होणारा होतला जाणारा जातला मागे तू फिरू नको,
उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको
येईल दिवस तुझाही माणसा जिगर सोडू नको
तुझ्या हाती आहे डाव सारा इसर गजाल कालची रे
देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे…
असे प्रेरणादायी शब्द आणि अतिशय श्रवणीय संगीत असलेल्या ‘देवाक काळजी रे’ या “रेडू” चित्रपटातील गाण्यानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या गाण्याला यु-ट्यूबवर 100 मिलियन व्ह्यूज (10 कोटी) मिळाले असून, मराठी चित्रपट संगीतातील हा दुर्मिळ मान आहे. नवल फिल्म्सचे नवलकिशोर सारडा यांना ब्लिंक मोशन पिक्चर्सच्या सहयोगानं “रेडू” या चित्रपटाची निर्मिती केली. लँडमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल यांनी हा चित्रपट प्रस्तूत केला. सागर वंजारी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. प्रतिष्ठेच्या अरविंदन पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये झळकलेला हा चित्रपट 18 मे 2018 रोजी प्रदर्शित झाला. तेव्हापासूनच देवाक काळजी रे या गाण्यानं मराठीच नाही, तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गीतकार गुरू ठाकूर यांनी हे गाणं लिहिलं आहे, विजय नारायण गवंडे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे आणि अजय गोगावले यांनी हे गाणं गायलं आहे. गाण्याला मिळालेल्या 100 मिलियन व्ह्यूज बद्दल दिग्दर्शक सागर वंजारी म्हणाले की, ‘जेमतेम दोन वर्षांत गाण्यानं 100 मिलियन व्ह्यूजचा टप्पा गाठणं अतिशय आनंददायी आहे. या गाण्याच्या व्हिडीओखाली आलेल्या कमेंट्समध्ये काहींनी नैराश्य दूर झाल्याचं, काहींनी आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त झाल्याचं लिहिलं आहे. मला वाटतं, हा या गाण्यासाठीचा सर्वांत मोठा पुरस्कार आहे. एखाद्या कलाकृतीतून आयुष्यावर सकारात्मक परिणाम होतो, जगण्याला प्रेरणा मिळते हे या गाण्यानं सिद्ध केलं. विशेष म्हणजे मराठीच नाही, तर परराज्यांत, जगभरात हे गाणं पोहोचणं हे गाण्याचं यश आहे.
(वाचा : आरजे सुमित आणि अभिनेत्री मयुरी घाडगे थिरकणार ‘सांज’ गाण्यात)
मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा आनंदाचा, अभिमानाचा क्षण- अजय
“देवाक काळजी रे” या गाण्याला 100 मिलियन व्ह्यूज मिळणं अतिशय आनंददायी आहे. कोणत्याही गाण्याचा गायक हा चेहरा असतो. पण गीतकार, संगीतकार हे त्या गाण्याचं मन, शरीर, भाषा असं सारं काही असतात. कारण शब्द आणि संगीताचा विचार त्यांचा असतो. व्यावसायिक भाग म्हणून श्रेयगायकाला मिळत असलं, तरी या गाण्याच्या यशाचं खरं श्रेय गुरू ठाकूर आणि विजय गवंडे यांचं आहे. मी केवळ त्यातला एक भाग आहे. मला हे गाणं मनापासून आवडलं असल्यानं मीही त्यात जीव ओतला होता. आमच्या झिंगाट या गाण्याला 300 मिलियनच्या आसपास व्ह्यूज आहेत. पण झिंगाट हे एक उडत्या चालीचं, धमाल गाणं होतं, तर देवाक काळजी रे हे गाणं भावनिक, हळवं आहे. त्यामुळे या गाण्याला 100 मिलियन व्ह्यूज मिळणं हा मराठी चित्रपट संगीतातला निश्चितपणे महत्त्वाचा टप्पा आणि मोठा मान आहे. माझ्याबरोबर अतुलनं हे गाणं ऐकलं, तेव्हाच त्यानं हे गाणं हिट होईल, असं म्हटलं होतं. त्याचे शब्द सत्यात उतरले आहेत. संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठीच हा आनंदाचा, अभिमानाचा क्षण आहे. आपण या गाण्याचं यश साजरं केलं पाहिजे. या गाण्याला मिळालेल्या प्रतिसादातून मराठी प्रेक्षकांची संवेदनशीलता दिसते, असं गायक अजय गोगावले यांनी सांगितलं.
(वाचा : संगीतमय प्रेमकथा असलेल्या ‘तत्ताड’चा ट्रेलर लाँच)
संगीतकार विजय गवंडे म्हणाले की, आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीसाठी टर्निंग पॉईंटची प्रतीक्षा असते. माझ्या संगीतकार म्हणून आजवरच्या करिअरमध्ये देवाक काळजी हे गाणं टर्निंग पॉईंट ठरलं. हे गाणं आधी एका नव्या गायकाच्या आवाजात ते गाणं रेकॉर्ड केलं होतं. पण ते काही परिपूर्ण वाटेना, म्हणून अजय गोगावले यांना पाठवून गाण्याविषयी विचारलं. त्यांनीही होकार दिला आणि गाणं निश्चित झालं. या गाण्यावर आजवर प्रेक्षकांना अफाट प्रेम केलं. एकदा एका मुलीनं फोन करून धन्यवाद दिले. मी धन्यवाद का असं विचारल्यावर तिनं या गाण्यामुळे आत्महत्येचा विचार सोडल्याचं सांगितलं. माझ्यासाठी तो अतिशय आनंदाचा क्षण होता. हे गाणं माझ्या मालवणी भाषेतलं असल्यानं माझ्या मनाच्या अतिशय जवळचं आहे. या गाण्याला मिळालेला प्रतिसाद संगीतकार म्हणून भारावून टाकणारा आहे.
(वाचा : सुभाष घईंचा मराठी सिनेमा ‘विजेता’ या दिवशी झळकणार बॉक्सऑफिसवर)
गीतकार गुरू ठाकूर गाण्याविषयी म्हणतात की, गीतकार, संगीतकार आणि गायक स्वतःचे 100 टक्के देऊन गाणं साकारतं. पण ते गाणं प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांचं, रसिकांचं होऊन जातं. ऐकणाऱ्या प्रत्येकाला ते गाणं आपलं वाटलं, तरच ते अजरामर होते. एखाद्या उडत्या चालीच्या गाण्याला अफाट प्रतिसाद मिळाला, तर समजू शकतो. पण अतिशय भावनिक गाण्याला इतका प्रचंड प्रतिसाद का मिळाला, याचं उत्तर गाण्याच्या युट्यबवरील व्हिडीओखालील कमेंट्समधून मिळतं. नैराश्यातून बाहेर आलो, जगण्यासाठी सकारात्मक उर्जा मिळाली, अशा अनेक कमेंट्स तिथं आहेत. माझ्या शब्दांना विजय गवंडेने दिलेलं अप्रतिम संगीत, अजय गोगावलेचा दैवी आवाज आणि रेडू चित्रपटाची टीम या सर्वांचेच आभार मानावेसे वाटतात. तसंच गाणं डोक्यावर घेणाऱ्या कोट्यवधी रसिकांना सलाम आहे.
हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.