कांगारू केयर ही नवजात बाळांची काळजी घेण्याची एक पद्धत आहे. खासकरून ज्या बाळांचे जन्माच्या वेळचे वजन कमी असते त्यांच्यासाठी कांगारू केयरचा उपयोग केला जातो. यामध्ये बाळाला त्याच्या पालकांच्या उघड्या छातीशी घट्ट कवटाळून ठेवले जाते, अशाप्रकारे पालकांच्या त्वचेशी बाळाच्या त्वचेचा थेट संपर्क होत राहतो, सर्व नवजात बाळांच्या बाबतीत या पद्धतीचा अवलंब केला जाऊ शकतो. अतिशय प्रभावी आणि वापराच्या दृष्टीने खूपच सोप्या अशा या पद्धतीमुळे बाळांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, प्रीटर्म आणि नॉर्मल प्रसूती होऊन जन्मलेल्या बाळांच्या तब्येतीची नीट काळजी घेण्यासाठी कांगारू केयर हे तंत्र उपयुक्त ठरते. डॉ. नवीन बजाज, नियोनेटोलॉजिस्ट, चेअरपर्सन, इंडियन अकॅडेमी ऑफ पेडियाट्रिक्स (आयएपी) निओनॅटोलॉजी चॅप्टर यांच्याकडून आम्ही अधिक जाणून घेतले आहे.
कांगारू केयर कोण देऊ शकते?
Freepik
बाळाची कांगारू केयर पद्धतीने काळजी घेण्यासाठी बाळाची आई ही सर्वोत्तम व्यक्ती असते. पण इतर कोणतीही व्यक्ती, बाळाचे वडील किंवा कुटुंबातील जवळची व्यक्ती (बाळाला जबाबदारीने हाताळू शकतील अशी भावंडे, आजीआजोबा, काकी, मावशी, आत्या, मामी, काका, मामा यांच्यापैकी कोणीही) बाळाला कांगारू केयर देऊन आईच्या जबाबदारीतील काही वाटा उचलू शकतात. कांगारू केयर देणार असलेल्या व्यक्तीने स्वच्छतेच्या काही मूलभूत नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असते. (उदाहरणार्थ, दररोज अंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, हात स्वच्छ धुणे, हाताची नखे कापलेली व स्वच्छ असणे इत्यादी.)
कांगारू केयरची सुरुवात केव्हा करावी?
कांगारू केयर किंवा ‘त्वचेचा त्वचेशी संपर्क’ तंत्राने बाळाची काळजी घेण्याची सुरुवात बाळाच्या जन्मापासूनच करावी आणि पुढे संपूर्ण पोस्टपार्टम कालावधीत सुरु ठेवता येऊ शकते.
कांगारू केयर किंवा ‘त्वचेचा त्वचेशी संपर्क’ तंत्राचा वापर करताना सुरुवातीला वेळ कमी ठेवावा. (जवळपास ३० ते ६० मिनिटे) हळूहळू आईला त्याची सवय होऊ लागते व ती आत्मविश्वासाने या पद्धतीचा वापर करू लागते, अशावेळी जितका जास्त वेळ कांगारू केयर देता येईल तितका वेळ ती द्यावी. खासकरून कमी वजनाच्या बाळांच्या बाबतीत कांगारू केयरचा कालावधी जितका जास्त असेल तितका चांगला ठरतो. बाळाला कांगारू केयर देताना आई स्वतः देखील आराम करू शकते किंवा अर्ध-पहुडलेल्या स्थितीत झोपू शकते.
कांगारू केयरची प्रक्रिया
Freepik
आईच्या स्तनांच्या मधल्या पोकळीत बाळाला उभ्या स्थितीत ठेवावे, बाळाचे डोके एका बाजूला कलते असावे, जेणेकरून त्याला श्वास घेण्यात काही अडचण येणार नाही आणि आई सतत दिसत राहील. बाळाचे पोट आईच्या पोटाच्या वरच्या भागाला टेकलेले असावे, हात आणि पायांची घडी घातलेली असावी. बाळाला आधार देण्यासाठी स्वच्छ, मऊ, सुती कापड किंवा कांगारू बॅगचा वापर केला जाऊ शकतो.
नवजात बाळाच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी टिप्स
कांगारू केयर / ‘त्वचेशी त्वचेचा संपर्क’ तंत्राचे लाभ
मुदतीपूर्व प्रसूतीमध्ये जन्मलेल्या किंवा अतिशय कमी वजनाच्या बाळांच्या शुश्रूषेसाठी कांगारू केयरची सुरुवात झाली. परंतु मुदत पूर्ण होऊन जन्मलेल्या किंवा वजन व्यवस्थित असलेल्या बाळांसाठी देखील ही पद्धत खूप लाभदायी ठरते.
कांगारू केयर / त्वचेशी त्वचेचा संपर्क तंत्राचे काही प्रमुख फायदे पुढीलप्रमाणे आहेत:
• बाळाची नीट काळजी घेण्याचा आणि बाळासोबत आपले बंध निर्माण करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. या पद्धतीचा वापर करून शुश्रूषा करण्यात आलेल्या बाळांची पालकांसोबत खूप जास्त जवळीक निर्माण होते असे निदर्शनास आले आहे.
• त्वचेशी त्वचेचा संपर्क आल्यामुळे मेंदूचा विकास होण्यास आणि भावनिक बुद्धिमत्ता निर्माण होण्यास सुरुवात होते. डोळ्यांशी डोळ्यांचा कॉन्टॅक्ट होत राहिल्याने (आय-टू-आय कॉन्टॅक्ट), जवळीक, प्रेम आणि विश्वास यामुळे सामाजिक बुद्धिमत्तेचा देखील विकास होण्यात मदत मिळते.
• त्वचेशी त्वचेचा संपर्क पद्धतीचा वापर केल्याने स्तनपानाला आपसूकच प्रोत्साहन मिळते. बाळ आणि आई या दोघांच्याही आरोग्याच्या दृष्टीने स्तनपान अतिशय लाभदायक आहे. बाळाचे पोषण आणि विकास यामध्ये स्तनपानाचे योगदान लक्षणीय असते.
• खासकरून कमी वजनाच्या बाळांच्या बाबतीत आणि थंडीमध्ये शरीराचे तापमान योग्य राखले जाणे आवश्यक असते.
• या पद्धतीने काळजी घेतल्या गेलेल्या बाळांचे वजन चांगले वाढू लागते, ती बाळे बराच काळ, अगदी शांत झोपतात, जागी झाल्यानंतर देखील निवांत असतात आणि कमी रडतात.
असे अनेक फायदे मिळत असल्यामुळे कांगारू केयर दिली जाणारी बाळे अधिक जास्त निरोगी, जास्त हुशार असतात व त्यांची आपल्या कुटुंबासोबत जास्त जवळीक असते. ही पद्धत बाळाबरोबरीनेच आई, संपूर्ण कुटुंब, समाज आणि संपूर्ण देशाच्या दृष्टीने लाभदायी आहे.
आईच्या दुधामुळे नवजात बालकांना मिळते परिपूर्ण सुदृढ सुरुवात
बाळाचे वडील व त्वचेशी त्वचेचा संपर्क तंत्र
आईप्रमाणेच बाळाचे वडील देखील बाळाची काळजी घेण्यासाठी त्वचेशी त्वचेचा संपर्क तंत्र वापरू शकतात. बाळ आणि त्याचे वडील या दोघांसाठी देखील हे फायदेशीर ठरते. या पद्धतीचा वापर केल्याने बाळाचे वडील बाळाची अगदी उत्तम प्रकारे काळजी घेऊ शकतात, बाळाची जबाबदारी आपण सक्षमपणे उचलू शकतो असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होतो. यामुळे बाळ आणि बाबा यांच्यात जवळीक होते, बाळाची काळजी घेणाऱ्या प्रमुख व्यक्तींपैकी आपण एक आहोत हा आनंद वडिलांना मिळतो. बाळाला भूक लागली किंवा ते त्रासलेले आहे हे कसे ओळखावे हे वडिलांना समजून घेता येते. वडील जेव्हा बाळाला कांगारू केयर देत असतील तेव्हा आई आराम करू शकते किंवा झोपू शकते, जेणेकरून बाळाची शुश्रूषा करण्याची ऊर्जा आणि उत्साह तिच्यामध्ये कायम टिकून राहील.
त्वचेशी त्वचेचा संपर्क तंत्र वापरून बाळांचे शारीरिक व मानसिक आरोग्य स्थिर राहते व सुधारते. या बाळांच्या मनात सुरक्षिततेची, निश्चिन्ततेची भावना निर्माण होते आणि त्यांची सर्व ऊर्जा उत्तम विकासासाठी वापरली जाते. सर्वच बाळांच्या बाबतीत कांगारू केयर पद्धतीचा वापर केला जावा अशी सूचना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन आणि डॉक्टरांनी केली आहे.
नवजात बाळाच्या आईला माहीत हव्या ‘या’ 4 कंफर्टेबल ब्रेस्टफिडींग पोझिशन्स
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक