ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
महिलांविषयी आदर हा कायमस्वरुपी असायला हवा – वैदेही परशुरामी

महिलांविषयी आदर हा कायमस्वरुपी असायला हवा – वैदेही परशुरामी

महिला दिनाच्या दिवशी आपल्या आयुष्यात खास स्थान निर्माण केलेल्या महिलांची माहिती आपण घेत असतो. अर्थात ही माहिती आपण वर्षभर घेत असलो तरीही महिला दिन हा प्रत्येक स्त्री साठी काहीतरी खास असतोच. महिला दिनाची सुरुवात होऊन साधारण एक दशक उलटून गेलं आहे. पण आता जास्त प्रमाणात या दिनाला महत्त्व प्राप्त झालं आहे. अर्थात महिला दिन केवळ एक दिवस साजरा करून इतर दिवशी त्यांना वाईट वागणूक द्यायची हे चूक आहे. पण महिलांचा आदर करण्यासाठी हा एक दिवस साजरा करण्याचा दृष्टीकोनही नक्कीच चांगला आहे. यावेळी आम्हीदेखील तुमच्यासाठी काही खास व्यक्तींची ओळख या महिला दिनानिमित्त करून देणार आहोत, ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक ध्येय गाठलं आहे.

वैदेही परशुरामी हे नाव मराठी आणि आता ‘सिम्बा’च्या यशानंतर हिंदी चित्रपटसृष्टीलाही नवं नाही. यावर्षामध्ये वैदेहीचे ‘काशीनाथ घाणेकर’ आणि ‘सिम्बा’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. अशा या यशस्वी आणि गोड मराठी अभिनेत्रीची नक्की कशी सुरुवात झाली? तिला आधीपासूनच या क्षेत्रात यायचं होतं का? कशी मिळाली पहिली संधी याबाबत महिला दिनानिमित्त ‘POPxo Marathi’ ने वैदेहीशी गप्पा मारल्या. वैदेही नक्की कशी आहे आणि तिला पुढे नक्की काय करायचं आहे हे आम्ही महिला दिनानिमित्त खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. खास बातचीत वैदेही परशुरामीबरोबर 

महिला दिन म्हणजे मूल्य जपणं महत्त्वाचं

vaidehi 4

ADVERTISEMENT

कोणताही एक दिवस साजरा करणं याला माझा विरोध नाही. पण त्या दिवसाची मूल्य कायमस्वरूपी जपणं महत्त्वाचं आहे असं महिला दिनाबाबत वैदेहीने मत मांडलं. महिला दिन साजरा करणं हा अप्रोच नक्कीच चांगला आहे. त्यासाठी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा वैदेहीने दिल्या. महिला दिनाची व्याख्या करणं खरं तर माझ्यासाठी खूप कठीण आहे. महिलांना आदर हा कायमस्वरुपी द्यायला हवा. महिला कुठेही मागे नाहीत. दिन साजरा करा पण तुमच्या मनामध्ये नेहमीच महिलांविषयी आदर बाळगा. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा दिवस पाळता अर्थात साजरा करता त्या व्यक्तीला नियमित तुम्ही तो आदर आणि ती काळजी द्यायला हवी. जेणेकरून प्रत्येक दिवस प्रत्येक महिलेसाठी खास असेल अशी व्याख्या वैदेहीने यावेळी मांडली. खरं तर वैदेहीकडे पाहिल्यानंतर ती कधीही मस्तीखोर असेल असं वाटत नाही. तिच्याशी बोलतानाही ती अतिशय समंजस आणि प्रत्येक गोष्टीकडे व्यवस्थित गांभीर्याने बघणारी कलाकार आहे असं वाटतं. आपलं महिला दिनाविषयी मत मांडतानाही वैदेहीने हा वेगळेपणा नक्कीच जपला आहे. तसंच महिलांसाठी केवळ एकच दिवस साजरा करू नका. तर नेहमीच मनात त्यांचा आदर ठेवा आणि त्याप्रमाणे वागा आणि महिलांनाही त्याचप्रमाणे वागणूक द्या असा मोलाचा सल्लाही यावेळी वैदेहीने दिला आहे.

कशी झाली सुरुवात?

vaidehi 3

वैदेहीला हा प्रश्न विचारल्यानंतर तिचं आलेलं उत्तर हे अर्थातच आश्चर्यकारक होतं. कारण तिच्याकडे बघितल्यानंतर ती अभिनय क्षेत्रामध्ये काम करण्यासाठीच जन्माला आलेली आहे असं वाटावं इतकी तिची अभिनयक्षमता चांगली आहे. पण वैदेही म्हणाली की, तिचा या क्षेत्रात येण्याचा कोणताही विचार नव्हता. तिच्या कथ्थक गुरु आशा जोगळेकर यांच्या ती वयाच्या सातव्या वर्षापासून शिक्षण घेत होती. अशाच एका कथ्थक परफॉर्मन्सच्यावेळी अभिनेता आणि दिग्दर्शक महेश कोठारे आले होते. त्यांना त्यावेळी आदिनाथला चित्रपटात लाँच करायचं होतं आणि त्यावेळी त्यांना नवा चेहरा हवा होता. त्याचवेळी परफॉर्मन्समध्ये त्यांना वैदेही आवडली आणि त्यांनी तिला चित्रपटासाठी विचारलं. आधी वैदेहीचा असा कोणताही विचार नव्हता. पण माणसं चांगली आहेत असा विचार करून तिने या चित्रपटासाठी होकार दिला आणि तिच्या चित्रपटातील करिअरला सुरुवात झाली. तिने हा चित्रपट केला तेव्हा ती बारावीत होती. पण महत्त्वाची बाब म्हणजे तिला शिक्षण पूर्ण करायचं होतं. चित्रपटात आल्यानंतरही तिने आपलं बी. ए. इंग्रजी लिटरेचरमध्ये पूर्ण केलं आणि त्यानंतर तिने कायद्याचं शिक्षण घेतलं. तिच्या घरातही सर्वांनी कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं आहे. याशिवाय वैदेहीने आपलं नृत्यप्रेम असणारं कथ्थक प्रशिक्षण पूर्ण करत त्यामध्येही मास्टर्स केलं.

ADVERTISEMENT

जाणून घ्या जागतिक महिला दिन माहिती

‘सिम्बा’ची मजेशीर गोष्ट

vaidehi2

डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ने सगळीकडेच वाहवा मिळवली. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या कामाची चर्चा झाली. वैदेहीचं कामही सर्वच प्रेक्षकांना आवडलं आणि वैदेहीला हिंदी चित्रपटसृष्टीतही एक चांगला ब्रेक मिळाला. पण हा चित्रपट वैदेहीला नक्की कसा मिळाला हे बऱ्याच जणांना माहीत नसेल. तर याविषयीदेखील वैदेहीनं सांगितलं. वैदेहीला हा चित्रपट मिळण्याआधी तिने प्रसिद्ध संगीतकार यांच्या ‘लाडली’ या महिलांची शक्ती सांगणारा एक संगीत व्हिडिओ केला होता. या व्हिडिओमधील काम बघून रोहित शेट्टीच्या कास्टिंग टीमने तिला फोन करून सिम्बासाठी ऑडिशन द्यायला बोलावलं. पण पहिल्यांदी वैदेहीला कॉल आल्यानंतर तिचा विश्वास बसला नाही. कोणीतरी आपली थट्टा करत असल्याचं तिला वाटलं. कारण रोहित शेट्टी आपल्याला का आपल्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी विचारतील असा प्रश्न तिच्या मनात आला. पण पुन्हा एकदा कास्टिंग टीमकडून कॉल आल्यानंतर वैदेहीने ऑडिशन दिली आणि तिची या भूमिकेसाठी वर्णी लागली असं वैदहीनं हसत सांगितलं.

ADVERTISEMENT

मोजकी पण चांगली कामं करायची आहेत

vaidehi 1

वैदेहीचे आता नवे प्रोजेक्ट कोणते आहेत याची प्रेक्षकांना आता उत्सुकता नक्कीच असेल. पण वैदेहीला मोजकी आणि चांगली अर्थात प्रेक्षकांच्या लक्षात राहतील अशी कामं करायची आहेत. मुळात प्रेक्षकांच्या लक्षात राहतील अशी कामं करायची असून वैदेहीला अभिनेत्री व्हायचं आहे. नुसतं हिरॉईन म्हणून काम करत राहायची वैदेहीची इच्छा नाही. आतापर्यंत भूमिका निवडताना भूमिका किती मोठी वा त्यामध्ये तिला किती काम आहे हे पाहण्यापेक्षा ती प्रेक्षकांच्या किती लक्षात राहील हे जास्त महत्त्वाचं अशाच भूमिका वैदेहीने केल्या आहेत. अगदी काशीनाथ घाणेकरमधील कांचन असो वा सिम्बामधील आकृती असो या दोन्ही व्यक्तिरेखा वैदेहीने अप्रतिम साकारल्या आहेत. वैदेहीने आतापर्यंत ‘वृंदावन’, ‘कोकणस्थ’, ‘एफयू’ आणि ‘वेड लावी जीवा’ असे मराठी चित्रपट केले आहेत. 2013 मध्ये वैदेहीने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पण तिला खरी ओळख दिली ती ‘काशीनाथ घाणेकर’मधील कांचनच्या भूमिकेने. वैदेहीने याआधी बॉलीवूडचे महानायक अमिताभ यांच्याबरोबरही ‘वजीर’ या चित्रपटात छोटी भूमिका केली होती. त्यामुळे भूमिका लहान असल्या तरीही वैदेहीचं काम लक्षात राहतं. कोणतंही काम निवडताना अतिशय काळजीपूर्वक काम निवडत असल्याचं वैदेहीने यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे कामामध्येही तोचतोचपणा येत नाही. वैदेही कामाच्या बाबतीत अतिशय चोखंदळ आहे. त्यामुळे भरमसाट भूमिकांची विचारणा झाली तरीही सध्या ती अशाच भूमिकेची वाट पाहत आहे, ज्यामध्ये काम केल्यानंतर तिला समाधान मिळेल आणि तिची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहील.  

वैदेहीची सुंदरतेची व्याख्या

ADVERTISEMENT

vaidehi

वैदेही मुळातच दिसायला खूप सुंदर आहे. 2012 मध्ये वैदेहीला ‘मिस क्लिन अँड क्लिअर फ्रेश फेस’ असा पुरस्कारही मिळाला होता. त्यामुळे आम्ही तिला तिची नक्की सुंदरतेची व्याख्या काय असंही विचारलं. त्यावर वैदेहीने क्षणाचाही विचार न करता सांगितलं, ‘तुम्ही व्यक्ती म्हणून कसे आहात हे तुमच्या चेहऱ्यावर झळकतं. तुम्ही कसे दिसता हे तुम्हाला अनुवंशिकतेने मिळत असतं. पण तुम्ही जे वागता आणि त्याप्रमाणे स्वतःला ठेवता ते तुमचं अंतर्गत सौंदर्य महत्त्वाचं असतं.’ अजूनही इतकं यश मिळालेलं असूनही वैदेही अगदी नम्र आणि अगदी डाऊन टू अर्थ आहे. त्यामुळेच तिच्या चेहऱ्यावर तिचं वागणं उमटत असून तिचं सौंदर्य प्रेक्षकांना अधिक खुलून दिसतं असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही.

वैदेहीने आतापर्यंत निवडलेल्या विविध भूमिकांमधून तिच्या अभिनयाची क्षमता तर आता सर्वच प्रेक्षक आणि चाहत्यांना कळली आहे. पण आम्ही तुम्हाला वैदेहीची नक्की सुरुवात कशी झाली आणि नेमकी वैदेही आज या स्थानापर्यंत कशी पोहलची आहे याची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. वैदेहीच्या दृष्टीकोनातून नक्की महिला आणि त्यांचं स्थान कसं आहे याबद्दलही आम्ही तुम्हाला सांगितलं आहे.

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

फोटो सौजन्य – Instagram 

हेदेखील वाचा  

#StrengthOfAWoman या आहेत भारतातील नवदुर्गा

#StrengthOfAWoman : ‘या’ आहेत बॉलीवूडच्या सुपरवुमन ज्यांनी स्वबळावर केले चित्रपट सुपरहिट

ADVERTISEMENT

#StrengthOfAWoman : दीपिका पादुकोण, सोनम कपूरसारख्या अनेक बॉलीवूड अभिनेत्रींचा आहे वेगळा बिझनेस

06 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT