मराठी चित्रपटांच्या यादीत सध्या काळी माती हा चित्रपट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लॉकडाऊनमध्ये मागच्या वर्षी या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं होतं. त्यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करण्यात आलं आणि डिसेंबरपासून काळीमातीचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभाग सुरु झाला. आजवर या चित्रपटाने केवळ 135 दिवसांमध्ये 151 पुरस्कार कमावले आहेत. यातील 30 पुरस्कार दिग्दर्शक हेमंत कुमार महाले यांना दिग्दर्शनासाठी मिळाले आहेत. काळीमातीने भारतासह सिंगापूर, मलेशिआ, फ्रान्स, युरोप, लंडन, अमेरिका या देशांमधील फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्वतःची मोहोर उमटवली आहे. निर्मात्यांच्या मते हा सिलसिला असाच पुढे सुरू राहणार असून एकूण 251 पुरस्कार मिळवण्यााठी प्रयत्न केले जाणार आहेत.
काय आहे काळी मातीची कथा
काळी माती हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रगतीशील आणि आदर्श शेतकरी आदर्श बोडके यांच्या यशोगाथेवर आधारित आहे. शेतीसाठी जीव की प्राण एक करत मेहनत करून जवळजवळ 400 कोटींची आर्थिक उलाढाल करणाऱ्या शेतकऱ्याची स्फूर्ती आणि प्रेरणादायी कथा यात मांडण्यात आली आहे. शेतकऱ्याची यशोगाथा घराघरात पोहचावी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या हा चित्रपट निर्माण करण्यामागचा मुख्य हेतू आहे. या चित्रपटात शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्या, बॅंकाचे आणि सरकारचे शेतकऱ्यांविषयी असलेले धोरण यावर भाष्य करण्यात आलेले आहे. सांगीतिक क्षेत्रात शोमॅन ऑर्गनायझर अशी ओळख असलेल्या हेमंत कुमार महाले यांचा काळी माती हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटात ओमप्रकाश शिंदे, एतशा संझगिरी, दीक्षा भोर, भगवान पाचोरे, पूनम पाटील. पी. के. वाघमारे या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. अविनाश आणि विश्वजीत यांचे सुरेल संगीत, छायाचित्रकार सुरेश सुवर्णा आणि राजा फडतरे यांचे छायाचित्रण, अनिल राऊत आणि हेमंत कुमार महाले यांचे भारदस्त संवाद आणि अतिशय सुरेख लोकेशन्स यामुळे या चित्रपटाचा दर्जा उंचावलेला असून या चित्रपटाची अनेक आतंरराष्ट्रीय महोत्सवांनी दखल घेतली आहे.
कधी येणार काळी माती प्रेक्षकांच्या भेटीला
काळी माती खरंतर 28 मे ला प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन आता 9 जुलैला करण्यातत येणार आहे. त्यामुळे जुलैमध्ये सर्व महाराष्ट्रात हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटाबाबत हेमंत कुमार यांनी शेअर केले की, 135 दिवसांमध्ये 151 पुरस्कार हा विश्वविक्रम काळी मातीने निर्माण केला आहे. आम्ही या चित्रपटासाठी आता गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड यांच्याशी संपर्क साधला आहे. लवकरच यांच्याकडूनही काळीमातीला प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे महाराष्ट्राच्या या काळी मातीची नोंद आता जगभरात घेतली जाणार हे नक्कीच. महाराष्ट्राची काळी माती सोन्याहून पिवळी ठरत यशाचं शिखर आता गाठतच राहणार. मग फक्त बैल पोळा स्टेटस सणाच्या निमित्ताने न ठेवता शेतीवरील आधारित असे सिनेमेही नक्की पाहा.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
गोव्यातील मालिकांचं चित्रीकरण रखडलं,मालिकांना बसणार फटका
मराठी मालिकांना झालंय तरी काय, दर्जा घसरला
लग्नाच्या काही दिवसानंतर कॉमेडियनला जाणवले लग्नाचे साईड इफेक्टस, व्हिडिओ व्हायरल