प्रियंका मिस वर्ल्ड झाल्यानंतर तिने मेहनतीने बॉलीवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. आता तर तिला हॉलीवूडमध्येही एक खास ओळख मिळाली आहे. मात्र विश्व सुंदरी ते एक लोकप्रिय अभिनेत्री होण्याचा तिचा प्रवास साधा आणि सोपा नक्कीच नव्हता. या प्रवासात तिच्यासमोर काटेकुटेही होते ज्यांना तुडवत तिला स्वतःला सिद्ध करावं लागलं होतं. याबाबतच तिने नुकताच एका मुलाखतीत एक किस्सा शेअर केला आहे. तिच्या मते मिस वर्ल्डचा पुरस्कार मिळण्याआधी काही क्षण आधी तिच्यासोबत एक अपघात झाला होता. ज्यामुळे कदाचित तिचं करिअर खराब होऊ शकलं असतं. यासाठीच जाणून घ्या असं काय घडलं होतं प्रियंकासोबत त्या कार्यक्रमात…
प्रियंकासोबत काय घटलं होतं मिस वर्ल्ड होण्याआधी
प्रियंकाने जिमी फॉलन सोबत ‘दी टुनाइट शो’मध्ये झालेल्या मुलाखतीत या घटनेचा उल्लेख केलेला आहे. तिने शेअर केलं आहे की, मिस वर्ल्डचा पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी जेव्हा तिला स्टेजवर जायचं होतं त्याच्या अगदी काही क्षण आधी तिची त्वचा भाजली होती. जे डाग लपवण्यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागली. ती तिचे केस कर्ल करत होती. तिथे नव्वद एक मुली आसपास फिरत होत्या. बॅकस्टेजमध्ये त्या इकडे तिकडे फिरून त्यांची कामं करत होत्या. प्रियंकाला तिथे तिचा मेकअप आणि हेअरस्टाईल लवकर पूर्ण करायची होती. मात्र त्या गडबडीत तिला कुणाचा तरी धक्का लागला आणि तिच्या त्वचेवर कर्लरमुळे चटका लागला. मग प्रियंकाला तिचा मेकअप आणि हेअरस्टाईल सोबत तिच्या त्वचेवर पडलेला हा डाग लपवण्याचंही आव्हान त्यामुळे समोर उभं राहीलं. मात्र तिने ते लीलया पेलत तो डाग कन्सिलरने लपवला आणि त्या भागावर केसांची बट काढत हेअर स्टाईल केली. प्रियंका आजही जेव्हा तिचे मिस वर्ल्डच्या इव्हेंटमधले फोटो बघते. तेव्हा तिला ही घटना आठवते. लोकांना वाटतं की तिची खास हेअर स्टाईल होती. मात्र त्या हेअर स्टाईल मागचं गुपित काही वेगळंच होतं.
प्रियंकाच्या करिअरचा आव्हानात्मक प्रवास
प्रियंका या अपघातून वाचली आणि हुशारी वापरत तिने मिस वर्ल्डचा पुरस्कारही प्राप्त केला. शिवाय त्यानंतर तिने कधीच वळून पाहिलं नाही. तिच्या बॉलीवूड करिअरला मागच्या वर्षी तब्बल वीस वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याचप्रमाणे ती आता बॉलीवूड आणि हॉलीवूडची एक सुपरस्टारही आहे. या सर्व प्रवासाचं वर्णन करणारं ‘अनफिनिश्ड’ हे तिचं आत्मचरित्रही नुकतंच प्रकाशित झालं आहे. ज्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पुस्तकात तिने तिच्या आयुष्यात घडलेल्या कडूगोड आठवणींचा मागोवा घेतला आहे. लवकरच प्रियंका ‘टेक्ट फॉर यु’ या चित्रपटातून दिसणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग लंडनमध्ये पूर्ण झालं आहे.काही दिवसांपूर्वीच तिचा ‘वी कॅन ही हिरोज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचप्रमाणे ‘दी व्हाईट टायगर’ या बॉलीवूड चित्रपटातही तिची एक महत्त्वाची भूमिका पाहता आली. या चित्रपटात ती राजकुमार राव यांच्यासोबत मुख्य भूमिकेत होती. त्यामुळे प्रियंकाच्या अभिनयाची मुळं पार साता समुद्रापार रोवली गेली आहेत. मात्र हा प्रवास तिच्यासाठी नक्कीच सोपा नव्हता हेच या घटनेतून दिसून येतं.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
कला आणि चित्रपटातील योगदानासाठी आर माधवनला मिळाला सन्मान