फळांचा राजा आंबा सध्या सर्वांच्या घरात विराजमान झालाय. आंब्याचा सीझन सुरू असल्यामुळे प्रत्येकाने या महिन्यात आंब्याच्या कितीतरी पेट्या फस्त केल्या असतील. पिवळा धम्मक मनमोहक सुगंध असलेला आंबा सर्वांनाच आवडतोच. त्यामुळे लहान मुलांपासून ते अगदी घरातील वृद्धांपर्यंत सर्वांना तो हवा हवासा वाटत असतो. घरी आंबा खाऊन झाल्यावर बऱ्याचदा त्याची बी म्हणजेच बाट आणि साल फेकून देण्यात येते. झिरो वेस्टेज करणारी माणसं या गोष्टी खतांसाठी अथवा पुन्हा झाडं लावण्यासाठी वापरतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का ? आंब्याची साल तुमच्या त्वचेसाठी वरदान ठरू शकते. यासाठीच जाणून घ्या आंब्याच्या सालचे काही फायदे आणि त्याचा त्वचेसाठी कसा करावा वापर
अॅंटि ऑक्सिडंट आहे
आंब्याप्रमाणेच आंब्याच्या सालातही भरपूर प्रमाणात अॅंटि ऑक्सिडंट असतात. अॅंटि ऑक्सिडंटमुळे तुमच्या त्वचेचं हवेतील फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होतं. सहाजिकच आंब्याच्या सालीचा तुमच्या त्वचेवर चांगला परिणाम होतो. यासाठी आंब्याची साल वाटून त्याची पेस्ट तुम्ही त्वचेवर लावू शकता.
सुरकुत्या कमी होतात
आंब्याच्या सालीत त्वचेला मुळापासून स्वच्छ करणारे गुणधर्म असतात. शिवाय वयोमानानुसार येणाऱ्या त्वचेवरील सुरकुत्याही यामुळे कमी होऊ शकतात. त्वचेवर सुरकुत्या येणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे. त्यामुळे तुम्ही ही शारीरिक क्रिया रोखू नाही शकला तरी तिचा प्रभाव नक्कीच कमी करू शकता. फ्री रेडिकल्स, प्रदूषण आणि ताणतणावामुळे येणाऱ्या सुरकुत्या, त्वचेवरील काळे डाग, व्रण आंब्याची साल लावल्यास कमी होतात. यासाठी आंब्याची साल उन्हात सुकवा आणि त्याची पावडर त्वचेवर पाण्यात भिजवून लावा. पंधरा मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.
पिंपल्स कमी होतात
आंब्याचा सालीचा वापर त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही करू शकता. त्वचेवर आंब्याच्या सालीचा फेसफॅक लावल्यामुळे त्वचेवर आलेले पिंपल्स कमी होतात. चेहऱ्याव पिंपल्स पुन्हा येऊ नयेत यासाठी आणि पिंपल्समुळे आलेले डाग कमी करण्यासाठी तुम्ही आंब्याची साल चेहऱ्यावर लावू शकता. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही उन्हाळ्यात आंब्याची साल सुकवून त्याची पावडर करून ठेवू शकता.
त्वचेचं टॅनिंग कमी होते
उन्हाळ्यात जसे आंबे भरपूर प्रमाणात मिळतात तसंच उन्हात फिरल्यामुळे त्वचेवर टॅनिंगही वाढू लागतं. यासाठीच त्वचेवर आंबा खाल्यावर उरलेली आंब्याची साल चोळा आणि काही मिनीटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवा. त्यामुळे त्वचेवरील टॅनिंग हळू हळू कमी होईल. आंब्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणातत व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतातच शिवाय त्वचेचं रक्षणही होतं.
आंब्याच्या सालचे इतर काही फायदे –
आंब्याची साल तांब्या पितळीची भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरली जाते. त्याचप्रमाणे मातीसाठी उत्तम खत म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता. त्वचेवर चोळून लावूनही उरलेल्या आंब्याच्या साल तुम्ही खतासाठी वापरू शकता. कारण आंब्यात कॉपर, व्हिटॅमिन्स, फायबर्स असतात ज्यामुळे झाडांसाठी जैविक खत निर्माण होते. यासाठीच आंब्याच्या सालीचे तुकडे करा आणि मातीत मिसळून झाडांच्या मुळाशी ती माती घाला.
आम्ही शेअर केलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला जरूर कळवा.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
सौंदर्य वाढवण्यासाठी आवश्यक आहेत हे व्हिटॅमिन्स
फेस शीट मास्क वापरण्यासाठी स्टेप बाय स्टेप टिप्स
उन्हाळ्यात त्वचेवर सतत टाल्कम पावडर लावण्यामुळे होऊ शकतं नुकसान