उन्हाळ्यात आंबा, फळस याप्रमाणेच ताडगोळे( Ice Apple) ही भरपूर मिळतात. ताडगोळे सीझनल फ्रूट म्हणजेच हंगामी फळ असल्यामुळे ते फक्त याच काळात मिळतात. उन्हाच्या काहिलीपासून दूर राहण्यासाठी थंडगार ताडगोळे खायला कोणाला आवडणार नाही. मात्र ताडगोळे शरीराला थंडावा तर देतातच शिवाय ते आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतात. नारळाप्रमाणे थंडगार आणि एखाद्या ट्रान्सफरंट जेलीप्रमाणे असलेलं हे फळ अतिशय गुणकारी आणि आरोग्यदायी आहे. ताडगोळे समुद्र किनारी जास्त प्रमाणात मिळतात.
ताडगोळ्यामधील पोषक तत्त्व (Nutrition in Ice Apple)
ताडगोळ्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, लोह, झिंक, पोटॅशिअम, फॉस्फरस, कॅल्शिअम असे अनेक गुधर्म असतात. ज्याचा तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होतो. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यापासून रोग प्रतिकार शक्ती वाढेपर्यंत अनेक फायदे यामुळे तुम्हाला मिळतात. विशेष म्हणजे मधुमेही अथवा ह्रदय विकार असलेली माणसंही ताडगोळे खाऊ शकतात.
ताडगोळ्याचे फायदे (Benefits of Tadgola)
ताडगोळ्यामध्ये अनेक पोषक तत्व आहेत. यासाठीच जाणून घ्या ताडगोळ्याचे फायदे (Benefits of Tadgola)
शरीर हायड्रेट राहते
उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातील पाणी निघून जातं ज्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो. यासाठीच उन्हाळ्यात भरपूर पाणी, रस अथवा पाणीदार फळं खायला हवीत. ताडगोळे हे नैसर्गिक पाणी असलेलं एक फळ आहे. त्याच्या जेली सारख्या मऊ गरात भरपूर पाणी असते. सहाजिकच ताडगोळे खाण्यामुळे तुमच्या शरीराला भरपूर पाणी मिळते. पाण्याची पातळी नियंत्रित राहिल्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान बिघडत नाही आणि तुम्ही हायड्रेट राहता. शरीर थंड राहण्यासाठी तु्म्ही या ताडगोळ्याचे पाणी अथवा ताडगोळ्याचे सरबत नियमित पिऊ शकता.
रोगप्रतिकार शक्ती वाढते
ताडगोळे खाण्यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते. कारण ताडगोळ्यांमध्ये प्रतिकार शक्ती वाढवणारे अनेक गुणधर्म असतात. सध्या कोरोना व्हायरसच्या काळात शरीराला प्रतिकार शक्ती मजबूत करण्याची जास्त गरज आहे. त्यामुळे या काळात नियमित ताडगोळे खा आणि संक्रमणापासून स्वतःचा बचाव करा.
अॅसिडिटीपासून सुटका
ताडगोळ्यामध्ये व्हिटॅमिन बी १२ भरपूर प्रमाणात असते. याचा तुमच्या शरीराला खूप चांगला फायदा होतो. शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहिल्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. ज्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते. पोटात गॅस होणे, अपचन, पोटदुखी, जळजळ, बद्धकोष्ठता, मुळव्याध असे त्रास यामुळे कमी होतात.
त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो
उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे तुमची त्वचा सतत चिकट होते. ज्याचा परिणाम त्वचेवर पुरळ येणे, खाज येणे, त्वचा लालसर होणे, पिंपल्स येणे, त्वचा काळवंडणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. मात्र ताडगोळे खाण्यामुळे त्वचेला पुरेसे पोषण मिळते. पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राहिल्यामुळे घामावाटे त्वचेतील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. ज्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होतो आणि तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने ग्लो करू लागते. सन टॅनपासून वाचण्यासाठी तुम्ही नियमित ताडगोळे खायला हवेत.
टवटवीत वाटू लागते
उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी कमी होते ज्यामुळे सतत थकल्यासारखे वाटते. मात्र जर या काळात तु्म्ही ताजे ताडगोळे खाल्ले. तर तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित होते आणि तुमचा थकवा कमी होतो. ताडगोळ्यांमध्ये असलेले पोषक घटक तुमच्या शरीराला योग्य उर्जेचा पूरवठा करतात. ज्यामुळे तुम्हाला लगेच टवटवीत वाटू लागते.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
उन्हाळ्यात ही 5 फळं ठेवतील तुम्हाला ‘हायड्रेट’
उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी चेहऱ्यावर लावा ‘पालक फेसमास्क’