देशभरात मागच्या वर्षीपासून कोरोनाच्या भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. पहिली लाट ओसरता ओसरता कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे कोरोनाची भीती काही केल्या लोकांच्या मनातून जात नाही आहे. कोरोनापासून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे कोरोनाची लस घेणे. मात्र कोरोनाच्या लसीकरणाला याच वर्षीपासून सुरूवात झाल्यामुळे त्याच्या परिणामांचा योग्य अंदाज अजूनही मिळालेला नाही आहे. शिवाय अजून सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्णही झालेले नाही. त्यामुळे इनफेक्शनपासून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करणं आणि सावध राहणं हेच आपल्या हातात आहे. कोरोनातून सुरक्षित राहण्यासाठी काय करावं, कोरोना झाल्यावर काय करावं आणि कोरोनातून बरं झाल्यावर काय करावं याबाबत अनेक मतं सध्या दिसून येत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कोरोनातून बरं झाल्यावर लगेच आपला टूथब्रश आणि टंगक्लिनर बदलावा अशी सध्या चर्चा सुरू आहे. याबाबत योग्य माहिती समोर येण्यासाठी आम्ही याबाबत तज्ञ्जांचा सल्ला घेतला
काय आहे याबाबत तज्ञ्जांचे मत
स्माईलक्राफ्ट डेंटोफेशिअल रिहॅब सेंटरच्या प्रोस्थोडोंटिस्ट आणि इम्प्लांटोलॉजिस्ट डॉ. रजनी डबले यांच्या मते, “व्हायरस आणि बॅक्टेरिआ अपेक्षेपेक्षा जास्त काळ सक्रिय राहू शकतात. जरी कोरोनातून बरं होताना तुमच्या शरीरात अॅंटि बॉडीज तयार होत असले तरी या काळात टूथ ब्रश अथवा टंग क्लिनर सारख्या तोंडाची स्वच्छता राहण्याऱ्या वैयक्तिक वस्तूंचा पुर्नवापर टाळणे महत्त्वाचे आहे. कारण या वस्तू संक्रमित झाल्यामुळे त्यांच्यामध्ये व्हायरस आणखी काही दिवस सक्रिय राहू शकतो आणि तुम्हाला पुन्हा इनफेक्शनचा धोका निर्माण होऊ शकतो. यासाठीच कोरोनातून बरं होताना या गोष्टी बदलाव्या शिवाय तुमच्या कुटुंबातील लोकांच्या वस्तूंसोबत या वस्तू मुळीच ठेवू नका कारण त्यामुळे त्यांनाही कोरोनाचे संक्रमण होण्याचा धोका वाढू शकतो”
दंतवैद्यांच्या या सल्लानुसार एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आणि ती व्यक्ती औषधउपचारांनी पूर्णपणे कोरोनामुक्त झाली तरी ती व्यक्ती पुन्हा संक्रमित होणार नाही याची गॅरंटी देता येत नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यामध्ये लोकांना पुन्हा पुन्हा कोरोना झालेला आढळून आला आहे. यासाठीच कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोनातून बरं झालेल्या व्यक्तीने लगेच आपला टूथब्रश आणि टंगक्लिनर बदलावा. अशा प्रकारे टूथब्रश आणि टंगक्लिनर बदलण्यामुळे फक्त ती व्यक्तीच इनफेक्शनपासून सुरक्षित होते असं नाही तर त्या व्यक्तीचे संपूर्ण कुटुंबदेखील सुरक्षित होऊ शकते. याचं कारण असं की मुंबई सारख्या शहरात प्रत्येकाची वेगळी रूम असतेच असं नाही. त्यामुळे अनेकजण एकाच रूममध्ये राहतात आणि जरी वेगवेगळ्या रूममध्ये राहत असले तरी घरात बऱ्याचदा एकच बाथरुम वापरले जाते. अशा वेळी कोरोना संक्रमित असताना वापरलेले दात स्वच्छ करण्याचे साहित्य पुन्हा वापरल्यास स्वतःला आणि इतरांना कोरोनाचा धोका पुन्हा निर्माण होऊ शकतो. यासाठीच कोरोनातून रिकव्हर झालेल्या लोकांनी स्वतःचा टूथब्रश आणि टंगक्लिनर अथवा दात स्वच्छ करण्याचे इतर साहित्य कोरोनातून रिकव्हर झाल्यावर लगेच बदलावे असा सल्ला देण्यात येत आहे. कारण टूथब्रश बदलण्यामुळे तुमच्या तोंडाचे आरोग्य सुरक्षित राहतेच शिवाय तुम्ही कोरोनापासून सुरक्षितदेखील राहता.
pexels
तोंडातील बॅक्टेरिया पासून कसा करावा बचाव
दिवसभरात आपण अनेक खाद्यपदार्थ खात असतो ज्यामुळे तोंडात अनेक जीवजंतू दडून बसलेले असतात. अशावेळी बाहेरील बॅक्टेरिआ तोंडात शिरण्याची शक्यता अधिक वाढते. तोंडात वाढणारे जीवजंतू नष्ट करण्यासाठी दंतवैद्य दिवसभरातून कमीत कमी दोन वेळा दात घासण्याचा सल्ला देतात. याशिवाय गरम पाण्याची वाफ घेणे अथवा कोमट पाण्याच्या गुळण्या केल्यानेदेखील तोंडातील जीवजंतू अथवा बॅक्टेरिआ नष्ट होऊ शकतात. कोमट पाण्यात मीठ घालून तुम्ही गुळण्या करू शकता. तोंडातील बॅक्टेरिआ कमी करण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे माऊथवॉश मिळतात. तुम्ही या गोष्टी वापरून तुमच्या तोंडाचे आरोग्य सांभाळू शकता. संक्रमित व्यक्तिच्या तोंडातून, वापरलेल्या वस्तूंमधून आणि सर्दी, खोकल्याच्या कणांमधून विषाणू पसरत असतात. यासाठीच कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आणि तोंडाचे आरोग्य जपण्यासाठी वेळेवर टूथब्रश बदलणे आणि योग्य काळजी घेणे गरजेचं आहे.
फोटोसौजन्य – pexels
अधिक वाचा –
कोरोनामधून बरं होताना गळत असतील केस तर करा हे उपाय
कोरोनाच्या काळात प्रेग्ननंट महिलांनी अशी वाढवावी प्रतिकार शक्ती
कोरोना काळात महिलांचे आरोग्य, स्वास्थ्य जपण्यासाठी काही सोप्या टिप्स