गर्भनिरोधक गोळ्यांबाबत तसं तर वयात आलेल्या प्रत्येक मुलीला माहीत असतं. माहीत नसेल तरी प्रत्येक मुलीने आणि महिलेने याबाबत माहिती करून घ्यायला हवी. आजकाल मुली वयाच्या आधीच मॅच्युअर होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गर्भधारणा टाळण्यासाठी मुली गर्भनिरोधक गोळ्यांचा सर्रास वापर करतात. पण त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. कारण गर्भनिरोधक गोळी कोणाच्याही नकळत घेणं तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. त्याचे बरेच दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होत असतात. पण या गोळ्यांच्या दुष्परिणामांबद्दल बऱ्याच मुलींना माहिती नसते. त्यामुळे बऱ्याच तरूणी आपल्या लैंगिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपल्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. अर्धवट माहिती मिळवून या गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करण्यात येतो. पण हे टाळणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी नक्की काय करायला हवं? त्याचे दुष्परिणाम काय आहेत? मुळात गर्भनिरोधक गोळ्या म्हणजे काय आणि त्या कशासाठी घेतल्या जातात या सर्वांची योग्य आणि फायदेशीर माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
गर्भनिरोधक गोळ्या कशा घ्याव्या
गर्भनिरोधक गोळ्यांचा दुष्परिणाम नक्की कसा होतो
गर्भनिरोधक गोळ्या म्हणजे काय? (What Is Contraceptive Pills)
गर्भनिरोधक गोळ्या म्हणजे नक्की काय आणि त्याचा काय परिणाम होतो याबाबत ‘POPxo मराठी’ने मदरहूड हॉस्पिटल, खराडी येथील डॉ. मोहीत गोयल यांच्याकडून काही गोष्टी समजून घेतल्या. गर्भनिरोधक गोळ्यांना मॉर्निंग पिल्स असेही म्हणतात. या गोळ्यांमध्ये लेव्होनोरजेस्ट्रेल हे प्रोजेस्टरॉन असते. ही गोळी औषधाच्या दुकानात मिळते आणि या पाकिटात दोन गोळ्या असतात. संततीनियमनाच्या साधनाचा उपयोग न झाल्यास किंवा असुरक्षित लैंगिक संबंध राखल्यास गर्भधारणा टाळण्यासाठी ही गोळी लवकरात लवकर किंवा ७२ तासांच्या आत घेण्यात यावी असं सांगितलं जातं. ही गोळी गर्भधारणा केली असल्यास घ्यावी आणि महिन्यातून एकदाच घेतली जावी अशी प्रक्रिया आहे. पण आजकाल मुली या गोळ्या महिन्यातून अनेकदा घेतात आणि कधीकधी कोणत्याही प्रकारची लैंगिक कृती केल्यावर घेतात. या गोळीचे परिणाम अथवा दुष्परिणाम नक्की काय होतात याची त्यांना काहीच कल्पना नसते. गर्भनिरोधक गोळ्या ही आजच्या काळाची गरज आहे यात काहीच शंका नाही पण त्यांचा वापर करण्याआधी महिलांचे योग्य प्रकारे समुपदेशन होणे आवश्यक आहे.
गर्भनिरोधक गोळ्या महिन्यातून एकाहून अधिक वेळा घेतल्या तर गर्भधारणा रोखण्यात त्यांना अपयश येऊ शकते. या गोळ्यांमुळे अनियमित रक्तस्त्राव,अनियमित पाळी, मळमळ, उलट्या, स्तनांना सूज येणे, शरीर सुजणे, वजन वाढणे, स्वभावात तीव्र चढउतार होणे इत्यादी परिणाम होतात. त्याचप्रमाणे या गोळ्यांमुळे लैंगिक संक्रमित आजारांपासून संरक्षण होत नाही.
या गोळ्या औषधाच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होत असल्याने पौगंडावस्थेतील मुलींमध्ये लैंगिक संबंध राखण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लैंगिक संक्रमित आजारांचे आणि एचआयव्हीचे प्रमाण वाढले आहे. म्हणून या गोळ्या घेण्यापूर्वी त्यांचा वापर आणि दुष्परिणाम यांची माहिती घ्यावी असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
गर्भनिरोधक गोळ्या कशा घ्याव्या? (How To Take Contraceptive Pills)
महिला ज्या गर्भनिरोधक गोळ्या घेतात त्यामध्ये प्रोजस्ट्रॉन आणि इस्ट्रोजेन हे हार्मोन्स असतात. या गोळ्या बाळ होण्याच्या प्रक्रियेत अर्थात स्त्री बीज निर्मिती प्रक्रियेला विरोध करतात. गर्भविरोधक गोळ्यांच्या पाकिटामध्ये 21 अथवा 28 गोळ्या असतात. जाणून घेऊया त्या कशा प्रकारे घ्यायच्या –
हे पाकिट जर 21 गोळ्यांचं असेल तर गोळी पाळीच्या पाचव्या दिवशीपासून घ्यायला सुरू करावी. रोज एक अशी ही गोळी पूर्ण 21 दिवस घ्यावी. गोळ्या तुम्ही ज्या दिवशी बंद कराल त्याच्या दुसऱ्या दिवशी पाळी सुरू होते. जर 28 गोळ्यांचं पाकिट असेल तर या गोळ्या पाळीच्या पहिल्या दिवशीपासून एक अशा तऱ्हेने घ्याव्यात. पण यातील एकही गोळी घेण्याचं चुकवू नये. तसं केल्यास, गर्भधारणा होण्याची शक्यता असते. सुरुवातीला गोळ्या घेतल्यानंतर त्रास होतो. पण साधारण एक दोन महिने गोळ्या घेतल्यानंतर हा त्रास कमी होतो. पण त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरचेजं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांना अथवा मुलींना कावीळ, मायग्रेन, स्तनांचे आजार, हृदरोग, मधुमेह, यकृताचे आजार आहेत, त्यांनी अजिबात या गोळ्या घेऊ नयेत. तसंच तुम्ही जर बाळाला अंगावरील दूध पाजत असाल तरीही या गोळ्यांच सेवन करू नये.
काही महिने गोळ्या घेतल्यानंतर मध्ये किमान एक ते दोन महिने इतर गर्भनिरोधक पद्धतीचा वापर करावा. पुन्हा दोन महिन्यांनी गोळ्या घेऊ शकता. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही सेक्स केला तर तीन दिवसात दोन – दोन गर्भनिरोधक गोळ्या या बारा तासांच्या अंतराने घ्याव्या लागतात. पण हे प्रयोग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
गर्भनिरोधक गोळीचे फायदे (Benefits Of Contraceptive Pills)
तुम्हाला काही कालावधीसाठी बाळ नको असल्यास, अर्थात गर्भधारणा नको असल्यास, गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करणं प्रभावी असल्याचं म्हटलं जातं. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, गर्भनिरोधक गोळ्यांमुळे केवळ गर्भधारणाच थांबते असं नाही तर तुमच्या मासिक पाळीचं अनियमित चक्रही व्यवस्थित होतं. पीसीओएस (PCOS) ने पीडित महिलांमध्ये हार्मोन्सशी निगडीत बऱ्याच समस्या असतात. मासिक पाळीच्या अनियमिततेची त्यांना सतत समस्या असते. त्यामुळे अशा महिलांना गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो.
या गोळ्यांचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे दोन मुलांमध्ये अंतर राखण्यासाठी या गोळ्यांचा चांगला उपयोग होतो. तसंच तुम्ही या गोळ्या घेत असाल तर तुमचं सेक्सलाईफ चांगलं राहातं. तुमच्या डोक्यात गर्भधारणा राहील का हा प्रश्न सेक्स करताना त्रासदायक ठरत नाही. बाकी गर्भनिरोधक उपायांपेक्षा गर्भनिरोधक गोळी घेण्याचा उपाय हा जास्त फायदेशीर असल्याचं संशोधनातूनही सिद्ध झालं आहे. फक्त याचा उपयोग व्यवस्थित आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे करायला हवा. तसंच या गोळ्या घेताना त्यामध्ये कोणत्याही तऱ्हेची अनियमितता ठेऊ नये याची काळजी घ्यायला हवी.
गर्भनिरोधक गोळ्यांचा दुष्परिणाम नक्की कसा होतो? (Side Effects Of Contraceptive Pills)
प्रत्येक स्त्री ची हार्मोन्सची पातळी ही वेगळी असते. त्यामुळे तुमच्या प्रत्येकीच्या शरीराप्रमाणे गर्भनिरोधक गोळ्यांचा परिणाम हा बदलत जातो. याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्यामध्ये नैसर्गिकरित्या इस्ट्रोजनची पातळी अधिक असेल तर गर्भनिरोधक गोळ्यांचा तुमच्या शरीरावर होणारा परिणाम हा इतर कोणत्याही महिलेपेक्षा वेगळा असेल. गर्भनिरोधक गोळ्यांचा परिणाम हा सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या कंबरेजवळ दिसायला लागतो. गर्भनिरोधक गोळ्यांची निवड करताना ती अर्थातच काळजीपूर्वक करायला हवी. केवळ जाहिरात माहीत आहे म्हणून एखादी गर्भनिरोधक गोळी घेणं हे चुकीचं आहे. गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये कंबरेजवळ बदल होतात म्हणजे तुमचं वजन वाढायला लागतं. या गोळ्या घेण्यामुळे नक्की काय परिणाम होतात ते आता जाणून घेऊया.
खरं तर गर्भनिरोधक गोळ्या सतत घेणं चांगलं नाही. यामुळे महिलांना अनेक दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे गोळ्या घेण्याआधी नेहमीच डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा असतो हे प्रत्येक मुलीने अथवा महिलेने लक्षात ठेवायला हवं. पाहुया गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचे नक्की दुष्परिणाम काय आहेत –
1. डोकेदुखी, मळमळ, मायग्रेन (Headache, Nausea, Migrane)
तुम्ही डॉक्टरांचा सल्ला न घेता जर आपल्या मनाने कधीही गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यात तर, या गोळीच्या सेवनाने तुमचं अर्ध डोकं सतत दुखत राहातं. तसंच तुम्हाला दिवसभर मळमळ होत राहाते. पण वेगवेगळ्या गर्भनिरोधक गोळ्यांचे वेगवेगळे परिणाम होत असतात.
2. अनियमित रक्तस्राव (Irregular Periods)
या गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन जर सतत तीन महिने केलं तर मासिकपाळी एकदा येऊन गेल्यानंतर दुसऱ्यांदा येण्याच्या आधीच योनीमार्गातून अनियमित रक्तस्राव होण्याची शक्यता असते. शरीरामध्ये या गोळ्यांमुळे संप्रेरक बदल होत असतो. त्याचमुळे हा परिणाम दिसून येतो.
3. स्तनांना सूज येणं (Breast Inflamation)
या गोळ्यांमुळे तुमच्या स्तनांना सूज येते आणि तुमचे स्तन अधिक नाजूक होतात. जर तुम्हाला तुमचे स्तन जाड लागत असतील अथवा गाठ आल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही ही बाब तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे जाऊन दाखवायला हवी.
4. वजन वाढणं (Weight Gain)
या गोळयांमुळे वजन वाढतं. गोळ्या खाल्ल्यास, फॅट असलेल्या पेशींचं प्रमाण जरी वाढत नसलं तरीही त्याचा आकार मात्र वाढतो. तसंच या गोळ्या खाल्ल्यामुळे काही स्त्रियांच्या छातीमध्ये अथवा स्तनांच्या भागामध्ये पाणी झाल्याचंदेखील आढळून आलं आहे. त्यामुळे या गोळ्या खायच्या आधी तुमच्या शरीरासाठी त्या योग्य आहेत की नाही हे माहीत करून घेणं आवश्यक आहे.
5. मासिक पाळी चुकणं (Menstrual Cycles)
गर्भनिरोधक घेतल्यामुळे दोन मासिक पाळीमधील अंतर वाढतं शिवाय बऱ्याचदा मासिक पाळी चुकण्याचीदेखील शक्यता असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव कमी प्रमाणात होतो आणि त्यामुळे पोटदुखी जास्त वाढते.
6. स्वभावात बदल – चिडचिड होणं (Feeling Irritated)
या गोळ्या घेतल्यामुळे महिलांमध्ये मूड स्विंग होण्याचं प्रमाण वाढतं. अर्थात स्वभावामध्ये बदल येतो. काही महिलांना औदासिन्य येतं तर काही महिला या भावनिकरित्या खूपच हळव्या होतात. तसंच या गोळ्यांच्या सेवनाने महिलांमध्ये अधिक प्रमणात नैराश्य येण्याची शक्यताही असते.
7. नरजेवर दुष्परिणाम (Other Side Effects)
या गोळ्या नेहमी घेत राहिल्यास, तुमच्या बुबुळाला सूज येऊन त्याचा दुष्परिणाम तुमच्या नजरेवर होतो. त्यामुळे या गोळ्या सतत खाणं टाळण्याची गरज आहे.
8. योनीस्राव (Vaginal Discharge)
काही महिलांना या गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्यामुळे पांढऱ्या रंगाचा योनीस्राव होण्याची शक्यता निर्माण होते. बऱ्याचदा असा स्राव होणं हे इन्फेक्शनचं लक्षण असतं.
9. सेक्सलाईफवर होतो परिणाम (Impact On Sex Life)
या गोळ्यांचा सेक्सलाईफवरदेखील दुष्परिणाम होतो. सेक्स करण्याची इच्छाच या गोळ्यांनी नाहीशी होते. त्यामुळे या गोळ्या घेत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
10. पिंपल्स आणि केसगळती (Pimples And Hair Follicles)
या गोळ्यांमुळे त्वचेसंदर्भात तक्रारी वाढू लागतात. तुमच्या चेहऱ्यावर गोळ्यांच्या उष्णतेने पिंपल्स येतात आणि त्यामुळे या समस्येमध्ये अधिक वाढ होते. तसंच या गोळ्यांमुळे महिलांमध्ये केसगळतीचे प्रमाणही वाढते.
गर्भनिरोधक गोळ्यांसंदर्भातील प्रश्न – उत्तर (FAQs)
1. वैद्यकीय सल्ल्याशिवाय गर्भनिरोधक गोळ्या घेता येतात का?
तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार नसेल तर वैद्यकीय सल्ल्याशिवाय तुम्हाला गर्भनिरोधक गोळ्या घेता येतात. हे जरी खरं असलं तरीही तुम्ही गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवाच. ज्या महिलांना यकृतासंबंधी अथवा हृदयासंबंधी काही आजार असतील त्यांनी कधीही सल्ल्याशिवाय गर्भनिरोधक गोळ्या घेऊ नयेत. कारण तसं केल्यास, तुमच्या प्रकृतीवर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
2. गर्भनिरोधक गोळ्यांनी वजन वाढतं किंवा कमी होतं का?
महिला ज्या गर्भनिरोधक गोळ्या घेतात त्यामध्ये प्रोजस्ट्रॉन आणि इस्ट्रोजेन हे हार्मोन्स असतात. त्याचे दुष्परिणाम महिलांच्या प्रकृतीवर दिसून येतात. इस्ट्रोजनच्या अधिक मात्रेमुळे वजन वाढतं. पण आता नव्या गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये हार्मोन्सची मात्रा कमी करण्यात आल्यामुळे वजन वाढण्याची शक्यता नसते. पण गर्भनिरोधक गोळ्यांनी वजन कमी झाल्याचं कुठेही ऐकिवात नाही.
3. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे बाळाला जन्म देण्यावर परिणाम होतो का?
गर्भनिरोधक गोळ्या थांबवल्यानंतर जेव्हा तुम्ही बाळाला जन्म द्यायचा विचार करता तेव्हा तुमच्याकडे संयम असायला हवा. प्रत्येक महिलेची शारीरिक स्थिती वेगळी असते. या गोळ्या थांबवल्यानंतर किमान दोन ते तीन महिने स्वतःला आणि शरीराला देण्याची गरज असते. लगेच तुम्ही गरोदर राहाल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. तर काही महिलांसाठी हा काळ सहा महिनेदेखील असू शकतो. अन्यथा बाकी काही दुष्परिणाम होत नाहीत.
4. दीर्घकाळ गर्भनिरोधक घेत राहिल्यास, काय परिणाम होतात?
दीर्घकाळ कोणतीही गोष्ट करत राहिल्यास त्याचे दुष्परिणाम होतच असतात. गर्भनिरोधक जास्त वेळ घेत राहिल्यास, उलट्या होणं, कायम डोकेदुखी, मूड स्विंग्ज, मळमळ हे तात्पुरते परिणाम असतातच. याचे दुष्परिणाम कमी होण्यासाठी किमान तीन महिन्यांचा तरी कालावधी लागतो. पूर्वीच्या गोळ्यांमध्ये हार्मोन्सचं प्रमाण अधिक होतं. पण आता ते प्रमाण कमी झाल्यामुळे कमी दुष्परिणाम दिसून येतात. पण असं काहीही होत असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेण्यास विसरू नका.
5. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे मासिक पाळी थांबते का?
गर्भनिरोधक गोळ्या घेत असताना तुमच्या मासिक पाळीच्या चक्रामध्ये साहजिकच बदल होते. बरेचदा मासिक पाळी लांबते अर्थात केवळ मासिक पाळीच्या चक्रामध्ये बदल होतो. पण जर अगदीच तुमची मासिक पाळी अनियमित झाली तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. अन्यथा पूर्ण मासिक पाळी थांबते हे चुकीचं आहे.
फोटो सौजन्य – Shutterstocks
हेदेखील वाचा
‘अशी’ लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही गरोदर आहात हे समजा
गरोदरपणानंतर काय घ्यावी काळजी, जाणून घ्या