात. मात्र चुन्याचा वापर करून तुम्ही चिरतरूण दिसू शकता. वाढणाऱ्या वयामुळे चेहऱ्यावर दिसणारे एजिंग मार्क्स यामुळे कमी होतात. सुरकुत्या, फाईन लाईन्स कमी करण्यासाठी तुम्ही फेसपॅकमध्ये चुना वापरू शकता. मात्र त्यासोबत गुलाबपाणी त्या फेसपॅकमध्ये मिसळण्यास विसरू नका. कारण चुना चेहऱ्यावर एखाद्या ब्लिचिंगप्रमाणे काम करतं. अशावेळी त्वचेला होणारा दाह कमी करण्यासाठी त्यात गुलाबपाणी असणं गरजेचं आहे.
चुन्याचे त्वचेवर होणारे दुष्परिणाम
चुना त्वचेसाठी फायदेशीर नक्की आहे. चुन्यामुळे त्वचेवरील काळसरपणा कमी होतो आणि त्वचेचा पोत सुधारतो. मात्र अती प्रमाणात त्याचा वापर त्वचेवर करू नये. त्यामुळे तो प्रमाणातच त्वचेवर वापरावा.
- चुना लावल्यावर अथवा चुना लावून झाल्यावर थेट सुर्यप्रकाशात जाऊ नये. कारण चुन्याचा स्पर्श झाल्यावर तुमची त्वचा काही काळासाठी अती संवेदनशील होते. अशा काळात त्यावर प्रखप सुर्यकिरणे पडल्यास तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं.
- त्याचप्रमाणे चेहऱ्यावर पहिल्यांदा चुना लावताना त्याची पॅच टेस्ट घ्यावी. कारण जर तुमची त्वचा अती संवेदनशील असेल तर त्यावर चुना लावण्याचे घातक परिणाम होऊ शकतात. पॅच टेस्टमध्ये जर तुम्हाला जळजळ, दाह, खाज, त्वचा लाल होणे अशा समस्या जाणवल्या तर तुम्हाला चुन्याची अॅलर्जी आहे हे ओळखा आणि हा उपाय करू नका.
- ज्या लोकांना कोणत्याही गोष्टींची सतत अॅलर्जी होत असेल अशा लोकांनी त्वचेवर चुन्याचा वापर करू नये. कारण त्यामुळे तुमच्या त्वचेला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
त्वचेसाठी घरीच बनवा लेमन टोनर, जाणून घ्या याचे फायदे
नाक अथवा कान टोचण्यापूर्वी या गोष्टींची घ्या काळजी
चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीम (Best Cream For Pigmentation In Marathi)