लॉकडाऊनमध्ये घरात राहून आपण अनेक रेसिपीज करुन पाहिल्या आहेत. अनेक चमचमीत पदार्थ असे पदार्थ जे आपण या पूर्वी कधीही करण्याचा प्रयत्न केला नाही असे पदार्थही या काळात आपण बनवून खाल्ले आहेत. पण आता त्याचाही कंटाळा आला आहे. आता पुन्हा एकदा सगळं काही अनलॉक होतंय म्हणजे पुन्हा आपल्या आरोग्याची, डाएटची काळजी घेण्याची वेळ आली आहे. तुम्हालाही पुन्हा फिट व्हायचं आहे. त्यासाठी चांगले पदार्थ खायचे असतील तर आज आम्ही तुमच्यासोबत मिश्र डाळींच्या काही रेसिपीज शेअर करणार आहोत या रेसिपीज करायला सोप्या आहेतच पण त्य चवीलासुद्धा चांगल्या आहेत. आणि महत्वाचे म्हणजे त्या पौष्टिक आहेत. मग जाणून घेऊया या रेसिपीज
मिश्र डाळींचे सूप
ज्यावेळी काहीही खाण्याची इच्छा होत नसेल. पण पौष्टिक असा पर्याय हवा असेल तर तुम्ही मिश्र डाळींचे सूप करुन पिऊ शकता. ही रेसिपी करण्याची अनेकांची पद्धत वेगळी असेलही. पण आज आपण सोपी रेसिपी जाणून घेऊया.
साहित्य: तुमच्या आवडीची मिश्र डाळ 1 वाटी, 1 कांदा, 1 टोमॅटो, तिखटानुसार मिरची, आलं-लसूण, जिरे,हिंग, हळद, धणा पावडर, गरम मसाला (आवश्यक असल्यास), भाज्या आवडत असल्यास, मीठ
कृती : डाळ धुवून कुकरमध्ये छान शिजवून घ्या. डाळीचा लगदा व्हायला हवा इतकी डाळ शिजायला हवी. (मीठ घालून डाळ शिजवू नका कारण ती पटकन शिजत नाही). कुकरमधून डाळ काढून ती छान स्मॅश करुन घ्या. एका कढईमध्ये थोडेसे तेल गरम करुन त्यामध्ये जिरे, हिंग, आलं लसूण याची फोडणी द्या. त्यावर कांदा अगदी गुलाबी होईपर्यंत परतून घ्या (कांदा अगदी बारीक चिरा.) कांदा छान शिजल्यावर टोमॅटो घालून सगळे मसाले घाला. चवीनुसार मीठ (भाज्या असल्यास त्या भाज्या किंवा पटकन शिजणाऱ्या भाज्या निवडा) त्यामध्ये शिजलेली डाळ घालून साधारण दोन ते तीन ग्लास पाणी घाला. डाळ छान उकळू द्या आणि मग त्यावर कोथिंबीर घालून गरम गरम सूप घ्या.
वजन नियंत्रणात ठेवणाऱ्या या सोप्या सूप रेसिपीज, नक्की करुन पाहा
मिश्र डाळींचा डोसा
तांदूळ आणि उडदाचा डोसा आपण रोजच खातो. पण थोडे हेल्दी खाण्यासाठी आज आपण मिश्र डाळींचा डोसा कसा करायचा ते जाणून घेऊया. ही रेसिपीही फार सोपी आहे.
साहित्य: ¾ कप तांदूळ, 2 चमचे चणा डाळ, उडिद डाळ, मूग डाळ, छिलकेवाली मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, 3 लाल सुक्या मिरच्या, जिरे, हिंग, मीठ, कडिपत्ता, तेल
कृती: एका भांड्यात सगळ्या डाळी, तांदूळ आणि सुक्या मिरच्या एकत्र करुन त्यात दोन कप पाणी घाला आणि सगळे मिश्रण साधारण 3-4 तासांसाठी भिजत घाला. चांगले भिजल्यानंतर डाळीचे पाणी काढून टाका. गरज वाटल्यास थोडे पाणी घालून धुवून घ्या. भिजलेल्या डाळी मिक्सरमधून जाडसर वाटा. तयार मिश्रणात जिरे, कडिपत्ता, हिंग, मीठ घाला. डोसा पॅनवर गरम झाल्यावर त्यावर तेलाचा हात लावून छान डोसा पसरवून घ्या. मस्त कुरकुरीत होईपर्यंत डोसा पॅनवर भाजू द्या. मस्त चटणीसोबत डोसा सर्व्ह करा.
मायक्रोवेव्हमध्ये होणाऱ्या 5 चविष्ट भारतीय रेसिपीज (5 Delicious Indian Microwave Recipes)
मिश्र डाळींचे अप्पे
अप्पे आपण नेहमीच खातो. पण तुम्ही मिश्र डाळींचे अप्पे खाल्ले आहेत का? चला तर आज पाहुया ही रेसिपी
साहित्य : दोन वाटी जाडा तांदूळ, ½ वाटी, चणा डाळ, मूग डाळ, उडिद डाळ, 1टेबलस्पून मेथी, बारीक चिरलेला कांदा, मिरची, आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर, तेल, मीठ, जीर, मोहरी, हिंग
कृती: डाळी एकत्र करुन त्या स्वच्छ धुवा. त्यात थोडे पाणी घालून डाळी भिजत घाला. तांदूळही स्वच्छ धुवून भिजत घाला. साधारण 4 ते 5 तास भिजत घातल्यानंतर डाळ -तांदूळ वाटून घ्या. हे मिश्रण आता डोशाप्रमाणे फुगण्यासाठी साधारण 8 ते 9 तास ठेवा. पीठ छान फुगून आल्यानंतर त्यामध्ये कांदा, कोथिंबीर घाला. फोडणी पात्रास तेल घालून त्यामध्ये जीर, मोहरी, हिंग, मिरची घाला. फोडणी तयार अप्पे पिठात ओतून एकजीव करुन अप्पे पात्रास अप्पे पीठ घालून छान शिजवून घ्या. तुमचे मिश्र डाळींचे अप्पे सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.
आता मिश्र डाळींपासून या रेसिपी करायला अजिबात विसरु नका
अशा पद्धतीने तयारी केलीत तर तुमची बिर्याणी नेहमीच होईल बेस्ट