बाळ जन्माला आल्यावर त्यांच्या अंगावर बारीक केस असतात. या केसांना लव असं म्हटलं जातं. बाळाच्या अंगावरील केस लहान असले तरी तरी ते तसेच राहीले तर पुढे दाट होऊ शकतात. यासाठीच मालिश आणि काही नैसर्गिक उपाय करून लहानपणीच बाळाच्या अंगावरील लव कमी केली जाते. यासाठीच जाणून घ्या हे करायला सोपे, नैसर्गिक आणि बाळासाठी अतिशय सुरक्षित उपाय
नियमित मालिश करणे –
बाळाला मालिश करण्याची परंपरा फार जुनी आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येक महिलेला बाळाला मालिश आणि अंघोळ घालण्याचे कसब शिकावे लागत होते. मात्र आता तज्ञ्ज महिलांकडूनही तुम्ही बाळाला मालिश करून घेऊ शकता. अथवा कोरोनाच्या काळात इतरांचा संपर्क बाळासोबत टाळायचा असेल तर हलक्या हाताने स्वतःच बाळाला बेबी ऑईलने मालिश करा आणि नंतर अंघोळ घाला. बाळाला नियमित मालिश केल्यामुळे बाळाच्या अंगावरील लव हळूहळू कमी होते. त्याचप्रमाणे जाणून घ्या बाळाला मालिश करण्याचे फायदे
बेसणाचे उटणे –
लहान बाळाला अंघोळ घालण्यासाठी आजकाल बाजारात अनेक बेबी सोप विकत मिळतात. मात्र पूर्वी बाळाला साबणाऐवजी बेसणाचे उटणे लावले जात असे. बेसणाचे उटणे दररोज बाळाच्या अंगाला लावल्यामुळे बाळाच्या अंगावरील दाट लव कमी होते. शिवाय बाळाची त्वचाही कोमल आणि सुरक्षित राहते. बेसणाच्या उटण्यामुळे बाळाच्या त्वचेवर कोणतेही इनफेक्शन होत नाही. मात्र लक्षात ठेवा यासाठी बेसण स्वतः घरी तयार केलेलं आणि बारीक चाळलेलं असावं. बाळाला बेसण लावताना ते दुधात भिजवावं.
चंदनाचे उटणे –
जर तुमच्या बाळाच्या अंगावर अतिशय दाट लव असेल तर ती कमी करण्यासाठी तुम्ही बेसणाप्रमाणेच चंदनाचे उटणेही त्याच्या अंगाला लावू शकता. यासाठी चांगल्या गुणवत्तेची आणि शुद्ध चंदनाची पावडर घ्या. त्यात चिमूटभर घरी दळलेली हळद मिसळा आणि दूधात हे मिश्रण भिजवून बाळाच्या अंगाला लावा. लक्षात ठेवा उटणे बाळाच्या अंगावर जोरात रगडून लावू नका. बाळाला तेलाने मालिश केल्यावरच बाळाच्या अंगाला उटणे लावा. शिवाय हळूवार हाताने ते बाळाच्या अंगावर लव असलेल्या भागावर चोळा. आठवड्यातून दोन दिवस बेसण आणि दोन दिवस चंदन बाळाच्या अंगाला लावा आणि लगेच बाळाला अंघोळ घाला. काही आठवड्यातच बाळाच्या अंगावरील लव कमी होईल. यासोबतच बाळाला पहिल्यांदा अंघोळ घालताना या गोष्टी ठेवा लक्षात
मसूर डाळीचे उटणे –
बेसन, चंदन याप्रमाणेच मसूर डाळीच्या पीठानेही तुमच्या बाळाच्या अंगावरील लव कमी होऊ शकते. मात्र त्याआधी बाळाच्या त्वचेला मसूर डाळीच्या पीठाची अॅलर्जी नाही ना हे तपासून घ्या. त्यानंतरच हे उटणे बाळाच्या अंगाला लावा. यासाठी मसूर डाळीचे पीठ घरीच तयार करून चाळून घ्या. त्यामध्ये दूध अथवा दूधाची साय थोडीशी हळद घाला. मिक्स करून उटणे बाळाच्या लव असलेल्या भागावर हलक्या हाताने चोळा. मसूर डाळीचे पीठ खरखरीत असते त्यामुळे ते खूप हळूवारपणे बाळाच्या अंगाला लावा. तुमच्या बाळाला दात येत असतील तर त्याची अशी घ्या काळजी
सूचना – वर दिलेले उपाय हे अनेक महिलांच्या अनुभवातून दिलेले आहेत. मात्र तरिही ते परिपूर्ण नक्कीच नाहीत. शिवाय प्रत्येक बाळाची त्वचा ही निरनिराळी असते. त्यामुळे बाळाच्या त्वचेवर कोणताही उपाय करण्यापूर्वी बाळाला त्या घटकांची अॅलर्जी नाही याची खात्री करून घ्या अथवा याबाबत बाळाच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम