प्रवासात प्रत्येक वेळी फोटो काढताना केस सोडायला आपल्या सगळ्यांना आवडते. केस सोडून फोटो येतात नेहमीच सुंदर पण जसाजसा प्रवास संपू लागतो तशा केसांच्या समस्या या अधिक जाणवू लागतात. केसांचा गुंता होणे, केस कोरडे होणे यासोबतच केसगळतीची समस्याही निर्माण होते. असा मोठा प्रवास करुन आल्यानंतर तुमच्याही केसांमध्ये हे बदल जाणवत असतील. केसगळती वाढू लागली असेल. तर पुन्हा कधीही प्रवासाला सुरुवात करताना केसांची अशा पद्धतीने काळजी घ्या. त्यामुळे तुमचे केस गळणार नाहीत.
शॅम्पूच्या वापरानंतर तुमचेही गळतात का केस
केस करा ड्राय
प्रवासास सतत घाम येत राहतो. घाम येतो म्हणून आपण केस वर बांधून ठेवतो. केसांमध्ये घाम तसाच साचून राहिला तर मात्र केसांमध्ये कोंडा होण्याची शक्यता असते. केसांमध्ये कोंडा वाढला की, केस गळतीची समस्या सुरु होते. शक्य असेल तेव्हा केस कोरडे करण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळी प्रवासात तुम्हाला वेळ असेल तेव्हा केस मोकळे करुन घाम शोषून घ्या. म्हणजे केसांना दुर्गंधीही येणार नाही आणि केस तेलकट किंवा चिकटही होणार नाही. त्यामुळे केस कोरडे करत राहा.
घट्ट बांधू नका
बरेचदा केसांना त्रास होऊ नये म्हणून आपण केस घट्ट बांधतो. पण केसांना घट्ट बांधल्यामुळे केसांची हेअरलाईन मागे जाते. प्रवासात केसांची हेअरलाईन अशी मागे केल्यामुळे कपाळ मोठे वाटू लागते. ही केसगळती नसली तरी केस घट्ट बांधल्यामुळे केस तुटत राहतात. सुरुवातीला काहीच केस गळतात असे वाटते. पण केस घट्ट बांधल्यामुळे ज्यावेळी तुम्ही केस विंचरता तेव्हा केसगळती किती झाली ते लक्षात येते.
सतत शॅम्पू टाळा
प्रवासात तुम्हाला चांगले पाणी मिळेल असे सांगता येत नाही. चांगल्या हॉटेल्समध्येही बोअरींगचे पाणीच पुरवण्यात येते. जड पाण्यात केस धुतल्यामुळे केसगळती होणे हे फारच स्वाभाविक आहे. कारण खूप जणांना केसगळतीचा हा त्रास अगदी सहज जाणवतो. त्यामुळे बाहेर गेल्यानंतर तुम्ही जितका कमी तितकाच केसांना शॅम्पूचा वापर करा. शक्यतो केस धुवूच नका. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही केसासंसाठी ड्राय शॅम्पूचा वापर करु शकता. त्यामुळे तुमचे केस काही काळासाठी चांगले राहतील.
घरच्या घरी करा केस ट्रिम, सोप्या टिप्स
रात्री वेणी घालून झोपा
केसांचा गुंता ही प्रवासादरम्यानची आणखी एक मोठी समस्या आहे. कितीही सीरम लावले तरी देखील केसांचा गुंता हा काही केल्या सुटत नाही. अशावेळी केसांची गळती सुरु होते. केसांचा हा गुंता टाळण्यासाठी आणि केसांची गळती थांबवण्यासाठी शक्य असल्यास तुम्ही रात्री वेणी घालून झोपा. त्यामुळे कदाचित तुमच्या केसांना स्टाईल करण्याची गरज भासेल पण तुमचे केस नक्कीच चांगले राहतील.
हिटचा वापर टाळा
प्रवासात चांगले फोटो काढण्यासाठी बरेचदा स्टायलिंग मशीन वापरली जाते. हेअर स्ट्रेटनर, हेअर कर्ल करणारी मशीन. हेअर ड्रायर पण यासगळ्याचा वापर टाळणे हे नेहमीच चांगले असते. कारण त्याच्या सतत वापरामुळेही तुमचे केस खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्य असेल तर हिटचा वापर करणे टाळा.
आता प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे तुमचे केस चांगले राहतील