गरोदरपण हा प्रत्येक स्त्रीसाठी खास अनुभव असतो. प्रेगनन्सी टेस्ट केल्यानंतर स्त्रीला ती आई होणार ही गोड बातमी समजते. गर्भधारणा झाल्यानंतर नऊ महिन्यांनी बाळाचा जन्म होतो. मात्र या नऊ महिन्याच्या काळात गरोदर स्त्रीला काही वैद्यकीय चाचण्या नियमित करणं गरजेचं असतं. ज्यामुळे पोटातील बाळाची वाढ आणि विकास योग्य पद्धतीने होत आहे का हे समजते. गरोदरपणातील नऊ महिन्यांचे तीन तिमाहीमध्ये वर्गीकरण केले जाते. पहिली तिमाही, दुसरी तिमाही आणि तिसरी तिमाही या काळात या चाचण्या केल्या जातात. यासाठीच जाणून घ्या ही आवश्यक माहिती तसंच वाचा प्रेगन्सीमध्ये कशी घ्याल तुमची आणि तुमच्या बाळाची काळजी (Pregnancy Care Tips In Marathi)
पहिल्या तिमाहीत केल्या जाणाऱ्या टेस्ट
गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यांना पहिली तिमाही असं म्हणतात. या काळात गरोदरपणाची गोड बातमी सांगणाऱ्या प्रेगनन्सी टेस्टनंतर काही वैद्यकीय चाचण्या केल्या जातात.
अल्ट्रासाउंड टेस्ट मध्ये लहरींच्या मदतीने पोटातील बाळाची आकृती पाहता येते. ज्यामुळे गर्भधारणा कुठे आणि किती आकाराची आहे हे पहिल्या तीन महिन्यात पाहता येते. या टेस्टमधून गर्भधारणा कोणत्या आठवड्यात झाली आहे याचा अंदाज सांगता येतो. ज्यामुळे बाळ कधी जन्माला येणार याचा अंदाज बांधता येतो. या वैदकीय चाचणीमुळे गर्भाचा विकास, ह्रदयासंबधीत विकार, अनुवंशिक आजारा अथवा काही इतर आरोग्य समस्या असतील तर त्या लगेच समजतात. ज्यामुळे योग्यवेळी योग्य निर्णय घेता येतो.
ब्लड टेस्ट केल्यामुळे गर्भवती स्त्रीच्या शरीरातील काही प्रमुख घटकांचे मुल्यमापन केले जाते. यामध्ये काही प्रकार असतात. डॉक्टर गर्भवती स्त्रीच्या आरोग्य स्थितीनुसार या टेस्ट करण्याचा सल्ला देतात.
प्लाझ्मा प्रोटिन टेस्टमुळे बाळाच्या गर्भनाळेसंबधीत गोष्टीं समजतात. ही टेस्ट साधारणरण आठव्या ते चौदाव्या आठवड्यात करतात
एचसीजी टेस्टमुळे गर्भवती स्त्रीच्या शरीरातील हॉर्मोन्सची स्थिती समजते. काही आरोग्य समस्यांमध्ये हे हॉर्मोन्स असंतुलित होतात. यासाठी ही टेस्ट करणे गरजेचं असतं.
सीव्हीएस टेस्टमुळे बाळामध्ये कोणता आनुवंशिक विकार नाही ना हे तपासले जाते. त्यामुळे ही टेस्ट सर्व गरोदर महिलांना करावी लागत नाही. काही आरोग्य समस्या असतील तरच डॉक्टर या टेस्टचा सल्ला देतात.
प्रेगन्सी टेस्टबाबत या गोष्टी प्रत्येकीला माहीत असायलाच हव्या
pexels
दुसऱ्या तिमाहीत केल्या जाणाऱ्या टेस्ट
दुसरी तिमाही म्हणजे चौथा ते सहावा महिना. दुसऱ्या तिमाहीतदेखील काही प्रमुख टेस्ट केल्या जातात. ज्यामुळे बाळाचा विकास योग्य पद्धतीने होत आहे का याचा अंदाज घेता येतो.
अल्ट्रासाउंड टेस्ट दुसऱ्या तिमाहीत केल्या जाणाऱ्या अल्ट्रा साउंड टेस्टमुळे बाळाची शारीरिक रचना जसे की बाळाचे डोके आणि हातपायाची वाढ नीट होत आहे का हे समजते. बाळाचे ठोके योग्य पद्धतीने पडत आहेत का याचा अंदाज येतो. बाळाची संपूर्ण शारीरिक वाढ यातून दिसू शकते.
एएफपी टेस्ट या रक्तचाचणीमधून गर्भवती महिलेच्या शरीरातील अल्फा फेटोप्रोटिनची पातळी मोजली जाते. हा पदार्थ बाळाला संरक्षण देणाऱ्या गर्भजलात असतो. जर या घटकाची पातळी असंतुलित असणे अनेक आरोग्य समस्यांचे संकेत असू शकतात.
ग्लूकोज टेस्ट काही महिलांना गर्भधारणे दरम्यान मधुमेह होतो आणि प्रसूतीनंतर तो कमी होतो. ज्याला जेस्टेशनल मधुमेह असं म्हणतात. या मधुमेहामुळे प्रसूतीमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. यासाठीच दुसऱ्या तिमाहीत रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी वैद्यकीय टेस्ट केली जाते.
प्रेगन्सीदरम्यान Gynaecologist ची निवड करताना
pexels
तिसऱ्या तिमाहीत केल्या जाणाऱ्या टेस्ट
तिसरी तिमाही म्हणजे सातव्या महिन्यापासून प्रसूती होण्यापर्यंतचा काळ. या काळात केलेल्या टेस्टमुळे स्त्रीची प्रसूती कधी आणि कशी होणार हे समजू शकते.
अल्ट्रा साउंड टेस्ट तिसऱ्या तिमाहीमध्ये गर्भनाळेची स्थिती समजण्यासाठी आणि बाळाची वाढ आणि स्थिती समजून घेण्यासाठी ही टेस्ट केली जाते. यासाठीच या काळात सतत अल्ट्रा साउंड टेस्ट करण्याची गरज लागू शकते.
नॉनस्ट्रेस टेस्टमुळे बाळाच्या ह्रदयाचे ठोके आणि आरोग्य योग्य स्थितीत आहे का याचा अंदाज घेता येतो. जेव्हा तिसऱ्या तिमाहीत डॉक्टर्संना बाळाच्या हालचालीमध्ये असमानता आढळते तेव्हाच ही टेस्ट केली जाते.
कॉंटॅक्शन स्ट्रेस टेस्टमुळे बाळाचा जन्म होताना प्रसव वेदना कशा असतील आणि काय स्थिती असेल याचा अंदाज मिळू शकतो. प्रसवादरम्यान स्त्रीच्या शरीरात होणारे बदल आणि बाळाच्या ह्रदयाचे ठोके तपासण्यासाठी ही टेस्ट केली जाते.
साधारणपणे गर्भावस्थेत स्त्रीला या काही वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतात. ज्यामुळे तिचे आरोग्य उत्तम ठेवता येते आणि सुलभ प्रसूतीसाठी प्रयत्न केले जातात.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम