असं म्हटल जात की, आपण नोकरी समाधानासाठी करतो, पैशासाठी नाही. पण तसं पाहायला गेलं तर नोकरीतील समाधानापेक्षा पगारच महत्वाचा असतो नाही का? रोज उठून कामावर जाण्याची प्रेरणा असते ती महिन्याअखेरीस मिळणारा ‘पगार’! कारण पैसा असेल तरच आपण आपल्या सगळ्या गरजा भागवू शकतो. तुमच्या सगळ्या गरजा भागविण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुवतीनुसार पगार मिळणे आवश्यक असते. तुम्ही कंपनीकडे पगाराची घासाघीस तेव्हाच करु शकता जेव्हा कंपनीला फायदा मिळवून देणारे गुण तुमच्यात असतील. नाहीतर कंपनी एखाद्या कर्मचाऱ्याला कामावर ठेवताना कंपनीचा फायदा पाहत कमीत कमी पगारावर ठेवण्यासाठी धडपडत असते. काही ठिकाणी योग्य पगार मागण्यासाठी काय करावे याचे देखील प्रशिक्षण दिले जाते. स्वाभाविकपणे पगार मागण्याची कला किती आवश्यक आहे ते तुम्हाला कळले असेलच. त्यामुळे हवा तो पगार मागण्यासाठी नेमकं काय करायला हवं ते सांगण्याचा प्रयत्न आम्ही यामध्ये केला आहे.
महिलांमध्ये पगार वाढवून मागण्याचे कौशल्य का आहे आवश्यक ?
भारतात स्त्री- पुरुष हा लिंग भेद कामाच्या ठिकाणी केला जातो. महिला किंवा पुरुष एकाच ठिकाणी एकाच पदावर आणि सारख्या तासांसाठी जरी काम करत असले तरी पुरुषांना स्त्रियांपेक्षा काकणभर जास्तच पगार दिला जातो. भारतामध्ये लिंगभेदाचे प्रमाण २० टक्के आहे. त्यामुळे साहजिकच पुरुषांना स्त्रियांपेक्षा २० टक्के जास्त पगार मिळतो. त्यामुळे महिलांनी या कारणाचा विचार करत पगार वाढवून मागायलाच हवा हे आम्ही नाही तर जगभरात वेगवेगळ्या पदांवर काम करणाऱ्या स्त्रियांचे म्हणणे आहे.
मिशेल ओबामा देखील महिलांनी आपली कुवत ओळखावी आणि आपल्या हककासाठी लढावे,असे म्हटले आहे. तर लेखिका शेरल सॅण्डबर्ग यांनी त्यांच्या ‘महिला, काम आणि सर्वाेत्तम स्थानी पोहोचण्याची क्षमता’ या पुस्तकात लिहिले आहे की, ज्या महिला अधिक पगाराची मागणी करतात त्यांना अनेकदा रोषाला सामोरे जावे लागते. तिच्यासोबत काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांना ही वाढ पटत नाही. पण पुरुषाचा पगार वाढला तर मात्र असे कधीच होत नाही. पगार वाढीची मागणी करण्यासाठी महिलांमध्ये नसते ती मागण्याची वृत्ती. महिला त्यांच्या वरिष्ठांकडून नेहमीच कमीची अपेक्षा ठेवतात. त्यामुळे पगारात वाढ हवी असली तरी त्या संदर्भात त्या वरिष्ठांशी त्या सहजासहजी बोलत नाहीत. त्यांच्या डोक्यात कायम पगार वाढीसंदर्भात वरिष्ठांशी बोलायचे असे ठरलेले असते पण मनात एक भिती असते की, मी पगार वाढवून मागितला तर ते माझ्याबद्दल काय विचार करतील?, पुरुषांच्या बाबतीत असे कधीच होत नाही. मनातून हे सगळे विचार काढून तुम्ही पगार वाढीसंदर्भात बोलणे आवश्यक असते या संदर्भातीलच अधिक मदत करण्यासाठी आम्ही इथे आहोत.
पगाराची चर्चा म्हणजे नेमकं काय?
आपण अगदी साध्या गोष्टीपासून सुरु करुयात. पगारासाठी केलेली चर्चा म्हणजेच Salary negotiations यात कंपनीच्या संबंधित व्यक्तिशी तुमचं पगारासंदर्भात बोलणं होते. यात अनेकदा तुम्हाला तुमच्या पगाराच्या अपेक्षा विचारल्या जातात. जरी तुम्हाला कोणताही अनुभव नसला तरी तुम्हाला चांगला पगार मागण्याचा अधिकार आहे. जर तुम्ही उत्साही असाल तर तुमच्या कंपनीची कामे अगदी यशस्वीपणे सांभाळू शकता. पगारासंदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी डोक्यात ठेवणे आवश्यक असते.
पूर्वतयारी : पगाराची मागणी करण्यापूर्वी तुम्ही पूर्वतयारी करणे देखील आवश्यक असते. त्यासाठी तुम्ही इतरांपेक्षा किती वेगळे आहात हे दाखवून द्यावे लागेल. कारण प्रत्येक कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या गुंतवणकीतून फायदाच पाहत असते. त्यामुळे तुमच्यातील वेगळेपण सिद्ध करा.
वेळ द्या आणि घ्या : तुम्ही पगाराची अपेक्षा सांगितल्यानंतर एखादी कंपनी लगेचच तुमचा पगार मान्य करेल असे होत नाही. त्यामुळे कंपनीला वेळ द्या आणि स्वत:लाही विचार करण्याचा वेळ द्या.
उत्तराची घाई नको : कंपनी तुम्हाला अगदी तुरळक पगार वाढवून देत असेल तर चटकन ‘हा’ म्हणू नका किंवा चांगली पगार वाढ देत असेल तर ‘नाही’ देखील म्हणून नका. ही प्रक्रिया दोन्ही बाजूने सुरळीत होण्यासाठी थोडी वाटाघाट तर नक्कीच होईल.
- चर्चा करणे गरजेचे आहे का?
आता तुम्हाला माहीत आहेच ही चर्चा ही आवश्यक आहेत. नुसतेच वाढीव पगारासाठी नाही तर तुमच्या चांगल्या राहणीमानासाठी देखील ते आवश्यक आहे. आता मिळालेली पगारवाढ तुम्हाला पुढील आयुष्यासाठी लाभदायक ठरु शकते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महिन्याअखेरीस बँक खात्यात जमा होणारी रक्कम म्हणजे समाधान नाही तर यातून कंपनीसाठी तुम्ही किती महत्वाचे आहात ते देखील कळते. त्यामुळे पगारावर चर्चा करणे अत्यंत महत्वाचे आहे.
- स्वत:ची किंमत कशी ठरवावी ?
आता पगारासंदर्भात चर्चा करायची म्हणजे तुम्हाला तुम्ही कोणत्या पदावर काम करणार आहात ते माहीत हवे. त्या पदासाठी लागणारे कौशल्य, अनुभव आणि जबाबदाऱ्या या देखील माहीत हव्यात. त्यानुसारच तुम्ही पगाराची मागणी करु शकता नाहीतर , तुम्हाला वाटते म्हणून कंपनीने तुम्हाला ३ लाख रुपये पगार द्यावा, हे योग्य नाही.
पगारासंदर्भात कंपनीशी निगडीत नसलेल्या पण तुमच्या वयाच्या व्यक्तिशी बोलणे नेहमीच योग्य आणि सुरक्षित असते. जर तुम्हाला तसे करायचे नसेल तर तुम्ही Glassdoor, Payscale and Paycheck अशा वेबसाईट चाळू शकता त्यामुळे तुम्हाला कंपनीचा, तुमच्या क्षेत्रातील पगाराचा अंदाज येईल. शिवाय Glassdor या संकेतस्थळावर तुम्हाला तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार किती पगार मिळायला हवा याचा अचूक आकडा देखील मिळेल.
उदाहरण द्यायचे झाले तर समजा तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर आहात या क्षेत्रात तुमच्या पदानुसार पगाराचा आकडा ३० हजार ते ५० हजार प्रति महिना असेल. आणि तुम्हाला साधारण ४४ हजार इतका पगार अपेक्षित असेल तर पगाराच्या चर्चेच्यावेळी तुम्ही ४० ते ४८ हजारांच्या घरात चर्चा करु शकता.
पगारासंदर्भात चर्चा करण्याच्या टीप्स
- पगाराचा अंदाज ठरवा पण एक आकडा सांगा
पगारासंदर्भात चर्चा करण्यापूर्वी तुम्हाला किती पगार मागायचा आहे ते ठरवून घ्या. एकदा चर्चेला बसल्यानंतर तुम्ही पगार काय मागायचा याचा विचार करु शकत नाही. शिवाय तुम्ही मागत असलेला पगार तुमच्या कुवतीचा आहे की नाही हे देखील तुम्हाला आयत्यावेळी कळू शकत नाही. वाटेल तो पगाराचा आकडा सांगितल्यानंतर तुम्ही पुन्हा मागे येऊ शकत नाही. त्याचा परिणाम भविष्यात होऊ शकतो. त्यामुळे अभ्यास करुन एखादा आकडा मनात ठेवा आणि वेळ आल्यावर तो सांगा.
उदाहरणार्थ तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला अमूक पदासाठी साधारण ३३ हजार ते ४४ हजार पगार मिळणे अपेक्षित आहे. अशावेळी तुम्ही पगार थोडा वाढवूनच सांगा. साधारण ४२ ते ४३ हजारापर्यंत वाढवून सांगा. या संदर्भात चर्चा करताना ३८ हजारांपेक्षा पगार कमी होणार नाही याची काळजी घ्या .
- सराव करा
चर्चेला प्रत्यक्ष बसण्यापूर्वी तुम्ही तुमचे मुद्दे कसे मांडणार याची तयारी करा. त्यामुळे तुमचा प्रत्यक्ष चर्चेच्यावेळी गोंधळ होणार नाही. तुमच्यासोबत चर्चेला बसलेली व्यक्ति ही अगदी तयारच असते. तुम्हाला तुमचे मुद्दे त्याला पटवून देणे आवश्यक असते. त्यामुळे या सगळ्याचा सराव तुमच्या मित्रासोबत बसून करा. त्याच्यासोबत तुम्ही ही चर्चा करुन पाहा. तुमच्या मित्राला देखील तुम्हाला अधून- मधून प्रश्न विचारायला लावा, अशी तयारी केल्यास प्रत्यक्ष चर्चेच्यावेळी तुम्ही तुमचे मुद्दे पटवून देऊ शकाल.
- आत्मविश्वास हवाच, पण नम्रताही हवी.
तुम्हाला जास्त पगार वाढवून हवा आहे. म्हणून तुम्ही खूप उद्धट वागू शकत नाही. चर्चेला जाताना आत्मविश्वासाने जा. तुमचे मुद्दे मांडा पण तसे करताना तुम्ही जास्त दबाव आणत नाही ना ? हे देखील पाहा. तुम्ही तुमचे मुद्दे ठामपणाने मांडताना कृतज्ञपणे बोला. तुमचे असे बोलणे तुम्हाला या खेळात अधिक गूण देऊ शकते.
- तुमचा फायदा ओळखा
या सगळयात तुम्ही तुमचा फायदा आणि तुमची किंमत ओळखणे सगळ्यात महत्वाचे असते. म्हजणे कंपनीला तुमची किती गरज आहे ते माहीत करुन घेणे गरजेचे असते. तुमची पगारासंदर्भातील वाटाघाट ही तुमच्या नोकरीवर अवलंबून असते. म्हणजे जर तुम्ही जुने जाणते कर्मचारी आहात पण तुम्हाला कठीण प्रसंगात कंपनीने अडकून ठेवलं असेल तर तुमच्यात पगारासंदर्भात वाटाघाटी करण्याची क्षमता नव्या व्यक्तिंपेक्षा अधिक असते.
- थोडा और…
पगारासंदर्भात बोलून झाल्यानंतर इतर महत्वाच्या गोष्टीसंदर्भात चर्चा करणे देखील आवश्यक असते. उदाहरणार्थ मेडिकल इन्श्युरन्स, भरपगारी रजा, प्रवास खर्च आाणि इतर गोष्टींबद्दल बोलणे गरजेचे असते. शिवाय तुमच्या काही अडचणी असतील म्हणजे जाण्याच्या वेळा, आरोग्याच्या तक्रारी यासंदर्भात तुम्ही आधीच सांगणे योग्य असते.
- समतोल साधा
आपण काय बोलत आहोत या आधी समोरचा काय सांगतोय हे देखील ऐका. जेव्हा तुम्ही त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकता तेव्हा तुम्हाला तो काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते अधिक प्रकर्षाने कळते. सगळ्यात कठीण गोष्ट अशी की तुमची आणि कंपनी दोघांची गरज ओळखणे गरजेचे असते तरच तुम्ही समतोल साधू शकता शिवाय त्यातून सुवर्णमध्य काढू शकता.
- बोलण्यापेक्षा करुन दाखवा
तुम्ही काय करु शकता हे सांगण्यापेक्षा तुम्ही करुन दाखवण्यावर भर द्या. तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला तुम्हाला पगार वाढीतून मिळायलाच हवा. तुम्ही कंपनीसाठी केलेल्या अशा गोष्टी दाखवा की, जेथे कंपनीला अधिक मोबदला मिळाला आहे. जेणेकरुन ते तुमचे पगारवाढीसंदर्भातील कोणतेही मुद्दे टाळू शकत नाही. तुम्ही तुमच्या कामाव्यतिरिक्त घेतलेल्या अधिकच्या जबाबदाऱ्या या तुमच्यासाठी फायद्याचे ठरु शकतात. शिवाय तुमच्याकडे कामाचे कौशल्य, हुशारी आणि मेहनत करण्याची वृत्ती अधिक असून कंपनीने पगार वाढून देणे आवश्यक असल्याचे त्यांच्या लक्षात आणून द्या. त्यासाठी तुम्हाला कामातून बोलणे आवश्यक आहे.
- ‘नाही’ उत्तराच्या तयारीत राहा
ऑक्सफर्ड डिक्शनरी नुसार negotiation म्हणजे ‘Discussion aimed at reaching an agreement. मुळात चर्चा तेव्हाच सुरु होते जेव्हा समोरील व्यक्ती ‘नाही’ म्हणते. त्यामुळे तुम्ही पगारासंदर्भातील एखादा आकडा सांगितला आणि समोरची व्यक्ती नाही म्हटल्यास वाईट वाटून घेऊ नका कारण तीच चर्चेची सुरुवात असते. तुम्हाला सहजासहजी होकार कधीच मिळत नसतो. उलट नकार ही चर्चेची सुरुवात असते शेवट नाही.
- हार मानू नका
जरी एखाद्या कंपनीने तुमच्या पगाराचा आकडा निश्चित केला असेल तरी अपेक्षा सोडू नका. कारण अपेक्षा सोडणे कधीच चुकीचे नाही. तुम्ही या निर्णयानंतर चर्चा सुरु ठेवली आणि तुम्ही अगदी शांतपणे ही चर्चा सुरु ठेवली तर त्याचे फलित चांगले मिळू शकेल म्हणजेच तुमचा पगार वाढू शकेल. आहे तो पगार स्विकारणे देखील समोरच्या कंपनीला प्रश्नात पाडू शकते त्यामुळे इच्छित यश मिळेपर्यंत अगदी गोड बोलून आपली मागणी पूर्ण करुन घ्या.
- पगार वाढ स्वत:च्या खासगी खर्चासाठी नको
तुम्ही एखाद्या कंपनीकडे पगारवाढी संदर्भात बोलत आहात ही पगार वाढ तुम्हाला तुमच्या खासगी कारणासाठी हवी अशी कारणे देऊ नका. उदाहरणार्थ पेट्रोलचे भाव वाढलेत. मला पगारात वस्तूंची खरेदी करायची आहे. अशी कारणे फार पोरकट वाटतात आणि सगळ्यांच्याच या सर्वसाधारण गरजा आहेत.वाढीसंदर्भात बोलताना ‘मला माझे काम आवडते. पण मी ज्या पगारावर काम करत आहे ती माझ्या पदाला शोभणारी नाही’ काही कळत आहे का? अशा बोलण्यातून तुमचे कामाप्रती प्रेम दिसून येते.
फोनवर पगारांसदर्भात चर्चा करताना
एकमेंकासमोर बसून चर्चा करणे आणि फोनवर चर्चा करणे हे बऱ्यापैकी सारखेच असते. पण फोनवर चर्चा करताना तुम्ही या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
- पूर्वतयारी
आता पगारासंदर्भातील चर्चा फोनवर होणार म्हटल्यावर काही विशेष गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे ते म्हणजे फोनची वेळ. ज्यावेळी तुम्हाला फोनची वेळ दिली आहे. त्यावेळी त्याची आधीच तयारी करुन ठेवा. तुम्हाला या टेलिफोनिक चर्चेतून काय मिळवायचे आहे ते उद्दिष्ट ठरवून घ्या. जर तुम्ही चर्चेसाठी पुन्हा एकदा फोनवरुन चर्चा करणार असाल तर तुम्ही झालेल्या चर्चेवर समाधानी आहात असे अजिबात दाखवू नका.
- उत्साह दाखवा पण दमाने
फोनवर होणाऱ्या कोणत्याही चर्चेसंदर्भात अधिक काळजी करु नका. पण एक लक्षात ठेवा की, तुम्ही या सगळ्या दरम्यान उत्साही असणे अधिक गरजेचे असते. मैत्रीपूर्व केलेला संवाद हा औपचारिक संवादापेक्षा नेहमीच फायदेशीर असतो. या शिवाय बोलताना तुमचा आवाज, तुमचे शब्द चांगले हवेत याची देखील काळजी घ्या
- पाठपुरावा
समोरा- समोर बसून केलेल्या चर्चेप्रमाणेच फोनवरील संभाषण झाल्यावर त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे असते. तुम्ही संभाषणादरम्यान ज्या विषयांवर चर्चा केली ते मुद्दे एका मेलमध्ये लिहून काढा. कारण एखाद्या गोष्टीचा लिखित पुरावा असणे नेहमीच चांगले.
ईमेलवरुन चर्चा करताना
पगारासंदर्भात बोलण्यासाठी इमेल हे उत्तम माध्यम आहे. जरी त्यात समोरा- समोर बसून किंवा फोनवरुन संभाषण केल्याचा अभाव असला तरी ते प्रभावी माध्यम ठरु शकते. या मेलमध्येही तुम्हाला तुमची भाषा चांगले ठेवणे आवश्यक असते. तुम्ही मेलच्या माध्यमातून केलेला संवाद हा अधिक गंभीर वाटतो. शिवाय समोरच्याच्या वेळही वाचतो. पण मेल लिहिताना तुमचे विचार स्पष्ट असणे गरजेचे आहे.
१. संधी दिल्याचे आभार
तुमचा बोलतानाचा प्रत्येक सूर हा आभार मानणारा वाटायला हवा. शिवाय कामाप्रती असलेली उत्सुकतादेखील त्यातून दिसायला हवी. असे केल्यास तुम्हाला पगाराचा विषय काढणे सोपे होईल तुम्हाला कामाची आवड असून तुमची पगाराची तक्रार लक्षात येईल त्याचा देखील विचार केला जाईल.
२. मेलवरुन आलेल्या ऑफरवर चर्चा करताना
जर तुम्हाला आधीच त्यांनी पगाराचा आकडा पाठवला असेल तर तुम्ही तुमची ऑफर देखील त्यांना पाठवू शकता. अशी मागणी करताना मी तुमच्या ऑफरचा आदर करते. पण या संदर्भात आपण अधिक बोलू शकतो का ? असा मेल केल्यास तुम्ही फार आदराने बोलत असल्याचे वाटते. त्यामुळे तुम्हाला पगार वाढ करण्याची एक संधी देखील मिळते. पण यासोबत तुम्हाला विचार करण्याची देखील संधी मिळते. शिवाय तुमच्या नव्या ऑफरमुळे बॉसला देखील नव्याने विचार करायची संधी मिळते.
३. तुमचा मेल म्हणजे धमकी नाही
मेलवरुन अशाप्रकारे संवाद साधताना तुम्ही मेल काळजीपूर्वक लिहिणे गरजेचे असते. तुमच्या मेलमधील शब्द धमकीवजा नकोत. जसे आधी म्हटल्याप्रमाणे दंडशाही या संदर्भात काहीच कामाची नाही. त्यामुळे मी ही पगाराची अमूक एक कमी रक्कम स्विकारणार नाही किंवा मी जास्त पगार मागतोय कारण तेवछा पगार मिळणे माझा अधिकार आहे. अशी वाक्य तुमचा सुसंवाद बिघडवू शकतात.
नवी नोकरी शोधताना
१. शोधकार्य करा
तुम्हाला पगारासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी काही वेबसाईट सांगितल्या. त्या वेबसाईटवरुन तुम्हाला देण्यात आलेल्या पगाराची ऑफर योग्य आहे की नाही हे कळेल. तुमच्या आधीच्या नोकरीमध्ये पगाराची वाढ मागणे हे अगदी स्वाभाविक आहे. पण तुमच्या अपेक्षेपेक्षा १० ते १५ टक्के पगारवाढ मागणे गरजेचे आहे. नक्कीच समोरची व्यक्ती तुम्हाला कमी पगारात घेण्याचा विचार करेल. पण त्याने तसे केले नाही तर तुम्ही जास्तीत जास्त पगाराची मागणी करा.
२. अतिरिक्त सोयी-सुविंधाबद्दल बोला.
तुमच्या पगाराव्यतिरिक्त मिळणाऱ्या इतर सोयी-सुविधादेखील तितक्याच महत्वाच्या असतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणे आधी गरजेचे असते. जर तुमच्या पगाराची रक्कम कमी असेल पण तुम्हाला मिळणाऱ्या इतर सोयी- सुविधा अधिक असतील तर ती तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. .
3.तुमच्या नियोक्ताला (employer) विचारा
सगळ्यात महत्वाची गोष्ट मुलाखतीच्यावेळी लोक विचारायला विसरतात किंवा विचारायचे टाळतात ती म्हणजे तुमचा नियोक्ता तुम्हाला किती पगार देण्यास तयार आहे. त्यांना आधी त्यांचा आकडा सांगू द्या त्यानंतर तुम्ही जास्त पगाराची मागणी करा. जर तुम्ही असे केले तर तुमची किंमत नक्कीच वाढते.
नोकरीच्या संधींमधून अधिक पगार मिळण्याचा फायदा कसा करुन घ्यायचा
तुम्हाला एकापेक्षा जास्त नोकरीच्या संधी चालून येत असतील. तर नक्कीच तुमची मागणी वाढली असे म्हणायला हवे. याचा दुसरा अर्थ नियोक्ता तुमच्या कामाच्या पद्धतीवर प्रभावित झाला आहे. त्यामुळे तो तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये घेण्यासाठी नक्कीच धडपड करेल. या सगळ्याचा फायदा तुम्हाला अधिक पगाराची नोकरी मिळवण्यासाठी करता येईल. ते कसे हे आम्ही तुम्हाला सांगतो.
इतर संधींबद्दल आवर्जून सांगा
आता हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल. पण तुम्हाला इतर ठिकाणाहूनही नोकरीच्या संधी आलेल्या आहेत हे समोरील कंपनीला सांगा. कारण जर एखादी कंपनी तुम्हाला घेण्यासाठी गंभीर असेल तर तर ती तुमचे कौशल्य तुमची वाढती मागणी पाहून तुमचा पगार वाढवण्याचा नक्कीच विचार करेल कदाचित तुम्हाला हवी असलेली पगारवाढही देईल.
हो आणि नाही म्हणण्याची घाई नको
तुम्हाला अपेक्षेनुसार मिळणाऱ्या नोकरीच्या संधीने हुरळून जाऊ नका आणि चटकन हा किंवा नाही म्हणू नका. तुम्ही तातडीने उत्तर दिल्यास तुम्हाला या नोकराचीच गरज होती असे वाटेल. अशावेळी ते तुम्हाला कमीत कमी पगारात घेण्याच्या विचार करतील. हा तुमच्यासाठी उत्तम असा पर्याय आहे अशी प्रतिक्रिया देऊ नका.
निर्णय घेण्यासाठी वेळ मागून घ्या
सगळ्या प्रदीर्घ असा चर्चा झाल्यानंतर नक्कीच तुमच्या मनाचा गोंधळ उडाला असेल. अशावेळी तुमच्या नियोक्त्याकडे निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ मागून घ्या. त्यामुळे तुमच्या हातात असलेल्या इतर संधींचाही विचार करता येईल आणि मग निर्णय घेण्यात येईल. या मधल्या काळात एखादी कंपनी तुम्हाला वाढीव पगाराची पुन्हा ऑफर देऊ शकते.जर त्यांना तुमच्यात रस असेल तर.
चर्चेदरम्यान केल्या जाणाऱ्या सर्वसाधारण चुका
- नकारात्मक विचार टाळा
काहीवेळा अशी परिस्थिती समोर येते की, सगळे तुमच्या मनाविरुद्ध असते. तुम्हाला नकार मिळू शकतो. अशावेळी कितीही वाईच वाटले तरी स्वत:च्या भावनंना आवर घाला. नकार येणे म्हणजे तुमच्यातील कौशल्य चांगले नाही असे होत नाही. त्यामुळे नकारात्मक विचार टाळून तुम्ही पुन्हा तुमच्या कामाला लागा.
- पहिली ऑफर स्विकारताना
तुम्हाला आलेली पहिली ऑफर तातडीने स्विकारु नका. तुम्ही त्यांनी सांगितल्यापेक्षा अधिक पगाराची मागणी केली असेल. पण ते तुम्हाला कमी पगार देत असतील. तर अशा वेळी कायम लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी की पगारासंदर्भात चर्चा करण्यासाठी घाबरु नका. तुम्ही केलेल्या चर्चेमधून नक्कीच पहिल्या ऑफरपेक्षा चांगले काहीतरी मिळू शकते. त्यामुळे प्रयत्न सोडू नका.
- ऑफर नाकारताना
अनेकदा पगारवाढीसंदर्भातील कठोर भुमिकेचा काहीच फायदा होत नाही. समजा. तुम्ही तुमचा पगार ४५ हजार ते ५० हजारच्या घरात ठरवला असेल. तुम्ही त्यापेक्षा कमी ऑफर नक्कीच स्विकारण्याची गरज नाही. जर तुम्ही तुमची शेवटी रक्कम ४९हजार ठरवली असेल आणि समोरची कंपनी तुम्हाला ४६ हजार देण्यासाठी तयार असेल तर ही ऑफर वाईट नाही याचा विचार नक्कीच करा. कारण तुम्ही ठरवलेल्या रकमेच्या रेंजमध्येच हा पगार आहे.
- लेखी करारासंदर्भात
तुम्ही कितीही औपचारिक चर्चा केली तरीदेखील त्या सगळ्या गोष्टींचे पुरावे असणे आवश्यक असते. जी चर्चा झाली त्यासंदर्भात HRने तुम्हाला मेल केल करणे आवश्यक असते. कारण भविष्यात तुम्हाला सांगितलेल्या काही गोष्टींची पूर्तता कंपनी करत नसेल त्यावेळी तुमच्याकडे लेखी करार हा पुरावा राहतो.
- पगाराने चर्चेची सुरुवात नको
आपण पगारासाठी चर्चेला बसलो आहोत हे माहीत असले तरी चर्चा सुरु करताना पगारासंदर्भातील चर्चेने सुरुवात करु नका. कारण असे करणे फारच अव्यावसायिकपणाचे लक्षण असते. त्यामुळे चर्चेच्या सुरुवातीचा पहिला शब्द किंवा पहिले वाक्य हा पगार नको.
- पगाराची रक्कम सांगायला घाबरु नका
चर्चा संपल्यानंतर पगाराचा आकडा तुमच्या वरिष्ठांसमोर पहिल्यांदा सांगायला घाबरु नका.जर तुमच्या बॉसने पगाराचा आकडा सांगितला. तर तो कदाचित तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी असू शकतो. तो आकडा बॉसने सांगितल्यानंतर आणि तो कमी असल्यास तुम्हाला वाईट वाटू शकते. शिवाय तुम्ही तडजोड करण्याच्या विचारात अडकून पडता.
- महिलांनी ही घ्यावी विशेष काळजी
महिला या नेहमीच एक पाऊल मागे घेण्याच्या पवित्र्यात असतात. पगारासंदर्भात चर्चा झाल्यानंतर तुम्ही ‘हे सगळं होतय यासाठी मला माफ करा’, किंवा ‘असं काही होणं माझ्यासाठी फार विचित्र आहे’, असं काहीच म्हणण्याची गरज नाही कारण तुम्ही कामाचा मोबदला मागत आहात त्यात काहीच वावगे नाही. जर तुम्ही समोरच्याला तुम्ही प्रत्येकवेळी एक पाऊल मागे घेण्याची प्रवृत्ती दाखवली तर समोरच्याला तुमची मागणी कधीच रास्त वाटणार नाही.
- तुम्हीच पगार कमी करु नका
जर तुम्ही स्वत:च म्हणत आहात की, मला अमूक एक रक्कम वाढवून हवी आहे. पण मी इतक्यावर तयार आहे… असे म्हणून तुम्ही तुमचीच किंमत कमी करता आणि तुम्ही पगार मिळवण्यासाठी केलेल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फेरले जाईल. तुम्ही एक आकडा सांगितल्यानंतर काही गोष्टी समोरच्यावर सोडून द्या. त्यांनाही त्यांचे काही काम करु द्या.
- पगारवाढ म्हटला की, जबाबदाऱ्या आल्याच
पगारवाढ म्हटली की, जबाबदाऱ्या आल्याच. पण ती तुमच्या आधीच्या कामाशी निगडीत असते. त्यामुळे काळजी करण्याचे काहीच कारण नाही. पण जर तुमचा पगार ५० टक्क्यांनी वाढत असेल पण तुमच्या जबाबदाऱ्या पगाराच्या तुलनेत ७५ टक्क्यांनी वाढत असेल तर अशी ऑफर स्विकारु नका.
तुम्ही तुमचा फायदा बघा
प्रत्येक जण हा वेगळा असतो. त्याच्यातील कौशल्यवेगळी असतात. त्यामुळे कंपनीच्या दृष्टिकोनातून त्याची किंमतही वेगळी असते. अशावेळी तुमच्यासोबत काम करणाऱ्या सह कर्मचाऱ्याच्या पगाराची तुलना करणे तुम्हाला कधीच फायद्याचे ठरणार नाही. त्यामुळे तुमच्यातील गूण ओळखून तुम्ही तुमचा फायदा पाहणे जास्त गरजेचे असते. ही परिमाण तेव्हा लागू होत नाही जेव्हा तुम्ही ज्या पदावर काम करत आहातत्या पदावर काम करणाऱ्या तुमच्या सह कर्मचाऱ्याचा अनुभव तुमच्या इतका असून देखील तुमच्यापेक्षा त्याचा पगार अधिक आहे. त्यावेळी तुम्ही तुमच्यावर होणाऱ्या अन्याायाला वाचा फोडली पाहिजे.
राजीनाम्याची धमकी उपयोगाची नाही
ही सर्वसाधारण चूक अनेक कर्मचारी करतात ती म्हणजे राजीनामा देण्याची. तुमच्या मनाप्रमाणे काही गोष्टी न झाल्यास राजीनामा देण्याची धमकी काहीच काम करुन शकत नाही. त्यामुळे तुमची प्रतिष्ठा कमी होण्याची शक्यता सर्वाधिक असते. शिवाय तुम्हाला अपेक्षित वाढ मिळणार नाहीच हे या मागचे सत्य आहे. शिवाय अशा प्रकारच्या वागण्यामुळे तुम्ही तुमची नोकरीही गमावू शकता.
चर्चा करुनही काहीच हाती न लागल्यास?
अनेकदा चर्चा झाल्यानंतर तुम्हाला हवा असलेला निकाल अपेक्षित असतो. पण तसे कधी कधी होत नाही. अशावेळी काय करायचे ते कळत नाही. बरोबर ना? पण खचून न जाता पुढे काय करायला हवे ते देखील वाचा
- सद्यस्थितीचा अभ्यास करा
आता तुमच्याकडे विचार करायला बराच वेळ आहे. आता तुम्ही तुमचे सध्याचे काम आणि तुमच्या जबाबदाऱ्या यांचा एकदा विचार करा. हा देखील विचार करा की, तुम्हाला या ठिकाणीच थांबायचे आहे की, तुमच्याकडे दुसरा पर्याय आहे. तुम्हाला ही नोकरी सोडायची आहे की, तुम्हाला तुमची आहे नोकरी आणि काम कमी पगार मिळूनही आवडत आहे का ? पगाराव्यतिरिक्त मिळणारी इतर सोयी-सुविधा अधिक चांगल्या आहेत का ? तुम्ही या कामात समाधानी आहात का?या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हालाच द्यायची आहेत.
- भूतकाळाचा नाही तर भविष्याचा विचार करा
भूतकाळाचा कायम विचार करत राहाल तर तुम्ही तुमचा वर्तमानकाळ वाईट करुन घ्याल. तुम्हाला तुमच्या कामात अधिक लक्ष घालायचे आहे. त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात पगार वाढ मिळवताना होईल. त्यामुळे हा विचार काम करताना कायम मनात हवा.
- मागोवा घेण्यासाठी सातत्य ठेवा
पगार वाढवून मिळाला नाही. म्हणून त्याचा मागोवा घेणे सोडू नका. कारण तुम्हाला योग्य वेळेसाठी थांबायचे आहे. त्या दरम्यान तुम्हाला तयारी देखील करायची आहे. ही तयारी पुन्हा एकदा पगार वाढ मागण्यासाठी असणार आहे हे लक्षात ठेवा. समजा तुम्ही या गोष्टीसाठी ६ महिन्यात तयार झालात. तर मागे नेमके काय काय झाले होते याचा मागोवा घ्या
- सकारात्मक राहा
तुमच्या चांगल्यासाठी ही गोष्ट महत्वाची आहे की तुमच्या वरिष्ठांना तुमची तुमच्या सह कर्मचाऱ्यांमधील किंमत कळणे. तुम्ही तुमच्या वरिष्ठांना हे कळून देणे महत्वाचे आहे की, तुम्ही त्यांच्या काही निर्णयाशी सहमत नाही पण तुम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर करता.
- तुमचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मेहनत करा
तुम्हाला पगार वाढ हवी आहे आणि तुम्ही त्या पगार वाढीसाठी योग्य आहात हे तुम्ही तुमच्या कामातून दाखवणे गरजेचे असते. तुम्ही तुमच्या कामातून ते दाखवून दिले तर तुम्हाला पगार वाढ मिळण्याचे मार्ग मोकळे होतात. तुमच्या कामाच्या प्रगतीबद्दल वरिष्ठांना विचारायला घाबरु नका. तुमच्या वरिष्ठांबरोबर बसून त्यांची चर्चा करा आणि पगारवाढीसंदर्भात बोला आणि तुम्ही पगारवाढीच्या लायक आहात ते पटवून द्या.
- तुमच्या कामानुसार जबाबदाऱ्या वाढणार
पगार वाढण्यासोबत तुमच्या जबाबदाऱ्या वाढणे अगदी स्वाभाविक आहे. तुमचा पगार वाढला असेल पण तुमचे प्रमोशन झाले नसले तरी तुमच्या जबाबदाऱ्या वाढणारच आहे. या जबाबदाऱ्या देण्यामागेही कारण असते ते म्हणजे तुम्ही या जबाबदाऱ्या पेलू शकता की नाही हे देखील त्यांना पाहायचे असते. कंपनीच्या तुमच्याप्रती अपेक्षा या वाढलेल्या असतात. कंपनीला नेमंक तुमच्याकडून काय हवे आहे हे नीट माहीत करुन घ्यायचे असेल तर तुम्ही एका औपचारिक मेल करु शकता त्यात तुम्ही कंपनीला तुमच्याकडून काय अपेक्षा आहे. ते विचारु शकता. या एका मेलमुळे तुम्हाला तुमच्या कामाचे नेमके स्वरुप आणि जबाबदाऱ्या कळू शकेल. तुम्ही तुमचे काम अगदी योग्य करु शकाल.
- तुमची प्रतिष्ठा वाढेल
तुम्ही तुमच्या कामाची जबाबदारी ओळखून त्यासाठी आवश्यक पगाराची वाढ मागितल्यामुळे तुमही प्रतिष्ठा वाढते. आता कसे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या प्रतिष्ठा वाढण्यामागे दोन कारणे असतात एक म्हणजे तुम्ही तुम्हाला हवी असलेली वाढ तुमच्या वरिष्ठांकडे मागण्यासाठी घाबरला नाहीत आणि ते मागण्यासाठी तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास, चिकाटी या गोष्टी कारणीभूत असतात.
- पगारवाढ ही चिरंतर प्रक्रिया
पगारवाढ ही चिरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ती कधीच संपत नाही. त्यामुळे पगारवाढ मिळत नाही याचा परीणाम तुमच्या कामावर होऊ देऊ नका.कारण पगार वाढ मिळाली म्हणजे विषय संपत नाही तर पुन्हा तुम्हाला पगारवाढ हवीच असते त्यामुळे तुम्हाला तुमचे काम चांगले ठेवावेच लागणार आहे. हे कटू सत्य आहे.
तुम्हाला या सगळ्या गोष्टी विचित्र वाटतील पण यापासून तुमची सुटकाही नाही. भारतात नाही पण परदेशात कौशल्य विकासाला अधिक महत्व दिले जाते. त्यामुळे कौशल्यविकासासाठी खास शिकवण्यादेखील घेतल्या जातात. विशेषत: महिलांना याची अधिक आवश्यकता असते कारण अनेक महिला पगारातील भेदभाव कामाच्या ठिकाणी झेलत असतात. अशांना पगार वाढवून मागण्याचे कौशल्य अवगत असणे गरजेचे असते. पगार वाढ मागण्यासाठी घाबरु नका. कारण तुम्ही त्या कामात स्वत: ला झोकून दिले आहे. त्यामुळे तुम्हाला पगार वाढवून मिळायला हवा नाही का?
फोटो सौजन्य : Giphy, Shutterstock