खणाची साडी ही सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे. याशिवाय खणाच्या साडीवरील ट्रेंडी आणि डिझाईनर ब्लाऊज हेदेखील ट्रेंडमध्ये आहेत. पण याहीपेक्षा सध्या अधिक ट्रेंडमध्ये आहे ते म्हणजे खणाचे ट्विनिंग. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, खणाचे ट्विनिंग म्हणजे काय? तर आई – मुलगा, आई – मुलगी अथवा नवरा – बायको अशा जोड्या ट्विनिंग करत खणाचे कपडे सणासाठी घालत आहेत. खणाच्या ट्विनिंगला सध्या खूपच पसंती मिळत असलेली दिसून येत आहे. सणासाठी काहीतरी वेगळं करायचं असेल तर नक्की काय घालायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. आपल्याकडे नवं वर्ष सुरू झाल्यापासून अगदी वर्ष संपेपर्यंत अनेक सण असतात. त्यामुळे तुम्ही या सणांसाठी खणाचे ट्विनिंग कपडे नक्कीच घालू शकता. हा उत्तम पर्याय आहेत. याशिवाय यासह खण मंगळसूत्रांचा ट्रेंडही आला आहे. एकूण सध्या सगळीकडे खणाला अधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे.
ट्विनिंग ठरत आहे सेलिब्रिटींचीही पसंती
केवळ महिलाच नाही तर पुरूषांनाही हल्ली खणांच्या कपड्यांनी भुरळ घातली आहे. कोणत्याही सणाला अथवा कार्यक्रमांना महिलांना मॅचिंग अशी जॅकेट्स हल्ली मिळू लागली आहेत आणि ट्विनिंग कॉम्बिनेशन दिसायला उत्तम दिसतं. तसंच यामधील लुक अधिक उठावदार आणि आकर्षक दिसून येतो. केवळ सामान्यच नाही तर अगदी सेलिब्रिटींनाही या साड्यांची आणि कपड्यांची भुरळ पडलेली दिसून येत आहे. अनेक कार्यक्रमांना सेलिब्रिटीही, विशेषतः मराठी सेलिब्रिटी खणाच्या साड्यांना पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. तर नवजात बाळांना त्यांच्या बारशासाठीही खास खणाचे जॅकेट्स शिऊन घेत असल्याचे सोशल मीडियावर दिसून येत आहे. आई आणि बाळाचे कपडे ट्विनिंग करत अत्यंत सुंदर आणि आकर्षक फोटोज पाहायला मिळत आहेत. इतकंच नाही तर अगदी कुटुंब एकत्र खणाचे ट्विनिंग करत असल्याचेही पाहायला मिळत आहे.
खणाची साडी आणि कुरत्याला अधिक मागणी
सणासाठी वेगवेगळ्या रंगाचे आणि विविध डिझाईन्सचे खणाचे कुरते आणि खणाच्या साड्या हल्ली अधिक प्रमाणात घेतल्या जातात. ‘मीरा – द लूम अफेअर’ हा ब्रँड तर खणाच्या साडीसाठीच प्रसिद्ध आहे. या ब्रँडची सर्वेसर्वा असणाऱ्या सोनाली डाळवाले यांनी सांगितले की, खणाच्या ट्विनिंगला सर्वाधिक पसंती दिली जाते. विशेषतः खणाची साडी आणि कुरत्याला अधिक मागणी असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा ट्विनिंग कॉम्बिनेशन खणाचा ट्रेंड सुरू केला आहे तो सोनालीने. संक्रांतीच्या सणापासून याची सुरूवात झाली आणि आता यामध्ये अधिकाधिक ट्रेंडमधील खणाचे डिझाईन्स सोनाली बनवत असल्याचे तिने आम्हाला सांगितले.
डोळ्यांना आकर्षित करणारे कॉम्बिनेशन
आईचा पदर अथवा मुलाचे जॅकेट अथवा मुलीचा फ्रॉक किंवा नवऱ्याचे जॅकेट ज्या रंगाचे असते त्याच रंगाची बायकोची खणाची साडी असे ट्विनिंग कॉम्बिनेशन करण्यात येते. या कॉम्बिनेशनला सध्या खूपच मागणी आहे आणि त्याशिवाय खूप पसंतीही आहे. तर यासह ऑक्सिडाईज्ड दागिन्यांनाही मागणी आहे. कारण खणाच्या साडीसह हे दागिने अधिक उठावदार दिसतात आणि यामध्ये महिला अधिक आकर्षक दिसतात. या ट्विनिंगमध्ये हाथी – मोर खण साडी कलेक्शन, बहीण भावाचे खणाचे फ्रॉक आणि सदरा – धोतर कॉम्बिनेशन, नवरा – बायको आणि बाळासाठी योग्य कॉम्बिनेशन असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
सध्या बाजारामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला हे कॉम्बिनेशन दिसून येत आहे. तुम्हालाही यावर्षी कोणत्याही सणासाठी असे ट्विनिंग करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही नक्कीच सोशल मीडियाचा आधार घेऊन डिझाईन्सचा पर्याय निवडू शकता.