गरोदरपण आणि बाळंतपण हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय त्रासदायक मात्र तरिही हवाहवासा वाटणारा एक टप्पा असतो. बाळाच्या जन्मानंतर स्त्रीचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. बाळाची निगा राखणं, त्याला दूध पाजणं, त्याला काय हवं काय नको याचा सतत विचार करणं, त्याला खेळवणं, सतत डायपर बदलणं अशा अनेक गोष्टी दिवसभर कराव्या लागतात. त्यामध्ये त्या स्त्रीचं स्वतःचं आरोग्य आणि खाणंपिणं याकडे बऱ्याचदा दुर्लक्षच होतं. म्हणून आई होणं हे सोपं काम नाही असं म्हटलं जातं. मात्र जर तुम्ही एक नाही दोन म्हणजे जुळ्या बाळांच्या आई झाल्या असाल तर तुम्हाला जास्त ऊर्जा , इतरांची मदत आणि मानसिक शांततेची गरज लागते. यासाठीच जाणून घ्या जुळ्या बाळांना कसं सांभाळावं.
आईचं दैनंदिन शेड्यूल ठरलेलं असावं –
जुळ्या बाळांचे संगोपन करण्यासाठी नवमातांनी स्वतःचं एक शेड्यूल ठरवावं. जसं की तुमच्या बाळांची दूध पिण्याची वेळ, अंघोळ घालण्याची वेळ, औषधांची वेळ, त्यांना खेळवण्याची वेळ, त्यांच्या झोपण्याची वेळ या सर्वांचं गणित तुम्हाला जमवावं लागतं. या वेळेची तुमच्या बाळांना सवय झाली की तुमचं काम थोडं सोपं होऊ शकतं. कारण एकाच वेळी तुम्हाला तुमच्या दोन्ही बाळाचं योग्य संगोपन करायचं आहे. शिवाय मग या शेड्यूल प्रमाणे तुम्हाला तुमच्या खाण्या-पिण्याची वेळ, झोपण्याची वेळ, कामाची वेळ ठरवता येऊ शकते.
इतरांची मदत घेण्यासाठी संकोच नसावा –
दोन बाळांचे संगोपन एकटीने करणं नक्कीच शक्य नाही. त्यामुळे बाळाला सांभाळण्यासाठी तुम्हाला इतरांची मदत घ्यावीच लागेल. अशा वेळी उगाचच आदर्श माता होण्यासाठी स्वतःवर सगळ्या जबाबदाऱ्या ओढून घेऊ नका. कारण प्रश्न फक्त तुमच्या जबाबदारीचा नाही तुमच्या बाळांचे योग्य संगोपन होणं आणि तुमचे आरोग्य उत्तम राहणं हेही तितकंच गरजेचं आहे हे घरच्यांना समजवा. यासाठी एका बाळाला तुम्ही जेव्हा सांभाळत असाल तेव्हा दुसऱ्या बाळासाठी त्याचे बाबा, आजी, आजोबा अथवा एखाद्या मदतनीसाची मदत घेण्याचा संकोच करू नका. शिवाय जेव्हा तुमची मुलं झोपतील तेव्हा घरातील इतर कामे उरकण्यापेक्षा तुम्ही देखील चांगली झोप घ्या. ज्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील. घरातील कामे आणि इतर जबाबदाऱ्या काही दिवसांसाठी घरातील इतर लोकांकडे वाटून द्या. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांकडे योग्य लक्ष देता येईल.
दररोज बाळाला मालिश आणि अंघोळ घालायलाच हवी-
तुमचे बाळ एकटे असो वा जुळे तुम्हाला तुमच्या बाळाला नियमित मालिश आणि अंघोळ घालणं गरजेचं आहे. कारण मालिश आणि अंघोळीमुळे बाळाच्या मांसपेशी आणि हाडे मजबूत होतात. बाळाचा विकास लवकर होण्यासाठी त्याला तज्ञ्जांच्या मदतीने मालिश करणं गरजेचं आहे. तुम्हाला अगदीच शक्य नसेल तर एक दिवस एका बाळाला आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाळाला अंघोळ घाला. मालिश आणि अंघोळ घातल्यामुळे तुमचे आणि बाळाचे बॉडिंग वाढते. बाळाला आईचा स्पर्श होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या दोन्ही बाळांना तुमचा स्पर्श, प्रेम मिळणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा.
आईने स्वतःचा आहार आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये-
आईची जबाबदारी सांभाळता सांभाळता तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत नाही ना याची वेळीच काळजी घ्या. कारण तुमच्या दोन्ही बाळांना तुमची मोठेपणीही खूप गरज असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता तुमच्या बाळांसाठी स्वतःच्या आरोग्याकडेही नीट लक्ष द्यावेच लागणार. त्यामुळे बाळाचे संगोपन करताना स्वतः योग्यआहार घ्या, पोषक पदार्थांचे सेवन करा, नियमित व्यायाम अथवा योगासने करा ज्यामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल. जुळ्या बाळांच्या संगोपनासाठी तुम्हाला आता जास्त निरोगी आणि सुदृढ होण्याची गरज आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
बाळाला पहिल्यांदा अंघोळ घालताना या गोष्टी ठेवा लक्षात
दूध पिताना बाळ सतत उलटी करत असेल तर त्यामागे असू शकतं हे कारण